You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ल्यूडमिला : नाझी सैनिकांमध्ये दहशत पसरवणारी रशियाची शार्प शूटर कोण होती?
इतिहासातील सर्वांत 'धोकादायक नेमबाज' असा दर्जा प्राप्त झालेल्या आणि हिटलरच्या नाझी सैन्याच्या नाकी नऊ आणणाऱ्या मुलीची ही कहाणी आहे.
ल्यूडमिलाने 25 वर्षांची होईपर्यंत 309 लोकांना आपल्या बंदुकीने टिपलं होतं. यातील बहुतांश बळी हिटलरच्या सैनिकांचे होते.
दुसरं महायुद्ध सुरू असताना 1942 साली ल्यूडमिला पवलिचेन्को वॉशिंग्टनला पोचली.
सोव्हिएत संघाने ल्यूडमिलाचा प्रचारतंत्रानुसार वापर केला, असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे.
तिला सोव्हिएतमधील सर्वोच्च नेतृत्वाने अमेरिकेला पाठवलं होतं. युरोपीय आघाडीवर अमेरिकेचं समर्थन मिळवण्याच्या उद्देशाने तिला तिथे पाठवण्यात आलं होतं.
मित्र राष्ट्रांच्या सैन्याने युरोपावर तातडीने आक्रमण करावं, असं रशियाच्या जोसेफ स्टॅलिन यांना वाटत होतं.
अमेरिकेचा दौरा
जर्मनांना त्यांची सैन्यदलं निरनिराळ्या आघाड्यांवर विभागावी लागावीत, यासाठी इतर ठिकाणांवरून दबाव आणला, तर जर्मन सैनिकांचा सोव्हिएत सेनेवर येणारा दबाव कमी होईल, असा स्टॅलिन यांचा उद्देश होता.
स्टॅलिन यांचा हा उद्देश तीन वर्षं पूर्ण होत नव्हता. त्यामुळे ही मोहीम फत्ते करण्यासाठी ल्यूडमिला पवलिचेन्कोने व्हाइट हाऊसमध्ये पाऊल टाकलं.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी स्वागत केलेली ती पहिली सोव्हिएत प्रतिनिधी होती.
ल्यूडमिलाने राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांची पत्नी एलिनॉर रुझवेल्ट यांच्या सोबत संपूर्ण अमेरिकेचा प्रवास केला.
महिला असूनही युद्धात सहभागी होण्याचे आपले अनुभव तिने अमेरिकी सैनिकांना सांगितले.
शूटिंग क्लब ते रेड आर्मीपर्यंतचा प्रवास
अवघी चौदा वर्षांची असताना ल्यूडमिला पवलिचेन्कोच्या हाती शस्त्रं आली होती. युक्रेनमधील पॅट्रिक या गावावरून ल्यूडमिला तिच्या कुटुंबियांसह कीव्ह इथे येऊन स्थायिक झाली.
हेन्री साकैडा यांनी लिहिलेल्या 'हिरॉइन्स ऑफ द सोव्हिएत युनियन' या पुस्तकात लिहिल्यानुसार, ल्यूडमिला एका शस्त्रास्त्रं कारखान्यात काम करत होती.
शस्त्रं चालवण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी ओसोआवियाजिम शूटिंग असोसिएशनमध्ये दाखल व्हायचा निर्णय तिने घेतला.
अमेरिकेतील दौऱ्यादरम्यान ल्यूडमिलाने सांगितलं, "माझ्या शेजारी राहणारा एक मुलगा शूटिंग करून शेखी मिरवत होता, तेव्हाच मी ठरवलं की, मुलगीसुद्धा असं करून दाखवू शकते. त्यासाठी मी कष्टपूर्वक सराव केला."
काही दिवसांनी ल्यूडमिलाने बंदूक चालवण्यात प्रावीण्य मिळवलं.
जर्मनी आणि सोव्हिएत संघ यांनी शस्त्रसंधीचा करार केला होता, पण 22 जून 1941 रोजी जर्मनीने हा करार तोडला आणि 'ऑपरेशन बार्बारोसा'ची सुरुवात झाली.
