You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Nobel Peace Prize 2018 : कोण आहेत नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नादिया मुराद
या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार कांगोचे महिला रोगतज्ञ डेनिस मुकवेगे आणि महिला हक्क कार्यकर्ता नादिया मुराद यांना मिळाला आहे.
संघर्षग्रस्त आणि युद्धग्रस्त भागामध्ये महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार थांबावेत यासाठी नादिया मुराद प्रयत्नरत आहेत. 25 वर्षीय नादिया मुराद यांचं ISISच्या सैनिकांनी 2014मध्ये अपहरण केलं होतं. तीन महिने बंदी बनवून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला होता.
बीबीसी रेडिओनं काही महिन्यांपूर्वी त्यांची मुलाखत घेतली होती. मॅथ्यू बॅनिस्टर यांना नादिया यांनी आपली कथा सांगितली होती. त्यांची ही कथा त्यांच्याच शब्दांत वाचा.
ISISचा ताबा येण्यापूर्वी मी माझी आई आणि भावंडासोबत उत्तर इराकच्या शिंजाजवळील कोचू गावात राहत असे. आमच्या गावातल्या लोकांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालत असे.
आमच्या गावात अंदाजे 1700 लोक शांततापूर्वक राहत असत. 3 ऑगस्ट 2014ची गोष्ट आहे, जेव्हा ISISनं याजिदी लोकांवर हल्ला केला. आम्हाला कोणतीच सूचना मिळाली नाही की आमच्या गावावर हल्ला होणार आहे.
काही लोक माउंट शिंजाकडे पळाले. आमचं गाव बरंच दूर होतं. आम्ही कुठे पळून देखील जाऊ शकत नव्हतो. आम्हाला 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान बंदी बनवून ठेवण्यात आलं.
आमच्या कानावर खूप भयानक गोष्टी पडत होत्या. त्यांनी 3,000 पेक्षा जास्त लोकांची हत्या केली आणि 5,000 हून अधिक महिला आणि मुलांना त्यांनी बंदी बनवलं. तेव्हाच आम्हाला सत्यता कळली.
इस्लाम स्वीकारण्याची धमकी
15 ऑगस्टला मी माझ्या कुटुंबीयांसोबत होते. आम्ही खूप घाबरलो होतो. कारण आमच्यासमोर जे घडलं ते खूप भयानक होतं. ISISचे अंदाजे 1000 सैनिक आमच्या गावात घुसले. ते आम्हाला शाळेत घेऊन गेले. ती शाळा दोन मजली होती.
पहिल्या मजल्यावर पुरुष होते आणि दुसऱ्या मजल्यावर महिला आणि मुलांना ठेवण्यात आलं. त्यांनी आमच्याजवळचं सर्वकाही हिरावून घेतलं. मोबाइल, पर्स, दागिने. त्यानंतर त्यांचा नेता ओरडला आणि म्हणाला ज्यांना इस्लाम स्वीकारायचा असेल त्यांनी खोली सोडून निघून जावं.
आम्हाला माहीत होतं की जर आम्ही खोली सोडली असती तरी त्यांनी आम्हाला मारून टाकलं असतं. याजिदीनी इस्लाम स्वीकारला तरी ते अस्सल मुसलमान बनणार नाही अशी त्यांची धारणा होती.
त्यांना वाटतं की याजिदींनी इस्लाम स्वीकारला पाहिजे आणि नंतर त्यांना मारून टाकलं पाहिजे. आम्हाला माहीत होतं की महिला असल्यामुळे ते आम्हाला काही करणार नाहीत पण आमचा उपयोग ते इतर कामासाठी करतील.
जेव्हा त्यांनी पुरुषांना शाळेबाहेर नेलं तेव्हा आम्हाला हे माहीत नव्हतं की त्यांच्यासोबत काय होणार आहे. पण काही वेळानंतर आम्ही गोळ्यांचा आवाज ऐकला. आम्हाला माहीत नव्हतं की नेमकं कोण मृत्युमुखी पडत आहे. त्या हल्ल्यात माझे भाऊ आणि इतर लोक मारले गेले.
त्यांनी कुणाचीही हायगय केली नाही. कोण लहान कोण मोठं कोण तरुण कोण म्हातारं काही पाहिलं नाही. काही अंतरावरून आम्ही हे पाहू शकत होतो की गावकऱ्यांना ते बाहेर घेऊन जाऊ लागले होते. सैनिकानं एका व्यक्तीचं मूल हिसकावून घेतलं. नंतर त्या मुलाला शाळेत सोडून देण्यात आलं. त्यांनी आम्हाला तीन गटात विभागलं. पहिल्या गटांत तरुण मुली होत्या, दुसऱ्या गटात मुलं आणि तिसऱ्या गटात इतर महिला होत्या.
