विदर्भात उल्कापात की उपग्रहाचे तुकडे? अवकाशातील रहस्यमयी दृश्याने नागरिक चकित

अवशेष
    • Author, प्रवीण मुधोळकर,
    • Role, बीबीसी मराठीसाठी, नागपूरहून.

शनिवारी (2 एप्रिल) संध्याकाळी आणि रात्री राज्याच्या विविध भागात प्रकाशमान आगेचा लोळसदृश आकाशातून जाताना दिसलं.

चित्रपटांमध्ये शोभावं अशा या घडामोडीने तर्कवितर्कांना उधाण आलं. हा उल्कापात आहे की उपग्रहाचे तुकडे आहेत? की विदेशी देशांनी भारतावर लक्ष ठेवण्यासाठी केलेली कूटमोहीम आहे? अशा अनेक शक्यतांविषयी सोशल मीडियावर चर्चा रंगली.

"शनिवारी रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागांत आकाशातून जलदगतीने काही लाल रंगाच्या वस्तू खाली येत असल्याचं स्थानिकांना दिसले. दरम्यान, सिदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे रात्री 7 वाजून 45 मिनिटांनी एक धातूची रिंग कोसळली. आकाशात ही रिंग जेव्हा होती ती लाल तप्त होती.

"ती एवढ्या जोराने जमिनीवर पडली की मातीमध्ये ती रुतली. ही रिंग आठ फुटाच्या व्यासाची आहे. आम्ही ती स्थानिक पोलीस स्टेशनला जमा केली आहे," सिंदेवाहीचे तहसीलदार गणेश जगदाळे यांनी बीबीसी मराठीला ही माहिती दिली.

हे एखादे जुने सॅटेलाईट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली कोसळलं असां, असा अंदाज खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला आहे. या वस्तू आकाशातून पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचे गोंडपिपरी, सिंदेवाही आणि चिमूर तालुक्यातही दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

अवशेषांना लागलेली आग

हे तुकडे 'इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टर'चे असल्याचे खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर, संचालक एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबाद यांनी बीबीसीला सांगितले.

"न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरील भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 11 वाजता तेथील रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेट द्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या 430 किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला.

ऑडिओ कॅप्शन, जगभरातल्या काही महत्त्वाच्या आणि रंजक गोष्टी, ज्यामुळे तुमचं विश्व होईल अधिक समृद्ध

"आजच्या तारखेत केवळ एकाच रॉकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर-पूर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या 'इलेक्ट्रॉन रॉकेटच्या बुस्टरचे'च असावेत. आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले.

दिसणार्‍या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही ही निश्चित," श्रीनिवास औंधकर या घटनेसंदर्भात सांगत होते.

सिंदेवाही येथे पडलेले अवशेष
फोटो कॅप्शन, सिंदेवाही येथे पडलेले अवशेष

नागपूर शहरातून आकाशात संध्याकाळी 7 वाजून 47 वाजता रहस्यमय प्रकाश दिसला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास पाच ते सात प्रकाशाचे भाग आकाशातून प्रवास करत होते. नागपूर शहरातील अनेक भागातील लोकांनी हा प्रकाश पाहिला.

अनेकांनी आकाशातील प्रकाशाचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढले. हा प्रकाश जवळपास 15 सेकंदापर्यंत आकाशात दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीला सांगितले.

"आकाशातील या प्रकाशाचा भारतीय वायू सेना किंवा भारतीय सैन्य दलाच्या कुठल्याही अभ्यासाचा किंवा सरावाचा संबंध नाही," अशी माहिती वायुसेनेचे प्रवक्ते रत्नाकर सिंग यांनी बीबीसी मराठीला सांगितले.

शनिवारी (3 एप्रिल) रात्री महाराष्ट्राच्या आकाशात दिसलेला प्रकाश
फोटो कॅप्शन, शनिवारी (3 एप्रिल) रात्री महाराष्ट्राच्या आकाशात दिसलेला प्रकाश

खगोल अभ्यासक सुरेश चोपणे या संदर्भात सांगतात," 2 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी हे प्रकाश दिसले. पश्चिमेकडून हा प्रकाश पूर्वेकडे गेला. हा विदर्भाच्या आकाशातून गेला. एखादा तुकडा त्याचा पडला असल्याची शक्यता आहे. पण हे कुठे पडले हे सांगता येणार नाही. एखादा जूना सॅटेलाईट असावा किंवा सॅटेलाईटचा बुस्टर रॉकेटचा पार्ट असावा अस प्रथमदर्शनी वाटतं."

उल्का / अशनी पडण्याची कारणे काय हे सांगतांना प्रा सुरेश चोपणे, " अवकाशात फिरत असलेले काही मीटर आकाराचे खगोलीय पिंड अचानक पृथ्वीच्या कक्षेत ओढले जातात आणि पृथ्वीच्या वातावरणासोबत होणार्या घर्षणाने जळायला लागतात. बहुतांश वेळा हे पिंड किंवा उल्का हवेतच जळून नष्ट होतात. परंतु क्वचित वेळी (लाखात एक वेळा) यातील न जळलेला एक दोन किलो वजनाचा तुकडा जमिनीवर पडू शकतो. मोठ्या आकाराची उल्का पडल्या मुळे प्राचीन काळात डायनोसार नष्ट झाले होते."

"उल्का पडायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे आज बघायला मिळालेला उल्कापात नसुन कदाचित एखाद्या अवकाश यानाचे, अंतराळ प्रयोगशाळेचे अवशेष किंवा उपग्रहाचे अवशेष सुद्धा असू शकतात," असेही प्रा सुरेश चोपणे यांनी बीबीसीला सांगितलं.

Harvard-Smithsonian Center for Astrophysics चे खगोलशास्त्रज्ञ जोनाथन मॅकडोवेल यांच्या मते, महाराष्ट्रात दिसलेली खगोलीय घटना म्हणजे फेब्रुवारी 2021 मध्ये प्रक्षेपित झालेल्या चीनी रॉकेटची पृथ्वीच्या वातावरणात पुन: प्रवेशाची होती. जोनाथन मॅकडोवेल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये या घटनेचा संदर्भ दिला.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"एखाद्या राष्ट्राचा उपग्रह चुकून पडला असावा किंवा जाणूनबुजून पडला असावा असे या घटनेवरुन वाटते. ही घटना उल्कावर्षाव किंवा फायरबॉलसारखे वाटत नाही. हे उल्कापिंडाचे भाग असण्याची शक्यता जर आपण पडताळून पाहिली तर या आकाशातील प्रकाशात रंग वेगळे दिसताहेत. शिवाय हे भाग पृथ्वीकडे येताना धातुची गोष्ट त्याच्यासोबत आली आहे. त्यामुळे हा सॅटेलाईटच्या राॅकेटचा भाग आहे हे निश्चित.

"माझा विश्वास आहे की हे अवशेष Chang Zheng 3B क्रमांक Y77 या चीनच्या उपग्रहाचे असावे. चीनने हा उपग्रह फेब्रुवारी 2021 मध्ये प्रक्षेपित केला होता. Chang Zheng 3B या उपग्रहाच्या भागाचा पृथ्वीच्या वातावरणात हा पुन:प्रवेश आहे."

दरम्यान, आकाशातून कोसळल्या सॅटेलाईट लाँचर राॉकेटचे एकूण तीन अवशेष सापडले आहेत. 2 एप्रिलच्या घटनेत कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही असं पोलीस प्रशासनाने सांगीतले आहे.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)