You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ॲाफिसच्या पार्टीत महिलांना दारू पिण्याचा आग्रह का? बलात्काराच्या घटनेनंतर चीनमध्ये संतप्त सवाल
- Author, वैयी यिप
- Role, बीबीसी न्यूज
चीनस्थित अलिबाब या तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपनीतल्या एका व्यवस्थापकावर बलात्काराचे आरोप करण्यात आले. या आरोपांच्या निमित्तानं चीनमधील कामाच्या ठिकाणच्या संस्कृतीबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झालीय.
कामाच्या ठिकाणी गैरवर्तनाचे प्रकार चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय. कामाच्या ठिकाणी मद्य पिण्याबाबतची एक जुनी पद्धत चीनमध्ये आहे. ही पद्धत आता टीकेचं लक्ष्य बनलीय.
मिंगशी (नाव बदललं आहे) यांना पसंत नसलं तरीही काम संपल्यानंतर सहकाऱ्यांसोबत मद्य पिण्यासाठी सोबत द्यावी लागत असे आणि तिथं गेल्यानंतर एका कोपऱ्यात उभं राहण्यापुरती गोष्ट मर्यादित राहत नाही.
अनेकदा खोटं खोटं हसून क्लायंट्ससोबत गप्पा मारणं आणि त्यांची चर्चा चांगली असण्याचं भासवणं, या सगळ्यांमुळे मिंगशींना अवघडल्यासारखं होई.
बीबीसीशी बोलताना मिंगशी सांगतात, "अनेकदा वाटायचं की या सर्व गोष्टी हाताबाहेर जातील, जरी माझ्या हातातलं पेय सांभळण्यात मी बरी असली तरीही."
मिंगशी 26 वर्षांच्या आहेत. गाँगझौमध्ये त्या पब्लिक रिलेशन कन्सल्टंट आहेत.
"अनेकदा तर काही लोक अयोग्य आणि अश्लिल विनोद करतात आणि ते विनोद चांगले असल्याचं भासवत हसावं लागतं," असंही त्या म्हणतात.
मिंगशी यांच्या सहकाऱ्यानेही असाच अनुभव सांगितला. वरिष्ठांच्या नजरेत चांगलं राहण्यासाठी आणि व्यवसायात सुरक्षिततेच्या दृष्टीने वैयक्तिक संबंधांना गुरुकिल्ली मानली गेल्यानं अनेक कामगारांना तणावाला सामोरं जावं लागतं.
अलिबाबा कंपनीतल्या वरिष्ठ व्यवस्थापकावरील बलात्काराच्या आरोपानंतर चीनमधील कामाच्या निमित्तानं मद्य पिण्याची परंपरा पुन्हा एकदा वादाचं केंद्र बनलीय.
पीडित महिला कर्मचाऱ्यानं त्या घटनेचं केलेलं 11 पानी वर्णन चीनमधील व्हिबो या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. त्यात तिने आरोप केलाय की, त्या रात्री मद्य प्यायल्यानं बेशुद्ध पडले आणि त्यानंतर बलात्कार करण्यात आला.
व्यवसायानिमित्त आयोजित पार्टीत वरिष्ठांनी मोठ्या प्रमाणात मद्य पिण्यास सांगितल्याचा पीडितेनं आरोप केला. हॉटेलमध्ये सकाळी जेव्हा ती उठली, तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते.
त्यानंतर सुरक्षेसाठीच्या कॅमेऱ्यांची पाहणी केल्यानंतर समोर आलं की, कंपनीचा व्यवस्थापक चारवेळा पीडितेच्या खोलीत गेला होता.
अलिबाबा कंपनीनं व्यवस्थापकाला कामावरून काढून टाकलं असून, त्याला पुन्हा कंपनीत नोकरी देणार नसल्याचंही जाहीर केलंय.
त्या व्यक्तीची 'जबरदस्तीची असभ्यता' हा गुन्हा नाही, असं म्हणत चिनी वकिलांनी या प्रकरणापासून फारकत घेतलीय. पोलिसांनी सांगितलंय की, शिक्षा म्हणून त्या व्यक्तीला 15 दिवस ताब्यात ठेवलं जाईल. मात्र, तपास थांबवण्यात आलाय.
मात्र, या सर्व घडामोडींमुळे सोशल मीडियावर वातावरण तापलं आहे. लोकांचा संताप हा केवळ बलात्काराच्या घटनेमुळे नाहीय, तर चीनमधील कंपन्यांच्या कार्यक्रमांमध्ये कर्मचाऱ्यांना मद्याचं अतिसेवन करण्याच्या परंपरेविरोधातही लोकांचा राग दिसून येतोय.
व्हिबो या चिनी मायक्रोब्लॉगिंग साईटवर 'How to view workplace drinking culture' या हॅशटॅगला आतापर्यंत 110 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी पाहिलंय. अनेकजण या हॅशटॅगसोबत आपापले अनुभव सांगत आहेत.
