You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिटलरच्या 'शुद्ध आर्य' कल्पनेसाठी मुलं जन्माला घालणाऱ्या तरुणी कोण होत्या?
अॅडॉल्फ हिटलरचा जन्म 20 एप्रिल 1889 रोजी झाला आणि 30 एप्रिल 1945 रोजी तो मरण पावला. तो 1934 साली जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष झाला आणि त्याला 'फ्यूरर' असं संबोधलं जाऊ लागलं.
दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीला हिटलरच्या नाझी सैन्याचा स्टॅलिनच्या रेड आर्मीने जर्मनीची राजधानी बर्लिन इथे पराभव केला. रशियन सैनिक येण्याआधीच हिटलरने व त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याचा इतिहास आपण वाचला असेल.
पहिल्या महायुद्धादरम्यान कमी झालेली जर्मन लोकसंख्या नव्याने वाढवण्याची कृतियोजना नाझींनी अंमलात आणली. यातील अनेक महिलांनी त्यांच्या देशासाठी गरोदर राहून मुलं जन्माला घालायला स्वेच्छेने पुढाकार घेतला. हा इतिहास आपल्या फारसा वाचनात आलेला नसेल. या लेखात आपण अशा इतिहासाचा वेध घेणार आहोत.
नाझी समर्थक व पदवीधर हिल्डगार्ड ट्राऊट या महिलेला 1936 साली वांशिकदृष्ट्या 'शुद्ध' जर्मन स्त्रियांपैकी एक म्हणून या कार्यक्रमात समाविष्ट करून घेण्यात आलं. 'शूट्स स्टेपल्स' (S.S) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस.एस. अधिकाऱ्यांशी संबंध ठेवून आर्य मूल जन्माला घालण्याचे प्रयत्न करणं ही नाझी सत्तेची सेवा आहे असं या महिला मानत.
काळ्या गणवेशांमधील हे एस.एस. अधिकारी हिटलरच्या शरीररक्षकांची मुख्य ढाल होते. या दलाची धुरा हिमलरकडे होती. तो हिटलरच्या सावलीसारखा वावरत असे आणि हिटलरच्या निर्णयांची अंमलबजावणीही त्याच्या मार्फत होत असे.
लेबेन्सबोर्न (Lebensborn) हा स्त्रियांनी स्वेच्छेने मूल जन्माला घालण्याचा कार्यक्रम होता. 'जीवनाचा झरा' असा त्याचा अर्थ होतो. त्या वेळी खालावलेला जर्मनांचा जन्मदर वाढवणं आणि नाझीसदृश दलाचं वर्गीकरण पवित्र वंश म्हणून करणं, या उद्देशाने हा कार्यक्रम राबवण्यात आला होता.
हिटलरच्या बारा वर्षांच्या (1933-45) सत्ताकाळात प्राचीन रोमन वंशाचे व जर्मन साम्राज्याचे आपण वारसदार आहोत असा दावा केला गेला. या कालावधीत 'लेबेन्सबोर्न' या कार्यक्रमांतर्गत विशेषतः जर्मनी व नॉर्वे इथे सुमारे 20 हजार मुलं जन्माला घालण्यात आली. या योजनेनुसार एस.एस.मधील व सैन्यातील मंडळींना किमान चार मुलं असणं अनिवार्य करण्यात आलं.
हे मूल हिमलरने सांगितल्या प्रमाणे आर्य चारित्र्याच्या स्त्रीकडून जन्मलेलं असायला हवं. पण या योजनेतून त्याला अपेक्षित होता तसा परिणाम झाला नाही.
हिटलरची भुरळ पडलेल्या स्त्रिया
स्वेच्छेने मुलांना जन्म देणाऱ्या एका तरुणीच्या जीवनावर याच कालखंडात ब्रिटिश लेखक गाइल्स मिल्टन यांनी एक पुस्तक लिहिलं. या मुलीचं नाव होतं 'हिल्डगार्ड ट्रट'. ट्रट ही हिटलरच्या नाझी पक्षाने मान्यता दिलेल्य तरुणांच्या संघटनेच्या एकमेव महिला शाखेची सदस्य होती. जर्मनमध्ये या शाखेचं नाव 'Bund Deutscher Model' असं होतं.