या मोहिमेअंतर्गत जर्मनीने सोव्हिएत संघावर आक्रमण केलं.
सैनिकी प्रशिक्षण
ल्यूडमिला पवलिचेन्कोने स्वतःच्या देशाच्या संरक्षणासाठी कीव्ह विद्यापीठातील इतिहासाचं शिक्षण अर्ध्यात सोडून सैन्यामध्ये दाखल व्हायचा निर्णय घेतला.
सुरुवातीला रशियन सैन्याने तिच्या प्रवेशाला नकार दिला.
पण तिने स्वतःचं नेमबाजीमधील कौशल्य दाखवून दिल्यावर तिला रेड आर्मीसोबत चाचणीची परवानगी देण्यात आली.
चार्ल्स स्ट्रोन्ज यांनी नेमबाजांवर लिहिलेल्या 'स्नायपर इन अॅक्शन' या पुस्तकात म्हटल्यानुसार, ल्यूडमिलाने कीव्हमधील एका शाळेत प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण घेतलं होतं, तिथेच तिने प्रादेशिक स्पर्धेत विजयसुद्धा मिळवला होता.
सैन्यातील चाचणीमध्ये ल्यूडमिलाच्या हातात एक रायफल देण्यात आली आणि जर्मनीसाठी काम करत असल्याबद्दल पकडण्यात आलेल्या दोन रोमन सैनिकांवर नेम धरण्यास सांगण्यात आलं.
ल्यूडमिलाने अगदी सहज त्या दोघांना लक्ष्य केलं. त्यामुळे तिला पंचविसाव्या वर्षी चपायेव फूसीलियर्स या तुकडीत प्रवेश मिळाला.
'मेलेले नाझी काही नुकसान करत नाहीत'
रशियन सैन्यात असताना तिने ग्रीस व मोलदोव्हा इथल्या लढायांमध्ये सहभाग घेतला. लवकरच ल्यूडमिलाचं सैन्यात विशेष स्थान निर्माण झालं.
युद्धाच्या पहिल्या 75 दिवसांमध्ये तिने 187 नाझी सैनिकांना टिपलं होतं.
आजच्या युक्रेनमध्ये दक्षिणेला असणाऱ्या ओडेसा इथे झालेल्या लढाईत स्वतःची क्षमता सिद्ध केल्यानंतर तिला सेवास्टोपोलच्या लढाईसाठी क्रिमियाला पाठवण्यात आलं (30 ऑक्टोबर 1941 ते 4 जुलै 1942).
सेवास्टोपोलच्या लढाईत तिला अनेक ठिकाणी जखमा झाल्या, तरीही तिने युद्धभूमी सोडली नाही. अखेरीस नाझी सैन्याने ती होती त्या जागेवर बॉम्ब फोडला, तेव्हा तिच्या चेहऱ्याला गंभीर जखम झाली.
अनेक यशस्वी कामगिऱ्या पार पाडल्याबद्दल ल्यूडमिला पवलिचेन्कोला बढती मिळाली आणि तिने इतर नेमबाजांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. काही दिवसांनी तिला वॉशिंग्टनला पाठवण्यात आलं.
अमेरिकेच्या दौऱ्यावेळी ती म्हणाली होती, "जिवंत राहिलेला प्रत्येक जर्मन सैनिक महिलांना, मुलांना आणि वृद्धांना मारून टाकेल. त्यामुळे एका नाझीला मारून मी अनेकांचे जीव वाचवत असते."
युद्धभूमीवर...
ल्यूडमिला पवलिचेन्को अनेकदा पत्रकारांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांनी नाराज होत असे.
युद्धभूमीवर तुम्ही मेक-अप करून जाता का, असा प्रश्न एकदा कोणातरी पत्रकाराने तिला विचारला.
यावर ल्यूडमिला म्हणाली, "युद्धावर जाताना मेक-अप करून जाऊ नये, असा काही नियम नाहीये. पण युद्धामध्ये स्वतःचं नाक किती चमकतंय हे पाहायला कोणाकडे वेळ असतो?"
