You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ट्रंप यांचं विद्यापीठ आणि एअरबस A380 - फसलेल्या प्रकल्पांची गोष्ट
जगातल्या फसलेल्या प्रोजेक्टमध्ये एअरबस 380चा समावेश झाला आहे. मार्केटचा नूर समजून घेण्यात अपयश आलेल्या कंपन्यांमध्ये एअरबस 380चा समावेश आहे.
एअरबस कंपनीने ए380 या जंबोजेट विमानाला ताफ्यातून हद्दपार करणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. या विमानाच्या आगमनावेळी त्याच्या अजस्त्र आकाराची आणि प्रवासी वाहून नेण्याच्या अद्भुत क्षमतेची प्रचंड चर्चा झाली होती. मात्र हे विमान आता रद्दबातल होणार या बातमीने फारसं कोणालाच आश्चर्य वाटलं नाही. किंबहुना औपचारिक घोषणा एवढंच बाकी राहिलं होतं.
ऑक्टोबर 2007मध्ये युरोपियन कंपनीने या भव्य विमानाची निर्मिती केली. मात्र सेवेतल्या पहिल्या दिवसापासून ए380ची स्पर्धा अनेक व्यवहार्य आकाराच्या विमानांशी आहे. ए380चा जेवढा आकार आहे तेवढा नफा या विमानाने कंपनीला कधीच मिळवून दिला नाही.
या विमानाच्या निर्मितीप्रक्रियेसाठी एअरबस कंपनीने 25 बिलिअन डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम खर्च केली आहे. ए380च्या निर्मितीचा एअरबसने घाट घातला तेव्हा बहुतांश कंपन्यांनी पाठिंबा व्यक्त केला होता. मात्र हे विमान कधीच फायद्याचं ठरू शकलं नाही.
मात्र बहुचर्चित आणि बहुप्रतिष्ठित अनेक कंपन्या आपल्या महत्वाकांक्षी प्रकल्प तसंच प्रॉडक्टबाबतीत अपयशी ठरल्या आहेत.
पेप्सी ब्ल्यू
कोल्डड्रिंक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी पेप्सीने 2002मध्ये पेप्सी ब्ल्यू हे नवीन कोल्डड्रिंक लाँच केलं. एरव्ही पेप्सी म्हटलं की चॉकलेटी-किरमिजी रंगाचं कोल्डड्रिंक डोळ्यासमोर येतं. या प्रतिमेला बाजूला ठेवत पेप्सीने निळ्याशार रंगाचं ब्ल्यू पेप्सी बाजारात आणली.
या नव्याकोऱ्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी पेप्सीने पॉप सिंगर ब्रिटनी स्पीअर्सला निवडलं. युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी ब्रिटनीला निवडण्यात आलं होतं. मात्र तरीही हा ब्रँड मनावर ठसला नाही. याची काही कारणं होती. पेप्सी ब्ल्यू या रंगाच्या ब्रँडिंगसाठी ब्ल्यू 1 रंग निवडण्यात आला. काही देशांमध्ये या रंगावर बंदी आहे.
अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर विक्री घटल्याने पेप्सी ब्ल्यूचं वितरण बंद करण्यात आलं. इंडोनेशिया आणि फिलीपिन्समध्ये मात्र पेप्सी ब्ल्यू अजूनही मिळू शकते
गॅलक्सी नोट 7 (सॅमसंग)
ऑगस्ट 2016 मध्ये हा फोन मार्केटमध्ये लाँच झाला. मात्र सुरक्षेसंदर्भात कारणांमुळे सॅमसंगचा हा फोन अडचणीत सापडला. नोट 7 फोन अचानकच तापून स्फोट होण्याचा प्रकार घडू लागले. अमेरिकेत विमान प्रवासात एका व्यक्तीला असा अनुभव आला. त्यानंतर चित्रच बदललं. 2.5 मिलिअन फोन्स सॅमसंग कंपनीने परत बोलावले.
हे सगळे फोन सुरक्षित असल्याचा दावा सॅमसंग कंपनीने केला. मात्र या फोन्समधली बॅटरी अतिरिक्त तापत असल्याची चर्चा मार्केटमध्ये होती. त्यानंतर सॅमसंगने या सीरिजचे फोन रद्दबातल केले.
मायक्रोसॉफ्ट झून
आयपॉडने दणका उडवल्यानंतर मायक्रोसॉफ्टने पोर्टेबल म्युझिक प्लेयर क्षेत्रात मुसंडी मारायचं ठरवलं. दुसऱ्या डिव्हाईसबरोबर वायरलेस पद्धतीने गाणी शेअर करण्याची सुविधा आयपॉडमध्ये नव्हती.
