एलियन्स खरंच अस्तित्वात आहेत का? पृथ्वीशिवाय आणखी कुठे जीवन आहे?

आपल्या भोवताली असलेल्या संपूर्ण विश्वात किंवा ब्रह्मांडामध्ये पृथ्वीशिवाय इतरही कुठं जीवन आहे का? असेल तर कसं असेल? हे प्रश्न आतापर्यंत शास्त्रज्ञांसाठी अत्यंत गंभीर ठरले आहेत.

याचवर्षी जून महिन्यात अमेरिकेच्या सरकारनं काही उडणाऱ्या वस्तूबाबत म्हणजे (UFO-अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट) शी संबधित एक रिपोर्ट डिक्लासिफाय केला. त्यात पृथ्वीवर अद्याप एलियन्स आल्याचे पुरावे मिळाले नसल्याचं म्हटलं आहे. मात्र या रिपोर्टमध्ये एलियन्सच्या अस्तित्वाची शक्यता नाकारलेलीही नाही.

गेल्या अनेक दशकांपासून वैज्ञानिक या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पृथ्वीपासून सुमारे चार प्रकारशवर्ष दूर असलेल्या अल्फा सेंच्युनी नावाच्या तारांगणामध्ये जीवनाचा शोध सुरू करणार आहेत.

पण त्यांना एलियन्सना शोधण्यात यश येईल का? आणि पृथ्वीशिवाय इतर दुसऱ्या एखाद्या ग्रहावरही जीवन आहे का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

कुठे, कसा उपस्थित झाला प्रश्न?

नॅटली हेन्स लेखिका आहेत आणि सायन्स फिक्शनमध्ये त्यांना रस आहे. दोन हजार वर्षांपूर्वी जेव्हा स्पेस ऑब्झर्व्हेटरी नव्हती किंवा अंतराळ प्रवासाची कल्पनाही केली नव्हती, त्यावेळी लुशियन्स नावाच्या एका ग्रीक लेखकांनी त्यांच्या पुस्तकात पृथ्वीपासून दूर जीवन असल्याचा उल्लेख केला आहे.

"अ ट्रू हिस्ट्री'' नावाच्या पुस्तकात लुशियन्स यांनी काही प्रवाशांची कथा लिहिली आहे. ते एका वादळात अडकून चंद्रापर्यंत पोहोचले. या प्रवासाला त्यांना सात दिवस लागले. सध्याचा विचार करता, रॉकेटच्या मदतीनं चंद्रापर्यंत जायला यापेक्षा अर्धा कालावधी लागतो. त्याठिकाणी चंद्र आणि सूर्याच्या राजांमध्ये युद्ध सुरू होते. त्यांच्याकडे विचित्र दिसणारं सैन्य असायचं," असं नॅटली म्हणाल्या.

लुशियन्स यांनी त्यांच्या पुस्तकात चंद्रावर पंख असलेले घोडे, महाकाय गिधाडं, बारा हत्तींच्या आकाराएवढे पिसू (किडे) यांचा उल्लेख केला आहे. त्यांनी विचित्र लोकांबाबत लिहिलं असून त्यांना एलियन्स म्हणणं वावगं ठरणार नाही.

त्यानंतर सुमारे आठशे वर्षांनी दहाव्या शतकातील जपानमध्ये आणखी एक सायन्स फिक्शन कथा 'द बाम्बू कटर्स डॉटर' लिहिण्यात आली होती.

"या कथेनुसार, बांबू कापणाऱ्या एका व्यक्तीला एकदिवस बांबूमध्ये तीव्र प्रकाश दिसला. त्याला तिथं एक लहानशी मुलगी आढळली. तिला त्यानं घरी आणलं आणि लहानाचं मोठं केलं. नंतर त्या मुलीनं ती चंद्रावरची असल्याचं सांगितलं," असं नॅटली म्हणाल्या.

मात्र, पूर्वीच्या ज्या कथांमध्ये एलियन्सचा उल्लेख आहे, त्याच चंद्राचाही उल्लेख आहे, असं का?

नॅटली यांच्या मते, "दीर्घकाळापासून चंद्राबाबतच लिहिलं जात आहे हे खरं आहे. चंद्र पृथ्वीपासून स्पष्टपणे दिसतो, शुक्र किंवा मंगळ दिसत नाही, हे त्याचं कारण असू शकतं."

