You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बर्फात अडकलेला कुत्रा समजून त्याला वाचवलं, पण तो लांडगा निघाला
एका गोठत चाललेल्या नदीत त्यांना एक प्राणी अडकल्याचं दिसला. त्यांना वाटलं तो कुत्रा आहे म्हणून ते इतक्या थंडीत गाडीबाहेर पडला आणि अत्यंत श्रमानं त्या कुत्र्याला वाचवलं.
पण त्या भल्या लोकांना कुठे ठाऊक होतं की जो प्राणी ते आपल्या गाडीतून घेऊन जात आहेत, तो कुत्रा नाही तर लांडगा आहे!
इस्टोनियामधील पार्नू नदीवर सिंदी धरणासाठी काम करणाऱ्या कामगारांना या घटनेला सामोरं जावं लागलं.
गोठवणाऱ्या थंडीत त्यांनी नदीतून वाट काढत त्या प्राण्याजवळ जाऊन त्याला बर्फातून बाहेर काढलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी घेऊन गेले. आणि तिथे त्यांना कळलं की आपण पकडलेला प्राणी कुत्रा नसून लांडगा आहे.
यावेळी त्या लांडग्याचा रक्तदाब कमी झाल्यामुळं तो मवाळ झाला असावा, असं इस्टोनियन युनियन फॉर द प्रोटेक्शन ऑफ अनिमल्सतर्फे (EUPA) सांगण्यात आलं.
या लांडग्याला वाचवणाऱ्यांपैकी एका माणसानं इस्टोनियातील वर्तमानपत्र 'पोस्टीमिज'शी बोलताना सांगितलं, "आम्ही त्याला उचलून आणलं तेव्हा त्याचं वजन सामान्य वाटलं."
"तो प्राणी अत्यंत शांत होता. माझ्या मांडीवर झोपला होता. जेव्हा पाय मोकळे करायचा प्रयत्न का तेव्हा त्यानं क्षणभर डोकं उचललं होतं."
मात्र या प्राण्याच्या जरा मोठ्या आकारामुळं डॉक्टरांच्या मनात शंका निर्माण झाली. तो तिथल्या नेहमीच्या शिकारी कुत्र्यांसारखा नव्हता तर त्या प्रदेशातील लांडग्यांसारखा होता.
शेवटी तो एक वर्षाचा नर लांडगा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
त्यामुळं उपचारानंतर त्याला पिंजऱ्यात ठेवायचा निर्णय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी घेतला. बरं झाल्यावर त्याला GPS कॉलर लावून पुन्हा जंगलात सोडण्यात आलं.
"या लांडग्याला वाचवण्यासाठी ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो, विशेषतः न घाबरता उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही आभार मानतो," असं EUPA संस्थेने सांगितलं.
इस्टोनियामध्ये शेकडो लांडगे आहेत. त्यातील काही मोजक्याच लांडग्यांना GPS कॉलर लावण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी इस्टोनियाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून लांडग्याची निवड झाली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)