You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जेव्हा हिटलरचे नाझी हिमालयात आर्यांचं मूळ शोधायला आले होते…
जर्मनीतील नाझी पक्षाचे प्रमुख सदस्य हेनरिक हिमलर यांनी 1938 मध्ये आर्य वंशाचं मूळ शोधण्यासाठी पाच सदस्यांचं एक पथक तिबेटला पाठवलं होतं.
लेखक वैभव पुरंदरे यांनी या संपूर्ण घटनेच्या रंजक कथेचं वर्णन केलं आहे. या मोहीमेत भारताचाही यात मोठ्या प्रमाणावर उल्लेख आहे.
दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या अगदी काही दिवसांपूर्वी जर्मन नागरिकांचा एक गट अत्यंत गोपनीय पद्धतीनं भारताच्या पूर्वेच्या सीमेवर दाखल झाला.
'आर्य वंशाचे मूळ' शोधण्याच्या मोहिमेवर ते सर्वजण होते.
हिटलरची आर्यांबद्दलची मतं काय होती?
'आर्य' म्हणजे उत्तर जर्मनीतील (नॉर्डिक) लोकांनी सुमारे 1500 वर्षांपूर्वी भारतात प्रवेश केला होता, असं अॅडॉल्फ हिटलरला वाटत होतं. तसंच त्यांनी मूळचे आर्य नसलेल्या स्थानिक लोकांमध्ये मिसळत गुन्हा केला होता आणि त्यामुळं पृथ्वीवरील सर्व मानवांमध्ये श्रेष्ठ असल्याचं स्थान त्यांनी गमावलं होतं, असंही हिटलरचं मत होतं.
हिटलरनं वारंवार भारतीय नागरिक आणि स्वातंत्र्यासाठीच्या भारतीयांच्या संघर्षाप्रती तिरस्कार व्यक्त केला आहे. हिटलरच्या या भावना वारंवार त्याच्या भाषणांतून, लिखाणातून किंवा चर्चांमधून समोर आल्या आहेत.
असं असलं तरीही भारतीय उपखंडाचा जवळून अभ्यास करणं गरजेचं आहे, असं हिटलच्या प्रमुख लेफ्टनंटपैकी एक आणि त्याच्या SS (Schutzstaffel) या संघटनेचे प्रमुख हिमलर यांना वाटत होतं.
या विचारातूनच तिबेटचा या संपूर्ण विषयात समावेश झाला.
श्वेतवर्णीय नॉर्डिक वंशाचे लोक हे जगात सर्वात श्रेष्ठ असल्याचं मानणाऱ्यांचा अटलांटिस या विलुप्त झालेल्या काल्पनिक शहराच्या परिकथेवर विश्वास होता. याठिकाणी एकेकाळी सर्वात शुद्ध रक्त असलेले लोक राहत होते, अशा अख्यायिका होत्या. अटलांटिक महागासागरात इंग्लंड आणि पोर्तुगालच्या मध्ये कुठंतरी हे वसलेलं होतं आणि दैवी प्रकोपामुळं ते पूर्णपणे बुडालं होतं, असंही म्हटलं जातं.
यातून बचावलेले सर्व आर्य सुरक्षित ठिकाणी स्थायिक झाले होते. हिमालयातील प्रदेश हे या निर्वासितांचं स्थान होतं, असं समजलं जातं. त्यातही तिबेटला 'जगाचं छत' असं म्हटलं जातं, त्यामुळं ते तिबेटमध्ये होते असं समजलं जातं.
हिमलरने 1935 मध्ये त्यांच्या SS या लष्करामध्ये एक तुकडी तयार केली. अहनर्बे (Ahnenerbe)किंवा वारसा शोधणारं पथक असं या तुकडीला म्हटलं जात होतं. निळ्या सागराच्या प्रलयाच्या घटनेनंतर अटलांटिस येथील लोक नेमके कुठं गेले आणि अजूनही त्या वंशाचे काही पुरावे कुठं आढळतात का? या शोध घेण्याचा प्रयत्न हे पथक करणार होतं.
कोण होते या पथकातले सदस्य?
