You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हातातली नोकरी सोडणं इतकं अवघड का वाटतं?
- Author, जोआना यॉर्क
- Role, बीबीसी न्यूज
हातातली नोकरी सोडणं- विशेषतः दुसऱ्या नोकरीची शाश्वती नसताना असं करणं- भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकतं आणि नाव खराब होण्याचीही भीती वाटू शकते. 'महा-राजीनाम्या'ने हे बदलेल का?
टाळेबंदीमुळे 2020 साली युनायटेड किंगडममधील जिम बंद झाल्या, तेव्हा पर्सनल ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या जेम्स जॅक्सन यांनी नोकरी सोडली.
"आता ऑनलाइन पद्धतीने काम करावं लागेल हे मला कळलं होतं," असं मँचेस्टरमध्ये राहणारे 33 वर्षीय जॅक्सन सांगतात. "जिम ही वर्दळीची जागा असते. त्यामुळे ती पुन्हा आता लोकांना आकर्षून घेणारी ठरेल का याबद्दल मला शंका वाटते. मी खूप वेळ तसाच ताटकळत राहिलो तर चांगली संधी गमावून बसेन, असं मला वाटलं."
पण नोकरी सोडण्याचा निर्णय अवघड होता. चांगलं करिअर आणि एकनिष्ठ ग्राहकवर्ग निर्माण करण्यासाठी जॅक्सन यांनी आठ वर्षं घालवली होती. "नोकरी सोडणं भयंकर होतं," असं ते म्हणतात. "मला पर्सनल ट्रेनर म्हणून काम करण्याव्यतिरिक्त काहीही येत नव्हतं." त्यांना इतर लोकांची मतं हाताळणंही अवघड वाटलं.
"मी खूप घाईगडबडीत आणि भावनेच्या भरात निर्णय घेतोय, असं माझ्या बॉसला वाटलं," असं ते सांगतात. त्यांच्या बहुतांश सहकाऱ्यांनाही तसंच वाटलं.
"मी घाईगडबडीत चुकीचा निर्णय घेतोय असं त्यांना वाटलं. आधीच मला नोकरी सोडताना अस्वस्थ वाटत होतं, त्यात या टिप्पण्यांमुळे माझ्या मनात साशंकता निर्माण झाली."
तुम्ही एखाद्या अधिक झकपकीत, नवीन, सुधारित भूमिकेत जाण्यासाठी आधीची नोकरी सोडत असाल, तर लोकांची हरकत नसते. पण वेगळी दिशा घेण्यासाठी कोणी हातातली नोकरी सोडली तर लोक त्यावर नाक मुरडण्याची शक्यता असते किंवा हा पराभव आहे, असंही अनेकांना वाटतं.
डेन्वर, कोलराडो इथल्या संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ मेलिसा डोमान म्हणतात, "खासकरून लोक कठोर आत्मपरीक्षण करतात. अनेक लोकांसाठी त्यांची नोकरी त्यांच्या ओळखीशी व सामर्थ्याशी घट्ट जोडलेली असते."
हे घटक असले, तरी अनेक लोकांना त्यांची नोकरी सोडायची असते असं विविध संकेतांवरून दिसतं. किंबहुना, मायक्रोसॉफ्टने अलीकडेच केलेल्या एका जागतिक सर्वेक्षणानुसार, एकूण कर्मचाऱ्यांपैकी 41 टक्के जणांना राजीनामा द्यायची इच्छा असते.
अमेरिकेमध्ये एप्रिल 2021 या महिन्यात विक्रमी संख्येने कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या सोडल्या आणि युनायटेड किंगडम, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यूझिलंड यांसह इतरही राष्ट्रांमध्ये अशीच लाट येण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेला आता विशिष्ट संबोधनही प्राप्त झालं आहे- 'ग्रेट रेझिग्नेशन' अर्थात 'महा-राजीनामा' असं याला म्हटलं जाऊ लागलं आहे.
या प्रवाहाला अनेक कारणं आहेत. जागतिक साथीच्या काळात लोक स्वतःच्या कारकीर्दीसंबंधीच्या अपेक्षांचं पुनर्मूल्यांकन करू लागले आहेत, घर व काम यांच्यात कसरत करण्याचा ताण वाढला आहे, आणि काहींना आपल्या मालककंपन्यांविषयी असंतुष्टता वाटते आहे. यातील कोणताही घटक कारणीभूत ठरला, तरी सध्याची नोकरी सोडण्याची निवड करणाऱ्या अनेकांसाठी ही प्रक्रिया भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असते.
