'कोरोना काळात पास तर झालो, पण आता नोकरी मिळेल का शंका वाटते'

    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी

कोरोना व्हायरसमुळे आपलं आयुष्य प्रचंड बदलून गेलं आहे. आधी लॉकडाऊन, एकटेपणा, काही लोकांच्या आप्तस्वकियांचे मृत्यू, नंतरचं सोशल डिस्टन्सिंग वगैरे गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागलं.

सर्वसामान्य नागरिकांचं जीवन अशा प्रकारे बेहाल झालेलं असताना शैक्षणिक क्षेत्राला बसलेला फटकाही प्रचंड मोठा होता.

गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या. तर हो-नाही म्हणत अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबरला घेण्यात आली.

पण परीक्षा देऊन पास झाल्यानंतरही नोकरीची शाश्वती नसल्याने विद्यार्थी तणावाखाली असल्याचं दिसून येत आहे.

स्वप्निल साळुंके (बदललेलं नाव) याचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं अखेरचं वर्ष 2019-20 असं होतं. एप्रिल-मे महिन्यात परीक्षा, मग कॅम्पस इंटरव्ह्यू आणि नंतर नोकरी असं गणित त्याने ठरवलं होतं.

पण कोरोनाचा प्रसार आणि मार्च महिन्यातील लॉकडाऊन यामुळे स्वप्निलचं सगळंच गणित बिघडलं.

त्याच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होण्यास नोव्हेंबर महिना उजाडला. त्या परीक्षाही ऑनलाईनच झाल्या. निकाल चांगला लागला. पण कॅम्पसमध्ये मुलाखती घेण्यासाठी कुणीच न आल्यामुळे स्पप्निलसमोरच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत.

गेल्या चार-पाच महिन्यांपासून तो नोकरीच्या शोधात आहे. दोन ठिकाणी मिळालेल्या नकारामुळे तो आणखीनच हवालदिल झालेला आहे.

एकीकडे शैक्षणिक कर्जाच्या रकमेचं ओझं डोक्यावर आहे. तर दुसरीकडे नोकरीच्या शोधात पैसा खर्च होतो तो वेगळाच.

कोरोना नसता तर आपण आतापर्यंत एखाद्या ठिकाणी नोकरीला लागतो असतो. कोरोना काळात पास झाल्यानेच आपल्यावर ही वेळ आली, आता नोकरी मिळेल किंवा नाही या शंकेने स्वप्निलची झोप उडाली आहे.

स्वप्निलसारखी कित्येक उदाहरणं आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतील. या सगळ्यांच्या करिअरबाबत नियोजनाला कोरोनाचा फटका बसला आहे.

कोरोना काळात ऑनलाईन स्वरुपात परिक्षा दिल्यामुळे आपल्याला कुणी नोकरीवर घेईल की नाही, अशी चिंता या विद्यार्थ्यांना सतावते.

कोरोना ग्रॅज्यूएटचा शिक्का?

कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी मार्च ते मे महिन्यापर्यंत सर्व काही ठप्प होतं. भारतात हा काळ प्रामुख्याने परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या काळातच लॉकडाऊन झाल्यामुळे परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या.

पुढे या परीक्षा घ्याव्यात की घेऊ नयेत, यावरून बरंच रणकंदन माजलं. मुलांना सरसकट पास करू नये, कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या परीक्षा घेणं त्यांच्या करिअरच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचं आहे, अशी भूमिका राज्यातील विरोधी पक्ष भाजपने घेतली होती. पण परीक्षा न घेता अॅव्हरेज पद्धतीने विद्यार्थ्यांना गुण देऊ असं सत्ताधारी महाविकास आघाडीचं मत होतं.

यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात बरीच जुगलबंदी झाली. विनापरीक्षा पास केलेल्या विद्यार्थ्यांवर कोरोना ग्रॅज्यूएट म्हणून शिक्का बसेल, अशी भीती त्यावेळी भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली होती.

अखेर केंद्राच्या सूचनेनुसार राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली होती.