या शोध मोहिमेसाठी त्यांनी 1938 मध्ये 5 जर्मन सदस्यांचं एक पथक तिबेटला पाठवलं.
त्या पाच सदस्यांपैकी दोन जण हे इतरांपेक्षा खास आणि वेगळे होते. त्यापैकी एक म्हणजे अर्न्स शाफर. शाफर 28 वर्षीय प्रतिभावान प्राणीशास्त्रज्ञ होते. भारत-चीन-तिबेट सीमेवर त्याआधी ते दोन वेळा गेले होते. तिबेटच्या मोहिमेत हिमलर त्यांचे संरक्षक बनले त्याच्या खूप पूर्वी म्हणजे नाझींनी 1933 मध्ये विजय मिळवल्यानंतर लगेचच शाफर हे SS लष्करात सहभागी झाले होते.
शाफर यांना शिकारीचं वेड होतं. बर्लिन येथील घरात चषक (ट्रॉफी) गोळा करणंही त्यांना आवडायचं. अशाच एका शिकारीच्या मोहिमेवर असताना शाफर त्याच्या पत्नीसह एका बोटवर होते. बोटमधून त्यांनी एका बदकावर निशाणा लावला होता. पण गोळी झाडताना ते घसरले आणि अपघातानं त्यांची गोळी पत्नीच्या डोक्यात लागली आणि त्यांचा मृत्यू झाला.
या पथकातील दुसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे ब्रुनो बेगर हे तरुण मानववंश शास्त्रज्ञ होते. 1935 मध्ये SS लष्करात ते सहभागी झाले होते. बेगर तिबेटमधील नागरिकांच्या कवटी आणि चेहऱ्याचे तपशील, मापे घेऊन आणि त्यावरून फेस मास्क किंवा साचे तयार करत होते.
"विशेषतः या प्रदेशातील नॉर्डिक वंशाचा उगम, त्याचे महत्त्व, प्रमाण आणि या वंशाचा विकास याबाबत त्यांना माहिती गोळा करायची होती."
पथकातील या 5 जर्मन नागरिकांना घेऊन निघालेलं जहाज मे 1938 मध्ये श्रीलंकेतील कोलंबो याठिकाणी थांबलं होतं. त्याठिकाणाहून दुसऱ्या जहाजानं ते मद्रास (सध्याचे चेन्नई) पर्यंत आले आणि नंतर तिसऱ्या जहाजानं कलकत्ता (सध्याचे कोलकाता) पर्यंत गेले होते.
त्यावेळी भारतातील ब्रिटिश अधिकारी हे या सर्वांना हेर समजत होते. त्यामुळं त्यांच्यापासून ते सावध होते. सुरुवातील त्यांनी या पाच जणांना भारतातून प्रवासाला परवानगीही नाकारली होती. त्यावेळी ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या टाईम्स ऑफ इंडियानं "A Gestapo Agent in India" अशा मथळ्याचं वृत्तही छापलं होतं.
भारताच्या ईशान्येला असलेल्या सिक्कीममधील गंगटोक येथील तत्कालीन ब्रिटिश पॉलिटिकल ऑफिसरदेखील या पथकाला सिक्कीममारर्गे तिबेटला जाऊ देण्यास तयार नव्हते. सिक्कीम हे त्यावेळी स्वतंत्र संस्थान होतं.
पण अखेर नाझींचा विजय झाला आणि 1938 या वर्षाच्या अखेरीस पाच जर्मन नागरिकांचं हे पथक स्वास्तिकाचं चिन्हं असलेले झेंडे लावलेल्या सामानासह तिबेटमध्ये दाखल झालं.
स्वास्तिक हे तिबेटमध्येही सगळीकडं वापरलं जाणारं चिन्हं होतं. स्थानिक भाषेत त्याला "यंगड्रंग" म्हटलं जात होतं. शाफर आणि त्यांच्या पथकातील सदस्यांना भारतात असतानाही अनेक ठिकाणी विशेषतः हिंदु भागात हे चिन्हं दिसलं होतं. भारतात दीर्घकाळापासून त्याला मांगल्याचं प्रतिक मानलं जातं. आजही भारतात घरांबाहेर, मंदिरांमध्ये, रस्त्यांच्या कोपऱ्यांना, वाहनांच्या मागे हे चिन्हं आढळतं.
