उर्मिला मातोंडकर यांचे पती मोहसीन अख्तर मीर पाकिस्तानी आहेत का? - फॅक्ट चेक

    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे पती पाकिस्तानी उद्योगपती आहेत, अशी अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल का होत आहे?

हो, उजव्या विचारसरणीच्या अनेक फेसबुक आणि व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर उर्मिला आणि त्यांच्या पतीचे फोटो शेअर केले जात आहेत, आणि त्याबरोबर लिहिलं आहे, "उर्मिला मातोंडकरनं एका पाकिस्तानी नागरिकाशी विवाह केला आहे, हे खूप कमी जणांना माहिती असेल."

बहुतांश ग्रुप्सवर उर्मिलाच्या विरोधात अगदी एकसारखा मेसेज लिहिला आहे. त्यावरून हा मेसेज कॉपी केला असावा, असं वाटतं.

मात्र ही माहिती सर्वत्र उपलब्ध आहे की, उर्मिला यांचे पती मोहसीन अख्तर मीर काश्मीरचे रहिवासी आहेत, पाकिस्तानचे नाही.

उर्मिला मातोंडकरहून वयानं 9 वर्षं लहान असलेले मोहसीन उद्योग करणाऱ्या एका काश्मिरी कुटुंबातून येतात. काही वृत्तांनुसार, मोहसीन यांच्या कुटुंबाचा कशिदाकारीचा व्यवसाय आहे.

मात्र मोहसीन 21व्या वर्षी मुंबईत आले आणि मॉडेलिंग क्षेत्रात करियरची सुरुवात केली. 2007 साली मिस्टर इंडिया स्पर्धेतही त्यांनी भाग घेतला होता. याशिवाय 2009 साली आलेल्या 'लक बाय चान्स' या सिनेमातही मोहसीन यांची छोटी भूमिका होती.

2014 साली फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या पुतणीच्या लग्नात या दोघांची पहिल्यांदा भेट झाल्याचं कळतं.

3 मार्च 2016 रोजी उर्मिला आणि मोहसीन यांनी अगदी छोटेखानी समारंभात काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले.

लग्नानंतर उर्मिला यांनी ना नाव बदललं ना धर्म, हे मोहसीन यांनी स्पष्ट केलं आहे.

उर्मिला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची पुतणी असल्याची अफवादेखील पसरवण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी या बाबीचंही खंडन केलं होतं.

काँग्रेस प्रवेश

काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबईतून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. दोन दिवसांपूर्वीच उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

उर्मिलाने काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला, त्यावेळीदेखील काही जणांनी तिच्या कामावर आणि चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले होते. तिच्याविषयी अफवा पसरवण्याचा प्रयत्न झाला होता.

पाकिस्तान कनेक्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरठमधून लोकसभेच्या प्रचार मोहिमेला सुरुवात केली. त्यावेळी केलेल्या भाषणात खुद्द मोदींनी अनेक अशी वक्तव्ये केली ज्या आधारावर लोक 'काँग्रेस आणि पाकिस्तानच्या कनेक्शनविषयी' विचार करू लागले.

भाजप प्रवक्ते पुलवामा हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राईकपासूनच 'देशविरोधी' आणि 'पाकिस्तानचा पुळका असलेला पक्ष' अशी काँग्रेसची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसने मोदी सरकारला सैन्याने केलेल्या कारवाईचे पुरावे मागणे देशविरोधी आहे, असं भाजप नेत्यांना वाटतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)