डेव्हिड फुलर : 100 मृतदेहांचं लैंगिक शोषण करणारा माणूस 30 वर्षांनी कसा सापडला?

    • Author, टॉम सायमंड्स
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

जवळपास 35 वर्षांपूर्वी दोन मुलींचा खून झाला होता. तो खूनी 30 वर्ष उजळ माथ्याने समाजात वावरत राहिला.

या काळात त्याने दोन हॉस्पिटल्सच्या शवागारात काम केलं आणि तिथे 100 हून जास्त महिलांच्या मृतदेहांचं लैंगिक शोषण केलं.

या व्यक्तीचं नाव होतं डेव्हिड फुलर. इंग्लंडमधल्या गाजलेल्या या केसमध्ये आरोपीला गेल्या महिन्यात 3 सलग जन्मठेपांची शिक्षा झाली आहे. आता तो मरेपर्यंत कधीही तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाही.

पण नक्की काय होतं हे प्रकरण आणि सलग 30 वर्षं हा माणूस पोलिसांना कसा चकवत राहिला? ही त्याचीच गोष्ट.

1987 साली वेंडी नेल आणि कॅरोलिन पिअर्स या विशीतल्या दोन महिला आपल्या आयुष्याची स्वप्नं रंगवत होत्या.

त्या दोघी एकमेकींना ओळखत नव्हत्या, पण दोघी नोकरी करत होत्या, त्यांचे मित्रमैत्रिणी होते, विशीतल्या तरुणी जसं जगतात तसं त्या हसतखेळत जगत होत्या. दोघी यूकेतल्आ टनब्रिज वेल्स या शहरात राहायच्या आणि मग त्यांच्या आयुष्यात आला डेव्हिड फुलर.

फुलर 1989 पासून एका हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रिशयनचं काम करायचा. 2011 साली केंट आणि ससेक्स हॉस्पिटल बंद होईपर्यंत तो तिथेच काम करत राहिला. त्यानंतर त्याची बदली टनब्रिज वेल्स हॉस्पिटलमध्ये झाली.

त्याला अटक होईपर्यंत तो इथेच काम करत राहिला.

कोण होत्या वेंडी आणि कॅरोलिन?

वेंडी त्यावेळी 25 वर्षांची होती. नवऱ्यापासून विभक्त होऊन ती एका हॉस्टेलमध्ये राहायची.

ज्युली माँक्स वेंडीच्या मैत्रीण होत्या. तिचं वर्णन करताना त्या म्हणतात की तिला लग्न मोडल्याचा धक्का बसला होता. पण ती कष्टाळू होती, स्वतंत्र विचारांची होती. तिला एक घरकुल हवं होतं, संसार करायचा होता आणि मुलबाळं हवी होती.

वेंडी एका फोटोच्या दुकानात काम करायची. 22 जून 1987 ला रात्री तिला तिच्या बॉयफ्रेंडनी घरी सोडलं.

दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत तिच्याच घरात सापडला.

शेजाऱ्यांना रात्री काहीही ऐकू आलं नव्हतं. पण तिला मारहाण झाली होती, तिच्यावर बलात्कार झाला होता आणि तिची गळा दाबून हत्या झाली होती.

कॅरोलिन पिअर्स 20 वर्षांची होती आणि एका रेस्टॉरन्टमध्ये काम करायची.

ज्या दिवशी ती नाहीशी झाली त्या दिवशी तिच्या घराबाहेर किंचाळण्याचे आवाज ऐकू आले होते.

तीन आठवड्यांनी तिचा मृतदेह तिच्या घरापासून 80 किलोमीटर दूर एका शेतावरच्या खड्यात सापडला. तिच्याही अंगावर कपडे नव्हते.

कॅरोलिनच्या शरीरावरही तशाच जखमा होता जशा वेंडीच्या शरीरावर होत्या. पोलिसांची खात्री पटली की हे एकाच खुन्याचं काम आहे.

1980 च्या दशकात ना मोबाईल फोन होते ज्यामुळे माणसं ट्रॅक करता येतील, ना सीसीटीव्ह फुटेज होतं जे पाहता येईल. डीएनएचं तंत्रही फारसं विकसित झालं नव्हतं.