पण लवकरच मंगळही पृथ्वीवर चर्चेचा विषय बनला. 1870 च्या दशकामध्ये इटलीचे एक खगोल शास्त्रज्ञ जियोवानी व्हर्जिनियो शियापरेली यांनी दुर्बीणीद्वारे मंगळ ग्रहाचं निरीक्षण करून, त्याबाबत सविस्तर लिखाण केलं.

"त्यांना मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर नालीसारख्या रेषा दिसल्या. त्यांना कनाली म्हटलं गेलं होतं. लोकांना वाटलं ते कॅनल म्हणजे कालव्यांबाबत बोलत असतील. त्यावेळी सुएझ कालव्याचं काम पूर्ण झालं होतं. त्यानंतर अशी चर्चा आणि अख्यायिका झाली की, मंगळ ग्रहावर राहणाऱ्यांनी त्याठिकाणी कालवा तयार केला आहे," असं नॅटली सांगतात.

काही वर्षांनी 1881 मध्ये लंडन ट्रूथ नावाच्या एका पत्रिकेमध्ये मंगळाच्या पृथ्वीवर हल्ला करण्याबाबतची एक काल्पनिक कथा प्रकाशित झाली. त्यानंतर काही वर्षांनी पोलंडच्या एका पाद्रींनी 'अॅलेरियल - अ व्होयेद टू अदर वर्ल्ड्स' नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्यात त्यांनी मंगळवावर राहणाऱ्या नऊ फुटांच्या शाकाहारी लोकांचा उल्लेख केला. प्रथमच त्यांनी त्यासाठी मार्शियन शब्दाचा वापर केला.

त्यानंतर अनेक लोकांनी मंगळ ग्रहावरून तीव्र प्रकाशाची किरणं पाहिल्यासारखे दावे केले.

याच काळात रेडिओ वर एचजी वेल्स यांचं पुस्तक 'द वॉर ऑफ द वर्ल्ड्स' चं नाट्य रुपांतर प्रसारीत करण्यात आलं. ओर्सन वेल्स यांनी ही कथा वृत्त मालिकेच्या स्वरुपात अशा प्रकारे सादर केली की, ऐकणाऱ्यांना मार्शियन्सनं पृथ्वीवर हल्ला केला आहे, असंच वाटावं.

विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच पुस्तकं आणि कथांवरही चित्रपट तयार करण्यात आले. त्यामुळं तरुण शास्त्रज्ञांच्या मनात एलियन्सबाबत जाण्याची इच्छा दृढ झाली.

इतर ग्रहांवर जीवनाचा शोध

1960 च्या दशकात तरुण वैज्ञानिक फ्रैंक ड्रेक यांनी म्हटलं की, एका सूर्यमालेतून दुसऱ्या सूर्यमालेत संदेश पाठवण्यासाठी महायुद्धादरम्यान तयार करण्यात आलेल्या रेडिओ तंत्राचा वापर करता येऊ शकतो. एलियन्सही तसं करत असू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना शोधण्यासाठी आपल्याला केवळ त्यांचं सिग्नल शोधायचं आहे.

सेथ शोस्टॅक सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रियल इंटलिजन्स (सेटी) मध्ये ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आहेत. गेल्या चार दशकांपासून ते एलियन्सचे असेच सिग्नल ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत.

"फ्रँक यांनी वेस्ट व्हर्जिनियाच्या वेधशाळेत सध्या असलेल्या अँटिनाची दिशा जवळच्या तारांकडे केली. एलियन्स सिग्नल पाठवत असतील तर ते त्यांना कॅच करू शकतात, असा त्यांचा प्रयत्न होता. ते दोन तारांवर लक्ष ठेवून होते. मजेशीर बाब म्हणजे, एका तारेतून त्यांना काहीही संदेश किंवा सिग्नल मिळाले नाहीत. मात्र दुसऱ्या तारेतून त्यांना काही आवाज ऐकायला आले. त्यामुळं त्यांनी एलियन्सला शोधलं आहे, असं त्यांना वाटलं. मात्र ते लष्कराचं एखादं विमान असण्याचीही शक्यता होती," असं ते म्हणाले.

काही काळातच जगभरातील शास्त्रज्ञ एलियन्सचा शोध घेऊ लागले होते. 1980 च्या दशकात अमेरिकेच्या सरकारनं एलियन्सच्या शोधासाठी सेटी इन्स्टिट्यूटला आर्थिक मदत देणं सुरू केलं.

