You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड अशी करण्यात आली
- Author, श्रीकांत बक्षी
- Role, बीबीसी तेलुगू प्रतिनिधी
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष के. सिवन यांनी 2020साठीची इस्रोने ठरवलेली उद्दिष्टं जाहीर केली आहेत.
2020 मध्ये गगनयान मोहिमेसोबतच चंद्रयान-3 मोहिमेचं कामही प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी सांगितलं. गगनयान ही इस्रोची समानव अंतराळ मोहीम आहे. या मोहिमेत अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यात येणार आहे. यासाठी भारतीय हवाई दलातील 4 वैमानिकांची निवड करण्यात आली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून या वैमानिकांचं रशियामध्ये प्रशिक्षण सुरू होणार आहे.
मिशन गगनयान
गगनयान मोहिमेची घोषणा आता झाली असली तरी इस्रोने समानव अंतराळ कार्यक्रम 2007 मध्ये सुरू केला होता. मात्र, निधीच्या कमतरतेमुळे ही योजना पुढे सरकू शकली नव्हती.
त्यावेळी इस्रोकडे असलेल्या GSLVची क्षमता कमी असल्यामुळे अंतराळवीर असलेलं यान पाठवण्यात अडचणी होत्या. पुढे अधिक क्षमतेचे रॉकेट्स किंवा क्रायोजेनिक इंजिन तयार करण्यासाठीचे प्रयोग सुरू झाले.
2014 साली इस्रोला GSLV मार्क टू बनवण्यात यश मिळालं. क्रायोजेनिक इंजिनांमध्ये करण्यात आलेल्या प्रयोगांनाही यश मिळालं. त्यामुळे गगनयान मोहिमेला पुन्हा वेग आला असून GSLV मार्क थ्रीचं कामही प्रगतीपथावर आहे.
चंद्रयान-2 हे यानही GSLV मार्क थ्री या रॉकेटच्या मदतीनेच अवकाशात सोडण्यात आलं होतं. अधिक क्षमतेचा लॉन्च पॅड बनवण्यात यश मिळाल्यानंतर इस्रोने 2017 साली समानव अंतराळ मोहिमेचं काम पुन्हा सुरू केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2018 रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधताना लवकरच भारतीयांना अंतराळात पाठवणार असल्याचं म्हटलं होतं. या मोहिमेसाठी तब्बल 10 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.
गगनयान मोहिमेसाठी इस्रोने बंगळुरूमधल्या मुख्यालयात ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर उभारलं आहे. या मोहिमेअंतर्गत 2 ते 3 अंतराळवीरांना 7 दिवसांसाठी अंतराळात पाठवून त्यांना सुरक्षित पृथ्वीवर आणण्याचा विचार आहे.
सर्व व्यवस्थित पार पडल्यास डिसेंबर 2021 पर्यंत हा प्रयोग पूर्ण होईल, अशी घोषणा सिवन यांनी केली आहे.
2019 मध्ये अंतराळवीरांच्या निवडीसोबतच जे यान त्यांना अवकाशवारी घडवणार आहे, त्या क्रू मॉड्युलचीही यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
अंतराळ मोहिमेच्या कुठल्याही टप्प्यात अंतराळवीरांना धोका निर्माण झाल्यास त्यांना सुरक्षित पृथ्वीवर परत आणण्याासाठी रॉकेटपासून वेगळं करणारी चाचणीही यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे.
अंतराळवीरांची निवड कशी करतात?
चंद्रयान-2 या मोहिमेनंतर भारतीयांचा इस्रोच्या कार्यक्रमांमध्ये रस वाढला आहे. इस्रोच्या भविष्यातील अंतराळ मोहिमांविषयी सामान्य भारतीयांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.
गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड केल्यानंतर ही निवड प्रक्रिया कशी असते, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
खरंतर अंतराळवीरांची निवड प्रक्रिया फार पूर्वीपासून सुरू झाली आहे. इस्रो आणि भारतीय हवाई दलाने 29 मे 2019 रोजी गगनयान मोहिमेसाठी आवश्यक अंतराळवीरांची निवड, प्रशिक्षण आणि इतर बाबींसंबंधीच्या करारावर स्वाक्षरी केली होती.
या करारानुसार ही प्रक्रिया 12 ते 14 महिन्यात पार पडते. या अंतराळवीरांना भारतातच बेसिक ट्रेनिंग देण्यात येईल आणि पुढील प्रशिक्षणासाठी परदेशी अंतराळ संशोधन संस्था सहकार्य करतील.
इन्स्टिट्युट ऑफ एरोस्पेस मेडिसीनकडून अंतराळवीरांची निवड केली जाते. 1957 साली भारतीय हवाई दलाच्या सहकारी संस्थेच्या रुपात याची सुरुवात झाली.
भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचं काम हीच संस्था करते. या विश्वासामुळेच अंतराळवीरांच्या निवडीची जबाबदारीही याच संस्थेवर टाकण्यात आली.
अंतराळात जाणारे अंतराळवीर उत्तम वैमानिक असणं गरजेचं आहे. शिवाय त्यांना इंजीनिअरिंगची पार्श्वभूमी हवी.
अंतराळ मोहिमेसाठी उत्सुक असणाऱ्यांकडून आधीच अर्ज मागवले जातात. त्यासाठी भारतीय हवाई दलाच्या वैमानिक विभागात नोटीफिकेशन पाठवण्यात येतं. यानंतर अर्जाची छाननी करून योग्य उमेदवाराची निवड केली जाते.
निवड केलेल्या उमेदवारांच्या काही वैद्यकीय चाचण्या घेतात. अंतराळ प्रवासासाठी ते सुदृढ आहेत की नाही, हे यात तपासलं जातं.
वैद्यकीय चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढच्या चाचणीसाठी पाठवलं जातं. यात त्यांची शारीरिक चाचणी घेतली जाते.
शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या वैमानिकांना अंतराळवीर मोहिमेचं बेसिक प्रशिक्षण देण्यात येतं.
एरोस्पेस मेडिसीन एअर कॉमर्स इन्स्टिट्यूटने अंतराळवीर निवड करारात म्हटलं आहे की भारतीय हवाई दलाच्या 30 वैमानिकांची ते निवड करतील.
यातील 15 जणांना अंतराळवीरांचं बेसिक प्रशिक्षण दिलं जाईल. बेसिक प्रशिक्षणातून 9 जणांची निवड होईल आणि या 9 जणांना परदेशात फूल-टाईम अॅस्ट्रोनॉट म्हणजेच पूर्णवेळ अंतराळवीर म्हणून प्रशिक्षण देण्यात येईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)