You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Nobel Prize : ग्लोबल वॉर्मिंगच्या अभ्यासासाठी भौतिकशास्त्राचं नोबेल
स्युकुरो मानाबे, क्लाऊस हॅसेलमान आणि जॉर्जियो पॅरिसी हे भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
सन 2021 साठीच्या फिजिक्स (भौतिकशास्त्र) नोबेलची घोषणा झाली आहे. यंदाचा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आला आहे.
स्युकुरो मानाबे आणि क्लाऊस हॅसेलमान यांना दोघांना मिळून अर्धा पुरस्कार तर जॉर्जियो पॅरिसी यांना अर्धा पुरस्कार जाहीर झाला आहे.
स्युकुरो आणि क्लाऊस यांना त्यांच्या 'पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करून ग्लोबल वॉर्मिंगचा अभ्यास करू शकणाऱ्या' मॉडेलसाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
तर जॉर्जियो यांना 'अणूच्या संरचेनपासून ग्रहमालिकेपर्यंत सगळ्या भौतिक रचनांमध्ये येणारे चढ-उतार आणि अव्यवस्था यांचा परस्परसंबंध कसा असतो' याचा शोध लावल्याबद्दल नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
मंगळवारी, 5 ऑक्टोबर, 2021 ला या पुरस्कारांची घोषणा झाली.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोबेल पुरस्कारांची घोषणा होते. याआधी वैद्यकशास्त्रातले नोबेल पुरस्कार जाहीर झाले.
नोबेल पुरस्कार का दिले जातात?
संशोधक, लेखक, शांततावादी अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात. साहित्य, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयात नोबेल पुरस्कार जगातले सर्वोच्च पुरस्कार समजले जातात.
तसंच दरवर्षी जगात शांतता नांदावी म्हणून अथक काम करणाऱ्या एका व्यक्तीला शांततेचं नोबल दिलं जातं.
अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाईट म्हणजेच सुरुंगाचा शोध लावला. एकदा त्यांनी एका फ्रेंच वृत्तपत्रात स्वतःचाच मृत्यूलेख वाचला. त्यावेळी त्यांच्या भावाचा मृत्यू झाला होता पण वृत्तपत्रात चुकीने अल्फ्रेड नोबेल यांच्याविषयी छापून आलं.
सुरुंगाचा शोध त्यांच्या नावे असल्यामुळे त्यांना 'मृत्यूचा व्यापारी' असं त्या लेखात म्हटलं होतं.
या गोष्टींनी त्यांना वाईट वाटलं. ते शांततावादी होते आणि आपली हीच ओळख आपल्या मृत्यूनंतरही कायम राहावी असं त्यांना वाटलं.
त्यामुळे त्यांनी नोबेल पुरस्कारांसाठी 26.5 कोटी डॉलर्स दान करायचं ठरवलं.
पहिला नोबेल पुरस्कार 1901 साली दिला गेला. सर्वात जास्त नोबेल रेड-क्रॉस या संस्थेला मिळाले आहेत.
रेडक्रॉसने आजवर तीनदा हा पुरस्कार जिंकला आहे.
नोबेल जिंकणारे भारतीय
आजवर 10 भारतीयांना किंवा भारतीय वंशाच्या व्यक्तींना नोबेल पुरस्कार मिळाला आहे.
नोबेल जिंकणारे पहिले भारतीय होते रविंद्रनाथ टागोर. त्यांच्या साहित्यातल्या कारकिर्दीबद्दल त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाल होता.
यानंतर 1930 साली सर सी व्ही रामन यांना प्रकाशाच्या विकिरणांचा अभ्यास आणि संशोधनाबद्दल भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळाला होता. भौतिकशास्त्रात नोबेल मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत.
सन 1968 मध्ये हर गोविंद खुराना यांना वैद्यकशास्त्रातलं नोबेल मिळालं होतं. 'जेनेटिक कोड' या क्षेत्रात काम केल्याबद्दल खुराना यांना रॉबर्ट हॉली आणि मार्शल निरेबर्ग यांच्यासोबत विभागून पुरस्कार मिळाला होता.
सन 1983 मध्ये सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना विल्यम फॉवलर यांच्यासोबत विभागून रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळाला होता.
1979 साली मदर तेरेसा यांना शांततेचा पुरस्कार मिळाल होता. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. मदर तेरेसा जन्माने भारतीय नसल्या तरी त्यांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारलं होतं.
1998 साली अर्थतज्ज्ञ अमर्त सेन यांना स्वेर्गिस रिक्सबँक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अल्फ्रेड नोबेल यांचं अर्थशास्त्रातलं योगदान अधोरेखित करण्यासाठी हा पुरस्कार तेव्हा देण्यात आला.
2001 साली भारतीय वंशाच्या व्ही एस नायपॉल यांना साहित्यातलं नोबेल देण्यात आलं.
सन 2009 मध्ये वेंकटरमण रामकृष्णन यांना थॉमस सेइट्झ आणि अदा योनाथ यांच्याबरोबर विभागून रसायनशास्त्रातलं नोबेल जाहीर झालं.
2014 साली भारतातले सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांना मलाला युसुफजाई हिच्यासोबत विभागून शांततेचं नोबेल देण्यात आलं.
2020 साली अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना त्यांच्या पत्नी एस्थर डफलो यांच्यासोबत विभागून अर्थशास्त्रातलं नोबेल मिळालं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)