You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आर्य भारताचे मूळ निवासी नाहीत, ते स्थलांतरित'
- Author, टोनी जोसेफ
- Role, लेखक
आर्य मूळचे भारतीय होते की बाहेरून आले या प्रश्नावर गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा चर्चा, वाद-विवाद झाले आहेत. उजव्या विचारधारेच्या अनेक हिंदुत्ववादी संघटना आर्य हे बाहेरून आले नाहीत, ते मूळचे भारतीयच होते असा दावा करतात.
काही जण तर हडप्पा संस्कृती ही आर्य किंवा वैदिक संस्कृती असल्याचंही म्हणतात. या दाव्यांमधलं नेमकं तथ्य काय आहे हे शोधणं आता सोपं होणार आहे. नवीन संशोधनानुसार प्राचीन DNAचा अभ्यास करून भारतातील प्रागैतिहासिक कालखंडाचं पुनर्लेखन करण्यात आलं आहे. प्राचीन भारतीय संस्कृती ही एका विशिष्ट समुदायामुळं नाही तर वेगवेगळ्या स्थलांतरितांमुळं विकसित होत गेली आहे.
भारतीय संस्कृती ही स्वतःला आर्य म्हणवून घेणाऱ्या लोकांपासून विकसित झाली असं हिंदू उजवे अभ्यासक मानतात. आर्य हे मुळात भटके होते. घोडेस्वारी, पशुपालन करणारे आर्य कुशल योद्धेही होते. हिंदू धर्माचे सर्वांत प्राचीन धार्मिक ग्रंथ अर्थात वेदांची रचना ही आर्यांनीच केल्याचं मानलं जातं. आर्य हे मूळचे भारतीयच होते आणि भारतातूनच ते आशिया तसंच युरोपच्या अन्य भागात पसरले, असा युक्तिवादही हिंदुत्त्ववादी करतात.
इंडो-युरोपियन भाषासमूह, ज्यांतील भाषा आजही भारत आणि युरोपमधले लोक बोलतात, त्यांचा विकास आर्यांमुळेच झाल्याचं मानलं जातं.
19व्या शतकातील युरोपियन अभ्यासकांनीही आर्य हा एकमेव शुद्ध वंश असल्याचं मानलं होतं. अडॉल्फ हिटलरचं आर्यांच्या वांशिक शुद्धतेबद्दलचं मतही सर्वांना परिचित आहे. युरोप जिंकणाऱ्या आर्यांचे आपण वंशज आहोत, असं हिटलर अभिमानानं सांगायचा.
आर्य ही संकल्पना भाषिक
अभ्यासक जेव्हा 'आर्य' ही संज्ञा वापरतात, तेव्हा त्यांना 'इंडो-युरोपियन' भाषा बोलणारा समुदाय अपेक्षित असतो. मीदेखील या लेखात 'आर्य' हा शब्द त्याच संदर्भानं वापरला आहे. हिटलर किंवा उजव्या कट्टरपंथी विचारवंतांप्रमाणे आर्यांचा उल्लेख वांशिक संदर्भाने केलेला नाही.
अनेक भारतीय विद्वान आर्य हे भारताबाहेरून आले होते, या सिद्धान्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आर्य किंवा इंडो-युरोपियन भाषा बोलणाऱ्या समुदायांपैकी एक समूह भारतातील एका संस्कृतीचा अस्त होत असतानाच्या कालखंडात इथे आला. ही लोप पावणारी संस्कृती म्हणजेच हडप्पा किंवा सिंधू संस्कृती. ज्यावेळी जगाच्या अन्य भागात इजिप्शियन आणि मेसोपोटेमियन संस्कृती अस्तित्त्वात होत्या, त्याच काळात भारताच्या वायव्य भागात (जो आता पाकिस्तानात आहे) हडप्पा संस्कृती अस्तित्त्वात होती. मात्र हिंदू उजवे विचारवंत हे हडप्पन संस्कृती आर्य किंवा वैदिक संस्कृतीचाच एक भाग असल्याचं मानतात.
हडप्पन आणि वैदिक संस्कृती भिन्न
या दोन पूर्णपणे विरुद्ध असलेल्या सिद्धांताचे समर्थन करणाऱ्या गटांमधील मतभेद गेल्या काही वर्षांत अधिक तीव्र झाले आहेत. विशेषतः 2014 मध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर हे मतभेद अजूनच वाढले.
