You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हवामान बदलावर काम करणाऱ्या जोडगोळीला
हवामान बदल या विषयावर काम करणाऱ्या विल्यम नोरढॉस आणि पॉल रोमर या द्वयीला यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
जागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंग आणि आर्थिक प्रगती यांच्यातील परस्परसंबंधांबाबत या जोडगोळीने केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
याची जाहीर घोषणा करताना रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटलं की "जगाला भेडसावणाऱ्या किचकट आणि गंभीर प्रश्नांबाबत या दोघांचं काम मोलाचं आहे. शाश्वत विकासासंदर्भात या दोघांचं संशोधन उपयोगी ठरेल."
या दोघांना 8.41 लाख युरो बक्षीसरकमेने गौरवण्यात येणार आहे.
अर्थव्यवस्था आणि हवामान यांचा परस्परसंबंध आहे, या सिद्धांताला पहिलं शिस्तबद्ध प्रारूप येल विद्यापीठाच्या प्राध्यापक नोरढॉस यांनी दिलं, असं अकॅडमीने म्हटलं आहे.
आर्थिक शक्तीकेंद्रं कसं कंपन्यांना नव्या संकल्पना आणि नवकल्पना अंगीकारण्यास भाग पाडतात, याबाबत न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक रोमर यांनी संशोधन केलं आहे.
"बाजाराचं आर्थिक ज्ञान आणि निसर्ग यांच्यातल्या नात्याचं आर्थिक विश्लेषण करत संशोधनाचा परीघ वाढवण्यात या दोघांचं मोलाचं योगदान आहे," असं पुरस्कार जाहीर करणाऱ्या रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटलं.
प्राध्यापक रोमर यांची जागतिक बँकेच्या प्रमुख अर्थशास्त्रज्ञपदी नियुक्ती झाली होती. मात्र पदभार स्वीकारल्यानंतर सव्वा वर्षातच त्यांनी हे पद सोडलं.
अल्पावधीत अतिमहत्त्वाचं हे पद सोडल्यामुळे रोमर यांच्यावर टीका झाली होती तसंच जगभर वादाची राळ उमटली होती.
'डुइंग बिझनेस' या बहुचर्चित अहवालात चिलीला चांगलं मानांकन मिळालं होतं. चिलीचे राष्ट्राध्यक्ष मिशेल बॅचलेट यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे चिलीला अनुकूल मानांकन मिळालं, असा दावा रोमर यांनी केला होता.
परखड मतं व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध रोमर यांचे जागतिक बँकेत संघटनात्मक स्वरूप आणि अर्थशास्त्रज्ञांची भाषा मांडणी सारख्या विषयांवरून खटके उडाले होते.
अमेरिकेचं वर्चस्व
तसे तर नोबेल पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या शेवटच्या इच्छेनुसार वितरित करण्यात येतात. 1901 मध्ये या पुरस्कारांची सुरुवात झाली.
पण अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यास 1969 साली सुरुवात झाली. नोबेल यांच्याच स्मरणार्थ स्वीडिश सेंट्रल बँकेने या पुरस्काराची निर्मिती केली. तांत्रिकदृष्ट्या अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार स्वेरिजेस रिक्सबँक प्राइज नावाने ओळखला जातो.
नज थिअरी मांडणारे अमेरिकेचे अर्थशास्त्र रिचर्ड थॅलर यांना गेल्या वर्षी अर्थशास्त्राच्या नोबेल देण्यात आला होता.
2016 मध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेले अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ ऑलिव्हर हार्ट आणि फिन बेंगट होमस्टॉर्म यांना कॉन्ट्रॅक्ट थिअरीसाठी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं. अनभिज्ञ परिस्थितीत माणसं कायदेशीर करार कसे निर्माण करतात यासंदर्भात ही थिअरी होती.
सुरुवातीपासूनच अर्थशास्त्राच्या नोबेलवर अमेरिकेचं वर्चस्व राहिलं आहे. आतापर्यंत केवळ एका महिलेला अर्थशास्त्राचं नोबेल देण्यात आलं आहे. 2009मध्ये एलिनोर ओस्टॉर्म यांना त्यांच्या योगदानासाठी गौरवण्यात आलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)