कॅन्सरच्या निवारणाबाबत महत्त्वपूर्ण संशोधनाला नोबेल पुरस्कार

कॅन्सरचं निवारण करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञ जोडगोळीला प्रतिष्ठेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

अमेरिकेचे वैज्ञानिक जेम्स पी. एलिसन आणि जपानचे शास्त्रज्ञ तासुकू होंजो यांना संयुक्तरीत्या सन्मानित केले जाणार आहे. या दोघांना 10.1 कोटी डॉलर्सचं बक्षीस देऊन गौरवण्यात येईल.

कॅन्सरच्या ट्यूमरशी लढण्याची शरीरातील पेशींची प्रतिकारशक्ती वाढवण्यासंदर्भात या दोघांनी एक नवं संशोधन केलं आहे. हे संशोधन कॅन्सरवरील उपचारांमध्ये क्रांतिकारी असल्याचं नोबेल पुरस्कार समितीने म्हटलं आहे.

"आमचं संशोधन यापुढेही सुरू राहील. जेणेकरून अधिकाअधिक रुग्णांना कॅन्सरच्या विळख्यातून सोडवता येईल," असं जपानी संशोधक तासुकू यांनी सांगितलं.

शरीरातील प्रतिकार यंत्रणा आपलं आजारापासून संरक्षण करतं. मात्र शरीरातील पेशींवर होणारं आक्रमण रोखण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.

आजपासून विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा होणार आहे. आज फिजिऑलॉजी/मेडिसीन क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाले. शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा शुक्रवारी केली जाणार आहे.

यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नसल्याचा निर्णय अकादमीने घेतला आहे. 70 वर्षात पहिल्यांदाच साहित्यातील नोबेल दिला जाणार नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)