ब्राह्मणांनी मांसाहार का आणि कधीपासून सोडला?

    • Author, अपर्णा अल्लूरी
    • Role, बीबीसी न्यूज

राजधानी दिल्लीत गेल्या वर्षी चैत्र नवरात्रीनिमित्त भाजपच्या एका नेत्याने मांसाची विक्री करणारी सर्व दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं होतं.

अनेकदा काही सणा-उत्सवांच्या निमित्ताने अशी मागणी केली जाते.

भारत किंवा हिंदूंना शाकाहारी म्हणून दाखवणं एक प्रकारे मांसाहारासोबत असलेल्या दीर्घ आणि प्राचीन संबंधांची उपेक्षा करण्यासारखं आहे.

भारतीय खाद्यसंस्कृतीची विविधता एवढ्या सहजेने हिंदू विरुद्ध मुस्लीम किंवा शाकाहारी विरुद्ध मांसाहारी अशी सरळ सरळ विभागणी करता येणार नाही. उजव्या विचारसणीचे राजकारण करणारे लोक मात्र हे मुद्दे अशाच पद्धतीने पुढे आणतात.

इंग्रजी वृत्तपत्र 'द इकॉनॉमिक टाईम्स'मध्ये भारतीय खाद्यसंस्कृतीवर विस्तृत लेखन करणारे संपादक विक्रम डॉक्टर सांगतात, "हे अत्यंत दुर्देवी आहे. कारण भारतात खाद्यपदार्थ आणि त्याच्याशी संबंधित परंपरेत वैविध्य आहे आणि ते मिश्रित आहे. देशात प्राचीन काळापासून मांसाहार करण्याची परंपरा आहे आणि दीर्घकाळापासून शाकाहार केला जात आहे. पण मला अनेकदा एक बाजू घेण्यास सांगितलं जातं."

वैदिक काळात देवतांना अर्पण केलं जायचं मांस

विक्रम डॉक्टर यांच्यामते भारताचे पुरोगामी मांसाहाराच्या बाजूने बोलताना दिसतात आणि पश्चिमेकडील देशांतील पुरोगामी पर्यावरणासाठी आहारात मांसाहार कमी करण्याचे आवाहन करताना दिसतात.

ते पुढे सांगतात, "भारतात उजव्या विचारसरणीचे राजकारण करणारे शाकाहाराच्या नावाखाली राजकारण करताना दिसतात."

खरं तर आतापर्यंत खाद्यपदार्थावरून झालेला वाद हा केवळ बीफ म्हणजेच गोहत्येबाबत होता.

हिंदू धर्मात गायीला पवित्र मानलं जातं आणि भारतात बहुतांश राज्यात गोहत्येवर बंदी आणण्यात आली आहे. 2014 पासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारच्या कार्यकाळात बीफ वाद वाढला आहे. त्यांचा पक्ष आणि सरकारने त्यांचे प्राबल्य असलेल्या राज्यांमध्ये कत्तलखाने बंद केले आणि हिंदुत्व समर्थनार्थ समूहांकडून गोहत्या आरोपाखाली अनेक मुस्लिमांचे लिंचिंग केल्याचंही समोर आलं होतं.

याचा प्रभाव आता स्पष्ट दिसतो. दिल्लीसारख्या शहरांमधील रेस्टॉरंटमध्ये बीफ मेन्यूमध्ये दिसत नाही. भारतात हे वास्तव आहे की सवर्ण हिंदुंचा एक मोठा वर्ग बीफ खात नाही. परंतु कोट्यवधी दलित, मुस्लीम आणि ख्रिश्चन बीफ खातात. केरळसारख्या राज्यात प्रत्येक समाजात हा लोकप्रिय मांसाहार आहे. तिथे अल्पसंख्याक हिंदू हे खात नाहीत.

भारतात खाद्यसंस्कृतीवर संशोधन करणाऱ्या क्लिनिकल न्यूट्रिशिअनिस्ट मानुशी भट्टाचार्य यांच्यामते, भारतात शिकार करून मांस खाण्याची पद्धत इसवी सन पूर्व काळापासून आहे. जवळपास 70 हजार वर्षांपासून ही पद्धत आहे.

