देशात जास्त अतिश्रीमंत असले तर त्याचा सामान्यांना कधी फायदा होतो का?

एका अहवालानुसार या पृथ्वीतलावर अतिश्रीमंतांच्या आकड्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. विकसनशील राष्ट्रांमध्ये सामाजिक दरी खूप मोठी आहे. तिथे संपत्तीत वाढ झाल्याने अनेकांकडे पैशाचा पूर आलेला आहे. या अमाप संपत्तीचा तिथल्या सामान्य जनतेवर काय परिणाम होतो?

आपल्याकडे जसं अंबानी किंवा टाटा-बिर्ला ही नावं घेतली जातात, अगदी तसंच हाँगकाँगमध्ये ली का-शिंग यांचं नाव आहे. 90 वर्षांचे हे उद्योजक जगातील 23वे सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती 37.7 अब्ज डॉलर्स एवढी आहे.

परिवहन सेवा, वित्त सेवा ते अगदी ऊर्जा क्षेत्रापर्यंत त्यांच्या व्यवसायाचा विस्तार आहे. म्हणजे प्रत्येक स्थानिकाने कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांच्या संपत्तीत योगदान दिलं असेल.

आणि चीनच्या या स्वायत्त प्रदेशातील संपत्तीच्या हिमनगाचं हे केवळ एक टोक आहे. कारण 'WealthX' या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या World Ultra Wealth Reportच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार न्यूयॉर्कनंतर हाँगकाँगमध्ये सर्वाधिक अब्जाधीश राहतात.

2016 साली हाँगकाँगमध्ये 72 अब्जाधीश होते, आणि 2018मध्ये ही संख्या आता 93 झाली आहे, म्हणजे गेल्या दोन वर्षांत अब्जाधीशांची संख्या 21ने वाढली आहे.

या नवअब्जाधीशांमुळे जगात एकूण श्रीमंतांची संख्याही वाढते आहे. पण या सर्वेक्षणात हेही आढळलं आहे की जगातील सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या 10 शहरांपैकी निम्मी शहरं ही सर्वाधिक सामाजिक विषमता असलेल्या विकसनशील राष्ट्रांमधली आहेत.

2017मध्ये केलेल्या या सर्वेक्षणानुसार जगात एक अब्ज डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती असणारे एकूण 2,754 जण आहेत. त्यांची एकूण संपत्ती आहे 9.2 हजार अब्ज डॉलर्स. जर्मनी आणि जपान या दोन देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा (GDP) ही संपत्ती अधिक आहे.

सर्वाधिक अब्जाधीश असलेली शहरं

'चांगली' विषमता?

अब्जाधीशांच्या वाढत्या संख्येच्या सामाजिक परिणामांविषयी तज्ज्ञांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. तज्ज्ञांचा एक गट उत्पन्नाची दरी वाढल्याने निर्माण होणाऱ्या नैतिक समस्यांकडे बोट दाखवतो आहे.

OxFam या गैरसरकारी संस्थेच्या गरिबीविषयक वार्षिक अहवालातही हाच मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. ही समस्या सोडवण्यासाठी अतिश्रीमंतांवर अधिक कर लावण्यासारखे उपायही या संस्थेने सुचवले आहेत.

तर तज्ज्ञांच्या दुसऱ्या गटाला हे अब्जाधीश सकारात्मक बदलाचे दूत वाटतात, किमान त्यातले काही अब्जाधीश तरी.

जागतिक बॅंकेच्या अर्थतज्ज्ञ कॅरोलीन फ्रेंड यांनी 2016 साली प्रकाशित Rich People, Poor Countries: The Rise of Emerging-Market Tycoons and Their Mega Firms या त्यांच्या पुस्तकातही याच मताला दुजोरा दिला आहे.

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "श्रीमंतांना बदनाम करण्याची फॅशन आहे. मात्र सगळेच तसे नसतात. संपत्ती कमावण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात. त्यामुळे समाजावर होणारा त्याचा परिणाम हा संपत्ती कोणत्या मार्गाने कमावली आहे, यावर अवलंबून असतो."