प्रत्येक गटासाठी त्यांच्याकडे वेगळी योजना होती. मुलांना ते प्रशिक्षण शिबिरात घेऊन गेले. ज्या महिला लग्नाच्या लायक वाटल्या नाहीत त्यांची हत्या करण्यात आली. त्यामध्ये माझी आई देखील होती.
रात्री ते आम्हाला मोसूलला घेऊन गेले. आम्हाला दुसऱ्या शहरात घेऊन जाणारे ते हेच लोक होते. ज्यांनी माझ्या आईला आणि भावाला ठार केलं होतं. तेच लोक आता माझ्यावर अत्याचार आणि बलात्कार करत होते. मला तर काहीच समजत नव्हतं.
'शिक्षा म्हणून जेव्हा माझ्या सहा जणांनी बलात्कार केला'
ते आम्हाला मोसूलच्या इस्लामिक कोर्टात घेऊन गेले. तिथं त्यांनी प्रत्येक महिलेचा फोटो घेतला. मला तिथं हजारो महिलांचे फोटो दिसत होते. प्रत्येक फोटोवर फोन नंबर दिसत होता. ज्या सैनिकाला त्या महिलेची जबाबदारी सोपवण्यात आली त्याचा नंबर त्या फोटोवर असे.
वेगवेगळ्या ठिकाणाहून ISISचे सैनिक कोर्टात येत असत. तिथं आल्यावर ते त्या महिलांच्या फोटोकडं पाहात. जर ती मुलगी आवडली तर फोटोवर असलेल्या सैनिकाशी संपर्क साधून तिचा भाव ठरवला जात असे. तिचा भाव ठरवण्याची, तिला भाड्यानं देण्याची किंवा कुणाला भेट देण्याची परवानगी त्यांना असे.
मला एका सैनिकाला विकण्यात आलं. पहिल्या रात्री जेव्हा त्यांनी मला सैनिकांकडे पाठवलं तेव्हा तिथं एक खूप जाड मुलगा होता. त्याला मी आवडत होते पण मला तो बिल्कुल आवडत नव्हता. जेव्हा आम्ही सेंटरवर गेलो तेव्हा मी एका फरशीवर होते. मी त्या व्यक्तीचे पाय पाहिले. मी त्याच्याकडे दयेची भीक मागितली. मी याचना करत होते, पण त्यानं माझं काहीही एक ऐकलं नाही.
एका आठवड्यानंतर मी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मी पकडले गेले. शिक्षा म्हणून सहा सुरक्षा रक्षकांनी माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर माझ्यावर सातत्याने तीन महिने बलात्कार झाला.
या भागात सगळीकडे ISISचे तरुण दिसत असत. त्यामुळे मला पळून जाण्याची संधी मिळाली नाही.
'...आणि मी तिथून सुटले'
नंतर मला एका पुरुषाला विकण्यात आलं. त्याला माझ्यासाठी काही कपडे विकत घ्यायचे होते आणि नंतर मला विकण्याचा त्याचा मानस होता. तो कपडे आणण्यासाठी बाहेर गेला.
मी घरी एकटीच होते. मी तिथून पळून गेले. मी मोसूलच्या गल्लीबोळातून पळू लागले. मी एका मुस्लीम कुटुंबाचं घर ठोठावलं. मी त्यांना माझी हकीकत सांगितली. त्यांनी माझी मदत केली.
कुर्दिस्तानच्या सीमेपर्यंत येण्यासाठी त्यांनी माझी मदत केली. शरणार्थी शिबिरात कुणी मला विचारलं नाही की माझ्यासोबत काय झालं. मला सांगायचं होतं की माझ्यासोबत आणि माझ्यासारख्या महिलांसोबत काय घडत आहे?
माझ्याजवळ पासपोर्ट नव्हता. कित्येक महिने मी कागदपत्रं हाती येईपर्यंत इराकमध्येच अडकून पडले.
त्याच वेळी जर्मन सरकारनं 1000 शरणार्थींना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी मी एक होते. माझ्यावर उपचार होत असताना एका संस्थेनं मला म्हटलं की तुझी हकीकत तू संयुक्त राष्ट्रांमध्ये जाऊन सांग. मी माझी कहानी सांगण्यासाठी कोणत्याही देशात जायला तयार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)