या गुन्ह्यांचा माग काढणाऱ्या गुप्तहेरांच्या हाती काही पुरावे लागले होते. एका शॉपिंग बॅगवर रक्ताळलेल्या बोटाचा ठसा आणि वेंडीच्या पांढऱ्या शर्टच्या तुटलेल्या बटणावर बुटांचा ठसा.

1999 साली शोधकर्त्यांच्या आशा मावळल्या कारण त्यांना नव्या डीएनए डेटाबेसमध्ये मॅच सापडला नाही.

निवृत्त डिटेक्टिव्ह डेव्ह स्टीव्हन्स, जे या केसचा तपास करत होते त्यांनी 2007 साली बीबीसीला सांगितलं की आम्ही तपास थांबवला होता पण केस बंद केली नव्हती.

2019 साली फॉरेन्सिक तज्ञांनी एक नवीन तंत्रज्ञान विकसित केलं होतं. जुन्या वीर्याच्या नमुन्यावरून डीएनए मिळवायचं तंत्रज्ञान. कॅरोलिन पिअर्सच्या मृतदेहावरची तिची पँट फाटलेली होती. त्यावर एक वीर्याचा नमुना सापडला होता.

आता त्यांनी आणखी एक तंत्रज्ञान वापरलं ज्याचं नाव होतं 'फॅमिलिअल मॅच'. म्हणजे जो डीएनए तपासकर्त्यांकडे होता त्याला त्यांनी नॅशनल डीएनए डेटाबेसमधल्या जवळपास 65 लाख नमुन्यांसोबत ताडून पाहिलं.

जर गुन्हेगाराला आधी अटक झाली नसेल तर गुन्हेगारांच्या डेटाबेसमध्ये त्याच्या डीएनए सापडणं अवघड होतं पण या फॅमिलिअल डेटाबेसमुळे जो डीएनए तपासकर्त्यांकडे होता त्यांच्या नातेवाईंकाशी तो ताडून पाहणं आणि त्या डीएनएच्या फॅमिलीतली माणसं शोधणं शक्य होतं.

माणसांची एक मोठी यादी समोर आली. मग या यादीतले कोणते लोक हे खून झाले तेव्हा त्या भागात राहात होते हे शोधण्यात आलं. मग खून करण्याच्या वयात कोण बसले असते ते शोधलं.

असं करत करत डेव्हिड फुलरची बहीण किंवा भाऊ असेल अशा व्यक्तीचा पत्ता सापडला. त्या व्यक्तीच्या कुटुंबात कोण कोण माणसं होती, त्यांची फॅमिली हिस्ट्री काय याचा पोलिसांनी तपास केला.

आणि एका दिवशी त्यांनी व्यक्तीचं दार ठोठावलं.

डेव्हिड फुलरचा जन्म 1950 च्या दशकात झाला होता. त्याने इलेक्ट्रेशियन म्हणून ट्रेनिंग घेतलं होतं आणि सुरुवातीला एका बंदराच्या धक्क्यावर काम करायचा.

शाळेत असताना त्याला लोकांच्या मालमत्तेला आगी लावल्याबद्दल आणि सायकली चोरल्याबद्दल अटक झाली होती.

1970 च्या दशकात त्याने दरोडे घातले होते.

2020 मध्ये तो त्याच्या तिसरी बायको आणि मुलाहसह यूकेच्या वेस्ट ससेक्स या भागात राहात होता.

3 डिसेंबर 2020 ला पोलीस डेव्हिड फुलरच्या घरी पोहचले.

चौकशी दरम्यान त्याने आपण कधी टनब्रिज वेल्सला राहात नव्हतो असं सांगितलं. अर्थातच हे खोटं होतं.

फुलरला आपण आयुष्यात काय काय केलं त्याचे पुरावे साठवून ठेवायची सवय होती. त्याच्याकडे भरमसाठ जुने कॉम्प्युटर्स, हार्ड ड्राईव्ह, सीडी, फोन आणि 34 हजार जुने प्रिंट केलेले फोटो होते.