'नोकरी सोडणं' या शब्दप्रयोगालाच नकारात्मक अर्थछटा प्राप्त झाली आहे. अधिक सकारात्मक पर्याय निवडण्यासाठी ही कृती केली तरी, आपल्याभोवतीचे लोक आणि आपण स्वतःसुद्धा त्याकडे नकारात्मकतेने बघतो.
पण कोरोनाच्या जागतिक साथीने केलेल्या उलथापालथीमुळे आणि नोकरी सोडण्याची शक्यता असलेल्यांची निव्वळ संख्या पाहिल्यावर तरी, आपल्याला राजीनाम्याभोवतीचं नकारात्मक वलय बाजूला करून त्याकडे सकारात्मकतेने पाहणं शक्य व्हायला हरकत नाही.
'मानसिकदृष्ट्या अस्वस्थकारक'
"नोकरी मिळाली की आयुष्यभराची सोय झाली" या विचारामुळे सामाजिक पातळीवर राजीनाम्याकडे नकारात्मकतेने पाहिलं जातं, पण "एखादी नोकरी आयुष्यभर पुरेल, ही अगदी जुनाट विचारांमधून आलेली धारणा आहे. एकतर ते खरंही नसतं आणि आता ते वास्तवाला धरूनही उरलेलं नाही," असं डोमान सांगतात.
यशस्वी करिअर घडवण्यासाठी कष्ट, चिकाटी आणिचांगल्या अंतिम परिणामासाठी त्रास सहन करायची इच्छा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असा लोकप्रिय समज आहे. त्यामुळे नोकरी सोडणाऱ्याकडे हे गुण नाहीत, असं पाहिलं जातं.
दुसरी नोकरी समोर नसताना हातातली नोकरी सोडणाऱ्यांना या धारणांचा सर्वाधिक त्रास होतो, असं संशोधनावरून सूचित होतं.
अधिक चांगल्या संधीसाठी नोकरी सोडणारे लोक सर्वमान्य करिअरच्या वाटेवर टिकून असतात, पण ज्यांनी पूर्णतः नोकरीच सोडून दिलेली आहे ते लोक कमी कार्यक्षम, कमी स्नेहशील व नोकरीवर घेण्यास कमी पात्र ठरणारे असतात, असा एचआर विभागांचा व व्यापक समाजाचा समज होतो, असं 2018 मधील एका अभ्यासातून स्पष्ट झालं.
आपण स्वेच्छेने नव्हे, तर बाह्य घटकांमुळे नोकरी सोडली आहे, याचा पुरावा दिला तरच स्वतःवरचा हा कलंक पुसणं शक्य असतं.
आसपासच्या लोकांकडून आपल्याविषयी असे पूर्वग्रह निर्माण झाले, तर त्याचा ताण येतो. ठोस योजना न आखता नोकरी सोडल्याने अनेकांना भावनिक क्लेशसुद्धा सहन करावा लागतो.
लाजीरवाणेपणा, अपराधभाव, भीती व पराभवाची भावना यांमुळे मेंदूत नकारात्मक भावनांचं चक्र सुरू होऊ शकतं.
"नोकरी सोडल्यावर पुढे काही हाताशी काम नसेल, तर सरासरी व्यक्तीसाठी ते मानसिकदृष्ट्या अतिशय अस्वस्थकारक असू शकतं," असं डोमान सांगतात. "भावनिकदृष्ट्या व मज्जातंतूंच्या संदर्भाने पाहिलं तर, मेंदूला अस्थिरता वा संदिग्धता आवडत नाही."
नोकरी सोडण्याचा निर्णय योग्य आहे का यामुळे निर्माण होणारी चिंताग्रस्तता आणि अज्ञात भविष्यात पाऊल टाकण्याच्या विचारामुळे भीतने गोठून जाणं- हे दोन सर्रास दिसणारे परिणाम आहेत.
पर्सनल ट्रेनर जॅक्सन यातील पहिल्या प्रकारात मोडणारे होते. नोकरी सोडली तर आपल्याला स्वतःची कार विकावी लागेल, आपल्या आईवडिलांच्या घरी राहायला जावं लागेल आणि आपल्याला येणारं एकमेव काम बाजूला सारावं लागेल, असं त्यांना वाटत होतं. या चिंताग्रस्ततेपायी त्यांना आठवडाभर झोप लागली नाही.
नोकरी सोडण्याच्या तुमच्या निर्णयामागे अवघड परिस्थिती कारणीभूत ठरली असेल, तर त्यातून गुंतागुंतीच्या भावना निर्माण होणं स्वाभाविक असतं.
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना इथे राहणाऱ्या क्रिस्टिन व्हाइट यांनी आरोग्य व स्वास्थ्य प्रशिक्षक म्हणून करत असलेली नोकरी सोडली, तेव्हा त्यांना 'शोकाकुलते'ला सामोरं जावं लागलं.