या दोन प्रदीर्घ काळ चाललेल्या वादावर आता लोकसंख्या आनुवांशिकीशास्त्रामुळे पडदा पडू शकतो. प्राचीन DNA वापरून कोणता समुदाय केव्हा आणि कुठे स्थलांतरित झाला हे पडताळून पाहणं लोकसंख्या आनुवांशिकीमुळे शक्य होऊ शकते.
प्राचीन DNAचा अभ्यास करून प्रागैतिहासिक कालखंडाचं पुनर्लेखन करण्याचा प्रयोग गेल्या काही वर्षांपासून जगभर सुरू आहे. भारतात तर या अभ्यासातून जे निष्कर्ष समोर येत आहेत, ते खूपच लक्षवेधी आहेत.
युरेशियाच्या गवताळ प्रदेशातून आले आर्य
हार्वर्ड विद्यापीठातील आनुवांशिकीतज्ज्ञ डेव्हिड राईश यांनी यासंदर्भात केलेलं संशोधन मार्च 2018मध्ये प्रसिद्ध झालं. राईश यांना या संशोधनामध्ये जगभरातील 92 अभ्यासकांनी सहाय्य केलं होतं. यांपैकी अनेक जण हे इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र तसेच आनुवांशिकीशास्त्रामधील नावाजलेले आहेत. The Genomic Formation of South and Central Asia असं डेव्हिड राईश यांच्या शोधनिबंधाचं नाव आहे. त्यातील अनेक निष्कर्ष हे अतिशय महत्त्वाचे असे आहेत.
राईश यांच्या संशोधनानुसार गेल्या 10 हजार वर्षांत भारतामध्ये दोन प्रमुख मोठी स्थलांतरं झाली, असं दिसून येतं. यातील एक स्थलांतर हे इराणच्या नैऋत्येकडील झागरोस भागातून झाले होते. इथून आलेले स्थलांतरित हे शेती करणारे, पशुपालक होते. हे स्थलांतर इसवी सन पूर्व 7 हजार ते 3 हजार या कालखंडात झालं. या उपखंडात आधीपासून असलेले स्थानिक हे आफ्रिकेतील लोकांचे वंशज होते. त्यांना Out of Africa म्हटलं जातं. हे लोक 65 हजार वर्षांपूर्वी भारतात आले. या दोन्ही समुहांनी मिळून हडप्पा संस्कृतीचा विकास केला.
दुसरं सर्वांत मोठं स्थलांतर हे इसवी सन पूर्व 2 हजारच्या सुमारास झालं. सध्या कझाकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युरेशियाच्या गवताळ प्रदेशातून आर्यांचं भारतात आगमन झालं. संस्कृत भाषाही आर्यांसोबतच भारतात आली. घोड्यांचा वापर, कृषी तंत्रज्ञान, पशुपालनही आर्यांनीच भारतात आणलं. हिंदू किंवा वेदिक संस्कृतीचा अविभाज्य भाग समजला जाणारा यज्ञही आर्यांसोबतच भारतात आला.
आनुवांशिकीशास्त्राच्या अभ्यासातून भारतामध्ये जी अन्य स्थलांतरं झाली, त्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. ऑस्ट्रो-आशियाई समुदायतील भाषा बोलणारे लोक आग्नेय आशियातून भारतात आले.
भारतीय संस्कृती पिझ्झासारखी
या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जेव्हा मी माझं पुस्तक लिहिलं, तेव्हा भारतीय लोकसंख्या ही पिझ्झाप्रमाणे असल्याची कल्पना केली. इथे सर्वांत पहिल्यांदा आलेले लोक हे या पिझ्झाचा बेस मानता येतील. अर्थात, या पिझ्झाचा बेस एकसारखा नाही. काही ठिकाणी तो पातळ आहे, तर काही ठिकाणी जाड. मात्र हा पाया पक्का आहे. कारण अभ्यासातून असं दिसून आलंय की पहिल्यांदा भारतात आलेल्या लोकांच्या आनुवंशिक गुणधर्मांपैकी 50 ते 60 टक्के गुणधर्म हे भारतीयांमध्ये आजही आढळून येतात.
या मजबूत पायावर पसरलेला सॉस म्हणून आपण हडप्पन संस्कृतीकडे पाहू शकतो.