टनब्रिज वेल्सच्या आसपास फुलरने काम केल्याची बिलं पोलिसांना सापडली.

त्याच्या डायरीवरून लक्षात आलं की तो कॅरोलिन पिअर्स काम करत होती त्या बस्टर्स ब्राऊन रेस्टॉरन्टमध्ये नेहमी जायचा.

तो ज्या सायकलिंग क्लबचा सदस्य होता, तिथल्या इतर सदस्यांनी सांगितलं की कॅरोलिन सापडली तो गावाबाहेरचा रस्ता त्यांच्या सायकलिंग रूटवर यायचा.

वेंडी ज्या रस्त्यावर राहायची तिथे तो 1970 आणि 80 च्या दशकात राहिला होता. तोवर वेंडी तिथे राहायला आली नव्हती.

जुन्या फोटोंमध्ये फुलर उन्हात पालथा झोपला आहे असा फोटो सापडला. या फोटोत त्याच्या बुटांचे सोल दिसत होते. या सोलचं डिझाईन वेंडीच्या घरात सापडलेल्या बुटांच्या ठशांशी जुळलं. त्यांच्या बोटांचे ठसेही शॉपिंग बॅगवरच्या रक्ताळलेल्या ठशाशी जुळले.

फुलरचा डीएनए नमुना कॅरोलिनच्या पँटवर सापडलेल्या वीर्यातून मिळवलेल्या डीएनए नमुन्याशी जुळला.

पोलिसांना त्यांचा खूनी तब्बल 33 वर्षांनी सापडला होता.

पण या केसला आणखी एक नाट्यमय वळण मिळणार होतं.

फुलरच्या घरात सापडलेले कॉम्प्युटर हार्डवेअर त्याने अगदी 80 च्या दशकापासून साठवून ठेवले होते. त्यात अनेक हार्ड ड्राईव्ह होत्या, मेमरी कार्ड्स होते आणि कालबाह्य झालेल्या फ्लॉपी डिस्क होत्या.

त्याच्याकडे 30 मोबाईल फोन आणि सिमकार्ड होते. या सगळ्यांचा तपास तज्ञ करतच होते.

एके दिवशी ते कपाटात काय आहे ते शोधत होते, तर त्यांना एक चोरकप्पा सापडला. त्याच चार हार्ड ड्राईव्ह होत्या.

यातले फोटो आणि व्हीडिओ बघता बघता त्यांना फुलरची विकृती समजली. डेव्हिड फुलरने हे व्हीडिओ हॉस्पिटलच्या शवागारात बनवले होते.

तो मृतदेहांचं लैंगिक शोषण करत होता.

नोएल मॅकह्यू तपासाधिकारी होते. त्यांना आजही तो दिवस आठवतो. ते म्हणतात,

"मला कळतंच नव्हतं काय चाललंय. माझ्या मनात आधी वेंडी नेल आणि कॅरोलिन पिअर्सच्या घरच्यांचे विचार येत होते की कसं त्यांना 33 वर्षं न्याय मिळाला नाही."

"पण आता लोकांना कळणार होतं की त्यांचे आप्तस्वकीय, ज्यांच्या मरणानंतर त्यांना सन्मान मिळाला असेल असं त्यांना वाटत होतं, त्यांची विटंबना फुलरने केली होती."

ज्या हॉस्पिटलमध्ये फुलरने काम केलं होतं तिथे सगळ्या भागात जाण्याची त्याला परवानगी होती. त्यांचं स्वाईप कार्ड कुठेही चालायचं. तो शवागारात कायम जायचा.

या हॉस्पिटलच्या शवागाराला दोन दारं होती. एका दारापुढे तर सीसीटीव्ही कॅमेरा होता पण दुसऱ्या दारापुढे नव्हता.

फुलरला हे माहिती होतं त्यामुळेच हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीत तो काय करतोय हे कधीच कळलं नाही पण त्याने स्वतः एका छोट्या कॅमेऱ्यावर त्याच्या कृत्याचे व्हीडिओ रेकॉर्ड केले होते.