तिच्या स्कर्टच्या लांबीवरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर उत्तर देताना ती म्हणाली होती, "मी स्वतःच्या गणवेशाचा आदर करते. यात मला लेनिन यांचा आदेश दिसतो आणि युद्धभूमीवरील रक्त पेललेला हा गणवेश आहे."
1942 साली तिने 'टाइम' नियतकालिकाशी बोलताना म्हटलं होतं की, "महिला गणवेशाखाली सिल्कची अंतर्वस्त्रं घालतात का, हे जाणून घेण्यात अमेरिकी लोकांना जास्त रस असतो. पण गणवेश कशाचं प्रतिनिधित्व करतो, हे त्यांनी समजून घ्यायला हवं."
हिरो ऑफ सोव्हिएत युनियन
सोव्हिएत संघाला परत येत असताना ल्यूडमिला पवलिचेन्को ब्रिटनलाही गेली. तिथे तिने ब्रिटनला पाश्चात्त्य आघाडीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं.
युद्ध संपल्यावर आणि 'हिरो ऑफ सोव्हिएत युनियन' हा उच्च सन्मान प्राप्त झाल्यानंतर तिने कीव्ह विद्यापीठातील अभ्यासक्रम पूर्ण केला आणि इतिहासकार म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली.
1945 ते 1953 या कालखंडात तिने सोव्हिएत नौदलाच्या मुख्यालयासोबत काम सुरू केलं आणि कालांतराने ती सोव्हिएत कमिटी फॉर वॉर व्हेटरन्सची सक्रिय सदस्यसुद्धा राहिली.
रेड आर्मीच्या वतीने दुसऱ्या महायुद्धात लढलेल्या दोन हजार बंदूकधारी सैनिकांमध्ये तिचा समावेश होता. तसंच या युद्धात सहभागी होऊनसुद्धा जिवंत राहिलेल्या 500 नेमबाजांमध्येही ती होती.
पण तिला झालेली इजा भरून निघाली नाही. त्यामुळे 10 ऑक्टोबर 1974 रोजी वयाच्या 58 व्या वर्षी तिचं निधन झालं.
चारित्र्यावर प्रश्नचिन्ह
इतिहासात ल्यूडमिलाच्या चारित्र्यावर अनेक प्रश्नचिन्हं उमटवण्यात आली आहे. ल्यूबा विनोग्राडोव्हा यांनी 'अव्हेन्जिंग एन्जल्स' या पुस्तकामध्ये असे काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
सर्वाधिक नाझी सैनिक टिपण्याचं श्रेय ल्यूडमिला पवलिचेन्कोला देण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत ल्यूबा लिहितात, "तिने शत्रुसैन्यातील 187 जणांचा बळी घेतला, पण तिला ओडेसामध्ये एकही पदक मिळालं नाही, ही विचित्रच गोष्ट आहे."
"शत्रुसैन्यातील 10 जणांना मारलं किंवा जखमी केलं, तरी नेमबाजांना एक पदक सन्मानार्थ दिलं जातं, आणि दर 20 बळींनंतर ऑर्डर ऑफ रेड स्टार हा किताब दिला जातो, तर तिला असं काही का मिळालं नाही."
ल्यूडमिलाच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या, असं म्हटलं जात असलं, तरी छायाचित्रांमध्ये तिच्या चेहऱ्यावर काही व्रण दिसत नाहीत, असंही काहींनी म्हटलं आहे.
वॉशिंग्टन दौऱ्यावर ल्यूडमिला पवलिचेन्कोसोबत व्लादिमीर पचेलिनत्सेवसुद्धआ होते.
दोन वैमानिक किंवा रणगाडा चालवणारे दोन कमांडर यांच्याऐवजी दोन महत्त्वाच्या नेमबाजांना अमेरिकेला पाठवण्यात आलं, कारण स्वतःच्या कामगिरीबद्दल सांगण्यासारखं त्यांच्याकडे बरंच काही होतं. जर्मनांना तिची भीती वाटत होती आणि सोव्हिएत संघातील वृत्तपत्रं तिला लोकप्रिय करण्यासाठी सतत प्रयत्नशील होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)