रेडिओ तरंग अंतराळात सहजपणे जाऊ शकतात आणि सेथ यांना रेडिओ रिसिव्हरवर जे आवाज ऐकायचे होते, ते सामान्य आवाजांपेक्षा वेगळे होते. सेथ यांनी सिम्यूलेशनद्वारे एक असा आवाज तयार केला जो ऐकायला एखाद्या एलियन सिग्नलसारखा वाटेल. ते काय शोधत आहेत हे समजण्यासाठी त्यांनी तसं केलं.

"ते ऐकल्यावर कोणीतरी नायगरा फॉल्सजवळ उभं राहून बासरी वाजवत असावं असं वाटतं. रिसिव्हरवर नायगरा फॉल्सचा आवाज अंतराळाच्या रिकामेपणाच्या आवाजासारखा असेल, मात्र ते एखाद्या गाण्याच्या चालीसारखं नव्हे तर, आवाजासारखं ऐकू येईल," असं ते म्हणाले.

सेथ आणि त्यांच्या टीमला ते काय शोधत आहेत? हे माहिती होतं. पण त्यासाठी त्यांना लाखो रेडिओ फ्रिक्वेन्सीचा अभ्यास करावा लागणार होता. त्यापैकी आधी काय पाहायचा हे त्यांना कसं समजणार?

"ही मोठी समस्या होती. एलियन्सनं मला कोणत्या फ्रिक्वेन्सीवर ट्यून करायचं हा संदेश पाठवला नाही. त्यामुळं मला प्रत्येक फ्रिक्वन्सी चेक करावी लागणार होती. पण तसं करणं म्हणजे वेळ वाया घालवणं होतं. आम्हाला सगळे चॅनल एकाचवेळी ऐकता येतील, असे रिसिव्हर हवे."

1990 पर्यंत हेदेखील शक्य झालं आणि एकाचवेळी लाखो फ्रिक्वेन्सी ऐकता येतील अशा कंप्युटर्सची निर्मिती झाली.

ओहायो युनिव्हर्सिटीच्या एका खगोल तज्ज्ञांनी जेव्हा रेडिओ टेलिस्कोपचा डेटा पाहिला तेव्हा त्यांना अत्यंत जास्त तीव्रता असलेले आणि फ्रिक्वेन्सीचे सिग्नल आढळले. त्यांना वाटलं हे एलियन्सचेच सिग्नल आहेत.

"ते अत्यंत आनंदी होतं. त्यांनी डेटाजवळ 'वाओ' असं लिहिलं. पण त्यांना नेमकं काय मिळालं, ते आम्हाला माहिती नाही. आकाशाच्या त्याच भागात इतर अनेक लोकांनी शोध घेतला. पण त्यांना असं काहीही मिळालं नाही. अशा परस्थितीत दोन शक्यता होत्या. एक तर ते एलियन्स होते किंवा पृथ्वीवरचाच कशाचा तरी तो आवाज होता," असं सेथ म्हणाले.

अनेक लोकांसाठी हे एलियन्सच्या सिग्नलचं उत्तम उदाहरण होतं. पण प्रत्यक्षात अनेक वर्षांच्या शोधानंतरही एलियन्सबाबत काही ठोस माहिती मिळालेली नव्हती.

त्यामुळं काहीच हाती लागणार नाही अशा प्रोजेक्टवर सरकारनं अब्जावधी खर्च करणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित झाला. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला सेटी इन्स्टिट्यूटला मिळणारी सरकारी मदत बंद झाली. पण एलियन्सच्या शोधाचा तो अंत नव्हता.

कॅप्लर

डेवीड ग्रीनस्पून अॅस्ट्रोबायोलॉजिस्ट आहेत आणि प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये वरिष्ठ वैज्ञानिकही आहेत. अंतराळ संशोधनासंदर्भात ते नासाचे सल्लागार राहिलेले आहेत.

एलियन्सच्या शोधाबाबत विश्वास कमी होण्याचं आणखी एक कारण म्हणजे, तोपर्यंत जास्त ग्रहांचा शोध लावण्यात आलेला नव्हता. मात्र, 90 च्या दशकाच्या सुरुवातीपासून वैज्ञानिकांना आपल्या सूर्यमालेत नवे छोटे आणि ड्वॉर्फ ग्रह शोधून काढले.

त्यानंतर पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले की आपल्या सूर्यमालेबाहेरही ज्याठिकाणी जीवन असेल तिथं असे ग्रह असू शकतात.

