You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
5वी पास हिरे व्यापारी जो दिवाळीचा बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना कार आणि फ्लॅट देतो
- Author, रवी परमार
- Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
सूरतच्या एका हिरे व्यापाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस म्हणून गाड्या दिल्याची बातमी तुम्ही गेल्या काही दिवसांत कुठे ना कुठे पाहिली-वाचली असेलच. कोण आहे हा व्यापारी आणि एवढं कसं जमतं त्याला?
सवजी ढोलकिया हे हरिकृष्णा एक्सपोर्ट प्राइवेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आहेत. 8 हजार कोटींचे मालक असलेले सवजी प्रत्येक दिवाळीला त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून कधी दागिने, कधी कार, घर आणि इतर काही गिफ्ट्स देतात. म्हणून सवजी त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
आणि यंदा तर त्यांनी दिवाळीचा बोनस म्हणून 600 कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्या.
या गुरुवारी सूरतमध्ये एका कार्यक्रमात खास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही कर्मचाऱ्यांना गाडीच्या किल्ल्या देण्यात आल्या.
सवजी यांनी कर्मचाऱ्यांना मागे एकदा बोनस म्हणून कार भेट दिली होती. तेव्हापासून ही परंपरा चालत आली आहे.
गेल्या वर्षी हरिकृष्णा एक्सपोर्ट कंपनीत 25 वर्षं पूर्ण करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना सवजी यांनी मर्सिडीज कार भेट दिली होती.
कोण आहेत सवजी?
सवजी ढोलकिया मूळचे गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातल्या दुधाला गावचे आहेत. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1962मध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला.
"सुरुवातीपासूनच माझं अभ्यासात मन लागत नव्हतं. 5वी नंतर मी शिक्षण सोडून दिलं. बारा वर्षांचा असताना मी सूरतला आलो. तिथल्या एका कंपनीत मी कामाला लागलो. मेहनत आणि कामावरील निष्ठेमुळे आज मी इथे पोहोचलो आणि हजारो लोक माझ्यासोबत जोडले गेले आहेत."
"आम्ही चार भाऊ आहोत. 1992मध्ये आम्ही ही कंपनी खरेदी केली आणि आज जगभरात या कंपनीचं नाव कमावत आहे," असं सवजी सांगतात.
हरी कृष्णा डायमंडमध्ये सात हजार कर्मचारी काम करतात. या कंपनीची वार्षिक उलाढाल आठ हजार कोटी रुपये आहे आणि कंपनी 80 देशांत हिऱ्यांचा व्यापार करते. अमेरिका, कॅनडा, पेरू, मेक्सिको, बेल्जियम, संयुक्त अरब अमिराती, हाँगकाँग, चीन इत्यादी देशांत त्यांच्या कंपन्या आहेत.
2015 मध्ये त्यांच्या कपनीनं कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसच्या स्वरूपात 491 कार आणि 200 फ्लॅट्स दिले होते. 2014 मध्येही कंपनीनं प्रोत्साहन म्हणून 50 कोटी रुपयांचं वाटप केलं होतं.
त्यापूर्वी 2013मध्ये 1,200 हून अधिक कर्मचाऱ्यांना 207 फ्लॅट, 424 कार आणि दागिने दिवाळीत भेट म्हणून दिले होते.
इतकी महाग भेटवस्तू का देतात?
ही एक प्रकारची प्रेरणादायी योजना आहे. यामुळे मी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करतो, जेणेकरून त्यांचं मन कंपनीत रमेल, असं सवजी सांगतात.
पण या भेटवस्तू कुणाला आणि कोणत्या आधारावर दिल्या जातात, हा प्रश्न उरतो.
बीबीसी गुजरातीशी बोलताना सवजी सांगतात की, "ज्या कर्मचाऱ्यांजवळ घर नाही त्यांना घर, ज्यांच्याजवळ घर आहे त्यांना गाडी, ज्यांच्याजवळ दोन्ही गोष्टी आहेत, त्यांना दागिने अथवा इतर किमती वस्तू दिल्या जातात. पण हे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामगिरीवर अवलंबून असतं."
"प्रत्येक कर्मचाऱ्याला एक टार्गेट दिलं जातं. जो कर्मचारी ते पूर्ण करतो त्याला प्रोत्साहित केलं जातं. याशिवाय फिक्स डिपॉझिट आणि लाइफ इन्शुरन्स सारख्या सोयीसुद्धा आम्ही कर्मचाऱ्यांना देतो. जेणेकरून भविष्यात त्यांच्या कुटुंबाला लाभ मिळेल."
कर्मचाऱ्यांना इतक्या महाग कार भेटवस्तू दिल्यास कंपनीला त्याचा काही फायदा होतो का? यावर महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठीतील प्रा. सुनिता नांबियार सांगतात की, "यामुळे कर्मचाऱ्यांची कंपनीबाबतची निष्ठा वाढीस लागते. असं केल्यानं नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीचा आणि त्यांच्या प्रशिक्षणाचाही खर्च वाचतो, कारण जुने कर्मचारी टिकून राहतात."
"एका कर्मचाऱ्याला गिफ्ट मिळालं तर ते पाहून इतर कर्मचाऱ्यांनाही अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते आणि यामुळे कंपनीला फायदा होतो," असं नांबियार पुढे सांगतात.
याच विद्यापीठातील प्रा. जगदीश सोळंकी सांगतात, "कोणत्याही व्यक्तीचा प्रथम उद्देश हा पैसे कमावणे हाच असतो. यशस्वी झाल्यानंतर त्याला प्रसिद्धी हवी असते आणि अनेकदा आपली प्रतिमा सुधारण्यासाठी ते यासारखे प्रयत्न करतात."
गिफ्टसाठीचा पैसा कुठून येतो, यावर सवजी बीबीसीला सांगतात की हा पैसा दुसऱ्या-तिसऱ्या कुणाचा नसून तो कर्मचाऱ्यांचाच असतो.
"कर्मचाऱ्यामुळे कंपनीला जितका फायदा होतो, त्यातील 10 टक्के रक्कम आम्ही बाजूला ठेवतो. याबाबत त्यांनाही माहिती नसतं, पण आमच्याजवळ सर्व माहिती असते. मग या रकमेतून त्यांना गिफ्ट दिलं जातं. हे एखाद्या योजनेसारखं आहे, ज्यामुळे कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही फायदा होतो."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)