'नकार देणं अनादर समजलं जातं'
जपानमधील 'Nomikai',दक्षिण कोरियातील 'Hoesik' आणि चीनमधल्या 'बिझनेस ड्रिंकिंग कल्चर'मध्ये बऱ्याच अंशी फरक आहे. काम करतानाचे संबंध अधिक दृढ व्हावेत म्हणून एकत्र येत अशाप्रकारचं आयोजन केलं जातं.
चीनमध्ये मद्याचं आयोजन साधरणत: रात्री होणाऱ्या मोठ्या कार्यक्रमांमध्येच केलं जातं. बैज्यू (Baijiu) हे मद्य चीनमध्ये प्रसिद्ध आहे. यात अल्कोहोलचं प्रमाण 60 टक्के असतं.
कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी मद्याचं अतिसेवन करून वरिष्ठांप्रती आदर व्यक्त करावा, अशी अपेक्षा असते. तसंच, ग्राहकांना प्रभावित करण्यासाठीही अशीच अपेक्षा केली जाते.
अनेकदा वरिष्ठ कर्मचारी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेयातील काही भाग पिण्यासाठी जबरदस्ती करतात. यामुळे कनिष्ठ कर्मचारी चिंतेत पडतात.
बॉसला नकार देणं शक्य नसतं. कारण पदांचा क्रम चीनमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, असं तंत्रज्ञानविषयक विश्लेषक रुई मा सांगतात.
किंबहुना, यामुळेच अशा कार्यक्रमांची निमंत्रणं नाकारणंही कनिष्ठ कर्मचाऱ्यांना कठीण जातं.
"निमंत्रण नाकारणं म्हणजे वरिष्ठांप्रती अनादर दाखवल्याचं समजलं जातं. करिअरच्या सुरुवातीलाच अशी नाराजी ओढवून घेण्यास कुणाही कर्मचाऱ्याची तयारी नसते," असं चीनमधील मार्केटचं विश्लेषण करणारे हन्यू ल्यू सांगतात.
जर अशा कार्यक्रमांना गेली नाही, तर कामाच्या ठिकाणी डावललं जाण्याची भीती मिंगशी व्यक्त करतात.
अशा डिनर्सचा वापर काहीजण वरिष्ठांची मर्जी संपादित करण्यासाठी करतात, मात्र ते सगळ्यांनाच जमत नाही, असंही त्या म्हणतात.
2016 साली चीन सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर असताना कुठल्याही प्रकारचं मद्यपान करण्यास बंदी घातली. मात्र, ही पद्धत खासगी क्षेत्रात कायम आहे.
गेल्यावर्षी जानेवारीत शेंझेनमध्ये एक सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. कारण त्यांच्या बॉसनं कामानंतर काहीजणांमध्ये जास्तीत जास्त मद्य पिण्याची स्पर्धा लावली होती. तसंच, त्या सुरक्षाक्षकाचा सहकारी अतिसेवनामुळे आजारी पडला आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
स्थानिक माध्यमांमधील वृत्तांनुसार, सुरक्षारक्षकांच्या कंपनीनं त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी 5 हजार युआन (775 डॉलर) दिले.
गेल्या वर्षीच ऑगस्टमध्ये एका बँक कर्मचाऱ्याला अशाच कार्यक्रमात वरिष्ठ सहकाऱ्याने कानाखाली लगावली. या कर्मचाऱ्यानं एका चॅट ग्रुपवर याबाबत लिहिल्यानंतर हे उघडकीस आलं.
चीनमधली ही 'घृणास्पद' पंरपरा थांबणार कधी?
अलिबाबा कंपनीतल्या प्रकारामुळे या परंपरेबाबत लोकांचा उद्रेक पाहायला मिळतोय. तज्ज्ञ सांगतात की, ही परंपरा थांबवण्यासाठी आता दबाव वाढेल आणि त्याचे परिणाम लवकरच दिसूनही येऊ शकतो.
"व्यवसायाच्या ठिकाणी किंवा त्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमांमध्ये मद्य पिण्याची परंपरा फार जुनी आहे. मात्र, अलिबाबामधील घटना इतक्या मोठ्या प्रमाणात चर्चेत येण्याचं कारण सोशल मीडिया आहे," असं ल्यू सांगतात.
ते पुढे म्हणतात, "चिनी लोक इंटरनेटशी जोडले गेलेत आणि ते काही क्षणात एखाद्या व्यक्तीला किंवा कंपनीला नमवू शकतात"
सरकारने काही कारवाई करण्याची शक्यता पाहता आता खासगी कंपन्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.
अलिबाबा कंपनीतलं प्रकरण समोर आल्यानं कंपनीचे सीईओ डॅनियल झांग यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सांगितलंय की, कुणालाही जबरदस्तीनं मद्य पिण्यास सांगण्याच्या कंपनी विरोधात आहे.
चीनमधील भ्रष्टाचार प्रतिबंधक यंत्रणेनं ही 'घृणास्पद' परंपरा संपवण्याचं आवाहन केलंय.
तर ल्यू म्हणतात, चीनमधील कामानंतर मद्य पिण्याची परंपरा नक्कीच संपेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)