झूनने नेमकं हेच हेरलं आणि त्यानुसार डिव्हाईस तयार केलं. पण झूनच्या लाँचनंतर आयपॉडच्या लोकप्रियतेत तसूभरही घट झाली नाही. 2011मध्ये मायक्रोसॉफ्टने झूनचा नाद सोडला.
सेगवे
सायकलसारखं दिसणारं सेगवे संकल्पनेला अनेकांनी क्रांतिकारी वगैरे संबोधलं. 2001 मध्ये हा प्रकार मार्केटमध्ये लाँच झाला. अमेरिकेत टीव्हीवरून याचं लाँचिंग दाखवण्यात आलं.
आठवड्याला 10,000 सेगवेची विक्री अशी आशा निर्मात्यांना होती. मात्र त्यांना प्रखर वास्तवाला सामोरं जावं लागलं. सात वर्षात जेमतेम 30,000 सेगवेंची विक्री झाली.
प्रचंड किंमत आणि अपेक्षाभंग ही त्यामागची कारणं. सध्याच्या घडीला सुरक्षायंत्रणा आणि आपात्कालीन नियंत्रण विभागातली माणसं सेगवेचा वापर करतात. वाहतुकीसाठी खाजगी किंवा सार्वजनिक तत्त्वावर हे कधीच व्यवहार्य होऊ शकलं नाही
क्विस्टर
चित्रपट स्ट्रीमिंग क्षेत्रातलं नेटफ्लिक्स हे मोठं नाव. 2011 मध्ये कंपनी जम बसवत होती. त्यावेळी CEO रीड हेस्टिंग्स यांना डीव्हीडी भाडेतत्वावर देण्याचा व्यवसायही सुरू राहू शकतो असं वाटलं. त्यातूनच क्विकस्टरचा जन्म झाला.
मात्र नेटफ्लिक्स आणि क्विकस्टर यांना बाजूला करण्यात आलं. त्यासाठी वेगळं शुल्कही द्यावं लागणार होतं. त्यामुळे अवघ्या महिनाभरात क्विकस्टरने गाशा गुंडाळला.
नाईकेची फ्युअलबँड
स्पोर्ट्स अपारल क्षेत्रातील अग्रगण्य नाईके कंपनीने फ्युअलबँड नावाचा फिटनेस ट्रॅकर 2012 मध्ये लाँच केला. मात्र तो मार्केटमध्ये कधीच तग धरू शकला नाही.
हा फिटनेस ट्रॅकर वापरणाऱ्या मंडळींनीही त्याचं गुणगान केलं नाही. फिटबिट कंपनीची फिटनेस ट्रॅकर क्षेत्रातली मक्तेदारी फ्युअलबँड मोडू शकला नाही. 2014 मध्ये फ्युअलबँडचं उत्पादन बंद करत असल्याचं नाईकेनं जाहीर केलं.
आयबो (सोनी)
सोनी कंपनीचा रोबोटिक कुत्रा मार्केटमध्ये 1999मध्ये अवतरला. शंभर मागण्या ऐकेल आणि बोलूही शकेल असा दावा कंपनीने केला होता.
अर्ध्या तासात 3,000 रोबोटिक कुत्र्यांची विक्री झाली. मात्र आयबो सोनीसाठी किफायतशीर ठरला नाही.
सोनी कंपनीने 2006 मध्ये या रोबोटिक कुत्र्यांचं उत्पादन थांबवलं. गेल्या वर्षी त्यांनी पुन्हा हा कुत्रा बाजारात आणला. 3,000 डॉलर्स एवढी त्याची किंमत होती.
ईव्ही1 (जनरल मोटर्स)
एलॉन मस्क यांनी नव्हे तर जनरल मोटर्स कंपनीने 1996 मध्ये इलेक्ट्रिक कारची निर्मिती केली होती. ईव्ही1 असं या गाडीचं नाव होतं.
मात्र या गाडीला अनेक तांत्रिक मर्यादा होत्या. थंड वातावरणात ही गाडी चालत नसे. ही गाडी कॅलिफोर्निया आणि अरिझोना या राज्यांमध्येच मिळत असे.
चार वर्षात जनरल मोटर्सने केवळ 1,100 ईव्ही विकल्या. 1999मध्ये जनरल मोटर्स कंपनीने ईव्ही1ला नारळ दिला.
ट्रंप विद्यापीठ
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या या शैक्षणिक उपक्रमाची मुहुर्तमेढ 2005मध्ये रोवली. रिअल इस्टेट इंडस्ट्रीत पैसा कसा कमवावा याचं शिक्षण या विद्यापीठात दिलं जाणार होतं.
नाराज आणि असंतुष्ट विद्यार्थी तसंच आणि गैरव्यवस्थापनच्या मुद्यावरून 2010मध्ये हे विद्यापीठ बंद करण्यात आलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)