आरोग्य सेतू अॅप सर्वांसाठी सक्तीचं आहे का?

    • Author, नितीन श्रीवास्तव
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली

भारतात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाची नोंद झाली होती. केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला.

त्यानंतर केंद्र सरकार आणि राज्यांची सरकारंया साथीचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहेत. यापैकीच एक उपाय म्हणजे केंद्र सरकारने सुरू केलेलं 'आरोग्यसेतू' (ArogyaSetu) नावाचं अॅप.

हे अॅप लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींविषयीची माहिती देऊन नजिकच्या काळात तुम्ही अशा कुणा कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आला होता का, याबद्दल तुम्हाला अलर्ट करेल, असा दावा सरकारने केला आहे.

हे अॅप सक्तीचं आहे का? यावरून सध्या इंटरनेटवर चर्चा सुरू आहे.

24 मार्चला भारतात लॉकडाऊन सुरू झाला आणि त्यानंतर 3 एप्रिल रोजी केंद्र सरकारने हे अॅप लॉन्च केलं.

आरोग्यसेतू अॅप सर्व अँन्ड्रॉईड आणि आयओएस उपकरणांवर डाऊनलोड करता येतं. शिवाय हे अॅप फ्री आहे.

हे अॅप सक्तीचं आहे का?

आरोग्य सेतू अॅप केंद्र सरकारमधील कर्मचाऱ्यांसाठी सक्तीचं आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी हे अॅप डाऊनलोड करून यात माहिती भरणं अपेक्षित आहे. कर्मचारी अॅपवर आहेत की नाही हे पाहणं त्यांच्या वरिष्ठांचं काम आहे. अॅपवर धोक्याची पातळी वाढलेली दिसली तर ऑफिसला जाऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे.

ऑरेंज आणि रेड झोन घोषित केलेले भाग हे कंटेनमेंट झोनमध्ये येतात. या भागातील लोकांकडे हे अॅप असावं याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी असं प्रेस इंफर्मेशन ब्युरोच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.

पण एखाद्या व्यक्तीजवळ हे अॅप नसेल तर त्याच्यावर काय कारवाई करण्यात येईल हे या पत्रकात दिलेलं नाही. सध्यातरी हे अॅप केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सक्तीचं आहे.

आरोग्यसेतू अॅप कसं काम करतं?

केंद्र सरकारच्या सूचनेवरून पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप (PPP) तत्त्वावर हे अॅप तयार करण्यात आलं आहे. अॅप सुरू करण्यासााठी युजरला सर्वात आधी स्वतःचं मूल्यांकन करावं लागतं.

सहाजिकच अॅपवर रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागतो. त्यानंतर त्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येतो आणि ओटीपी टाकून अॅप सुरू करता येतं.

अॅपमध्ये पुढे तुम्हाला तुमचं लिंग, वय विचारण्यात येईल. त्याननंतर परदेश प्रवासाचा इतिहास, सर्दी, खोकला, ताप यासारख्या प्रश्नांची हो किंवा नाही मध्ये उत्तरं द्यावी लागतील.

तुम्हाला मधुमेह (डायबेटीज), रक्तदाब (ब्लड प्रेशर) यासारखे काही आजार आहेत का, हेदेखील विचारलं जातं.

अॅप अॅक्टिव्ह करण्याच्या प्रक्रियेत योग्य माहिती भरा, अशी सूचना वारंवार येते. त्यामुळे इथे एक प्रश्न सहाजिकच उद्भवतो की अॅपमध्ये माहिती भरताना एखाद्या व्यक्तीने किंवा अनेकांनी एखादी माहिती लपवली तर त्याची पडताळणी कोण आणि कशी करणार?

अॅपमध्ये सोशल डिस्टंसिंगचं महत्त्व आणि ते कसं पाळायचं, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शिवाय कोव्हिड-19 आजाराविषयीचे सर्व ताजे अपडेट्सही येत राहतात.

आरोग्यसेतू अॅप ब्लूटूथ आणि जीपीएस लोकेशन यांच्या माध्यमातून तुम्ही कोरोनाग्रस्त रुग्ण किंवा कोरोना संशयिताच्या संपर्कात आला आहात का, हे ट्रॅक करतं.

इतकंच नाही तर गरजेच्या वेळी तुम्हाला वॉलेंटिअर किंवा स्वयंसेवक म्हणून काम करायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही अॅपच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचवू शकता.

खाजगी माहितीच्या सुरक्षेचं काय?

केंद्र सरकारचं म्हणणं आहे, की या अॅपच्या माध्यमातू कोरोनाग्रस्त रुग्ण आणि होम क्वारंटाईन लोकांवर लक्ष ठेवण्यात येतंय आणि युजरच्या प्रायव्हसीची सगळी खबरदारी घेण्यात आली आहे.

कोरोनासारख्या जागतिक आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने उचलेलं हे पाऊल योग्य वाटत असलं तरी या अॅपच्या माध्यमातून सरकार युजरची जी खाजगी माहिती गोळा करत आहे त्याचा वापर कधीपर्यंत होईल आणि कसा केला जाईल, याबाबत अजून स्पष्टता नाही आणि हे काळजीचं कारण आहे, असं जाणकारांना वाटतं.

सायबर कायद्यांचे तज्ज्ञ पवन दुग्गल यांच्या मते, "एकीकडे हे अॅप तुमचं कोव्हिड-19 स्टेटस अपडेट करतं तर दुसरीकडे तुमच्या लोकेशनवरही चोवीस तास लक्ष ठेवून असतं. दुसरं म्हणजे हा सर्व डेटा कोणत्या कंपनीकडे जातोय, हे अजूनतरी स्पष्ट नाही. तिसरं म्हणजे या अॅपच्या माध्यमातून तुमच्या आरोग्याची माहिती एकत्रितपणे कुठेतरी पाठवण्यात येत आहे. मात्र, कुठल्या कायद्यांतर्गत ही माहिती गोळा करण्यात येत आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही."

कोरोनामुळे सध्या सर्वत्रच घबराट आहे आणि म्हणूनच सध्यातरी खाजगी माहिती गोळा करण्याविषयी कुणीच प्रश्न विचारत नसल्याचं पवन दुग्गल म्हणतात.

इंटरनेट फ्रीडम फाउंडेशनचे कार्यकारी संचालक अपार गुप्ता यांचंदेखील हेच मत आहे. ते म्हणतात, "सरकार सध्यातरी कुठल्याच कायद्यांतर्गत ही माहिती गोळा करत नाहीय. पुढे मात्र यावर प्रश्न उपस्थित होतीलच."

दुसरीकडे सरकारचा दावा आहे, की या अॅपच्या माध्यमातून गोळा करण्यात येणाऱ्या डेटामध्ये एक विशिष्ट इनक्रिप्शन (इंटरनेट सुरक्षेशी संबंधित कोड) आहे जे तुमची खाजगी माहिती तुमच्या मोबाईलमध्येच ठेवेल.

केंद्र सरकारच्या विज्ञानविषयक घडामोडींचे मुख्य सल्लागार के. विजयराघवन यांनी बिजनेस स्टँडर्ड वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, "या अॅपच्या माध्यमातून होणारं सर्व कम्युनिकेशन अज्ञात आणि सुरक्षित ठेवण्यात येतं आणि प्रख्यात संशोधक आणि सायबर क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांनी अॅपची पडताळणी केली आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)