You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एक लड़की को देखा..: 'लेस्बियन नातं घरच्यांना मान्य नव्हतं तरीही आम्ही पळून लग्न केलं'
स्वीटीचा माग काढत पंजाबच्या एका छोट्या शहरात साहिल (राजकुमार राव) येऊन पोहचतो. स्वीटीचे (सोनम कपूर) शब्द त्याने अनेकदा मनातल्या मनात गिरवलेले असतात. 'ट्रू लव्ह के रास्तेमें कोई ना कोई सियाप्पा होता ही होता है.. नही हो तो लव्ह स्टोरीमें फील कैसे आएगी' सियाप्पा म्हणजे अडथळा.
फिल्मी साहस करून साहिल अबोल स्वीटीपर्यंत पोहचतो खरा... पण तिला आपल्या मनातलं सांगितल्यावर वेगळंच घडतं.
स्वीटी डोळ्यातून हताशपणे अश्रू ढाळत त्याला म्हणते- 'सब हमेशा एकही डिरेक्शन मे क्यू सोचते है... जरूरी है क्या मुझे एक लडके से ही प्यार हो..'
समलैंगिक नात्याविषयीचा 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात समलिंगी पुरुष, ट्रान्सजेंडर समोर येऊन बोलू लागले आहेत. पण त्या प्रमाणात समलिंगी स्त्रिया सामाजिक परिस्थितीमुळे मोकळेपणाने बोलताना दिसत नाहीत.
'एक लडकी की देखा...' या सिनेमाच्या निमित्ताने एका मुलीच्या प्रेमात पडलेल्या आणि लोकांच्या विरोधाला न जुमानता ते प्रेम निभावलेल्या धाडसी मुलीशी आम्ही संवाद साधला. महाराष्ट्रातली रश्मी आणि तेलंगणातील प्रियाची ही प्रेमकथा सिनेमाच्या कथेलाही लाजवणारी आहे. (या बातमीत दोघींची नावं बदलली आहेत.)
आज जवळपास तीन वर्षं झाली. साधारणपणे असं होतं की, कुणी कोणालातरी नातेवाईकांच्या लग्नात भेटतं किंवा प्रवासात भेटतं किंवा सहलीदरम्यान... आणि प्रेमात पडतं.
मी तिच्या प्रेमात पडले ते आमच्या गावी. आजी वारली म्हणून सगळे नातेवाईक तिथे जमलो होतो. मी तिला आधीपासून ओळखत होते. मला ती आवडत होती. ती म्हणजे प्रिया - माझी आत्येबहीणच.
मला तिच्याबद्दल त्यावेळी काय वाटत होतं, असं आता मला कुणी विचारतं तेव्हा मला हसू येतं. जे प्रेमात पडल्यावर कुणालाही वाटतं, तेच मला वाटत होतं.
मुलगा आणि मुलीमधलंच प्रेम मी आजूबाजूला आणि सिनेमांमध्ये पाहात आले होते. मला माहीत होतं की मी वेगळी आहे आणि इंटरनेटवर शोधल्यावर मी नॉर्मल आहे, हे मला कळलं.
माझी इच्छा नसतानाही वयाच्या पंधराव्या वर्षीच माझं लग्न लावून दिलं गेलं. अर्थातच ते काही टिकू शकलं नाही आणि सज्ञान होईस्तोवर माझा घटस्फोटही झाला होता.
मला मुलांविषयी काहीच फीलिंग नाही, हे मला पक्क समजलं होतं. पण ती फीलिंग मला प्रियाविषयी होती. तिला मी प्रपोज केलं तेव्हा तिलाही तेच फीलिंग आहे, असं तिने मला सांगितलं.
तिचा पहिला प्रश्न होता - "आपल्या नात्याविषयी कुटुंबात आणि नातेवाईकांना कळलं तर ते आपल्याला स्वीकारतील का?"
मी तिला सांगितलं, "नातेवाईकांचं माहीत नाही, तुझं जर मनापासून प्रेम असेल तर आपण लग्न करूया आणि एकत्रही राहूया."