"मला खूपच दुःख होतंय, त्यामुळे यातून बाहेर यायला एक-दोन महिने लागतील, असं मी माझ्या नवऱ्याला सांगितलं. काम म्हणजे एक प्रकल्प साकारण्यासारखं असतं, मला त्याचा अभिमान वाटत होता आणि आता मी त्या कामात नसणार होते," असं त्या म्हणतात.
पहिलं मूल झाल्यानंतर स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी व्हाइट यांनी 2015 साली कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी करिअर सोडून दिलं. पण कालांतराने त्यांनी स्वतःचा स्वास्थ्यविषयक व्यवसाय सुरू केला.
एप्रिल 2020मध्ये टाळेबंदी लागू झाल्यावर त्यांच्या समोर दुहेरी आव्हानं उभी होती. स्वतःचा व्यवसाय ऑनलाइन नेणं, आणि त्याच वेळी लहान मुलांना घरातच शिकवणं. या पेचातून बाहेर पडणं अशक्य आहे, असं त्यांना वाटलं होतं.
आता आपण व्यवसाय बंद करत असल्याचं त्यांनी त्यांच्या भागधारकांना, व्यावसायिक संपर्कातील व्यक्तींना व मित्रमैत्रिणींना सांगून टाकलं होतं.
नोकरी सोडणं या कृतीच्या सार्वजनिक बाजूला सामोरं जाणं अनेक लोकांसाठी अवघड असू शकतं.
"तुम्हाला आवडो न आवडो, लोक प्रतिक्रिया देत राहतात," असं डोमान सांगतात. "कोणी नोकरी सोडली की, 'त्याला झेपलं नसेल' असा सर्वसाधारणतः लोकांचा समज होतो." व्हाइट यांनाही असाच अनुभव आला.
पुरेसं यश मिळालं नाही म्हणून त्या कॉर्पोरेट क्षेत्रातलं करिअर सोडून देत आहेत, असं सुचवणाऱ्या बोचऱ्या प्रतिक्रिया त्यांच्या सामाजिक वर्तुळातून आल्या.
"हे लोकांचं बोलणं सतत माझ्या डोक्यात घुमत असायचं. आता मी कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणारी महिला उरले नव्हते, तर निव्वळ घरात राहणारी आई झाले होते, त्यामुळे लोकांच्या या टिप्पण्या मला जाणवायला लागल्या," असं त्या सांगतात.
जॅक्सन यांना चिंताग्रस्तता भेडसावू लागली तेव्हा, जुनी नोकरी परत मागण्याची इच्छा टाळण्यासाठीही झगडावं लागलं. पण आपल्या सहकाऱ्यांच्या नकारात्मक प्रतिक्रिया मुळात त्यांना स्वतःच्या भवितव्याबद्दल वाटणाऱ्या चिंतेतून आलेल्या आहेत, हेसुद्धा त्यांना जाणवत होतं.
जॅक्सन ऑनलाइन प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नोकरी सोडत असल्याचं विशेषतः त्यांच्या बॉसला स्वीकारायला अवघड गेलं.
"लोकांची व्यायामाची सवय आता बदलणार असल्याचं त्यालाही कुठेतरी आत जाणवलं होतं. आता इतक्या कष्टाने उभा केलेला व्यवसाय सोडण्याची त्याची इच्छा नव्हती," असं जॅक्सन सांगतात.
नवीन संधी?
नोकरी सोडण्याची इच्छा असणाऱ्या, पण कृती करायला अडखळणाऱ्या लोकांना डोमान असा सल्ला देतात की, नोकरी सोडणाऱ्यांविषयीच्या सामाजिक धारणा काय आहेत याचा विचार करण्याऐवजी वैयक्तिक कारणांवर लक्ष केंद्रित करा आणि आपला निर्णय योग्य परिप्रेक्ष्यात ठेवून विचार करा.
"तुम्ही उर्वरित आयुष्यातील तुमच्या भूमिकेविषयी काही निर्णय घेत नाही आहात- तुम्ही निव्वळ आता पुढे नोकरी कोणती करायची किंवा पुढे काय काम करायचं, यासंबंधीचा निर्णय घेत आहात, हे लक्षात ठेवा," असं त्या सांगतात.
त्याचप्रमाणे योग्य वेळी योग्य लोकांकडून सल्ला घेणंही महत्त्वाचं असतं. व्यक्तीशः निर्णय घेतल्यानंतर अशा प्रकारे नोकरी सोडल्यावरही यश मिळवलेल्या आणि आपल्या निर्णयाकडे नकारात्मकतेने पाहण्याची शक्यता कमी असेल अशा लोकांशी बोलावं, असा सल्ला डोमान देतात.
