गटारातही हिरे सापडणारा सुरतचा प्रसिद्ध बाजार

    • Author, मनीष पानवाला
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

खाणीतून हिरे मिळतात असं तुम्ही ऐकलं असेल पण गटारात किंवा मातीतूनसुद्धा हिरे मिळू शकतात, हे कधी ऐकलं आहे का?

देशाची 'हिरा नगरी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुजरातमधील सुरतमध्ये असे हिरे मिळतात.

गटारातून हिरे शोधणं हेच इथल्या पाचशे लोकांच्या रोजगाराचं हेच साधन आहे. मातीत आणि गटारात रोज हिरे मिळणं शक्य नसलं तरी चिकाटीने आणि विश्वासाने ही मंडळी प्रयत्न करत राहतात.

अशा प्रकारचं उत्खनन करून काही लोक महिन्याकाठी पाच आकडी पगारही मिळवतात, असा अंदाज आहे.

जगात 70 टक्के हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम गुजरातमधल्या सुरतमध्ये होतं हे उल्लेखनीय.

रस्त्यावर रत्नं

सुरतमधल्या महिधरपुरा, वराछा रोड या भागातील हा मिनी बाजार प्रसिद्ध आहे. रोज कोट्यवधी रुपयाच्या हिऱ्यांचा तेथे व्यापार होतो. हा व्यापार रस्त्यावरच चालतो. अंदाजे 40 हजार लोकांची बाजारात ये-जा असते.

हिऱ्यांचा व्यवहारासाठी येणाऱ्या लोकांकडून काहीवेळा कोणाचा धक्का लागून, कोणाकडून हाताळताना हिरे खाली पडतात. कित्येकदा लोक चक्क तिथे हिरे विसरतातही!

हिऱ्यांचा आकार छोटा असतो. त्यामुळे मातीत पडल्यावर ते हिरे शोधणं कठीण होऊन बसतं.

अनेकदा ते रस्त्यावर पडून गटारातसुद्धा जातात. त्यावरच मंजीभाईसारखे अनेक लोक उदरनिर्वाह करतात.

गटारात हिऱ्यांची खाण

भावनगरमधील मंजीभाई इकडच्या छोट्या गल्लीत गटाराच्या पाण्यात हिरे शोधतात. मंजीभाई सांगतात, "मी पंचवीस वर्षांपासून हिरे शोधण्याचं काम करत आहे. हे कष्टाचं काम आहे. नशिबात असेल तर कधी कधी अनेक हिरे मिळतात, त्यातून माझा घरखर्च निघतो."

मंजीभाईसारखे त्या परिसरात अंदाजे 150 लोक गटाराच्या पाण्यात हिरे शोधत फिरत असतात.

मातीत धन

दुसरीकडे काशीराम हिरा बाजारात रस्त्याच्या धुळीत हिरे शोधतात. 40 वर्षांपासून ते हे काम करत आहेत. त्यामुळे हे या कामात अर्थातच निष्णात आहेत.

काशीराम हिरा पाहून किमतीचा अंदाज लावतात. 'चौकी', 'मारकिश', 'गोल' अशा प्रकारच्या हिऱ्याची पारख ते करू करतात. हिऱ्याच्या प्रकारावरून त्यांना किमतीचा अंदाजही येतो.

काशीरामसारखंच काम शंकरही करतात.

शंकर सांगतात, "हे मेहनतीचं काम आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत आम्ही काम करतो. कधी हिरे मिळतात तर कधी नाही."

सुरत डायमंड असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रवीण नानावटी सांगतात, "या उद्योगातून अनेकांना 20-25 हजारापेक्षा जास्त पैसे मिळत असतील. माझ्यासमोर असे अनेक लोक आहेत, जे ड्रायव्हर आहेत पण त्यांची स्वत:चीही गाडी आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)