हरेकाला हजाब्बा : फळविक्रीतून साठलेल्या पैशातून उभारली गावातल्या मुलांसाठी शाळा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी (8 नोव्हेंबर) राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात विविध मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं.

सोमवारी सन्मानित करण्यात आलेल्या मान्यवरांपैकी अनेकांनी परिस्थितीशी संघर्ष करत खडतर वाटचाल केली आहे. मात्र त्यांनी अतुलनीय जिद्द आणि निर्धाराच्या बळावर आपापल्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. यासाठीच त्यांची प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यापैकीच एक आहेत कर्नाटकचे हरेकाला हजाब्बा.

स्वत: निरक्षर असलेल्या हजाब्बा यांनी शिक्षणाचं मोल ओळखलं आणि आपल्या साठवणुकीच्या पैशातून त्यांनी बेंगळुरूजवळच्या गावात 2000 मध्ये शाळा सुरू केली.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्यावर सोशल मीडियावर हजाब्बा यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली. द्रष्टेपण, प्रचंड मेहनत आणि अडथळे पार करत केलेल्या वाटचालीसाठी अनेकांची त्यांचं कौतुक केलं.

फळविक्रेता म्हणून काम करणाऱ्या हजाब्बा यांच्या वाटचालीसंदर्भात बीबीसी प्रतिनिधी विकास पांडे यांनी फळं विकून शिक्षणाची कास धरणारा माणूस अशी बातमी केली होती. पद्म पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने या बातमीतील संपादित भाग...

दक्षिण भारतात राहणाऱ्या हजाब्बा यांनी शिक्षण झालेलं नसताना, मर्यादित संसाधनांच्या साह्याने जे करून दाखवलं आहे ते अनेक राज्य सरकार आणि संघटनांनादेखील जमलेलं नाही.

हजाब्बा यांचं फळांचं छोटंसं दुकान आहे. फळविक्रीतून जे पैसे मिळतात त्यातून जे पैसे राहतात त्या पैशातून हजाब्बा यांनी प्राथमिक आणि नंतर माध्यमिक शाळा सुरू केली.

बंगळुरूपासून साडेतीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या न्यूपाडपू गावात रस्त्यांची चाळण झालेली आहे. अनेक ठिकाणी चिखल साठला आहे. मात्र शाळेत जाण्यासाठी तयार असलेल्या 130 मुलांच्या फौजेला यातलं काहीही रोखू शकत नाही.

2000पर्यंत या गावात एकही शाळा नव्हतं. दरदिवशी दीडशे रुपये कमावणाऱ्या हजाब्बा यांनी स्वकमाईतून ही शाळा उभारली. आता ही शाळा दक्षिण कन्नड जिल्हा पंचायत हायस्कूल या नावाने ओळखली जाते.

शाळा सुरू करण्याची प्रेरणा

शाळा सुरू करावी असं का वाटलं यासंदर्भात हजाब्बा सांगतात, एकदा एका विदेशी माणसाने मला फळाचं नाव इंग्रजीत विचारलं. तेव्हा मला निरक्षर असल्याची जाणीव झाली. मला त्याचा अर्थ सांगता आला नाही.

तेव्हा मला असं वाटलं की, गावात प्राथमिक शाळा असावी. जेणेकरून गावातली मुलं तिथे शिकतील. ज्या परिस्थितीतून मला जावं लागलं ती परिस्थिती त्यांच्यावर ओढवू नये.

स्थानिक मंडळी हजाब्बा यांच्या कौतुकात जराही कमी पडत नाहीत पण हजाब्बा यांच्यासाठी शाळा सुरू करणं महत्त्वाचं होतं.

कोणाचीही मदत नसताना हजाब्बा यांनी 2000 साली ही शाळा सुरू केली. मशिदीजवळच्या एका मदरशात त्यांनी ही शाळा सुरू केली. सुरुवातीला 28 मुलं होती.

सरकारची भूमिका

मशिदीच्या बाजूला असलेल्या मदरशात ही शाळा सुरू झाली. काही काळानंतर शाळेची स्वत:ची वास्तू तयार झाली.

जसजशी मुलांची संख्या वाढू लागली तसं शाळेला अधिक जागेची गरज भासू लागली. त्यावेळी हजाब्बा यांनी अर्ज केला. साठवणुकीच्या पैशातून त्यांनी इमारतीचं काम सुरू केलं.

हजाब्बा यांची जिद्द आणि निर्धार पाहून अनेक माणसं या कामात जोडली गेली. पण हजाब्बा यांचं काम अद्याप संपलेलं नाही.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, देशातले 25 टक्के लोकसंख्या निरक्षर आहे. अनेक मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत. कारण त्यांच्या गावी शाळाच नाही.

एका स्थानिक वर्तमानपत्राने हजाब्बा यांच्याबाबत लिहिलं तेव्हा सरकारने त्यांन एक लाख रुपये दिले.

हजाब्बा सांगतात, सरकारच्या वतीने मला आणखी एक पुरस्कार देण्यात आला ज्याअंतर्गत मला एक लाख रुपये मिळाले. त्यानंतर लोकांनी मला पैसे पाठवणं सुरू केलं.

तेव्हापासून हजाब्बा यांना खूप साऱ्या ठिकाणांहून मदत आणि पुरस्कार मिळाले आहेत. सर्वसामान्य जनतेला ते नायक वाटतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)