मिल्टन यांनी त्यांच्या पुस्तकात ट्रटचे अनुभव मांडले असून अनेक तरुण जर्मन मुली हिटलरच्या या योजनेसाठी गरोदर राहायला का तयार झाल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
हिल्टगार्ड ट्रट हिटलरच्या नेतृत्वाची कट्टर समर्थक होती. ती नाझी पक्षाशी संलग्न युवा संघटनेत 1933 साली दाखल झाली आणि त्यांच्या साप्ताहिक बैठकांना उपस्थित राहू लागली.
"हिटलरवर आणि आमच्या थोर नव्या जर्मनीवर माझी प्रचंड श्रद्धा होती. या संघटनेत दाखल झाल्यानंतर आम्ही तरुण-तरुणी जर्मनीसाठी किती मूल्यवान आहोत हे मला कळलं," असं हिल्डगार्ड म्हणाली. लवकरच ती स्थानिक संघटनेची मुख्य नेती झाली.
"पिंगट केस आणि निळे डोळे, अशी खास जर्मन वैशिष्ट्यं असणारी मी नॉर्डिक स्त्रीचा आदर्श नमुना आहे, असं नेत्यांनी सांगितलं. लांब पाय, लांब धड, रुंद पार्श्वभाग यामुळे मला मूल जन्माला घालण्यासाठी योग्य ठरवण्यात आलं," असं ट्रट म्हणाली.
शाळा संपली तेव्हा 1936 साली ट्रट 18 वर्षांची होती. पुढे काय करायचं याबद्दल तिचं निश्चित काही ठरलं नव्हतं. तेव्हा नाझींच्या युवा संघटनेच्या नेत्याने तिला दिलेला सल्ला तिचं आयुष्य बदलून टाकणारा ठरला. "आयुष्यात काय करायचं हे तुझ्या लक्षात येत नसेल, तर फ्यूररसाठी मुलं का जन्माला घालत नाहीस? सध्या जर्मनीला वंशवृद्धीची सर्वाधिक गरज आहे," असं तो नेता म्हणाला.
तोवर ट्रटला सरकारच्या लेबेन्सबोर्न कार्यक्रमाबद्दल काहीच माहिती नव्हती. पिंगट केसांच्या, निळ्या डोळ्यांच्या 'आर्य' मुलांचा जन्मदर कुमारिकांच्या प्रजननाद्वारे वाढवणं, हा यामागचा उद्देश होता. आपण नाझी अधिकाऱ्यांसोबत झोपलो, आणि गरोदर राहिलो, तर त्यातून आर्य मुलं जन्माला येतील, अशी युवा संघटनेतील महिला नेत्यांची धारणा होती.
या कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी काही वैद्यकीय चाचण्या गरजेच्या होत्या. या चाचण्यांद्वारे संबंधित तरुणीचा वंश निश्चित केला जात असे. ज्यू लोकांचं रक्त यात मिसळू नये, याची खातरजमा करण्यासाठी या चाचण्या केल्या जात. प्रयोग करून झाल्यावर संबंधित स्वयंसेविका जोडीदार निवडण्याच्या टप्प्यावर येत असे.
कुमारवयीन ट्रटला हिटलरच्या मुलं जन्माला घालण्याच्या योजनेची भुरळ पडली होती. तिने तात्काळ या प्रकल्पासाठीच्या कागदपत्रांवर सह्या केल्या. अशा प्रकारच्या योजनेला आपले पालक संमती देणार नाहीत त्यामुळे वर्षभरासाठी नाझी प्रशिक्षण संस्थेत जाण्याची इच्छा तिने व्यक्त केली.