प्रिया तेलंगणात होती आणि मी मुंबईत. पुढचे सहा महिने आम्ही सतत एकमेकींशी बोलत होतो. तिचं कॉलेजमधलं शिक्षण सुरू होतं, पण माझं शिक्षण माझ्या पहिल्या लग्नाआधीच बंद करण्यात आलं होतं. घटस्फोटानंतर मी लहान-सहान नोकऱ्या करत होते.
मी सुट्टी काढून शक्य होईल तेव्हा तिच्या घरी जायचे. घरातले म्हणायचे, "सतत उठून आत्याकडे कशाला जातेयस?"
मी प्रेमात बेधुंद होते. मी त्यांचं म्हणणं फारसं मनावर घेतलं नाही आणि काही ना काही कारण काढून मी जातच राहिले.
आत्याच्या घरी मात्र आमच्याविषयी हळूहळू संशय येऊ लागला होता. ते मला 'मुंबईला आपल्या घरी जा' म्हणून सांगायचे. पण प्रिया मला थांबवून ठेवायची. तिच्या आग्रहाखातर माझा मुक्काम लांबायचा.
अशाच एका मुक्कामात आम्ही गावातल्या महालक्ष्मीच्या मंदिरात, तिथे कुणी नसताना गुपचूप जाऊन लग्न केलं. मी तिला मंगळसूत्रही बांधलं आणि देवाच्या साक्षीने आम्ही बंधनात अडकलो.
लग्न करून एकत्र राहायचा निर्णय आम्ही आधीच घेतला होता. खरंतर मला थाटामाटात लग्न करायचं होतं, पण ते सोपं नव्हतं आणि शक्यही नव्हतं. लग्न झाल्यावर तिच्याच घरी मी राहात होते. आमच्या लग्नाविषयी कुणालाच काही माहिती नव्हती.
आम्हाला एकत्र राहून संसार करायचा होता, त्यामुळे घराबाहेर पडणं भाग होतं. मी आत्याला सांगितलं की, "प्रियाला मुंबईला घेऊन जाते. तिथे चांगली नोकरीही मिळेल."
साहजिकच तिच्या आईवडिलांनी खूप विरोध केला. मला खात्री होती की काहीही झालं तरी आम्ही एकत्रच राहू, पण बाहेर कसं पडायचं?
शेवटी आम्ही पळून जायचं ठरवलं. दिवस, वेळ आणि जागा ठरवून भेटलो. ट्रेनमधून मुंबईच्या दिशेने निघालो होतो. घरी कसं जाणार? आमची रवानगी पुन्हा आपापल्या घरी झाली असती.
प्रिया साईबाबांची भक्त होती. आणि मला शिर्डीचा रस्ता ठाऊक होता. दोन दिवस शिर्डीत जाऊन थांबू आणि नंतर मदत मिळाली की कुठे ते राहायला जाऊ, असं ठरवलं.
असं करत करत 15 दिवस निघून गेले. गळ्यातली सोन्याची चेनही विकली. कधी लॉजवर तर कधी कोणत्या धर्मशाळेत दिवस काढले. दोघींकडेही मोबाईल फोन होते. ते दिवसभर स्विच-ऑफ करून ठेवायचो.
पण त्याच दरम्यान घरच्यांनीही आमची शोधाशोध सुरू केली होतीच. कदाचित पोलीसही आमच्या शोधात होते.
महिन्याभरानंतर तेलंगणा पोलिसांनी आम्हा दोघींना शिर्डीतून ताब्यात घेतलं, आणि आम्हाला तेलंगणात नेलं. आम्ही दोघीही पोलिसांना स्पष्ट सांगत होतो की आम्ही सज्ञान आहोत. आमची 18 वर्षं पूर्ण आहेत. पण त्यांनी आपापल्या घरी धाडलं.
इकडे आमच्या नातेवाईकांनीही त्रास द्यायला सुरुवात केली होती. प्रियाच्या घरचे तिला समजावत होते आणि जबरदस्तीने तिचं लग्न लावून देण्याच्या तयारीत होते. तिला घराबाहेर पडणं मुश्किल झालं. मग तिने आदळआपट केली आणि आम्हाला भेटू दिलं नाही तर जिवाचं काही बरंवाईट करूनच घेईन, असं धमकावलं.