कॅरोलीन यांचं म्हणणं आहे की स्वबळावर अब्जाधीश झालेले, म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांचे संस्थापक हे सामान्यतः समाजासाठी अधिक फायदेशीर असतात.

'फोर्ब्स' मॅगझीननुसार 72 देशांमध्ये अब्जाधीश राहतात. चीन, भारत आणि हाँगकाँगसारख्या देशांमध्ये तर त्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. त्यामुळे या बिलिनेअर क्लबमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या आशियात वाढली आहे. सध्या आशिया खंडात एकूण 784 अब्जाधीश आहेत. याबाबत इतिहासात पहिल्यांदाच आशियाने उत्तर अमेरिकेला मागे टाकलं आहे, जिथे 727 अब्जाधीश आहेत.

बीजिंग विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार चीनमध्ये 2016 साली सर्वाधिक श्रीमंत असलेल्या एक टक्का लोकांकडे देशाची एक तृतीयांश संपत्ती होती. तर सर्वाधिक गरीब असलेल्या 25% टक्के लोकांकडे केवळ एक टक्के संपत्ती होती.

मानव विकास निर्देशांकात सर्वांत पिछाडीवर असलेल्या 20 देशांपैकी 19 देश आफ्रिकेतले आहेत. अफ्रिका खंडातसुद्धा सध्या 44 अब्जाधीश आहेत. त्यांच्याकडे एकूण 93 अब्ज डॉलर्स एवढी संपत्ती आहे.

टॉप 10 अब्जाधीश राष्ट्र

कल्पना करा या सर्वांनी एकत्र येऊन एक राष्ट्र तयार केलं तर 54 आफ्रिकन राष्ट्रांच्या GDPच्या यादीत त्यांचा क्रमांक आठवा लागेल.

प्रति व्यक्ती उत्पन्न 'फक्त 2.11 अब्ज डॉलर'

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार 2017मध्ये आफ्रिकेतील प्रति व्यक्ती GDP हा 1,825 डॉलर होता. मात्र काही ठिकाणी श्रीमंत होणाऱ्यांची संख्या भारताच्या तुलनेत अधिक वेगाने वाढताना दिसते.

नव्वदीच्या मध्यात फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत केवळ दोन भारतीय होते. 2016मध्ये तब्बल 84 जणांनी या यादीत मजल मारली. जागतिक बँकेच्या माहितीनुसार जवळपास 28 कोटी भारतीय गरिबीरेषेखाली आहेत.

कॅरिलोना सांगतात, "श्रीमंत राष्ट्रांमध्ये अतिश्रीमंतांची संख्या वाढणं, हे खूप मेहनत घेऊनही कमी यश संपादन करणाऱ्यांना त्रासदायक ठरू शकतं. मात्र गरीब राष्ट्रांमध्ये मोठ्या कंपन्या आणि श्रीमंतांचा उदय, हे सुदृढ अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे. कारण तिथे उत्पादकता वाढल्याने सामान्य जनतेच्या जीवनशैलीत सुधारणा होत असते."

वाढ

अमेरिकेच्या Bureau of Labour Statistics ने केलेल्या विश्लेषणाचा आधार घेत कॅरोलिना सांगतात, "चीनमध्ये उत्पादन क्षेत्रात मोठ्या कंपन्यांच्या उदयामुळे 2009 ते 2013 दरम्यान कामगारांचं वेतन तिपटीने वाढलं."

उदयोन्मुख बाजारामध्ये कंपनी स्थापन करणारे उद्योजक अधिक रोजगार देतात. जवळपास 80,000 रोजगार यातून निर्माण होतात.

वारसा हक्काने किंवा सरकारी कंपनीच्या मालकीमुळे अब्जाधीश झालेल्यांच्या उद्योगात मिळणाऱ्या रोजगारापेक्षा हा आकडा कितीतरी जास्त आहे, असं अर्थतज्ज्ञांच्या संशोधनातून सिद्ध झालं आहे.