बव्हेरियातील किल्ल्यावरच्या सुखसोयी
युवा महिला संघटनेच्या नेतृत्वाने केलेल्या शिफारसीनुसार ट्रट्सला नाझी अधिकाऱ्यांनी बव्हेरियाला नेलं. तिथे एका मोठ्या किल्ल्यामध्ये तिच्यासारख्या आणख 40 तरुणी होत्या. प्रत्येकीने स्वतःचं खरं नाव लपवलं होतं आणि एक टोपणनाव घेतलं होतं. आपण आपल्या आजोबांज्या बाजूने तरी किमान आर्य आहोत हे सिद्ध करण्यासाठी या मुलींना इथे आणण्यात आलं.
या किल्ल्यात सुखसोयींची चंगळ होती. तिथल्या खोल्या मोठ्या होत्या आणि खेळांसाठी मोठे हॉल होते. एक ग्रंथालय होतं, संगीतासाठीची खोली होती आणि एक थिएटरसुद्धा होतं. इथे मिळणाऱ्या अन्नासारखी चव ट्रट्सने आयुष्यात कधीही चाखली नव्हती.
या मुलींच्या दिमतीला अगणित कर्मचारी होते, त्यामुळे काम करण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे आपण आळशी झालो आणि चंगळीच्या जीवनाची सवय झाली, असं ट्रट्ने सांगितलं.
या किल्ल्याचं नियंत्रण एस.एस. दलाच्या एका डॉक्टरकडे होतं. "आम्ही किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर लगेचच डॉक्टरने प्रत्येकीची काटेकोरपणे तपासणी केली. आम्हाला कोणताही अनुवंशिक आजार नाही, दारूचं व्यसन नाही आणि कौटुंबिक बंधनं नाहीत, असं जाहीर करणाऱ्या एका कागदपत्रावर आम्हाला स्वेच्छेने सही करायला सांगण्यात आलं," असं ट्रट म्हणाली.
आपण जन्म दिलेल्या कोणत्याही अपत्याचं पालकत्व मागणार नाही,ही मुलं देशाची मालमत्ता समजली जातील, ते नाझीविचाराचे निष्ठावान व्हावेत यासाठी त्यांना विशेष नाझी शिक्षणसंस्थांमध्ये प्रशिक्षण दिलं जाईल, असंही त्यांच्याकडून लिहून घेण्यात आलं.
साप्ताहिक जोडीदार निवडण्याची संधी
ट्रट व इतर महिलांनी या नियमांना सहमती दर्शवली. कराराच्या कागदपत्रांवर सह्या झाल्यानंतर संबंधित महिलांना आपापला जोडीदार निवडण्याची संधी देण्यात आली. तिथे उपलब्ध असलेले तरुण उंच व निळ्या डोळ्यांचे होते. खेळून, एकत्र चित्रपट पाहून किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकमेकांशी बोलून संवाद साधण्याचीही संधी त्यांना मिळाली.
"प्रत्येक तरुणीला जोडीदार निवडण्यासाठी एक आठवडा देण्यात आला," असं ट्रटने सांगितलं. जोडीदार निवडताना आपल्या केसांचा व डोळ्यांचा रंग सारखा असेल याची खातरजमा करावी, असाही सल्ला तरुणींना देण्यात आला. यात सहभागी झालेल्या पुरुष अधिकाऱ्यांची नावं तरुणींना सांगण्यात आली नव्हती.
"मासिक चक्राच्या दहाव्या दिवशी जोडीदारासोबत झोपायची वेळ आली. त्याआधी आमची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर आम्हाला आम्ही निवडलेल्या पुरुष जोडीदारासोबत वेगळ्या खोलीत रात्र घालवण्याची परवानगी देण्यात आली."
"ही एक लैंगिक कृती होती, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे फ्यूररसाठी मी हे करत होते याचा मला जास्त अभिमान वाटत होता. या संबंधांमध्ये सहभागी झालेली मी आणि माझा जोडीदार, आम्हा दोघांनाही परस्परांचे हेतू माहीत होते. हे जरा वेडगळपणाचं वाटेल, पण मला माझ्या जोडीदाराचीही थोडी भुरळ पडली होतीच," असं ट्रट म्हणाली.
