You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतीयांनी शोधलेल्य त्या 7 गोष्टी, ज्यामुळे जगात बदल झाला...
आजघडीला भारताची जगात विशिष्ट अशी ओळख आहे. भारतानं जगाला अनेक अशा गोष्टी दिल्या ज्यामुळे लोकांचं जीवन सुखकर होण्यास मदत झाली.
भारतानं जगाला दिलेल्या 7 गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील.
1. योगविद्या
जगभरात योगविद्या प्रसिद्ध आहे. संयुक्त राष्ट्रांनी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केलं आहे. पूर्व-वैदिक काळापासूनच भारतात योग प्रचलित आहे असं सांगितलं जातं.
योगविद्येची मुळं हिंदू, बौद्ध आणि जैन संस्कृतीत आढळतात. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आता जगभर लोक योग अभ्यास करताना दिसून योतात. स्वामी विवेकानंदांनी (1863-1903) पश्चिमेकडील देशात योगविद्येचा प्रसार केला होता.
2. रेडियो प्रसारण
नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ गुलइलमो मार्कोनी यांना रेडियो प्रसारणाचा जनक मानल्या जातं.
असं असलं तरी, भारतात जगदीश चंद्र बोस यांनी त्यापूर्वीच मिलीमीटर रेंज रेडियो तरंग मायक्रोवेव्हचा वापर सुरूंग लावण्यासाठी आणि घंटा वाजवण्यासाठी केला होता.
यानंतर चार वर्षांनी लोह-पारा-लोह कोहिरर टेलिफोन डिक्टेटरच्या स्वरूपात उदयास आला आणि रेडियो प्रसारणाच्या वायरलेस क्रांतीचा अग्रदूत बनला.
1978 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल विजेता सर नेविल मोट यांनी बोस हे 60 वर्षं पुढचा विचार करत होते असं म्हटलं आहे.
3. फायबर ऑप्टिक्स
फायबर ऑप्टिक्सच्या उदयानंतर ट्रान्सपोर्ट, दूरसंचार आणि वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले.
भारताच्या पंजाबमधील मोगामध्ये जन्मलेल्या नरिंदर सिंह कपानी यांना फायबर ऑप्टिक्सचे जनक मानलं जातं.
1955 ते 1965 च्या दरम्यान कपानी यांनी अनेक शोधनिबंध लिहिले. त्यातील एक शोधनिबंध 1960 मध्ये सायंटिफिक अमेरिकनमध्ये प्रकाशित झाला होता.
या पेपरनं फायबर ऑप्टिक्सच्या संशोधनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
4. साप-शिडी
भारतात खेळल्या जाणाऱ्या साप-शिडीच्या खेळापासून प्रेरित होऊन आजचे कॉम्प्युटर वरील खेळ तयार झाल्याचं बोललं जातं.
भारतातील हा खेळ इंग्लंडमध्ये खूपच लोकप्रिय झाला होता.
हिंदू मुलांना नैतिक मुल्यांच शिक्षण देण्याचा उद्देश या खेळामागे होता असं सांगितलं जातं. यातील शि़डीला सद्गुणाचं तर सापाला सैतानाचं प्रतिक मानलं जायचं.
5. यूएसबी पोर्ट
यूएसबी म्हणजेच युनिव्हर्सल सीरियल बस पोर्टच्या शोधामुळं आपण इलेक्ट्रॉनिक साधनांशी जोडले गेलो.
ज्या अजय भट्ट यांनी यूएसबी पोर्टच्या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली त्यांचं आयुष्य यामुळे बदलून गेलं.
1990 च्या दशकाच्या सुरुवातीला भट्ट आणि त्यांच्या टीमनं यावर काम करणं सुरू केलं. या दशकाच्या शेवटी यूएसबी हे कंप्युटर कनेक्टिव्हिटीचं मुख्य साधन बनलं.
पण, भट्ट यांच्याबद्दल लोकांना खूप उशीरा म्हणजे 2009 मध्ये कळालं. याला कारण ठरली ती त्यावर्षी आलेली इंटेलची जाहिरात. यानंतर भट्ट यांना 2013 मध्ये गैर-युरोपियन श्रेणीत 'युरोपियन इन्व्हेंटर अवार्ड' नं गौरवण्यात आलं.
6. फ्लश टॉयलेट्स
पुरातत्वीय पुराव्यांवरून सिद्ध होतं की, फ्लशिंग शौचालयाची मुळं सिंधू संस्कृतीत होती.
कांस्ययुगीन संस्कृतीचा भाग असलेल्या कश्मीरमध्ये जलाशय होते. तसंच सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था होती.
7. शॅम्पू
शॅम्पूनं केस धुतल्यानंतर कुणाला ताजंतवानं वाटत नसेल? शॅम्पूविना अंघोळीची कल्पना आता केली जाऊ शकत नाही.
भारतात 15 व्या शतकात झाडपाल्यापासून शॅम्पू बनवला जात असे. ब्रिटिशांच्या काळात व्यापारी लोकांनी शॅम्पूला युरापात पोहोचवण्याचं काम केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)