हेन्री फोर्ड यांची सोयाबीन कार बाजारात का आली नाही? ही गाडी कशापासून बनली होती?

हेन्री फोर्ड यांनी जगातील पहिली मोठ्या पातळीवर उत्पादन करण्यात आलेली कार, फोर्ड-टी तयार केली होती. त्यांतर कार विश्वामध्ये ते अमर झाले.

अमेरिकेच्या हेन्री फोर्ड यांनी कार निर्मितीसाठी स्थापन केलेल्या असेंबली लाइनमुळं ऑटोमोबाइल उत्पादनाच्या जगात क्रांती आणली होती.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी वाहतूक व्यवसायासाठी मोठ्या बाजारपेठेची निर्मिती केली होती.

आता शंभर वर्षांनंतर इंधनावर चालणारी आणि कार्बन डाइ ऑक्साइडचं उत्सर्जन करणारी वाहनं, पृथ्वीचं तापमान वाढवण्याबरोबरच हवामान बदलासाठीही जबाबदार असल्याचं मानलं जात आहे.

मात्र, ज्या व्यक्तीमुळं कारचं हे एवढं मोठं विश्व निर्माण झालं, ते पर्यावरणाच्या दृष्टीनंदेखील विचार करत होते, हे फार कमी लोकांना माहिती असेल.

'सोयाबीन कार'

1930 च्या दशकात फोर्ड हे बायोप्लास्टिकचं उत्पादन आणि वापर करणाऱ्या सुरुवातीच्या काही लोकांपैकी एक होते, हे त्यामागचं कारण आहे.

बायोप्लास्टिक एक प्रकारचं प्लास्टीक असतं. ते झाड आणि हायड्रोकार्बनपासून तयार होतं आणि ते बायो डीग्रेडेबल (पूर्णपणे विघटन होणारं) असतं.

फोर्ड यांनी बायोप्लास्टिकची निर्मिती तर केलीच, मात्र त्यापासून कार निर्मिती करणारे ते इतिहासातील पहिले व्यक्तीही ठरले.

या कारला 'सोयाबीन कार' किंवा 'सोयाबीन ऑटो' असं नाव देण्यात आलं होतं. 1941 मध्ये फोर्ड यांनी ती लोकांसमोर आणली.

हे प्लास्टीक स्टीलपेक्षा दहापट मजबूत असल्याचा फोर्ड यांचा दावा होता. त्यांना एवढा विश्वास होता की, त्यांना एका कुऱ्हाडीनं प्रत्येक मटेरियलच्या पॅनलवर मारलं होतं तेव्हा केवळ धातूच्या पॅनलवर खड्डे झाल्याचं आढळून आलं होतं.

शेतकरी आणि व्यावसायिक

या पदार्थापासून गाड्यांचे दहा हजार पार्ट तयार करण्याची शक्यता मांडणारे फोर्ड त्यांची ही इच्छा पूर्ण करू शकले नाहीत.

प्रत्यक्षात त्यांची सोयाबीन कार कधीही बाजारात येऊच शकली नाही. जी एक कार तयार करण्यात आली होती, तीही नष्ट करण्यात आली आणि तशी दुसरी कारही नव्हती.

पण फोर्ड यांनी हा ग्रीन प्रोजेक्ट का बंद केला आणि तो यशस्वी का झाला नाही? असा प्रश्न उपस्थित होतो.

बेन्सन फोर्ड रिसर्च सेंटरच्या मते, प्रसिद्ध व्यावसायिक हेन्री फोर्ड मिशिगनमधील एका कृषी फार्ममध्ये लहानाचे मोठे झाले होते. उद्योगाला कृषी क्षेत्राशी कसं जोडलं जावं, याचाच विचार ते करायचे.

बेन्सन सेंटर हेनरी फोर्ड यांच्या कामाला प्रोत्साहन देण्याचं काम करतं.

प्लास्टिक पॅनल कार

फोर्डनं सोयाबीन, मक्का, गहू आणि भांग यांच्या व्यावसायिक वापराचा शोध लावण्यासाठी प्रयत्न करणारी एक प्रयोगशाळा उभारली होती.

या रोपांपासून तयार करण्यात आलेल्या प्लास्टिकपासून कार तयार करण्याच्या विचारामाग फोर्ड यांच्या कृषी क्षेत्राला उद्योगाशी जोडण्याच्या उद्देशाबरोबरच इतरही अनेक फायदे होते.

बेन्सन फोर्ड रिसर्च सेंटरच्या मते, प्लास्टिक पॅनलमुळं कार ही पारंपरिक स्टील फ्रेमच्या कारपेक्षा अधिक सुरक्षित बनते, असं फोर्ड यांना वाटत होतं.

ही कार पलटी होऊनही चुराडा न होता सुरक्षित राहू शकत होती. तसंच ही कार तयार करण्याचं आणखीही एक कारण होतं.

1939 मध्ये युरोपात दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. त्यावेळी जगात धातूची कमतरता होती.

