संस्कृत भाषा कॉम्प्युटरसाठी सर्वाधिक उपयुक्त आहे का?

    • Author, विघ्नेश ए
    • Role, बीबीसी तमिळ

फोन आणि इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे आजकाल फेक न्यूजचे प्रमाण वाढले आहे.

इंटरनेटवर काल्पनिक आणि तथ्यहिन बातम्या चालवल्या जातात. लोक त्याची खात्री न करता अशा बातम्यांवर विश्वास ठेवतात.

सध्या अशीच एक फेक न्यूज सुरू आहे.

संस्कृत भाषा कॉम्प्युटरसाठी सर्वात उपयुक्त भाषा आहे, असं या बातमीत म्हटलं आहे. कदाचित तुम्हीसुद्धा ही बातमी वाचलेली असेल.

पण, कॉम्प्युटरमध्ये संस्कृतच्या वापराचं प्रमाण देताना ही भाषा कोडिंगसाठी कशी उपयुक्त आहे, हेसुद्धा या बातमीत सांगण्यात आलं आहे.

अॅप्लीकेशन सॉफ्टवेअर बनवण्यासाठी कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये कोडिंगचा वापर केला जातो.

पण संस्कृत भाषेचा वापर कोडिंगमध्ये कसा करावा किंवा कोणत्या सॉफ्टवेअरचा वापर कोडिंगसाठी करावा, याबाबत काहीही माहिती या बातमीत देण्यात आलेली नाही.

कोडिंग हे फक्त त्या मशीनमध्ये असलेल्या भाषांमधूनच करता येतं. त्यामुळेच याचं एकही उदाहरण बातमीत नाही.

कुठून आली फेक न्यूज?

या फेक न्यूजची सुरुवात वर्ल्ड वाईड वेबच्या शोधापूर्वीच झाली होती. वर्ल्ड वाईड वेबने इंटरनेटच्या वापरात वेग आणला होता.

1985 मध्ये नासाचे एक संशोधक रिक ब्रिग्स यांनी AI नियतकालिकात एक संशोधन अहवाल प्रकाशित केला होता.

'नॉलेज रिप्रेझेंटेशन इन संस्कृत अँड आर्टिफिशियल लँग्वेज' म्हणजेच संस्कृत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ज्ञानाचं प्रतिनिधित्व.

या रिसर्च पेपरमध्ये कॉम्प्युटरसोबत संवाद साधण्यासाठी प्राकृतिक भाषांच्या वापरावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं.

त्यांनी या रिसर्च पेपरमध्ये जी माहिती दिली, त्याचा चुकीचा अर्थ काढून ही फेक न्यूज बनवण्यात आली आहे.

ब्रिग्स यांनी म्हटलं होतं, "मोठ्या प्रमाणात असं मानलं जातं की प्राकृतिक भाषा अनेक विचारांच्या देवाण-घेवाणीसाठी योग्य नाहीत. पण आर्टिफिशियल लँग्वेज हे काम चांगल्या पद्धतीने करू शकते. पण असं नाही. संस्कृत ही 1 हजार वर्षांपासून बोलली जाणारी भाषा आहे. त्यात अत्यंत व्यापक साहित्य आहे."

रिक ब्रिग्स यांनी संस्कृतीतील प्रवाही आणि मुबलक साहित्याचा उल्लेख केला होता.

कॉम्प्युटरला आदेश देण्यासाठी प्राकृतिक भाषेच्या वापराच्या शक्यतेबाबत उल्लेख करणारा हा लेख सर्च इंजिनच्या शोधापूर्वी लिहिला गेला होता.

उदाहरणार्थ, वापरकर्त्याने प्राकृतिक भाषेत लिहिलं की भारताच्या पंतप्रधानांचं नाव काय आहे? तर हे कॉम्प्युटरला समजतं आणि तो त्याचं उत्तर देण्यास सक्षम असतो.

सध्याच्या यंत्रणेत मशीनच्या भाषेत बनवलेलेल कोड वापरकर्त्याचा आदेश कॉम्प्युटरपर्यंत पोहोचवतात. हे कोड कॉम्प्युटरच्या भाषेच्या वाक्यरचनेनुसार तयार केले जातात.

पण फेक न्यूज आणि इतर दाव्यांसाठी या रिसर्च पेपरचा चुकीचा वापर करण्यात येत आहे.

हा लेख लिहिण्यात आला त्यावेळी प्राकृतिक भाषेत बोलू शकणारे आर्टिफिशिय इंटेलिजन्सयुक्त रोबोटसुद्धा बनलेले नव्हते.

तसंच कोणत्याही मानवी भाषेत इनपुट घेऊन त्याचे निकाल देणाऱ्या सर्च इंजिनचा शोधही लागला नव्हता.

कोडिंग

कॉम्प्युटर कमांड पूर्ण करण्यापूर्वी कोडिंग त्याच्या भाषेत बदलतो. आता इंग्रजीशिवाय इतर अनेक भाषा विकसित झाल्या आहेत.

उदाहरणार्थ, तमिळमध्ये येलील ही एक प्रोग्रॅमिंग भाषा आहे. यामध्ये सर्व की-वर्ड तमिळमध्ये आहेत. या भाषेत बनवलेले कोडसुद्धा तमिळमध्येच असतील.

इंग्रजीमध्ये C++, C या भाषा आहेत.

अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये अशा प्रकारच्या प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज आहेत. पण त्यांचा वापर जास्त होत नाही.

याप्रकारे संस्कृतमध्येही की-वर्डचा वापर करून प्रोग्रॅमिंग लँग्वेज बनवता येऊ शकते. पण अद्याप तरी संस्कृत किंवा इतर कोणतीही भाषा कोडिंगसाठी सर्वाधिक उपयुक्त असल्याचं सिद्ध झालेलं नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)