You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जुळ्या मुलांचे दोन बाप; गे जोडपे झाले बाबा
IVFच्या मदतीनं दोन गे जोडप्यांचे शुक्राणू एकाच आईच्या गर्भात वाढवले आणि त्यातून त्यांना जुळी मुलं झाली आहेत. अॅलेक्सांड्रा आणि काल्डर असं या बाळांचं नाव आहे. त्यांचं वय 19 महिने असून ते जुळे बहीण आणि भाऊ आहेत आणि त्यांचे वडील वेगवेगळे आहेत.
सायमन हे अॅलेक्सांड्राचे वडील आहेत. काल्डर हा ग्रेएम यांचा मुलगा आहे.
पण एका जुळ्यांचे दोन बाप कसं काय असू शकतात, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. पण वैद्यकीय पद्धतींनी हे शक्य झालं आहे.
सायमन आणि ग्रेएम गे जोडपं आहे. दोघांनी वडील व्हायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या पुढं एक मोठं आव्हानं होतं. सरोगेट आईच्या मदतीनं त्यांची वडील होण्याची इच्छा पूर्ण झाली.
पण अशा पद्धतीने मुलं जन्माला घालण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट होती. मुलं जन्माला घालण्यासाठी स्त्रीबीज मिळवणं आवश्यक होतं.
दोन वेगवेगळ्या बाळंतपणातून दोन मुलांना जन्म देण्याचा त्यांचं नियोजन होतं. पण एकाच सरोगेट आईच्या पोटी दोन गर्भ वाढवता येऊ शकतात, अशी माहिती त्यांना एका संस्थेकडून मिळाली.
सायमन आणि ग्रेएम जे UKचे रहिवाशी असले तरी त्यांनी परदेशातून यासाठी मदत घेतली.
"लास व्हेगासमध्ये आम्ही हे उपचार केले. अमेरिकेतून एका निनावी दात्या स्त्रीकडून आम्हाला स्त्रीबीज मिळाले. "
बीजांड मिळवून त्याचं विभाजन करण्यात आले. त्यातील एका स्त्रीबीजाचं फलन सायमनच्या शुक्राणुसोबत आणि दुसऱ्या स्त्रीबीजाचं फलन ग्रेएमच्या शुक्राणुंसोबत करण्यात आलं. नंतर दोन्ही भ्रूण सरोगेट आईच्या गर्भाशयात वाढीसाठी सोडण्यात आले. सरोगसीची सगळी प्रक्रिया त्यांनी कॅनडामध्ये केली.
ते दोन्ही गर्भ मेग स्टोन या कॅनडाच्या सरोगेट आईनं जन्माला घातले. म्हणजे एका आईने दोन बाप असलेल्या जुळ्या मुलांना जन्म दिला.
कॅनडामध्ये मुलांना जन्म का देण्याचं ठरवलं?
"कॅनडातले कायदे सरोगसीसाठी चांगले आहेत. हे काही प्रमाणात UK सारखेच आहेत," असं सायमन सांगतात.
सरोगसी पूर्ण करून ते दोघे UKला परतले. प्रेग्नन्सी यशस्वी होईल काही याबाबत त्यांना उत्सुकता होती. शेवटी त्यांना त्यांच्या गोड बातमी समजली. गर्भधारणेच्या दरम्यान ते UK होते पण बाळ जन्मायच्या 6 आठवडे आधी ते कॅनडात दाखल झाले.
"ते समजल्यावर आम्ही खूपच भावनिक झालो होतो, आम्हाला खूप आनंद झाला," असं ग्रेएम सांगतात. या प्रक्रियेद्वारे आणखी मुलांना जन्म द्यावा असा सायमन आणि ग्रेएम विचार करत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)