सोयाबीन कारबाबत उपलब्ध माहिती?

कार सादर करताना 1941 मध्ये न्यू यॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हेन्री फोर्ड यांनी या प्लास्टिकपासून तयार केलेली कार अमेरिकेत स्टीलची गरज दहा टक्क्यांपर्यंत कमी करू शकते, असं सांगितलं होतं.

बेन्सन रिसर्च सेंटरनुसार या शोधाबाबत अत्यंत कमी माहिती जपून ठेवण्यात आलेली आहे.

आजही अनेक लोकांना त्यामध्ये रस आहे. विशेषतः सध्या पर्यावरणाला अधिक महत्त्वं दिलं जात असल्यानं लोक याला महत्त्वं देत आहेत.

ही कार कशापासून तयार करण्यात आली होती हेही या कारबाबतचं एक गूढ आहे.

सेंटरच्या मते या पॅनलमध्ये कशा-कशाचा समावेश होता, याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. कारण याचा फॉर्म्युला सुरक्षित ठेवण्यात आला नव्हता.

न्यू यॉर्क टाइम्समध्ये या कारबाबत प्रकाशित एका लेखानुसार फोर्डच्या शास्त्रज्ञांना हे प्लास्टीक तयार करण्यासाठी 70 टक्के सेल्यूलोज आणि 30 टक्के रेझिन बायंडरचा वापर केला होता.

त्या लेखानुसार सेल्यूलोज फायबरमध्ये 50 टक्के देवधार फायबर, 30 टक्के भुसा आणि दहा टक्के भांग तसंच दहा टक्के रेमी (एक प्रकारचं रोपं ज्याचा वापर प्राचीन इजिप्तमध्ये ममी तयार करण्यासाठी केला जात होता) याचा समावेश होता.

मात्र, कार तयार करणाऱ्या पथकाचे प्रमुख लोव्हेल ई यांनी वेगळी माहिती दिली होती.

हे प्लास्टिक सोया फायबर, फेनोलिक रेझिन आणि फॉर्मलडिहाइड यापासून तयार करण्यात आल्याचं ते एका मुलाखतीत म्हणाले होते.

वजनाला अत्यंत हल्की

सोयाबीन कारबाबत दस्तऐवज किंवा डिझाईन अशी काहीही माहिती उपलब्ध नाही.

फोर्ड यांनी हे काम ओव्हरलेला सोपवलं होतं. ते सोयाबीन कार लॅबमध्ये टूल अँड डाय डिझाईन इंजीनीअर होते.

ओव्हरलेमधील सुपरवायझर आणि रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट ए बोयर यांनीही या प्रोजेक्टसाठी मदत केली होती.

या कारला स्टीलच्या ट्यूबपासून तयार केलेला एक ढाचा होता. त्यात प्लास्टीकचे 14 पॅनल लावलेले होते. प्लास्टिक स्टीलच्या तुलनेत अत्यंत हलकं होतं, हाही एक अधिकचा फायदा होता.

सोयाबीन कारचं वजन केवळ 907 किलो होतं. पारंपरिक कारच्या तुलनेत ती 450 किलोने हलकी होती. फोर्ड यांनी 13 ऑगस्ट 1941 ला ही कार सादर केली तेव्हा त्यांनी या कारच्या या वैशिष्ट्याकडेही लक्ष वेधलं होतं.

ही कार मिशिगनच्या डियरबॉर्न डेज सामुदायिक सोहळ्यात सादर करण्यात आली होती. नंतर मिशीगनच्या मेळाव्यातही ती सादर करण्यात आली होती. मात्र, झाडांवर आधारित प्लास्टिकबाबत फोर्ड यांचा उत्साह भरपूर असूनही या प्रकल्पाला यश मिळू शकलं नाही.

ओव्हरलेच्या मते, या कारचं केवळ एक मॉडेल तयार करण्यात आलं होतं. ते नष्ट करण्यात आलं आणि दुसरी कार तयार करण्याची योजना रद्द करण्यात आली.

हा प्रोजेक्ट थांबल्यामुळं आणि त्या काळात अमेरिकेत कारच्या उत्पादनावर बंदी लागण्याचं कारण अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धात घेतलेला सहभाग हे होतं.

बेन्सन फोर्ड रिसर्च सेंटरच्या मते युद्धानंतर प्लास्टिकद्वारे कार तयार करण्याचा विचार मागे पडला. कारण युद्धानंतर सर्व प्रयत्न हे देशाला सावरणं आणि पुनर्विकास यावर केंद्रीत होते.

तर काही लोकांच्या मते, बायोप्लास्टिकमध्ये रस कमी होण्याचं कारण आर्थिक होतं. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर तेल मुलबक प्रमाणात उपलब्ध होतं.

कारण काहीही असलं तरी, सोयाबीन कारची निर्मिती आणि पुन्हा तिचं थंडबस्त्यात जाणं हा संपूर्ण घटनाक्रम जुन्या काळाची आठवण करून देण्याबरोबरच रंजकही आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)