Pale Blue Dot: नासाने जारी केली पृथ्वीचा सर्वांत दुरून काढलेला फोटो

पेल ब्ल्यू डॉट

फोटो स्रोत, NASA/jpl-caltech

    • Author, जोनाथन अॅमोज
    • Role, विज्ञान प्रतिनिधी

आजवर अंतराळातून काढण्यात आलेल्या छायाचित्रांपैकी हे छायाचित्र सर्वोत्तम आहे, यात शंका नाही. या चित्रात जो फिकट निळा ठिपका दिसतोय ती आपली पृथ्वी आहे.

खगोलीय भाषेत त्याला 'Pale Blue Dot' असं म्हणतात. वोएजर-1 या अंतराळयानाने पृथ्वीपासून तब्बल 6 अब्ज किमी अंतरावरून मागे वळून हे छायाचित्र टिपलं होतं. या घटनेला काल 14 फेब्रुवारी रोजी 30 वर्षं पूर्ण झाली आहेत.

यानिमित्ताने नासाने 30 वर्षं जुन्या या छायाचित्रावर आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वॉफ्टवेअरच्या माध्यमातून पुनर्प्रक्रिया करून अधिक स्पष्ट प्रत जारी केली आहे.

मूळ छायाचित्राचा मान राखत ही प्रक्रिया केल्याचं नासाने म्हटलं आहे.

News image

या चित्रात पृथ्वी अजूनही विशाल अंतराळात एकमेव, चमकदार निळा ठिपका असल्याचं दिसतं, आणि नवीन छायाचित्रातही या ठिपक्यावर सूर्यप्रकाश पडलेला दिसतो. फरक एवढाच की नवीन छायाचित्र अधिक 'स्वच्छ' आहे आणि त्यात पृथ्वी चटकन ओळखता येते.

वोएजर-1 या अंतराळ यानाने अवकाशात काही फोटो काढले आणि त्यानंतर यानातील ऊर्जेची बचत करण्यासाठी त्याचा कॅमेरा बंद करण्यात आला. जेव्हा कॅमेरा बंद करण्याची कमांड देण्यात आली तेव्हा शेवटी काढलेल्या काही फोटोंमध्ये पृथ्वीचं हे छायाचित्र हाती आलं होतं.

यानाने ग्रहांचा दौरा पूर्ण केला होता आणि ते तारकासमूहाकडे निघाल्याने कॅमेऱ्याची गरज नव्हती.

मात्र, या मोहिमेत इमेजिंग वैज्ञानिक म्हणून काम करत असलेले कार्ल सॅगन आणि कॅरोलिन पोर्को या दोन शास्त्रज्ञांनी आपल्या वरिष्ठांना गळ घातली, आणि पावर डाऊन कमांड पाठवण्यापूर्वी संपूर्ण 'सौर मालिकेचा फॅमिली पोट्रोट' तयार करण्यास सांगितलं.

वोएजर यानाने पाठवलेल्या 60 फ्रेम्समध्ये सूर्य आणि सहा मोठे ग्रह दिसले. यात शुक्र, पृथ्वी, गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे सहा ग्रह या फ्रेम्समध्ये दिसले.

बुध आणि मंगळ (प्लुटोसुद्धा) यानाने काढलेल्या फोटोमध्ये टिपले गेले नाही. त्यामागे बरीच कारणं आहेत. उदाहरणार्थ, लाल ग्रह असलेला मंगळ कॅमेरा ऑप्टिक्सच्या आत सूर्यकिरणं बाऊंस झाल्यामुळे दिसू शकला नाही.

आजवर वेगवेगळ्या अंतराळयानांनी अवकाशातली अनेक छायाचित्रं टिपली आहेत. मात्र 'फिकट निळा ठिपक्याचं' हे छायाचित्र इतकं गाजण्यामागंच एक कारण म्हणजे सॅगन यांनी या ठिपक्याविषयी लिहिलेलं पुस्तक.