"तुम्ही या प्रवासाची सुरुवात करत असता आणि आधी नोकरी सोडलेले लोक पलीकडच्या बाजूला असतात, त्यामुळे त्यांच्याकडे काही विचारणा करणं चांगलं," असं त्या म्हणतात. "या प्रक्रियेतून न गेलेल्या लोकांना काही विचारायला जाऊ नका, कारण ते तुम्हाला मदत करू शकणार नाहीत."
अलीकडच्या काळात नोकऱ्या सोडणाऱ्यांची संख्या वाढते आहे, याचा अर्थ तुम्हाला अधिक समजुतीने सल्ला देणारे जास्त लोक आसपास असतील.
लंडनस्थित चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल अँड डेव्हलपमेन्ट या संस्थेमधील मानवी संसाधनविषयक तज्ज्ञ डेव्हिड डी'सूझा म्हणतात की, नोकरी सोडणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळे भरती करून घेणाऱ्या व्यवस्थापसांच्या मनातील नकारात्मक भावना कमी व्हायला मदत होईल.
जागतिक साथीने आर्थिक व सामाजिक उलथापालथ घडवली असल्यामुळे रोजगारामध्ये व्यापक स्तरावर बदल होणं अपरिहार्य आहे. ढोबळमानाने, "संबंधित संस्था आपल्याला चांगली वागणूक देत असेल किंवा आपल्या गरजा भागवत असेल, तर त्यासाठी नोकरीवर टिकून राहावं, ही कल्पना आता कालबाह्य झाली आहे," असं ते म्हणतात.
आरोग्यसंकटाच्या अनन्यसाधारण परिस्थितीमुळे नोकरी सोडण्यामधील सकारात्मक वैशिष्ट्यांकडे अधिक इष्ट म्हणून पाहिलं जाईल, अशीही आशा असल्याचं काही संशोधनांमधून समोर आलं आहे. उदाहरणार्थ, डेलॉइटने २०२१ साली चिकाटीविषयी केलेल्या एका अभ्यासानुसार, व्यवसाय क्षेत्रातील धुरीण जुळवून घेण्याची क्षमता व लवचिकता हे आता सर्वाधिक आवश्यक गुण मानू लागले आहेत.
जॅक्सन यांची अंतःप्रेरणा योग्य ठरली. त्यांन नोकरी सोडल्यानंतर आठच आठवड्यांमध्ये त्यांना एका ऑनलाइन प्रशिक्षण कंपनीने भरती करून घेतलं. आपल्या नवीन नोकरीमध्ये भविष्यातील संधी जास्त आहेत, असं त्यांना वाटतं.
आधी पर्सनल ट्रेनर म्हणून ते आठवड्याला 60 तास काम करायचे, पण आता सर्वसाधारण कार्यालयीने वेळेत त्यांचं काम आटपतं.
केवळ मोजकेच आठवडे बेरोजगार राहिल्यामुळे जॅक्सन त्यांच्या नवीन मालकाशी नोकरी सोडण्याबद्दल प्रामाणिकपणे बोलले.
त्यामुळे त्यांना अधिक मोकळेपणाचे कार्यसंबंध राखता आले. अखेरीस नोकरी सोडणं "विचित्र बळ" देणारी ठरल्याचं जॅक्सन म्हणतात. पण ते पुन्हा असाच निर्णय घेण्यासाठी उत्सुक नाहीत.
आपल्या बाबतीतही गोष्टी अधिक चांगल्या घडण्याची शक्यता होती, असं व्हाइट यांनासुद्धा वाटतं. त्या आता स्वतःचा व्यवसाय पुन्हा सुरू करत आहेत.
"पण आता मी अधिक हुशारीने काम करणार आहे आणि मला काय करायचं याची अधिक चांगली कल्पना माझ्या डोक्यात आहे," असं त्या म्हणतात. त्यांनी काम सोडलं, त्या दोन्ही वेळी त्यांचा नवरा काम करत होता. त्यामुळे काम करणं थांबवताना 'निवडीचा विशेषाधिकार' आपल्याला मिळाल्याचं त्या मान्य करतात. पण वैयक्तिक पातळीवर ही प्रक्रिया वेदनादायी होती.
यावर डोमान सहमती नोंदवतात. अनेक लोकांसाठी नोकरी सोडणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसतं. पण नोकरी सोडणं शक्य असलं तरी मनोबळ मिळत नसणाऱ्या लोकांना त्या सल्ला देतात की, "भीती व अस्थिरता कमी करायचा प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यासाठी आणि तुमच्या करिअरसाठी योग्य निर्णय तुम्ही घेत आहात, ही एक विशेषाधिकाराची स्थिती आहे, आणि त्यात संधी आहे, असा विचार करावा."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)