You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सॅम्युएल लिटील : 35 वर्षांत 93 महिलांचे ठोसे मारून खून करणारा सीरियल किलर
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
78 वर्षांचा तो वृद्ध माणूस 3 खूनांच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. एक दिवस त्याने आपल्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली द्यायचं ठरवलं.
या माणसाने त्याच्या संपूर्ण आयुष्यात 93 खून केले होते. अमेरिकेच्या इतिहासातला सर्वाधिक खतरनाक आणि धोकादायक सीरियल किलर होता तो. त्याचं नाव सॅम्युएल लिटील.
काय होता या माणसाचा इतिहास?
त्याच्या नावात जरी 'लिटील' असलं तरी हा माणूस धिप्पाड होता. तो व्यवसायाने बॉक्सर होता आणि करमणुकीसाठी जे बॉक्सिंगचे सामने आयोजित केले जातात त्यात बॉक्सिंग करायचा.
त्याच्या आयुष्याविषयी फारशी माहिती नाहीये. त्याचा जन्म 1940 च्या सुमारास झाला होता. त्याने एफबीआयला दिलेल्या जबाबात म्हटलं होतं की, त्याची आई वेश्या होती. त्याला त्याच्या आजीनेच मोठं केलं.
सोळाव्या वर्षी एका चोरीच्या आरोपात त्याला पोलिसांनी पकडलं आणि बालसुधारगृहात त्याची रवानगी झाली.
एफबीआयच्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की लहानपणापासूनच त्याला गुन्ह्याची चटक लागली होती. तो गुन्ह्यांचे फोटो असलेली मासिकं गोळा करायचा, विशेषतः अशी मासिकं ज्यात महिलांचे मृतदेह असतील किंवा त्यांचा गळा दाबताना दिसत असेल.
यानंतरही तो सतत जेलमध्ये जातच राहिला. दारू पिऊन गाडी चालवणे, चोरी, दरोडा, मारामारी, फसवणूक, वेश्यागमन, बलात्कार असे वेगवेगळे गुन्हे त्याच्या नावावर दाखल झाले.
अमेरिकेच्या एका राज्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याला शिक्षा झाली की तो दुसऱ्या राज्यात जायचा आणि तिथेही हेच धंदे करायचा.
चोरीमारी, दरोडे असले गुन्हे तर तो करतच होता पण दुसऱ्या बाजूला सराईतपणे लोकांचे खून करत होता.
त्याला बळी पडलेल्या जवळपास सगळ्या कृष्णवर्णीय महिला होत्या. जवळपास दोन दशकं त्याचं हे खूनसत्र सुरू होतं.
पण पोलिसांच्या हाती तो सापडला नाही, आणि जेव्हा सापडला तेव्हा त्याला शिक्षा झाली नाही.
1982 साली सॅम्युअल लिटीलला 22-वर्षांच्या मेलिंडा रोझच्या खूनाप्रकरणी अटक झाली पण त्याच्यावर खटला चालला नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना त्याला अमेरिकतल्या फ्लोरिडा राज्यात झालेल्या दुसऱ्या एका महिलेच्या, पॅट्रिशिया अॅन माऊंटच्या खूनासाठी अटक झाली.
सरकारी पक्षाच्या एका साक्षीदाराने कोर्टात सॅम्युअलला ओळखलं आणि हाच माणूस 26-वर्षीय पॅट्रिशिया गायब झाली त्या रात्री तिच्या सोबत होता हे सांगितलं. पण हा साक्षीदार विश्वासार्ह न वाटल्यामुळे सॅम्युअलची या प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
1984 साली त्याला एका 22-वर्षीय तरुणी, लॉरी बॅरोसचं अपहरण, मारहाण आणि गळा दाबल्याप्रकरणी अटक केली. लॉरी सुदैवाने सॅम्युअलच्या तावडीतून वाचली. एका महिन्यानी पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा त्याच्या गाडीत मागच्या सीटवर आणखी एक बेशुद्ध महिला होती. तिलाही मारहाण केली होती आणि तिचा गळा दाबला होता. या दोन्ही गुन्ह्यांसाठी त्याला अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
कोण असायच्या सॅम्युअलच्या बळी?