मुलं आईपासून वेगळी काढणं
ट्रटने ज्या एस.एस. अधिकाऱ्यासोबत तीन रात्री एकत्र घालवल्या, त्याला पुढील तीन रात्री दुसऱ्या स्त्रीसोबत झोपायला सांगण्यात आलं.
काही आठवड्यांनी आपण गरोदर राहिल्याचं ट्रटच्या लक्षात आलं. यासंबंधी चाचण्या करण्यात आल्यावर तिला किल्ल्यावरून मॅटर्निटी होममध्ये नेण्यात आलं.
आपल्याला इतक्या लवकर किल्ल्यातून बाहेर पडावं लागेल असं ट्रटला वाटलं नव्हतं. मूल जन्माला घालण्याची वेळ जवळ आली.
ट्रट्ने मुलाला जन्म दिला. अंगावरचं दूध पाजण्यासाठी दोन आठवडे मूल तिच्याचपाशी होतं. मग मात्र बाळाला आईपासून वेगळं करण्यात आलं आणि विशेष संगोपनासाठी एस.एस.च्या संस्थेत दाखल करण्यात आलं. तो मुलगा नाझींसाठी निष्ठावान लढवय्या म्हणून वाढवला गेला असता.
ट्रट ज्या एस.एस. अधिकाऱ्यासोबत झोपली, तो अधिकारी ट्रट्सला पुन्हा कधीच भेटला नाही. तो बहुधा त्यांच्या मुलालाही कधीच भेटला नसावा.
ट्रट घरी परतल्यावर तिने राष्ट्रसेवेसाठी आणखी मुलं जन्माला घालावीत अशी इच्छा नाझी युवा संघटनेच्या नेत्याने व्यक्त केली. पण लवकरच ट्रट्सने दुसऱ्या एका तरूण अधिकाऱ्याच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न केलं.
फ्यूररसाठी मूल जन्माला घालण्याच्या कार्यक्रमातील सहभागाविषयी तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं. त्याने आपल्या पत्नीवर उघड टीका केली नाही, पण तिच्या गतकाळातील ही घटना कळल्यावर तो नाराज झाला.
परंतु, आपण फ्यूरर प्रति असलेलं कर्तव्य पार पाडत होतो, असं ट्रटला वाटतं.
त्या प्रकल्पांतर्गत जन्म दिलेल्या मुलाचं काय झालं, हे ट्रट्सला माहीत नाही. लेबेन्सबोर्न प्रकल्पातील अनेक मुलांप्रमाणे तो मुलगाही मोठा होऊन युद्धावर गेला असेल.
हिटलरचा एक सेनापती हिमलर याला असा विश्वास होता की, लेबेन्सबोर्न प्रकल्पांतर्गत किमान 20 कोटी मुलांना जन्म घालून संपूर्ण जग आपल्या नियंत्रणाखाली आणता येईल.
पण ही योजना अंमलात आणण्यासाठी केवळ जर्मनीत राहणाऱ्या स्त्रियांनी स्वयंसेवेने त्यात सहभागी होऊन पुरणार नव्हतं. त्यामुळे नाझी फौजा जगाच्या इतर भागातील आर्य वंशाची वैशिष्ट्यं असणाऱ्या महिलांचं अपहरण करून त्यांना जर्मनीत घेऊन येत. दुसऱ्या महायुद्धामुळे जर्मनी सोडून युरोपात
इतरत्र राहणाऱ्या स्त्रियांना ते खासकरून शोधून काढत होते. हिटलरच्या बारा वर्षांच्या सत्ताकाळात या प्रकल्पांतर्गत सुमारे 20 हजार मुलांचा जन्म झाला असावा, असं अनुमान आहे.
युद्धानंतर यातील अनेक मुलांना दत्तक घेण्यात आलं. त्यांच्या जन्मनोंदी नष्ट करण्यात आल्या. या मुलांकडे मोठ्या प्रमाणात सामाजिक दुर्लक्ष झालं. यातील काहींनी कालांतराने स्वतःवरील अन्यायाविरोधात न्यायालयात दाद मागितली. त्यातील बहुतेकांच्या जन्माचं रहस्य इतिहासाच्या पानांमध्ये लुप्त झालं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)