दरम्यानच्या काळात तिबेटमध्ये अनेक बदल होत होते.
1933 मध्ये 13 व्या दलाई लामांचं निधन झालं. नवे दलाई लामा अवघ्या तीन वर्षांचे होते. त्यामुळं राज्यपालांच्या मार्फत तिबेटचा राज्यकारभार चालवला जात होता. या प्रशासनाकडून आणि तिबेटच्या नागरिकांकडूनही जर्मनीच्या पथकाला अत्यंत चांगली वागणूक मिळाली. फेस मास्क तयार करणाऱ्या बेगर यांनी तर याठिकाणी काही काळासाठी डॉक्टर म्हणूनही काम केलं.
मात्र, नाझींची बौद्ध धर्माबाबतची विकृत कल्पना तिबेटमझील बुद्धिस्ट नागरिकांना माहिती नव्हती. हिंदू धर्माप्रमाणेच बौद्ध धर्मामुळंच तिबेटला आलेले आर्य लोक दुर्बल झाले आणि त्यामुळं त्यांनी शक्ती आणि प्राण गमावले असं नाझींचं मत होतं.
का गुंडाळली ही मोहीम?
शाफर आणि इतरांना प्राणीशास्त्र आणि मानववंश शास्त्र याच्या माध्यमातून हवं ते संशोधन करण्यासाठी आणखी जास्त काळ लागू शकतो हे लक्षात आल्यानंतर जर्मनीनं ही मोहीम गुंडाळली. 1939 च्या ऑगस्ट महिन्यात युद्धाच्या अपरिहार्यतेमुळं त्यांनी मोहीम आटोपती घेतली.
तोपर्यंत बेगर यांनी 376 तिबेटियन नागरिकांच्या कवट्या आणि चेहऱ्याची मापे घेतली होती, 2000 फोटो काढाले होते. त्याचबरोबर 17 जणांच्या डोके, चेहरा, हात आणि कानांचे साचेही तयार केले होते. 350 जणांच्या बोटाचे आणि हाताचे ठसेही त्यांनी मिळवले होते. .
त्यांनी सुमारे 2000 मानव जातीय कलाकृतीही गोळा केल्या होत्या. या पथकातील दुसऱ्या एका सदस्यानं सुमारे 18,000 मीटर लांब फिल्मवर ब्लॅक अँड व्हाईट व्हीडिओ आणि 40 हजार फोटो गोळा केले होते.
ही मोहीम अचानक रद्द करण्यात आली त्यावेळी, हिमलर यांनी त्यांची कलकत्त्याहून विमानानं परतण्याची सोय केली होती. तसंच विमान म्युनिकला उतरलं तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हिमलर स्वतः तिथं उपस्थित होते.
शाफर यांनी तिबेटमधून या संशोधनादरम्यान मिळवलेला माहितीचा हा खजिना साल्झबर्ग येथील एका वाड्यात नेला. युद्धाच्या वेळी ते त्याठिकाणी गेले होते. पण 1945 मध्ये मित्रसैन्याच्या तुकड्या त्याठिकाणी पोहोचल्या आणि तिथं छापा टाकून तिबेटमधील बहुतांश फोटो आणि इतर साहित्य त्यांनी उध्वस्त केलं.
या मोहिमेतील इतरही तशाकथित शास्त्रीय माहिती अशाचप्रकारे युद्धात उध्वस्त झाली. ती हरवली गेली किंवा नष्ट झाली. शिवाय नाझींचा इतिहास पाहता युद्धाच्या नंतरही कोणीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला नाही.
(वैभव पुरंदरे हे "हिटलर अँड इंडिया : द अनटोल्ड स्टोरी ऑफ हिज हेट्रेड फॉर द कंट्री अँड इट्स पीपल" पुस्तकाचे लेखक आहेत. वेस्टलँड बुक्सनं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)