अमेरिकेची मध्यवर्ती सुरक्षा यंत्रणा एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार सॅम्युअल लिटील 1970 ते 2005 या 35 वर्षांच्या काळात सक्रिय होता.
या काळात तो जवळपास 93 जणांच्या हत्येला जबाबदार असल्याचं त्याने एफबीआयकडे कबूल केलं होतं. यातल्या 50 खूनांशी त्यांचा संबंध जोडून पुरावे शोधण्यात एफबीआय यशस्वी झालीये.
एफबीआयच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की सॅम्युअलच्या बळी गरीब कुटुंबातल्या, अडचणीत आलेल्या, वेश्या व्यवसायात अडकलेल्या किंवा ड्रग्सचं व्यसन असलेल्या महिला असायच्या. बहुतांश महिला कृष्णवर्णीय होत्या.
त्याच्या कित्येक बळींच्या खुनांचा तपासही कधी झाला नाही. त्या महिला कोण हेही कळलं नाही.
"सॅम्युअल ज्या पद्धतीने त्यांचा खून करायचा त्यावरून नेहमीच पुरावे सापडतील असं नव्हतं किंवा हा खूनच आहे असं कळणं ही अवघड असायचं. हा बॉक्सर त्या महिलांना ठोसे मारून बेशुद्ध करायचा आणि मग त्यांची गळा दाबून हत्या करायचा," या रिपोर्टमध्ये दिलं आहे.
या महिलांच्या शरीरावर भोसकल्याच्या किंवा गोळी मारल्याच्या खुणा नसायच्या. त्यामुळे या मृत्युंची खून म्हणून नोंद व्हायची नाही. हे मृत्यू एकतर ड्रग ओव्हरडोस, अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवले गेले.
यातल्या बहुसंख्य हत्या 1970 आणि 80 च्या दशकात केल्या होत्या त्यामुळे त्यावेळी डीएनए तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं.
लॉस एजेंलिसच्या प्रादेशिक सरकारी वकील बेथ सिल्वरमॅन यांनी सॅम्युअलला तुरुंगात पाठवण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांनी 2014 साली न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की, "देशभरातल्या सुरक्षा यंत्रणांनी या केसकडे म्हणावं तितकं लक्ष दिलं नाही. तो प्रत्येक वेळी पकडला गेला आणि सुटत राहिला."
एफबीआयने म्हटलं की अनेक वर्षं सॅम्युअलला पकडलं जाण्याची भीती नव्हती कारण त्याने खून केलेल्या महिलांना कोणीच शोधत नाहीये याची त्याला खात्री होती.
अखेरीस सॅम्युअल पोलिसांच्या तावडीत सापडला
2012 साली एका बेघर लोकांसाठी असणाऱ्या शेल्टर होममधून सॅम्युअलला अमेरिकतल्या कंटकी राज्याच्या पोलिसांनी अटक केली. तिथून त्याला कॅलिफोर्निया राज्यात पाठवण्यात आलं जिथे त्याच्या नावावर ड्रग्सचा गुन्हा दाखल होता.
यावेळी पोलिसांनी त्यांचं डीएनए सँपल घेतलं आणि ते सँपल तीन न सुटलेल्या प्रकरणांशी जुळलं. लॉस एजेंलिस प्रदेशात 1987 आणि 1989 साली तीन महिलांचा खून झाला होता. या तिन्ही महिलांना मारहाण झाली होती आणि त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचे धागेदोरे शेवटपर्यंत हाती आले नाहीत आणि या महिलांना कोणी मारलं हेही कळू शकलं नव्हतं.
पण 2012 साली सॅम्युअलचे डीएनएन सँपल घटनास्थळी सापडलेल्या डीएनएशी जुळले. या प्रकरणांची पुन्हा चौकशी सुरू झाली.