फुलरच्या कॅमेऱ्यात सापडलेले व्हीडिओ तपासकर्त्यांनी पॉझ केले. त्या मृतदेहांच्या मनगटावर असलेल्या पट्ट्यांवर जी नावं होती ती त्यांनी वाचली. व्हीडिओचा मेटाडेटा तपासला, त्यामुळे हे व्हीडिओ कधी घेतलेत ते कळलं.

त्यावेळी त्या हॉस्पिटलच्या शवागारात कोणाचे मृतदेह होते ते ताडून पाहिलं त्यामुळे त्यांना फुलरने कोणाकोणाचं लैंगिक शोषण केलंय ते कळलं.

फुलरने एका लहानशा काळ्या डायरीत त्याच्या पीडितांची नावंही लिहिली होती.

"तो माणूस त्या मृतदेहांना एकटंच सोडायचा नाही," सरकारी वकील लिबी क्लार्क म्हणाल्या.

तो वारंवार शवागारात जाऊन त्या मृतदेहांचं लैंगिक शोषण करायचा.

दुसरे सरकारी वकील डंकन अॅटकिन्सन म्हणाले की फुलरने जवळपास '102 हून जास्त महिला आणि मुलींच्या मृतदेहाचं लैंगिक शोषण केलं आहे.'

यात एक नऊ वर्षांची मुलगी, दोन 16 वर्षांच्या मुली आणि एक 100 वर्षांच्या वृद्धेचा समावेश होतो.

फुलरकडे चाईल्ड पोर्नोग्राफीचाही प्रचंड साठा सापडला.

डॉ रिचर्ड बॅडकॉक एक फॉरेन्सिक सायकॅस्ट्रिस्ट आहेत. त्यांनी या केसमध्ये पोलिसांबरोबर काम केलं. त्यांच्यामते फुलरमध्ये सॅडो-माचोईझमची लक्षणं दिसतात.

"स्वतःत असलेल्या प्रॉब्लेम सोडवता आले नाही की माणूस दुसऱ्यांच शोषण करतो. हे त्याचं उदाहरण आहे."

"त्याला अशा टोकाच्या गोष्टी करताना आनंद आणि एक्साईंटमेंट मिळायची. आपण खऱ्या अर्थाने जिवंत आहोत असा आभास व्हायचा," ते पुढे म्हणतात.

डॉ रिचर्ड बॅडकॉक यांच्यामते वेंडी आणि कॅरोलिन यांचा बलात्कारानंतर केलेला खून आणि मृतदेहांचं शोषण यात सरळ सरळ लिंक आहे.

"मानसशास्त्रीय दृष्ट्या मृतदेहांचं लैंगिक शोषण ही शेवटची पायरी असते."

फुलरने 2008 ते 2020 या काळात मृतदेहांचं शोषण केल्याचं म्हटलं जातं. पण 1987 ते 2008 या काळात त्याने काय केलं याचे तपशील सापडलेले नाहीत.

केंट पोलीस आता त्या काळात बेपत्ता झालेल्या महिलांचा ठाव घेत आहेत आणि त्यांना या केसशी जोडून पाहात आहेत. एक प्रश्न उरतोच की त्याने आणखी कोणाचा खून केला असेल किंवा लैंगिक शोषण केलं असेल का?

2007 मध्ये बीबीसीशी बोलताना वेंडीचे वडील बिल नेल म्हणाले होते, "एक दिवस येईल जेव्हा कोणीतरी माझं दार ठोठावेल आणि सांगेल की तो पकडला गेलाय. त्यादिवसी आम्ही आनंद व्यक्त करू. तो फार मोठ्या काळासाठी जेलमध्ये जाईल."

तो दिवस आला खरा पण बिल तो पाहू शकले नाहीत. त्यांचा मृत्यू 2017 सालीच झाला.

फुलरला दोन जन्मठेपांची शिक्षा झाली. तो त्याच्या हयातीत आता कधीही तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाही. त्याला शिक्षा झाली तेव्हा तो 67 वर्षांचा होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)