You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सीरियल किलरः 18 वर्षात 18 महिलांची हत्या एकाच पद्धतीने करणाऱ्या सीरियल किलरची कहाणी
- Author, बल्ला सतीश
- Role, बीबीसी तेलुगू प्रतिनिधी
30 डिसेंबरची रात्र. हैदराबादमधील युसूफगुडाच्या कंपाऊंडमध्ये काही लोक ताडी पित बसले होते. प्रत्येक नशेत धुंद झाला होता.
याच कंपाऊंडमध्ये दोन आणखी लोक होते. यातील एक व्यक्ती 50 वर्षांची महिला, तर दुसरी व्यक्ती 45 वर्षांचा पुरुष होता. हा पुरुष हळूच त्या महिलेच्या जवळ गेला आणि गप्पा मारू लागला. काही वेळ गप्पा मारल्यानंतर दोघेही कंपाऊंडच्या बाहेर पडले. शहराच्या बाहेर एखाद्या शांत ठिकाणाच्या शोधात ते चालू लागले.
युसूफगुडापासून ते दोघेही घाटकेश्वरजवळील अंकुशपूरला पोहोचले. हा अत्यंत शांत आणि चिटपाखरूही नसलेला परिसर. दोघेही इथं पोहोचल्यानंतर थोडी दारू प्यायले. त्यानंतर दोघांचं आपापसात भांडण सुरू झालं. हे भांडण इतकं वाढलं की, त्या पुरुषाने महिलेला दगडाने ठेचून मारून टाकलं. त्यानंतर तो पुरुष तिथून पळून गेला.
या घटनेच्या केवळ 20 दिवस आधीच 10 डिसेंबरलाही अशाच काहीशा पद्धतीने बालानगर ताडी कंपाऊंडमध्ये घटना घडली होती. तिथेही हाच पुरुष होता. तिथेही त्याला अशीच एकटी महिला भेटली होती. ती महिला 35-45 वर्षांदरम्यानच्या वयाची होती. दोघेही दारू प्यायले. त्यानंतर त्या पुरुषाने या महिलेलाही काही गोष्टी सांगितल्या तिथून तिला बाहेर घेऊन गेला.
दोघेही शहराच्या अशा ठिकाणी गेले, जिथे कुणीही कधी फिरकत नाही. ते सेंगारेड्डी जिल्ह्याच्या मुलुग परिसरातील सिंगायापल्ली गावात पोहोचले. दोघेही पुन्हा दारू प्यायले. त्यानंतर त्या पुरुषाने महिलेच्या साडीनेच तिचा गळा दाबला आणि हत्या केली. मग तिथून पळून गेला.
या पुरुषाने केलेली ही केवळ दुसरी हत्या नव्हती, तर ही 18 वी हत्या होती.
या पुरुषावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत बाहेर जाणारी कुणीही महिला अद्याप जिवंत परतली नाहीय. या पुरुषाचं नाव आहे एम. रामुलु.
युसूफगुडाच्या महिलांसह या एम. रामुलुने 18 महिलांची हत्या केलीय. यातील सगळ्या महिला एकट्या होत्या आणि या सगळ्यांची हत्या एकाच पद्धतीने केली गेलीय. इतकंच नव्हे, तर सगळ्या महिलांची हत्या हैदराबादच्या बाहेरील कुणीच नसलेलेल्या परिसरातच केली गेलीय.
नवव्या हत्येच्या दरम्यान पोलीस एम. रामुलुला पकडू शकत होते. 2003 साली तूरपान पोलीस ठाण्याच्या हद्दीत, 2004 साली रायादुर्गाम पोलीस ठाण्याच्या हद्दीत, 2005 साली संगारेड्डी पोलीस ठाण्याच्या हद्दी, 2007 साली रायदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत, 2008 साली नरसापूरमध्ये आणि 2009 साली कुकाटपल्लीत दोन हत्या यावेळी एम. रामुलुला पकडता आलं असतं.
मात्र, पोलिसांनी नरसंगी आणि कोकटपल्लीमधील हत्येनंतर हे प्रकरण गंभीरपणे घेतलं. मोठ्या तपासानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं.
2009 साली कुकाटपल्ली आणि नरसंगी हत्या प्रकरणात एम. रामुलुला 2011 साली रंगारेड्डी कोर्टाने दोषी ठरवलं आणि आजीवन कारावास, 500 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
रामुलुचा 'फिल्मी प्लॅन'
रामुलुने पूर्ण आयुष्य तुरुंगात खितपत जाऊ नये, यासाठी आधीच एक प्लॅन तयार ठेवला होता. त्याने मनोरुग्णासारखं वागायला सुरुवात केली. लोकांना वाटलं, तो खरंच आजारी आहे. त्यानंतर त्याला एरागड्डा मेंटल हॉस्पिटलमध्ये 2011 साली भरती करण्यात आलं.