सगळं जगच आमच्या विरोधात आहे, असं मला वाटू लागलं होतं. आमचं नातं तुटलं, असं पत्र सहीनिशी आमच्याकडून लिहून घेण्यात आलं. आमच्यावरचा दबाव वाढत होता. प्रियाच्या भावाने आणि त्याच्या मित्रांनी तर मला मानेवर चाकू धरून धमकावलंही.
सख्खी बहीण मला हे नातं तोडून टाकावं म्हणून समजावत होती. मला प्रियाची काळजी वाटत होती. तिने खरंच स्वतःचं काहीतरी करून घेतलं तर...? माझी अवस्था तर आता जीव जातो की काय, अशी झाली होती.
मी बहिणीला घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. प्रियाला घरातल्याच लोकांपासून संरक्षण मिळावं असं मला वाटत होतं.
मी मदत मागण्यासाठी वाट्टेल ते करत होते. आमच्याविषयी मीडियात बातमी आली तरंच आम्ही एकत्र येऊ शकू म्हणून मी प्रयत्न करत होते. ओळखीतल्या एका व्यक्तीने मला एका पत्रकार ताईंचा नंबर दिला. त्यांना मी सकाळ-संध्याकाळ फोन करून मदत मागत होते.
आज मागे वळून पाहाताना मला जाणवतंय की त्या जर नसत्या तर माझं आयुष्य काय असतं? माझी बातमी 'मुंबई मिरर'मध्ये छापून आली. ती बातमी वाचून मुंबईतल्या 'लेबिया' (Labia - Lesbian and Bisexual in Action) नावाच्या एका ग्रुपने माझ्याशी संपर्क केला.
आमच्या अटकेच्या बातम्या तोपर्यंत अनेकांपर्यंत गेल्या होत्या. आमचं चारित्र्य कसं वाईट आहे, याची खूप प्रसिद्धी झाली होती. त्यामुळे ती भीती मनात ठेवूनच मी 'लेबिया'च्या ताईंशी बोलायला सुरुवात केली.
माझी आणि प्रियाची कहाणी त्यांना सांगितली. त्यांना विचारलं आमचं नातं चूक आहे का? त्यांनी मला नीट समजावलं की अशा फीलिंग कशा नैसर्गिक असतात.
नंतर मला कळलं की 'लेबिया' ही माझ्यासारख्या मुलींना मदत करणारीच संस्था आहे. त्यांनी तेलंगणात मध्यस्थी करून प्रियाला बाहेर काढलं. त्यांच्यामुळेच आम्ही पुन्हा भेटू शकलो. आता एकत्र राहण्यासाठी आम्ही स्वतंत्र होतो.
आम्ही पुन्हा एकत्र येऊन दीड वर्ष लोटलंय. महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा शहरात आम्ही नव्याने संसार थाटलाय. दोघीही नोकरी करतो. पैसे फार मिळत नाहीत, पण गुजराण होतेय.
आमच्या सर्व नातेवाईकांना आमच्याबद्दल माहिती आहे. पण दोन मुली अशा छान एकत्र राहतात, म्हणून अनेकांना प्रश्न पडतात. तेही मुलाशी लग्न करायला तयार नाहीत अशा मुली.
कोणी विचारलं तर आम्ही सांगतो की आमच्या दोघींचं लग्न झालंय आणि आमच्यामध्ये नवरा-बायकोचं असतं तसंच नातं आहे. काहींना ऐकून धक्का बसतो, तर काही म्हणतात, "आम्ही असं पहिल्यांदाच ऐकतोय. तू बोलतेयस तर असेल कदाचित..."
काही लोक संपर्कच तोडून टाकतात. मला वाटतं त्यांनाही हळूहळू सवय होईल आणि मग ते नॉर्मल वागतील, असा मला विश्वास आहे.
आज घरच्यांनी मनापासून नाही तरी आम्हाला आम्ही आहोत तशा स्वीकारलं आहे. त्यांच्यासोबत पूर्वीसारखे संबंध राहिलेले नाहीत. पण जिच्यावर प्रेम आहे, तीच माझ्यासोबत आहे. माझ्यासाठी हेच मोठं यश आहे.
(शब्दांकन : प्राजक्ता धुळप, बीबीसी मराठी प्रतिनिधी)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)