मार्च 2009 मध्ये नासानं कॅप्लर अंतराळ यान लाँच केलं. त्यात टेलिस्कोप असलेली एक ऑब्झरव्हेटरी होती. तिचा उद्देश पृथ्वीच्या बाहेर जीवनाचा शोध घेणं हा होता.

"कॅप्लर ही एक उत्तम कल्पना होती. त्यानुसार धरतीपासून दूर एका अशाठिकाणी ते ठेवायचं ज्याठिकाणाहून संपूर्ण अंतराळावर ते नजर ठेवू शकेल," असं डेव्हीड म्हणाले.

कॅप्लर अनेक वर्षे ताऱ्यांवर नजर ठेवत राहिलं. एखाद्या ताऱ्यातून येणारा प्रकाश बदलतो की नाही, हे पाहणं त्याचं काम होतं.

"प्रकाशात बदल झाला तर त्याचा अर्थ म्हणजे आपल्या आणि त्या ताऱ्याच्या मधून काहीतरी जात आहे. हा एखादा ग्रह असू शकतो. एखादा तारा चमकण्याचा काही पॅटर्न असला तर काही तरी त्याभोवती फिरत आहे, हे लक्षात येतं," असं ते सांगतात.

कॅप्लरला काही ग्रह शोधण्याची अपेक्षा होती. मात्र, नऊ वर्षाच्या काळात त्यानं सूर्यमालेच्या बाहेर 2600 ग्रह शोधले. 2013 मध्ये शास्त्रज्ञांनी यावरून अंदाज बांधला की, यासारखे अब्जावधी ग्रह हे आकाशगंगेमध्ये असू शकतात.

पण यापैकी किती ग्रहांवर जीवन असण्याची शक्यता आहे?

"याबाबत अगदी वरवरचा अंदाज लावला जाऊ शकतो. कारण कोणत्या परिस्थितीत जीवन निर्माण होतं, हे आपल्याला माहिती नाही. आपल्यासमोर केवळ पृथ्वीचं उदाहरण आहे. पण आपण असं म्हणू शकतो की, पृथ्वीच्या आकाराचा एखादा ग्रह जर एखाद्या खास वातावरणात असेल तर त्याठिकाणी जीवन असण्याची शक्यता असू शकते. त्यानुसार आपल्या आकाशगंगेत असे किमान 30 कोटी ग्रह असू शकतात, असं म्हणता येईल."

डेवीड ग्रीनस्पून यांच्यामते हा शोध म्हणजे पृथ्वीच्या बाहेर जीवन असण्याच्या शक्यतेबाबत शास्त्रज्ञांचं मत बदलणारी क्रांती होती.

"बहुतांश खगोलतज्ज्ञ किंवा शास्त्रज्ञ यांना इतर ग्रहावर जीवन असेल याचा विश्वास आहे, असंच सांगतील. आतापर्यंत पृथ्वीबाबतही काही विशेष असं समजलेलं नाही की, केवळ याठिकाणीच जीवन निर्माण होऊ शकत होतं," असंही ते म्हणाले.

यादरम्यान पृथ्वीवर एक्सट्रिमोफाइल्ससारखे काही जीव आढळले. त्यावरून कठीण परिस्थितीतही जीवनाची निर्मिती होऊ शकते हे सिद्ध होतं. जीवनाच्या उगमाचा आधार असलेले हे चिमुकले जीव संपूर्ण ब्रह्मांडामध्ये असल्याचा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.

या नव्या शोधानं पुन्हा एकदा एलियन्सच्या शोधातील रस वाढला आहे.

पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, - एलियन्स भेटले तरी पुढं काय?

एलियन्स भेटले तर आपण काय करणार?

स्टिव्हन डिक खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञानाचे इतिहासकार आहेत. ते नासामध्ये प्रुमख इतिहासकार राहिलेले आहेत. आंतरराष्ट्रीय अॅस्ट्रॉनॉमिकल युनियननं त्यांच्या नावावर एका ग्रहाला 6544 स्टीव्हनडिक असं नाव दिलं आहे.

इतर खगोल तज्ज्ञांप्रमाणे स्टिव्हन यांनाही विश्वास आहे की, पृथ्वीपासून दूरदेखील कुठंतरी जीवन आहे. मात्र चिंतेची बाब म्हणजे त्याबाबत समजल्यानंतर काय होणार.

"मला जेवढं माहिती आहे त्यानुसार, अमेरिकेचं सरकार किंवा इतर कुणाकडेही एलियन्स सापडले तर त्याचा काय परिणाम होईल, याबाबत काही नियोजन नाही," असं ते म्हणाले.

