अटकेपार झेंडा रोवणाऱ्या मराठ्यांचा भगवा झेंडा लाल किल्ल्यावर फडकला होता का?

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी

26 जानेवारी 2021 ला दिल्लीमध्ये शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली झाली. त्या रॅलीदरम्यान अनेक जण दिल्लीत शिरले आणि हिंसाचारालाही सुरुवात झाली. लाल किल्ल्यावर 'निशाण साहिब' हा ध्वज फडकवला गेला. यानंतर संपूर्ण देशात प्रतिक्रिया उमटल्या.

प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला लाल किल्ल्यावरुन भारताचे पंतप्रधान देशाला संबोधित करतात. त्याच लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनी एका धर्माचे प्रतीक असलेला ध्वज फडकवल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या.

त्याच निमित्ताने सोशल मीडियावर प्रश्न विचारला जात आहे की जर मराठा शासकांनी अटकेपार झेंडे रोवले होते तर त्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला की नाही?

26 जानेवारी निशाण साहेब फडकवण्याची कृती ही प्रतीकात्मक असली तरी त्या कृतीला ऐतिहासिक संदर्भ आहे हे विसरून चालणार नाही.

1783 मध्ये खालसा पंथाचे नायक जस्सा सिंग रामगडिया यांच्या नेतृत्वात दिल्लीच्या शाह आलम दुसरा याच्यासोबत लढाई झाली होती. ही लढाई खालसाने जिंकली होती. त्याला 'दिल्ली फतेह' किंवा दिल्लीवर विजय असं म्हटलं जातं.

1788 मध्ये मराठ्यांचा भगवा झेंडा लाल किल्ल्यावर होता इतकंच नाही तर महादजी शिंदे हे दिल्लीच्या मुघल बादशाहचे संरक्षणकर्ते बनले होते. त्यामुळे लाल किल्ल्यावर मुघलांचा आणि मराठ्यांचा झेंडा काही काळ फडकत असल्याचंही सांगितलं जातं.

एखाद्या ठिकाणी ध्वज फडकवणे याला संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या ठिकाणी ज्याचा ध्वज असतो त्याची ती सत्ता किंवा जागा असते असा त्याचा अर्थ असतो.

मराठ्यांचा भगवा ध्वज लाल किल्ल्यावर फडकला पण तो सार्वभौमत्व दाखवण्यासाठी नव्हता तर मुघलांसोबत असलेली मित्रत्वाचे नाते दाखवण्यासाठी होता, असं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सांगतात.

पण या निमित्ताने पुन्हा एक प्रश्न मनात येतो तो म्हणजे 18 व्या शतकात मराठे प्रभावशाली होते तर त्यांनी दिल्लीवर आपला दावा का सांगितला नाही?

केवळ प्रतीकात्मकरीत्या किंवा आपली युती दाखवण्यासाठी नव्हे तर सार्वभौमत्व दाखवण्याच्या दृष्टीने मराठ्यांचा ध्वज लाल किल्ल्यावर फडकला होता की नाही याचा विचार आपण या लेखात करणार आहोत.

मुघलांना नाममात्र शासक ठेवण्याऱ्या मराठ्यांकडे सत्ता आली ती मुघलांचा सर्वांत शक्तिशाली काळ ओसरल्यानंतरच.

मुघल सत्तेचा अस्त

औरंगजेबाच्या काळात मुघल साम्राज्य शिखरावर होते त्या काळात तर ही कल्पना करणेही कुणालाही शक्य झाले नसते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य खिळखिळं झालं आणि नंतर तर ते साम्राज्य न राहता फक्त दिल्लीचं राज्य इतक मर्यादित बनलं होतं. जाट, राजपूत, शीख आणि मराठा सरदार हे इतके सशक्त झाले की पुढे चालून तेच त्यांच्या भागातले राज्यकर्ते बनले.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा 65 वर्षांचा मुलगा बहादुरशहाच्या हाती दिल्लीची सत्ता आली. त्याने शाहू महाराज आणि ताराबाई यांच्यापैकी कुणीच्याही गादीला मान्यता नव्हती दिली. इतकेच नव्हे तर बहादुरशहाने मराठ्यांना चौथाईचे अधिकार दिले नव्हते फक्त देशमुखीचेच अधिकार दिले होते.

बाळाजी विश्वनाथ हे शाहू महाराजांचे पेशवे बनले आणि 1711 मध्ये त्यांनी मुघलांकडून चौथाई आणि सरदेशमुखीचे अधिकार मिळवून घेतले. दक्षिण राज्य करायचे असेल तर दोन्ही राजघराण्यांना नाराज करता येणार नाही असे जाणून बहादुरशहाने शाहू महाराजांना झुकते माप दिले.

