Ig Nobel Prize : 'गेंड्याला उलटं लटकावून नेणं सुरक्षित असतं का,' यावरील संशोधनाला मिळाला पुरस्कार

गेंड्यांना उलटं लटकावून त्यांच्यावर अशा अवस्थेचा कोणता परिणाम होतो, याचा शोध घेणाऱ्या प्रयोगाला या वर्षीचा ईग (Ig - noble: 'ईग नोबेल' / सन्माननीय नसलेले) नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

फूटपाथवर अडकलेल्या च्युईंग-गममधील जीवाणूंचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या चमूला, आणि पाणबुड्यांमधील झुरळांना कसा आळा घालायचा यावर काम केलेल्या अभ्यासकांनाही या पुरस्काराने 'सन्मानित' करण्यात आलं आहे.

अजून तरी 'खऱ्या' नोबेल पुरस्कारांइतके हे विडंबनात्मक नोबेल पुरस्कार प्रसिद्ध पावलेले नाहीत.

कोव्हिडविषयक निर्बंधांमुळे या वर्षी पुरस्कार वितरणाचा समारंभ नेहमीसारखा अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात होऊ शकला नाही. त्यामुळे ही सर्व गंमत ऑनलाइनच पार पडली.

ईग नोबेल पुरस्कारांनी लोकांना पहिल्यांदा हसायला लावलं पाहिजे आणि मग विचारात पाडलं पाहिजे, अशी या पुरस्कारामागची आयोजकांची भूमिका आहे.

या वर्षी वाहतुकीसंदर्भातील संशोधनाचा ईग नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या गेंड्यांवरील अभ्यासाने नेमकं हेच केलेलं आहे. बारा गेंड्यांना दहा मिनिटं उलटं लटकावण्याइतकं मूर्खपणाचं दुसरं काय असेल, असं वाटू शकतं पण संशोधकांनी यावर अभ्यास केला.

कॉर्नेल विद्यापीठातील वन्यजीव व्हेटरिनेरियन रॉबिन रॅडक्लिफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नामिबियामध्ये हा प्रयोग केला.

संशोधन नेमकं काय होतं?

हेलिकॉप्टरला पाय बांधून गेंड्यांना उलटं लटकावलं तर त्यांच्या आरोग्यावर काही विपरित परिणाम होतो का, हे या मंडळींना शोधायचं होतं.

आफ्रिकेत गेंड्यांना विखंडित निवास परिसरातून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी केल्या जाणाऱ्या संरक्षणकार्यामध्ये ही पद्धत अधिकाधिक वापरली जाते.

परंतु, हेलिकॉप्टरला उलटं लटकावून प्रवास करताना शांत प्राण्यांचं हृदय व फुफ्फुसांचं कार्य या परिस्थितीशी कसं जुळवून घेतं, इतका प्राथमिक तपास आत्तापर्यंत कोणी केला नव्हता, असं रॉबिन म्हणाले.

बीबीसी न्यूजशी बोलताना ते म्हणाले, "हा अभ्यास करून अंदाज घ्यायला हवा, गेंड्यांच्या बाबतीत असं करणं सुरक्षित आहे का, असा विचार करणारा नामिबिया हा पहिला देश ठरला."

त्यामुळे रॉबिन यांच्या संशोधकीय चमूने नामिबियाच्या पर्यावरण, वन व पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने एक प्रयोग केला. त्यांनी शांत केलेल्या 12 काळ्या गेंड्यांना पायांच्या बाजूने एका क्रेनला बांधून लटकावून ठेवलं आणि गेंड्यांचं शरीर या स्थितीला कसा प्रतिसाद देतं, याचं मोजमाप केलं.

तर, गेंडे अशा स्थितीशी चांगल्या तऱ्हेने जुळवून घेत असल्याचं त्यांच्या लक्षत आलं. किंबहुना, उलट्या स्थितीत त्यांच्या शारीरिक क्रिया अधिक चांगल्या झाल्याचा पुरावा त्यांना मिळाला.

"नेहमीच्या स्थितीपेक्षा बदललेल्या स्थितीचे रक्ताभिसरणावर होणारे परिणाम याला कारणीभूत ठरतात, असं मला वाटतं. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, फुफ्फुसांच्या खालच्या बाजूला वायूच्या देवाणघेवाणीसाठी जास्तीचा रक्तप्रवाह होतो, पण फुफ्फुसाचा वरचा भाग, गुरुत्वाकर्षणामुळे पुरेशा प्रमाणात प्रवाह खेचू शकत नाही. गेंडा उलट्या स्थितीत गेल्यावर मात्र फुफ्फुसाला समान रक्तप्रवाह मिळतो.

"दीर्घ काळ नेहमीच्या स्थितीत असणाऱ्या, किंवा छातीवर भार देऊन असणाऱ्या गेंड्यांच्या स्नायूंची हानी होते, त्यांना मायोपथीचा विकार जडावू शकतो, कारण ते खूप वजनतादर असतात. गुडघ्याभोवतीच्या मांसल पट्ट्याव्यतिरिक्त त्यांच्या पायांवर काही दाब येत नाही," असं रॉबिन म्हणाले.

