You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शुक्राच्या ढगांमध्ये जीवजंतू तरंगत आहेत?
शुक्र ग्रहाच्या वायुमंडळात जीवजंतू असल्याचा संकेत देणारा एक वायू खगोल शास्त्रज्ञांना आढळला आहे. त्या आधारावर शुक्राच्या ढगांमध्ये सूक्ष्मजीव तरंगत असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
त्या वायूचे नाव फॉस्फीन असं आहे. फॉस्फरसच्या एका कणापासून आणि तीन हायड्रोजन कणांपासून तयार झालेला हा अणू आहे.
पृथ्वीवर फॉस्फीनचा संबंध सजीवांशी आहे. फॉस्फीन पेंग्विनसारख्या प्राण्यांच्या पोटात किंवा दलदलीसारख्या कमी प्राणवायूच्या ठिकाणी आढळणाऱ्या सूक्ष्म जीवांमध्ये आढळतो. सूक्ष्म जीवाणूऑक्सिजनअभावी हा वायू उत्सर्जित करतात.
फॉस्फीनला कारखान्यांमध्येही तयार करता येऊ शकतं. पण शुक्र ग्रहावर ना कारखाने आहेत ना पेंग्विन.
मग शुक्र ग्रहावर हा वायू कुठून आला? तोही ग्रहाच्या पृष्ठभागापासून 50 किलोमीटर उंचीवर का आहे?
यूकेमधील कार्डिफ विद्यापीठातील प्राध्यापक जेन ग्रीव्हज आणि तिच्या सहकाऱ्यांना पडलेला हा मोठा प्रश्न आहे.
त्यांनी नेचर अॅस्ट्रॉनॉमी नावाच्या जर्नलमध्ये एक पेपर प्रकाशित केला आहे. यामध्ये त्यांनी शुक्रावर फॉस्फिन आढळल्याबाबत सविस्तर लिहिलं आहे.
हा अणू नैसर्गिक किंवा अजैविक मध्यमातून उत्पन्न झाला असण्याची शक्यता आहे, असंही त्यांच्या संशोधनात नमूद करण्यात आलं आहे.
शास्त्रज्ञांनी शुक्र ग्रहावर जीव असल्याचा दावा केलेला नाही. पण या शक्यतेबाबत अधिक संशोधन करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले आहेत.
शुक्र ग्रहावर जीवजंतू असल्याचा संकेत देणारा वायू कसा आढळला?
कार्डिफ विद्यापीठाच्या प्राध्यापक जेन ग्रीव्हज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हवाई येथील मौना केआ वेधशाळेत जेम्स क्लार्क मॅक्सवेल दुर्बिणीच्या मदतीने आणि चिलीतील अटाकामा लार्ज मिलिमीटर ऐरीदुर्बिणीच्या मदतीने शुक्र ग्रहाचं निरीक्षण केलं.
यात त्यांना फॉस्फिनची स्पेक्ट्रल स्वाक्षरी ओळखता आली. शास्त्रज्ञांच्या मते, शुक्राच्या ढगांमध्ये हा वायू मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे.
शुक्र ग्रहाबद्दल आणि तिथे आढळून आलेलं फॉस्फिनचं प्रमाण लक्षात घेता फॉस्फिनच्या अजैविक माध्यमाचा शोध लागलेला नाही. म्हणूनच शुक्रावर सजीव असण्याच्या शक्यतेबाबत विचार केला जाऊ शकतो.
प्राध्यापक जेन ग्रीव्हज सांगतात, "माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी विश्वात जीव शोधण्यासाठीच प्रयत्न केले. त्यामुळे ही शक्यता पाहूनच मला आनंद झाला."
याबाबत इतके कुतुहूल का?
शेजारील ग्रह शुक्रावर जीव असण्याची शक्यता सूर्यमालेतील इतर कोणत्याही ग्रहापेक्षा कमी मानली जाते. बायबलमध्ये शुक्राला 'नर्क' म्हटलं गेलंय.