त्याबदल्यात शाहू महाराजांनी दिल्लीच्या संरक्षणासाठी सैन्य सज्ज ठेवायचे असा करार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 39 वर्षानंतर मुघल आणि मराठ्यांमध्ये असलेला संघर्ष थांबला होता.

मुघलांच्या दुर्बलतेचा साक्षात्कार

बहादुरशहा नंतर मुहम्मद शाह गादीवर आला. अनेक वर्षं त्याने दिल्लीचं राज्य सांभाळलं पण नंतर इराणच्या (पर्शिया) नादीरशाहचे आव्हान निर्माण झाले. 1739 मध्ये नादीरशाहाने दिल्लीवर स्वारी केली. कर्नालमध्ये नादीरशाह आणि मुहम्मद शाह (मुघल) यांच्यात लढली झाली.

नादीरशाहने मुहम्मद शाहला बंदी बनवलं. त्यानंतर त्याने दिल्ली लुटली. 70 कोटींची लुट नादीरशाहने पर्शियाला नेली. सोबत कोहिनूर हिरा देखील नेला. सिंधू नदीच्या पलीकडचा प्रदेशही आपल्याकडे राहील असा करार करून घेऊन त्याने मुहम्मद शाहला सोडून दिले.

या प्रसंगानंतर दिल्ली अत्यंत दुर्बळ आहे याची जाणीव मराठा सरदार आणि विदेशी व्यापारी कंपन्यांना झाली आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या. 1748 ला मुहम्मद शाहचे निधन झाले. त्यानंतर मुघल घराण्यातच सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला याचा फायदा देखील विरोधकांना झाला. त्यानंतर नादीरशाहचा सेनापती अहमदशाह अब्दालीने दिल्ली अनेक वेळा लुटली.

पानिपतमुळे भारताचा इतिहास बदलला

पानिपतची लढाई ही भारतावर कोण राज्य करणार हे ठरवण्यापेक्षा भारतावर कोण राज्य करणार नाही यासाठी अधिक होती असं म्हटलं जातं. कारण या लढाईमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही एका पक्षाचा थेट फायदा झाला नाही.

अहमदशाह अब्दाली आणि मराठ्यांना दिल्लीवर राज्य तर करता आलेच नाही उलट दोन्ही पक्षांचे नुकसान झाले आणि त्यांचे त्यांच्याच भागातील प्रस्थ कमी झाले. ते मिळवण्यासाठी पुन्हा त्यांना संघर्ष करावा लागला.

1761 मध्ये माधवराव पेशवे बनले. 11 वर्षांच्या काळात त्यांनी मराठा सत्तेचे वैभव पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला. माधवरावांनी निजामाला हरवले, मैसूरच्या टिपू सुलतानाला खंडणी देण्यास भाग पाडले, जाट आणि राजपूत सरदारांशी पुन्हा संबंध प्रस्थापित करून उत्तर भारतावर वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली. माधवरावांच्या काळात शाह आलम द्वितीय यांनाच पेशव्यांकडून पेन्शन दिली जायची. त्याबदल्यात उत्तर भारतात मराठा सरदार चौथाई गोळा करायचे.

एकेकाळी आपल्याच राज्यात चौथाई गोळा करण्याची परवानगी त्यांना नव्हती नंतर ते उत्तर भारतातूनही उत्पन्न मिळवू लागले. हाच काळ होता ज्या काळात जर मराठ्यांनी दिल्लीवर दावा केला असता तर त्यावेळी त्यांना मुघलांकडून आव्हान मिळालं नसतं पण आजूबाजूच्या प्रदेशात असलेल्या सरदार आणि राजांचे थेट आव्हान तयार झाले असते. त्यातून संघर्ष निर्माण झाला असता आणि मराठ्यांना मिळणारे उत्पन्न कमी झाले असते हा विचार करून तत्कालीन मराठी शासकांनी हे पाऊल उचलले नाही.

1772 ला माधवरावांचा मृत्यू झाला. त्यानंतर नारायण हे पेशवे झाले. 1773 ला त्यांची हत्या झाली आणि त्यांचा न जन्मलेला मुलगा सवाई माधवराव पेशवा झाला. 1795 पर्यंत तो पेशवा होता मग अपघातात त्याचा मृत्यू झाला.

महादजी शिंदेंची वेगळी रणनीती

उत्तर भारतात असलेल्या मराठा सरदारांपैकी सर्वांत शक्तिशाली होते ते म्हणजे महादजी शिंदे. 1788 रोहिला सरदार गुलाम कादिर याने मुघल बादशाह शाह आलमवर स्वारी केली आणि बंदी बनवले. महादजी शिंदे शाह आलम यांच्या संरक्षणासाठी ते धावून गेले होते.