स्टीव्हन डिक अनेक वर्षे नासाच्या एलियन लाईफ प्रिपरेशन प्रोग्रामचा भाग राहिलेले आहेत. इतर ग्रहांवरून येणाऱ्या वस्तुंबाबत काही नियम आहेत मात्र ते दीर्घकाळासाठी तयार केलेले नाहीत, असं ते सांगतात.

आपल्याला अजून हेच माहिती नाही की, ज्यांना आपण शोधत आहोत ते नेमके कसे आहेत आणि आपल्याला भेटल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया असेल, असं ते म्हणाले.

"एलियन्स चांगलेच असतील असं आपण समजू शकत नाही. मायक्रोबच्या दृष्टीनं विचार केला तरी, इतर ग्रहावरून आलेला बॅक्टेरियादेखील इथं संसर्ग पसरवू शकतो. एलियन्सच्या जगात परोपकाराचा सिद्धांत आहे की नाही, हेही आपल्याला माहिती नाही. माणसांप्रती त्याचं वर्तन ठिक असेल का," असं ते म्हणाले.

पण आपण ज्या एलियन्सचा शोध घेत आहोत तेही आपल्याला शोधत असतील आणि आपल्याला भेटण्यासाठी पृथ्वीवर आले तर, असंही होऊ शकतं का? त्याहीपेक्षा मोठा प्रश्न म्हणजे आपण एलियन्सबरोबर कसं बोलणार?

"हा गंभीर चर्चेचा विषय आहे. मला वाटतं अराईव्हल चित्रपटात याबाबत उत्तम बाबी दाखवण्यात आल्या आहेत. यात काही एलियन्स लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला अशी भाषा हवी आहे, जी संपूर्ण ब्रह्मांडामध्ये समजली जाईल. अनेकांना वाटतं याचं उत्तर गणित असू शकतं. पण त्याबाबतही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. काहींच्या ते गणिताचा शोध लावण्यात आला तर काहींच्या मते ते तयार करण्यात आलं," असं स्टिव्हन म्हणाले.

त्याशिवाय इतरही अनेक असे प्रश्न आहेत जे त्रासदायक ठरू शकतात. उदाहरणार्थ आपण त्यांना धर्माच्या दृष्टीनं पाहू शकू का? आपण त्यांच्याबरोबर कशाप्रकारचं वर्तन करू? किंवा जगाच्या वतीनं त्यांच्याशी कोण चर्चा करेल-संयुक्त राष्ट्र की दुसरं कुणी?

या प्रश्नांची उत्तरं अद्याप कोणाकडेही नाहीत. स्टिव्हन डिक म्हणतात की, यावर चर्चेसाठी आपल्याला खगोल शास्त्रज्ञ, तत्वज्ञानी, जीव शास्त्रज्ञ आणि राजकारणी यांना एकत्र आणण्याची गरज आहे.

"मला वाटतं आपल्याकडे काहीतरी योजना असायला हवी. काय करायला हवं हे आपल्याला माहिती नाही. पण याबाबत आधीपासून विचार करण्यात आला तर अधिक उत्तम होईल," असं ते म्हणाले.

आता पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया, तो म्हणजे खरंच एलियन्स आहेत का?

आपल्याला माहिती आहे की, आतापर्यंत इतर ग्रहांवर जीवन असल्याचे काही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. अनेक दशकांच्या संशोधनानंतरही या प्रकरणी आपण जिथून निघालो होतो अद्याप तिथून पुढं सरकलेलो नाही.

पण याकडे वेगळ्या दृष्टीकोनानंदेखील पाहिलं जाऊ शकतं. हा शक्यतांचा प्रश्न आहे. ब्रह्मांडामध्ये लाखो आकाशगंगा आहेत. त्यापैकी एक आपली मिल्की आहे आणि आपल्या आकाशगंगेमध्ये अब्जावधी ग्रह आहेत.

जीवनाची निर्मिती होऊ शकते असा पृथ्वी हा एकमेव ग्रह नाही अशी शक्यता आहे. दुसऱ्या एखाद्या ग्रहावरही जीवन असू शकतं आणि कदाचित आपल्यासारखंच ते जीवन असेल.

एक दिवस खरंच आपण एलियन्स शोधू शकू किंवा कदाचित ते आपल्याला आपल्या आधी शोधतील असंही होऊ शकतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)