एका महिन्यापर्यंत तो तिथं राहिला आणि 30 डिसेंबरच्या रात्री तिथून पळून गेला. त्याच्यासोबत तो इतर पाच कैद्यांनाही घेऊन गेला. हे इतर पाच जणही मानसिक आजारावर उपचार घेत होते.
या प्रकरणात एसआर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
तुरुंगातून पळाल्यानंतर रामुलु पुन्हा महिलांची हत्या करू लागला. 2012 आणि 2013 साली बोवेनपल्लीमध्ये दोन हत्या, 2012 साली चंदानगरमध्ये, 2012 साली डुंडीगलमध्ये दोन हत्या आणि या पाचही हत्या महिलांच्याच होत्या.
पोलिसांनी या हत्यांवर पुन्हा लक्ष देण्यास सुरुवात केली. 2013 सालच्या मे महिन्यात बोवेनपल्ली पोलिसांनी रामुलुला पकडलं. यावेळी त्याला पाच वर्षे तुरुंगात पाठवण्यात आलं.
आम्हाला माहित नाहीय की, रामुलुची कायद्यावर चांगली पकड आहे की, त्याचा चांगला वकील आहे, मात्र त्याने 2018 साली हायकोर्टात अपील केलं आणि आपली शिक्षा कमी करून घेण्यात यश मिळवलं. 2018 च्या ऑक्टोबर महिन्यात रामुलुबाबतचा निर्णय आला आणि त्याची सुटका झाली.
बाहेर येऊन त्याने पुन्हा हत्या करण्यास सुरुवात केली. 2019 साली त्याने शमीरपेटमध्ये एक आणि पट्टन चेरुवुमध्ये एक हत्या केली. म्हणजे 2019 पर्यंत तो 16 महिलांची हत्या करून झाला होता.
त्यानंतर त्याला पुन्हा पकडण्यात आलं. तुरुंगात टाकण्यात आलं आणि पुन्हा जुलै 2020 मध्ये तुरुंगातून बाहेर पडण्यात तो यशस्वी झाला.
हत्येचं सत्र
2020 च्या जुलै महिन्यात तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर रामुलुने दोन हत्या केल्या.
50 वर्षीय महिलेच्या पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार जुबिली हिल्स पोलीस ठाण्यात दिली. चार दिवसांनंतर घाटकेश्वर पोलिसांना एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला. मग पोलिसांनी तपास सुरू केला.
अखेर हैदराबाद आणि राचनकोंडा पोलिसांनी आपापसात चर्चा केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून समोर आलं की, महिला कुणा अनोळखी व्यक्तीशी बोलत होती. फुटेज नीट तपासले गेले आणि प्रकरणाचं गांभीर्य पोलिसांना लक्षात आलं.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकानेच 2009 साली एका हत्या प्रकरणात रामुलुला दोषी ठरवलं होतं. जेव्हा तपास अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजमधील फोटो पाहिले, तेव्हाच त्यांना संशय आला होता.
ज्या पद्धतीने 50 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली होती, तो पॅटर्न रामुलु करत असलेल्या हत्यांशी मिळता जुळता होता. त्यामुळे पोलिसांनी आधीची प्रकरणं नीट पाहिली आणि रामुलुचा याही हत्येत सहभाग असल्याला दुजोरा दिला.
हत्येची पद्धत काय होती?
एकट्या असणाऱ्या महिला रामुलुची शिकार व्हायच्या. एखाद्या दुकानात किंवा ताडी पिण्याच्या ठिकाणी रामुलु महिलांशी मैत्री करायचा. महिलांशी बोलून त्यांना आपलसं करायचा आणि कुणीही नसलेल्या परिसरात घेऊन जायचा.
रामुलु प्रत्येक महिलेसोबत त्याची लैंगिक इच्छा पूर्ण करायचा आणि त्यानंतर हत्या करायचा. हत्या केलेल्या बहुतांश महिलांची साडीने गळा दाबून हत्या केलीय. काही हत्यांमध्ये दगडाने ठेचून हत्या केलीय. हत्येनंतर त्या महिलांचे दागिने तो चोरत असे.
गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय महिला रामुलुच्या जाळ्यात अडकायच्या.
रामुलु संगारेड्डी जिल्ह्यातील कांडी मंडल गावातील आहे. 21 व्या वर्षी त्याचं लग्न झालं होतं. काही दिवसांतच त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. लोक सांगतात की, त्यानंतर त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केलं होतं. मात्र, आता ती महिलाही त्याच्यासोबत राहत नाही.
18 महिलांच्या हत्येसोबतच इतर 4 चोरीच्या प्रकरणातही रामुलु आरोपी आहे. तसंच, पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा गुन्हाही त्याच्यावर आहे.
आतापर्यंत एकूण 18 महिलांची रामुलुने हत्या केलीय. आता घाटकेश्वर पोलीस रामुलुची चौकशी करत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)