खरे नोबेलविजेते ईग नोबेल पुरस्कार प्रदान करतात, असा प्रघात आहे. उदाहरणार्थ, फ्रान्सिस अरनॉल्ड (रसायनशास्त्र, 2018), कार्ल वेइमन (भौतिकशास्त्र, 2001), आणि एरिक मस्किन (अर्थशास्त्र, 2007) यांच्या हस्ते यापूर्वी ईग नोबेल पुरस्कार दिलेले आहेत.

बक्षिसात काय मिळतं?

विजेत्यांना एक ट्रॉफी मिळते- पीडीएफच्या प्रिंट-आउटवरून त्यांना स्वतःलाच ती जोडून घ्यावी लागते. शिवाय झिम्बाब्वेतील बँकेची १० खर्व डॉलरांची एक बनावट नोटही त्यांना 'रोख' बक्षिस म्हणून मिळते.

या 'रोख' बक्षिसाविषयी रॉबिन रॅडक्लिफ हसून म्हणाले, "आम्ही तसेही कायम कुठून काही निधी मिळतोय का ते शोधतच असतो.

"मी पहिल्यांदा ईग नोबेलबद्दल ऐकलं तेव्हा हे चांगलं आहे की वाईट, याचा मला अंदाज आला नाही. पण 'आधी हसायला लावणारा आणि मग विचार करायला लावणारा' हा त्यांचा संदेश आम्हाला लागू होतो, असं मला वाटतं. आपल्या सोबत पृथ्वीवर राहणारे हे विलक्षण प्राणी वाचवण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत, हे अधिकाधिक लोकांना कळायला हवं."

या संशोधकीय चमूचा भाग असणारे वन्यजीव डॉक्टर पीट मॉर्कल म्हणाले, "या अभ्यासामुळे गेंड्यांच्या स्थानांतरणामध्ये खरोखरच बदल घडला आहे. किंबहुना हत्तींच्या स्थानांतरण पद्धतीवरही याचा चांगला परिणाम झाला. या मोठ्या प्राण्यांना त्यांच्या पायांना बांधून उलट्या स्थितीत दुसऱ्या ठिकाणी नेणं आता स्वीकारलं गेलं आहे. आता म्हशी, पाणघोडे आणि कदाचित जिराफ अशा इतर प्रजातींबाबतही आम्हाला आता संशोधन करायचं आहे."

ईग नोबेलविजेत्या पुरस्कारार्थींची संपूर्ण यादी:

जीवशास्त्रातील पुरस्कार: सुझान शॉट्झ. मांजर आणि मानव यांच्या संदेशनाच्या- म्हणजे किंचाळण्यापासून म्याँव करण्यापर्यंतच्या- विविध पद्धतींमधल्या भेदांचं विश्लेषण केलं.

पर्यावरणशास्त्रातील पुरस्कार: लइला सेटारी व सहकारी. विविध देशांमध्ये फूटपाथवर चिकटलेल्या च्युईंग-गमच्या चोथ्यात राहणाऱ्या जीवाणूंच्या विभिन्न प्रजाती ओळखण्यासाठी जनुकीय विश्लेषणाचा वापर केला.

रसायनशास्त्रातील पुरस्कार: योर्ग विकर व सहकारी. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांकडून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमधून समोरच्या चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या हिंसा, सेक्स, समाजविघातक वर्तन, अंमली पदार्थांचा वापर व खराब भाषेच्या पातळीचे काही विश्वसनीय संकेत मिळतात का, हे तपासण्यासाठी चित्रपटगृहातील हवेचं रासायनिक विश्लेषण केलं.

अर्थशास्त्रातील पुरस्कार: पाव्लो ब्लावत्स्की. एखाद्या देशातील राजकारण्यांचा लठ्ठपणा त्या देशातील भ्रष्टाचाराचा निर्देशांक मानता येतो, हे शोधलं.

औषधविषयक पुरस्कार: ओल्के सेम बुलुत व सहकारी. चोंदलेलं नाक मोकळं होण्यासाठी संबंधित औषधांइतकाच लैंगिक परमोच्च सुखाचा क्षणही परिणामकारक ठरतो, हे दाखवून दिलं.

शांतता पुरस्कार: इथन बेसेरिस व सहकारी. चेहऱ्यावरील ठोशापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी उत्क्रांतीमध्ये मानवी चेहऱ्यांवर दाढी आली, हे गृहितप्रमेयाची चाचणी केली.

भौतिकशास्त्रातील पुरस्कार: अलेसान्द्रो कॉर्बेटा व सहकारी. पादचारी लोक सातत्याने इतर पादचाऱ्यांना धडकत का नाही, हे शोधण्यासाठी प्रयोग केले.

गतिशास्त्रातील पुरस्कार: हिसाशी मुराकामी व सहकारी. काही वेळा पादचारी इतर पादचाऱ्यांवर का धडकतात, हे शोधण्यासाठी प्रयोग केले.

कीटकशास्त्रातील पुरस्कार: जॉन मुलरेनन ज्युनिअर व सहकारी. 'पाणबुड्यांमधील झुरळांना आळा घालण्याची नवीन पद्धत' अभ्यासणारं संशोधन केलं.

वाहतूकविषयक पुरस्कार: रॉबिन रॅडक्लिफ व इतर. गेंड्यांना उलटं करून हवाई वाहतुकीद्वारे इतरत्र नेणं सुरक्षित असतं का, हे ठरवणारा प्रयोग केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)