शाह आलम यांच्यावर चाल करून गेलेला गुलाम कादिर याचा शिंदेंनी पराभव केला होता. त्याला मृत्युदंड देऊन बादशाहच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती.

त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी पेशव्यांसाठी नायब-ए-मुनायब ही पदवी मिळवली. महादजी शिंदे हे शक्तिशाली सेनापती होते पण त्यांची बरीचशी ऊर्जा नाना फडणीस यांच्यातील मतभेदांमध्येच खर्च व्हायची. तसेच इंदोरच्या होळकर घराण्याशीही त्यांचे पटत नव्हते. नाना फडणीस आणि शिंदे यांच्यानंतर मराठा साम्राज्याला उतरती कळा लागली.

1795 ला सवाई माधवरावांच्या निधनानंतर दुसरा बाजीराव गादीवर आला. मग साम्राज्य वाढवणे तर दूर परंतु इंग्रजांपासून आहे ते राज्य वाचवण्याचीच धडपड सुरू झाली. 1818 मध्ये इंग्रज आणि मराठ्यांमध्ये भीमा कोरेगाव येथे लढाई झाले. त्या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला.

या लढाईनंतर दिल्लीवर जरीपटका भगवा फडकवण्याचे स्वप्न तर धुळीस मिळालेच पण शनिवारवाड्यावर जो मराठ्यांचा झेंडा 100 वर्षांहून अधिक काळ फडकत होता त्या जागी ब्रिटिशांचा युनियन जॅक आला.

मराठ्यांनी दिल्लीवर सत्ता का काबिज केली नाही?

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत या प्रश्नाचे उत्तर असे देतात की "छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई यांच्यानंतर दिल्लीला न जुमानणारे राजेच झाले नाहीत. दिल्लीच्या गादीबद्दल असलेल्या आदरातून थेट दिल्लीवर राज्य करावं ही इच्छाच त्यांच्यात निर्माण झाली नसल्याचं दिसतं.

"आधी सदाशिवराव भाऊ पेशवे आणि महादजी शिंदे इतके शक्तिशाली होते की ते सहज मराठ्यांचं सार्वभौमत्व जाहीर करू शकले असते पण दिल्लीच्या तख्ताबद्दल असलेल्या आदरामुळे ते करू शकले नसावे," असं मत इंद्रजीत सावंत मांडतात.

'मराठ्यांची तलवार तळपली, पण ध्वज तेजाने फडफडला नाही'

मराठ्यांचे दिल्लीतील वर्चस्व कसे वाढत गेले याचं विश्लेषण करताना दिल्ली विश्वविद्यालयातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. अनिरुद्ध देशपांडे सांगतात, "18 व्या शतकात मराठ्यांनी भारतातील बहुतांश भाग आपल्या अधिपत्याखाली आणला. ही प्रक्रिया तीन टप्प्यात पार पडली. पहिल्या टप्प्यात बाजीराव पेशवे येतात.

"आपले रणांगणातील सामर्थ्य वापरून दिल्लीचाही विचार करणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. दुसरा टप्पा होता तो सदाशिवराव भाऊ पेशव्यांचा. 1760 मध्ये पानिपताच्या युद्धावेळी मराठ्यांच्या आक्रमकेतेचा प्रत्यय आला. तिसरा टप्पा होता महादजी शिंदे यांचा. त्यांच्या काळात तर मुघल शासक हे नाममात्र शासक बनले होते.

"मराठ्यांचं दिल्ली, आग्रा आणि अलीगड मधील वर्चस्व 1818 साली संपुष्टात आले, जेव्हा इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला.

"मराठ्यांनी एकदाही मुघल शासकांचा पूर्णपणे बिमोड करण्याचा ना विचार केला, ना प्रयत्न केला. मराठे नेहमीच त्यांचे संरक्षक आणि कारभारी बनून राहिले.

"लोकांच्या नजरेत मुघल हे भारताचे अधिकृत शासक होते. त्यामुळे मराठ्यांनी त्यांच्या फर्मानांचा वापर करत आपला अधिकार गाजवला. हे खरं आहे की तलवारीच्या जोरावर दिल्लीत आपली जागा बनवली पण मराठ्यांचा भगवा ध्वज मुघलांच्या किल्ल्यांवर तेजाने फडफडला नाही," असं देशपांडे सांगतात.

(संदर्भ -मॉडर्न इंडिया, बिपीन चंद्र, NCERT, अनार्की - विल्यम डॅलरिंपल, ब्लुम्सबरी प्रकाशन)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)