त्यांनी Pale Blue Dot : A Vision of the Human Future in Space हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात ते लिहितात, "पुन्हा एकदा त्या ठिपक्याकडे नीट पहा. ते आपलं घर आहे. ते आहोत आपण." ते पुढे म्हणतात, "हा सूर्यकिरणांमध्ये तरंगणारा बारिकसा धुलीकण आहे."

पेल ब्ल्यू डॉट

फोटो स्रोत, NASA/jpl-caltech/ssi

या लिखाणाच्या माध्यमातून अवकाशाच्या शोधातून मिळालेला सखोल 'दृष्टिकोन' उत्तम प्रकारे मांडण्यात आला आहे.

2013 साली या फोटोविषयी बीबीसीशी बोलताना कॅरोलिन पॉर्को म्हणाल्या होत्या की या फोटोने "ब्रह्मांडातल्या आपल्या स्थानाचं एक चमकदार आणि खरं रुप आपल्याला दाखवलं आहे. हे चित्र आपला सर्व भ्रम दूर करतो आणि आपला आपल्या खऱ्या, शक्तिशाली ओळखीशी सामना करून देतो. एक अशी ओळख जी आपल्याला पुढे नेते."

वोएजर यानाच्या इमेजिंग टीममध्ये असलेले एकमेव ब्रिटिश वैज्ञानिक गॅरी हंट म्हणतात की हे छायाचित्र पूर्वी कधीही नव्हतं इतकं आज प्रासंगिक आहे. ते पर्यावरण अभ्यासासह पृथ्वी विज्ञान क्षेत्रात काम करतात. आपल्या व्याख्यानांमध्ये ते कायम हे छायाचित्र दाखवत असतात.

या आठवड्याच्या बीबीसी 4 रेडियोच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, "मी ज्या ज्या वेळी पर्यावरणाविषयी बोलतो तेव्हा बदल घडवण्यासाठी तुम्ही आज काय करत आहात, याविषयी बोलत असतो. मी हे छायाचित्र दाखवतो कारण त्यात पृथ्वी एक ठिपका असल्याचं दिसतं. ही छोटीशी निळ्या ठिपक्याएवठी पृथ्वी हे एकमेव ठिकाण आहे, जिथे आपण राहू शकतो आणि आपण तिलाच घाण करतोय."

कॅरोलिन पॉर्को यांनी 2013 साली कॅसिनी प्रोब यांच्यासोबत मिळून 'पेल ब्लू डॉट' पुन्हा चित्रित केला. यासाठी त्यांनी अंतराळयानाची कॅमेरा यंत्रणा पृथ्वीच्या दिशेने वळवली आणि शनीच्या कड्यांच्या खालून पृथ्वीच्या निळ्या ठिपक्याचं छायाचित्रं टिपलं.

पेल ब्ल्यू डॉट

फोटो स्रोत, NASA

आपल्या घराचं छायाचित्र काढणं आता लांबच्या अवकाश मोहिमांचा अविभाज्य भागच बनलं आहे.

'The New Horizon' हे अंतराळयान 2015 साली प्लुटोच्या अगदी जवळून गेलं होतं. सध्या हे यान पृथ्वीपासून तब्बल 7 अब्ज किमी अंतरावर आहे. या अंतराळयानातूनही पृथ्वीचं छायाचित्र टिपण्याचा प्रयत्न होणार आहे.

मात्र, यासाठी सौरमालेच्या मध्यभागी म्हणजे सूर्याच्या दिशेने छायाचित्र काढावं लागणार आहे. कॅमेरा सूर्याच्या दिशेत ठेवून छायाचित्र काढण्यात एक धोका आहे. यामुळे यानातल्या लांब पल्ल्याच्या कॅमेऱ्यामध्ये असलेल्या संवेदनशील डिटेक्टर्सवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे 'The New Horizon' मोहिमेची मूळ उद्दीष्टं पूर्ण होत नाहीत, तोवर तरी या यानाच्या कॅमेऱ्यातून पृथ्वीचं चित्र काढलं जाणार नाही.

बीबीसी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)