चीनमध्ये अति उंच इमारती उभारण्यावर निर्बंध का घालण्यात आले?

फोटो स्रोत, Reuters
चीननं देशातील लहान शहरांमध्ये 'सुपर हाय राइज इमारती' म्हणजेच अति उंच इमारती उभारण्यावर बंदी आणली आहे.
जगातील सर्वात उंच इमारतींमध्ये चीनमधील काही इमारतींचा समावेश आहे. चीनमधील 128 मजली शांघाय टॉवर ही आशियातील सर्वात उंच इमारत आहे. तिची उंची 632 मीटर आहे.
काही स्थानिक अहवालांनुसार कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये अतिउंच इमारती उभारण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या योजना महत्त्वाकांक्षी असल्या तरी व्यावहारिक नसल्याचं म्हटलं जात आहे.
याचवर्षी जुलैमध्ये चीननं सुरक्षेच्या कारणांवरून 500 मीटरपेक्षा अधिक उंच इमारती उभारण्यावर बंदी घातली होती.
मे महिन्यात दक्षिण चीनमधील शेनजेन शहरातील एका उंच इमारतीमध्ये कंपनं जाणवल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यावेळी 980 फूट उंच एसईजी प्लाझामधील लोकांना इमारत हलत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्याठिकाणी एकच गोंधळ उडाला होता. मात्र त्याठिकाणी भूकंप आला नव्हता. त्यानंतर या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.
चीनमधील वीबो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. "खरं पाहता, सुपर हाय राइज इमारतींची गरजच नाही. तो केवळ दिखावा आहे," असं अनेकांनी म्हटलं.
त्यापूर्वी याच वर्षी सरकारनं 'विद्रूप वास्तुकलेवर' (इमारती) देखील बंदी आणली होती.
"लोक इतिहासात नोंद व्हावी, असं काहीतरी करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत, अशा काळात आपण आहोत," असं टॉन्गजी युनिव्हर्सिटी ऑफ आर्किटेक्चर अँड अर्बन प्लानिंगचे उपप्रमुख झांग शांगवू यांनी चीनमधील साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Reuters
"प्रत्येक इमारतीला उत्तम बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विकासक आणि शहर नियोजनकार इमारतींमध्ये नाविन्य आणि वेगळेपणा शोधत आहेत," असं ते म्हणाले होते.
नवीन नियम नेमके काय?
चीनमधील हाऊसिंग, शहर-ग्रामविकास आणि आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयानं या आठवड्यात एक सामुहिक प्रसिद्धी पत्रक सादर केलं. त्यात 30 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात 150 मीटरपेक्षा उंच इमारती तयार करण्यावर बंदी आणली जाईल, असं म्हटलं आहे.
ज्या शहरांची लोकसंख्या यापेक्षा अधिक आहे, त्याठिकाणी 250 मीटरपेक्षा जास्त उंच इमारतींच्या निर्मितीवर बंदी असेल.

फोटो स्रोत, Getty Images
शिवाय ज्या शहरात लोकसंख्या 30 लाखांपेक्षा कमी आहे, त्याठिकाणी 150 मीटरपेक्षा अधिक उंच इमारती तयार करण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागेल, असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत याठिकाणी इमारतीची उंची 250 मीटरपेक्षा अधिक नसेल.
त्याचप्रमाणे ज्या शहरांची लोकसंख्या 30 लाखांपेक्षा जास्त आहे, त्याठिकाणी 250 मीटरपेक्षा उंच इमारती तयार करण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागेल. मात्र तिथंही जास्तीत जास्त मर्यादा 500 मीटरपर्यंत असेल.
या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायमस्वरुपी जबाबदारी निश्चित केली जाईल, असंही त्यात म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