कॅरोलिना सांगतात, "अशा बाजार व्यवस्थेत अतिश्रीमंतांचा उदय नैसर्गिक आणि अपरिहार्य आहे. मात्र याचे सकारात्मक परिणामही होऊ शकतात. उदाहरणार्थ, विकसित राष्ट्रांमधल्या कंपन्यांसोबत स्पर्धा केल्याने त्याचा फायदा सर्वसामान्यांना मिळतो. "

मॅकंझी या कन्सल्टन्सी फर्मच्या अंदाजानुसार 2025पर्यंत फॉर्च्यून मॅगझीनच्या फॉर्चून 500 यादीतील 45% कंपन्या आणि जगातील 50% अब्जाधीश उदयोन्मुख अर्थव्यवस्थेतील असतील.

OxFamकडे मात्र वेगळी आकडेवारी आहे. या संस्थेतील अभ्यासकांच्या मते 1990 ते 2010 या वीस वर्षांच्या काळात जगभरात उद्योगांची भरभराट झाली असली तरी कोट्यवधी लोकांना गरिबीरेषेच्या वर येता आलेलं नाही.

OxFamच्या रिबेका गोवलँड सांगतात, "उदयोन्मुख अर्थव्यवस्था जेव्हा वेगाने धावू लागतात तेव्हा तिथल्या अतिश्रीमंतांचा बँक बॅलंस वाढताना दिसतो. मात्र समाजातील गरिबांसाठी त्याची फारशी मदत होताना दिसत नाही. नायजेरियासारख्या देशात अर्थव्यवस्थेचा वेग चांगला आहे आणि आफ्रिका खंडातील सर्वात श्रीमंत उद्योजकही याच देशाने दिला आहे. मात्र तिथे गरिबीही वाढली आहे."

पैसा पैशाला खेचतो

अमेरिकेतील विलानोवा विद्यापीठाच्या सुतिर्था बागची आणि कोलंबिया विद्यापीठाचे जॅन स्वेगनार यांनी 2015 मध्ये एक शोधनिबंध लिहिला होता. त्यात त्यांचं म्हणणं होतं की सामाजिक विषमतेच्या दर्जापेक्षा त्यामागचं कारण जास्त महत्त्वाचं आहे.

त्यांनी 1987 ते 2002 या काळातील 23 देशातील अब्जाधीशांचा अभ्यास केला. त्यात असं लक्षात आलं की राजकीय लागेबांधे असल्याने अब्जाधीशांकडे एवढी संपत्ती गोळा झाली. मात्र सत्ता आणि संपत्ती मोजक्या लोकांकडे गेल्यामुळे सरकारी कारभारात त्यांचा हस्तक्षेप वाढतो. जनहिताच्या धोरणांवर त्याचा परिणाम होतो आणि देशाच्या व्यापक हितासाठी ते अपायकारक ठरतं.

अब्जाधीशांसबंधीच्या या चर्चेत आणखी एक वादाचा मुद्दा म्हणजे वारसाहक्काने मिळालेली संपत्ती. फ्रेन्च अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटी यांच्यामते एका श्रीमंत व्यक्तीने आपली संपत्ती आपल्या वारसदारालाच देणं, ही सुदृढ समाज निर्मितीतली मोठी अडचण आहे.

WealthXने केलेल्या सर्वेक्षणानुसार 2017मध्ये जगातील बरेचसे (56.8%) अतिश्रीमंत हे स्वतःच्या बळावर पुढे आले असले तरीही त्याच वर्षी वारसाहक्काने मिळालेली संपत्ती 13.2 टक्के इतकी वाढली. 2016मध्ये हीच संपत्ती 11.7% होती.

कॅरोलिना म्हणतात, "या अर्थी करासोबतच श्रीमंतांसाठीची धोरणं यावरही चर्चा होणं महत्त्वाचं आहे. विशेषतः पैतृक संपत्तीविषयी. उद्योजकतेला चालना देणं महत्त्वाचं आहे. अब्जाधीशांच्या वारसांना केवळ वडिलांकडून सर्व न मिळता त्यांनी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. "

त्या पुढे म्हणतात, "अतिश्रीमंतीतून राजकीय सत्ता आणि राजकीय सत्तेकडून अतिश्रीमंती, हेदेखील होता कामा नये. चांगल्या मार्गाने कमावलेला पैसाही सत्तेपायी वाया जाण्याची भीती असते. त्यामुळेच मजबूत अशा संस्थांची गरज आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)