त्यानंतर नंबर येतो पिझ्झावरच्या टॉपिंग्ज आणि चीजचा. ऑस्ट्रो-एशियाटिक, तिबेटो-बर्मन आणि इंडो-युरोपियन भाषा बोलणारे किंवा आर्य यांना आपण या टॉपिंग्ज आणि चीजचा दर्जा नक्कीच देऊ शकतो.
उजव्या विचारवंताचा विरोध
अनेक कट्टर उजव्या विचारवंतांना हे निष्कर्ष फारसे पटणारे नाहीत. हे लोक शाळांमधील अभ्यासक्रम बदलण्याच्या, आर्य हे भारतात बाहेरून आले होते हा सिद्धांत खोडून काढण्याच्या मागे लागले आहेत. प्रचंड लोकप्रिय असलेली उजव्या विचारधारेची इतिहासविषयक काही ट्वीटर हँडल आहेत. आर्य बाहेरून भारतात आले होते या सिद्धांताला दुजोरा देणाऱ्या अनेक नामवंत इतिहासकारांचा या हँडलवरून समाचार घेतला जातो.
आर्य हे मूळ भारतीय निवासी नव्हते आणि त्यांच्या भारतात येण्याच्या खूप आधीपासून इथे हडप्पा संस्कृती नांदत होती, हे मान्य करणं हिंदू राष्ट्रवाद्यांना परवडणारेही नाही. कारण हे मान्य केलं तर भारतीय संस्कृतीचा पाया केवळ आर्य किंवा वैदिक संस्कृती नाही तर ती संमिश्र संस्कृतीमधून विकसित झाल्याचंही मान्य करावं लागेल.
भारताचे तत्कालीन मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं, "केवळ वैदिक शिक्षणानेच आपल्या मुलांचा नीट विकास होईल. वैदिक शिक्षण मुलांना मानसिकदृष्ट्या सक्षम करून या त्यांच्यामध्ये देशभक्ती रुजवायला मदत करेल."
वांशिक शुद्धतेवर भर असल्यामुळे वेगवेगळ्या वंशाच्या सरमिसळीतून बनलेली संस्कृती हिंदू राष्ट्रवादी गटांच्या पचनी पडणार नाहीच कारण वाशिंक शुद्धता हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. आर्य बाहेरून भारतात आले होते, हे मान्य करणं म्हणजे त्यांना भारतात बाहेरूनच आलेल्या मुघलांच्या रांगेत बसवण्यासारखं आहे.
शालेय अभ्यासक्रम बदलण्याचा प्रयत्न
या सर्व सैद्धांतिक, जर-तरच्या चर्चा आहेत असं तुम्हाला वाटेल. पण हरियाणामधील भाजप शासित सरकारनं 'हडप्पन संस्कृती'चं नाव बदलून 'सरस्वती संस्कृती' असं करण्याची मागणी केली होती. सरस्वती ही वेदांमध्ये नमूद केलेली आणि हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची नदी आहे. या नामांतरामुळे हिंदू संस्कृती आणि आर्य यांच्यामधील संबंध प्रस्थापित करणं सोपं होऊन जाईल, हा त्यामागचा विचार आहे.
प्राचीन DNA संबंधीच्या नवीन संशोधनामुळं या सर्व चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. मात्र हे संशोधन करणाऱ्या प्राध्यापक राईश यांच्यावर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली आहे. "हे सर्व खोटं आहे...धादांत खोटं आणि (हार्वर्ड यांच्या 'थर्ड राईश आणि कंपनी'चं) अंकगणित आहे."
स्वामींनी कितीही टीका केली, तरी या नवीन संशोधनाचा निष्कर्ष भारतीयांसाठी आशादायी आणि कौतुकास्पद आहेत. वेगवेगळ्या ऐतिहासिक आणि आनुवंशिक वारशाने मिळून भारतीय संस्कृती घडवली आहे. या संस्कृतीचा गाभाच मुळात सर्वसमावेशकता हा आहे. त्यामुळंच विविधतेत एकता हा केवळ भारतीयांच्या संस्कृतीचाच नाही तर आनुवंशिकतेचाही गुणधर्म आहे.
(टोनी जोसेफ हे Early Indians: The Story of Our Ancestors and Where We Came From या पुस्तकाचे लेखक आहेत. Juggernaut या संस्थेने या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)