शुक्राच्या वायुमंडळाचा जाड थर असून त्यात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अधिक आहे. येथील वातावरणात 96 टक्के कार्बन डायऑक्साईड आहे. या ग्रहावर वायुमंडळाचा दबाव पृथ्वीच्या तुलनेत 90 पटीने अधिक आहे.
शुक्राच्या पृष्ठभागावरील तापमान एखाद्या पिझ्जा ओव्हन प्रमाणे 400 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त आहे. म्हणूनच जर तुम्ही शुक्र ग्रहावर पाय जरी ठेवला तरी काही सेंकदात तुम्ही भाजून निघाल.
त्यामुळेच शुक्रावर जीव असतील तर ते पृष्ठभागापासून 50 किलोमीटरच्या उंचीवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जीव असण्याची शक्यता कमी का आहे?
शुक्रावर घनदाट ढग आहेत. त्या ढगांत 75-95 टक्के सल्फ्यूरिक आम्ल आहे. पृथ्वीवरील जीव ज्या पेशींच्या रचनांपासून बनले आहेत त्यांच्यासाठी हे आम्ल घातक आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, जर तिथे सुक्ष्म जीव असतील तर सल्फ्युरिक आम्लापासून सुरक्षित राहण्यासाठी एका प्रकारचं कवच तयार करावं लागेल.
मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसोबत काम करणारे डॉ. विल्यम बेन्स सांगतात, "आम्ही अशा जीवाणूंबद्दल बोलत आहोत ज्याने आपल्या अवतीभोवती टेफ्लॉनपेक्षाही मजबूत कवच बनवलं आहे आणि स्वत:ला त्याच्या आतमध्ये सील केलं आहे."
"पण मग ते खातात कसे? ते वायूची देवाणघेवाण कशी करतात? हे सर्व परस्परविरोधी आहे."
शुक्रावर जीव आहेत की नाही याचा शोध घेण्यासाठी तिथे शास्त्रज्ञांना पाठवावं लागेल.
अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने शास्त्रज्ञांना 2030 च्या दशकात संभाव्य फ्लॅगशीप मिशन पाठवण्याच्या योजनेवर काम करा असे सांगितलं आहे. फ्लॅगशिप मिशन ही नासाची सर्वाधिक सक्षम आणि महागडी मिशन असतात. त्या पार्श्वभूमीवर शुक्राच्या ढगांमधून जाणारा एक इन्स्ट्रुमेंटल फुगा पाठवण्याचा विचार सुरू आहे.
टीमची सदस्य सारा सेगर यांनी सांगितले की, रशियाने 1985 मध्ये वेगा फुगा पाठवला होता. सल्फ्युरिक आम्लापासून संरक्षण व्हावं यासाठी टेफ्लॉन लावण्यात आले होते.
त्या सांगतात, "आम्ही नक्कीच तिथे जाऊ शकतो. सुक्ष्म कणांना गोळा करून त्यावर संशोधन करता येईल. सोबत आपण एक मायक्रोस्कोप घेऊन जाऊ शकतो ज्यामधून जीव आहेत का हे पाहण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो."
वेस्टमिन्स्टर विद्यापीठातील डॉ. लुईस डार्टनेल आशा व्यक्त करत सांगतात, "शुक्र ग्रहावरील ढगांमध्ये जीव आढळत असतील तर त्यामुळे अनेक गोष्टी समजण्यास आम्हाला मदत होईल. कारण याचा अर्थ आकाशगंगेत इतरही ठिकाणी जीव असू शकतात या शक्यतेला वाव आहे. असं असेल तर मग जगण्यासाठी पृथ्वीसारखाच ग्रह असण्याची आवश्यकता नाही. कारण आकाशगंगेत शुक्रासारख्या प्रचंड उष्ण ग्रहावरही जीवन आढळू शकतं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)