इतिहासानुसार, प्राचीन भारतात सिंधु संस्कृतीच्या काळापासून गोमांस आणि जंगली डुक्कराचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जात होते. वैदिक युगात प्राणी आणि गायीचा बळी देणं सामान्य गोष्ट होती. इसवी सन पूर्व 1500 आणि 500 दरम्यान देवतांना मांस अर्पण केलं जायचं आणि त्यानंतर ते पंगतीत वाढले जायचे.

ब्राह्मणांनी मांसाहार कधी सोडला?

भारतात मांस मुस्लीम आक्रमणकर्ते घेऊन आलेले नाहीत. परंतु उजव्या विचारसरणीचे राजकारण करणारे हे अशाचपद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, नवीन सरकार, व्यापार आणि शेती-शेतकरी यामुळे भारतात खाद्यसंस्कृतीत बदल होत गेले.

शतकानुशतकांच्या प्रवासात ब्राह्मण आणि इतर सवर्णांच्या खाद्यसंस्कृतीतून बीफ आणि इतर मांस गायब झाले. यामागे अनेक कारणं आहेत. केवळ धर्मामुळे हे झालं नाही.

डॉ. मानुशी भट्टाचार्य यांनी दावा केला की, आपल्या संशोधनात त्यांना दक्षिण भारतीय ब्राह्मण कमीत कमी 16 व्या शतकापर्यंत मांसाहार करत असल्याचं आढळतं. उत्तर भारतात ब्राह्मणांनी आणि इतर सवर्णांनी 19 व्या शतकापर्यंत मांसाहाराचा त्याग केला.

वसाहतवाद, भूमी उपयोग, कृषी व्यवस्था आणि व्यापार तसंच देशातील भीषण दुष्काळ यामुळे आधुनिक भारतीय खाद्यसंस्कृतीचं स्वरूप बनवलं, ज्यात तांदूळ, गहू आणि डाळीचा समावेश आहे.

प्रत्येक नियमाला अपवाद असतो त्याप्रमाणे भारतीय खाद्यपदार्थाच्या परंपरेतही अपवाद आहे. काही ब्राह्मण आजही मांसाहार करतात.

काश्मिरी पंडित आपल्या 'रोगन गोश्त'साठी लोकप्रिय आहेत. लाल मिरचीचा वापर करून मेंढी किंवा बकरीचं मांस ग्रेव्हीमध्ये शिजवलं जातं. तसंच बिहार, बंगाल आणि दक्षिण कोकणातही ब्राह्मण कुटुंबात विविध प्रकारचे ताजे मासे खाल्ले जातात.

भारतीयांना आवडणारा मांसाहार

दक्षिण मुंबईतील कुलाब्यात ससून डॉकवर महिला विविध प्रकारच्या माशांचा व्यवसाय करतात. हे मुंबईतील सर्वात जुने बंदर आहे. आजच्या काळात मांसाहारत भारतात सर्वात कमी लोकप्रिय बीफ आहे. मासे खाणं लोकांना सर्वाधिक आवडतं. गेल्यावर्षीच्या नॅशनल सँपल सर्व्हेनुसार, देशभरात माशांनंतर चिकन, मटण आणि नंतर बीफ याक्रमानुसार लोकप्रियता आहे.

भारतीय नेमका किती मांसाहार करतात याची वास्तविक आकडेवरी मिळवणं खूप कठीण आहे. प्यू (Pew) सर्वेक्षणानुसार, 39 टक्के भारतीयांनी स्वत:ला शाकाहारी म्हटलं आहे. 81 टक्के भारतीयांनी ते मांसाहार करत असल्याचं सांगितलं. पण यातही अनेक प्रकारचे लोक आहेत. उदाहरणार्थ- काही लोक विशिष्ट दिवशी किंवा आठवड्यासाठी मांसाहार करत नाहीत.

दरम्यान, भारत सरकारच्या सर्वेक्षणात ही आकडेवारी अत्यंत कमी आहे. 2021 च्या सर्वेक्षणानुसार, एका आठवड्यात मांसाहार केवळ 25 टक्के घरांमध्ये पहायला मिळाला, तर शहरी लोकसंख्येत ही आकडेवारी 20 टक्के एवढीच होती. पण या आधारे असं म्हणता येणार नाही की इतर सर्वजण शाकाहारी आहेत. कारण अशीही शक्यता नाकारता येत नाही की, सर्वेक्षण सुरू असताना त्या आठवड्यात ज्या घरांमध्ये मांसाहारी आहार बनवला नाही त्यांनी त्याचे सेवन केलं नसणार.