2014 साली सॅम्युअलला या प्रकरणी 3 जन्मठेपांची शिक्षा झाली. म्हणजे तो मरेपर्यंत तुरुंगातच राहाणार होता आणि त्याला जामीन मिळणार नव्हता. यावेळी त्याचं वय होतं 74 वर्षं.
पण अजूनही एफबीआयला कळलं नव्हतं की ही व्यक्ती एक सीरियल किलर आहे.
त्याच्यावर दरोडा, बलात्कारासारखे गुन्हेही दाखल होते. या खूनांप्रकरणी त्याला शिक्षा झाल्यानंतर एफबीआयने आपल्या हिंसक गुन्हेगार पकडणे कार्यक्रम (व्हायकॅप) अंतर्गत त्याच्या स्वभावाचा, त्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करायला सुरुवात केली.
व्हायकॅप अंतर्गत लैंगिक गुन्हेगार, हिंसक गुन्हेगारांचा अभ्यास केला जातो. देशात इतर ठिकाणी घडलेल्या, न सुटलेल्या गुन्ह्यांमध्ये त्याचा हात आहे की नाही, त्या गुन्ह्याची आणि या गुन्हेगाराची कार्यपद्धती मिळती जुळती आहे का, या व्यक्तीविषयी आणखी कुठे पुरावे सापडतात का याचा शोध घेतला जातो.
हा तपास करतानाच एफबीआयच्या अधिकाऱ्यांसमोर धक्कादायक बाबी आल्या. अनेक महिलांच्या खुनांमध्ये सॅम्युअलचा हात आहे हे समोर आलं.
अधिकारी आता वारंवार सॅम्युअलकडून माहिती घेण्यासाठी त्याच्याशी बोलायला लागले. सॅम्युअललाही दुसऱ्या तुरुंगात जायचं होतं, आहे त्यापेक्षा बऱ्या कोठडीत आयुष्य काढायचं होतं त्यामुळे तोही माहिती द्यायला तयार झाला.
त्याने 90 पेक्षा जास्त खुनांची कबुली दिली. त्याच्या कबुलीजबाबाच्या काही रेकॉर्डिंग एफबीआयने प्रसिद्ध केल्या. यात सॅम्युअल आपल्या बळींविषयी बोलताना दिसतो.
एकदा तो सत्तरच्या दशकात एका कृष्णवर्णीय ट्रान्सजेंडर महिलेला भेटल्याचं सांगतो. तिचं नाव मेरी अॅन होतं.
या 19-वर्षीय ट्रान्सजेंडरचा कसा खून केला याचं वर्णन तो करतो. "एका उसाचा शेताजवळ मी तिला मारलं आणि मग तिचा मृतदेह घेऊन जंगलात गेलो. तिथे जमीन फारच भुसभूशीत होती. तिला मी गाडीतून ढकलून दिलं. तिचा मृतदेह खाली पडला आणि जमिनीत रुतला."
आणखी एका केसबद्दल सांगताना तो म्हणतो, "1993 साली मी एका बाईला एका लॉजच्या खोलीत गळा दाबून मारलं. मी तिच्या मुलाला आधी भेटलो होतो. त्याला हँडशेकही केला होता. तिला मारल्यानंतर मी तिला शहराबाहेर घेऊन गेलो आणि एका टेकडीवरून तिचा मृतदेह खाली ढकलून दिला."
अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की सॅम्युअल ज्या घटनांचं वर्णन करतोय ते चपखल आहे, पण त्याला तारखा नीट आठवत नाहीयेत त्यामुळे तपासात अडथळे निर्माण होत आहेत.
तो तुरुंगात असतानाही या खूनांचा तपास सुरु होता कारण प्रत्येक मृत महिलेला न्याय मिळाला पाहिजे असं एफबीआयने म्हटलं. त्याने केलेल्या 93 पैकी 50 खूनांचा उलगडा झाला आहे पण तरीही सुरक्षा यंत्रणा इतर 43 गुन्ह्यांचा उलगडा करण्याचा आजही प्रयत्नात आहेत.
2020 साली त्याचा तुरुंगात असताना मृत्यू झाला. त्यावेळी तो 80 वर्षांचा होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)