तज्ज्ञांच्या मते, सर्वेक्षणात मांसाहार करणाऱ्यांची आकडेवारी कमी दिसते कारण दलित किंवा मागास समाजाचे लोक मांसाहार करत असल्याचे मान्य करताना कचरतात.

डॉ. मानुशी भट्टाचार्य सांगतात, "आम्ही शाकाहारी आहोत जे मांसाहारसुद्धा करतात."

विक्रम डॉक्टर हे सुद्धा भारताविषयी सांगतात, "भारत जगातील एकमेव संस्कृती आहे जिथे अभिजात मानल्या जाणाऱ्या वर्गाने शाकाहार लवकर आत्मसात केला. इतर लोक मांस खात राहिले."

भारतीय खाद्यसंस्कृती वैविध्यपूर्ण आहे आणि यात मांसाहारी पदार्थांचाही समावेश आहे. हे पदार्थ आहारात प्रमुखस्थानी असतील हे आवश्यक नाही.

विक्रम डॉक्टर गोव्यात राहतात आणि ते गोव्यातील स्थानिक खाद्यसंस्कृतीला 'सेमी शकाहारी' मानतात. बटाट्याच्या करीमध्ये कोळंबी या पदार्थाचे ते उदाहरण देतात. त्यांच्यानुसार हा पदार्थ स्वादिष्ट आणि पोषक आहे.

विक्रम डॉक्टर म्हणाले, "लोक गोव्यात येतात तेव्हा त्यांना मांसाहार करायचा असतो. पण गोव्यातील लोक जास्त मांसाहारी पदार्थ खात नाहीत. कॅथलिक कुटुंबात जेवणामध्ये मांसाहारी पदार्थ, सुके मासे आणि अनेक प्रकारच्या डाळी असतात."

अशी अनेक उदाहरणं आहेत असं ते सांगतात. तामिळनाडूत दलित कुटुंबात एक पदार्थ खूप लोकप्रिय आहे. ज्यात हिरव्या वाटाण्यांसोबत मांस शिजवलं जातं.

विक्रम डॉक्टर यांना अशीही भीती आहे की आवश्यकतेनुसार उदयास आलेले पदार्थ आता लोप पावत आहेत. "तुम्हाला रेस्टॉरंट मेन्यूमध्ये आता सेमी शाकाहारी आहार मिळणार नाही," असंही ते सांगतात.

हैद्राबाद मुस्लीम समाजात बनवल्या जाणाऱ्या पदार्थांसाठी लोकप्रिय आहे. माझ्या आवडीचा एक पदार्थ म्हणजे दालचा. आता इथे कधीही हा पदार्थ मिळणं कठीण आहे. मसूरची डाळ, भाज्या, मसालेदार सूप, मेंढीचे मांस, उकडलेली अंडी आणि घट्ट तिखट टोमॅटोच्या करीसह दालचा बनवलं जातं.

भारताच्या समृद्ध शाकाहारी पदार्थांच्या यादीत मांस आणि सागरी आहाराच्या पदार्थांचाही समावेश आहे. आपल्याकडे आरोग्यदायी आणि हवामानासाठी अनुकूल पदार्थांची परंपरा सुरू करण्याची संधी आहे, असं विक्रम डॉक्टर यांना वाटतं.

परंतु भारतीयांच्या खाद्यसंस्कृतीचा ट्रेंड दुसरं काही सांगतो. मांस विक्री वाढतेय. विशेषत: फॅक्टरी फार्म-चिकनचा खप वाढतोय. गेल्यावर्षी भारतीय फूड डिलिव्हरी अॅप स्वीगीवर सर्वाधिक ऑर्डर केला जाणारा पदार्थ चिकन बिर्याणी हा होता. भारतीयांनी दर सेकंदाला दोन चिकन बिर्याणी ऑर्डर केल्या होत्या.

विक्रम डॉक्टर सांगतात, "भारतीय शाकाहारी पंरपरा साजऱ्या केल्या पाहिजेत. पण ते लोकांवर थोपवलं तर कोणाचाच विश्वास कमवता येत नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)