पण या परीक्षा घेऊनसुद्धा कोरोना ग्रॅज्यूएटचा शिक्का आपल्यावर बसल्याचं विद्यार्थ्यांना वाटतं. याची बरीच कारणं समोर येतात.

करिअर मार्गदर्शक योगीन गुर्जर यांच्या मते, "कोरोना काळात पास झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात अशा प्रकारच्या टोमण्यांना सामोरं जावं लागणारच आहे. ऑनलाईन परीक्षा पद्धतीत अनेक त्रुटी होत्या. त्या त्रुटींचा गैरफायदा घेत अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षांमध्ये गैरप्रकार केले. या सगळ्याचा एकंदरीत फटका संपूर्ण बॅचला बसणार आहे."

गुर्जर यांनी आपला मुद्दा पटवण्यासाठी एक उदाहरणही दिलं. ते सांगतात, "ऐशी-नव्वदच्या दशकातही असाच एक प्रकार घडला होता. त्यावेळी एका विद्यापीठात उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या गोडाऊनलाच आग लागण्याची घटना घडली होती."

"त्यामुळे त्या संपूर्ण बॅचलाच पास करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. पण पुढे त्या बॅचला जळीत कांड पीडित बॅच म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्या गोष्टीचा फटका त्यांना नोकरी मिळवताना बसला. त्या बॅचच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं, हे उदाहरण विसरून चालणार नाही," असं गुर्जर म्हणाले.

सरकारी नोकरीत एकवेळ या विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत, पण खासगी नोकरी मिळवताना त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. खासगी कंपन्या आठवीपासूनचा रेकॉर्ड तपासतात. विविध प्रकारचे प्रश्न विचारतात, अशा वेळी आपण उघडे पडू नये, याची काळजी घेणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे.

ज्ञानाचं मूल्यमापन योग्य प्रकारे व्हावं

ऑनलाईन परीक्षा दिल्याने आपल्याला डावललं जाण्याची भीती विद्यार्थ्यांच्या मनात आहे. याबद्दल बोलताना मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि शिक्षण तज्ज्ञ वैभव नरवडे यांनी काही गोष्टी समजावून सांगितल्या.

नरवडे सांगतात, "ऑनलाईन परीक्षा दिल्यामुळे आपल्याला संधी मिळणार नाही, अशी भीती विद्यार्थ्यांना वाटणं साहजिक आहे. ऑनलाईन शिक्षण आणि प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण यामध्ये निश्चितच फरक आहे. आपण मुलाखतींमध्ये आपलं ज्ञान कशा पद्धतीने समोर मांडतो, यावर सगळं अवलंबून आहे."

"त्यामुळे कंपन्यांकडूनही विद्यार्थ्यांचं योग्य प्रकारे मूल्यमापन करावं. त्यासाठी त्यांनी कोणत्याही पद्धतीने शिक्षण घेतलेलं असो की कोणत्याही पद्धतीने परीक्षा दिलेली असो. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये," असं नरावडे म्हणतात.

गुण आणि कौशल्य यामधील तफावत कळते

रुसा महाराष्ट्र या शैक्षणिक संघटनेचे पदाधिकारी विजय जोशी यांच्याशीही बीबीसी मराठीने चर्चा केली.

त्यांनाही कोरोना काळातील परीक्षांचा करिअरवर परिणाम होण्याची कोणतीच शक्यता वाटत नाही.

ते सांगतात, "एखाद्या विद्यार्थ्याला नोकरी हवी असेल आणि त्याने आपली मार्कशीट कंपनीच्या मुलाखतकाराला दाखवली तर मागच्या पाच सेमेस्टरमध्ये त्याची कामगिरी कशी होती, तेसुद्धा मुलाखतकाराने पाहावं.

कोरोना काळात ऑनलाईन परिक्षांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या अनेक बातम्या सुरुवातीच्या काळात आल्या होत्या.

आधीचे दोन-अडीच वर्ष सरासरी कामगिरी असलेल्या विद्यार्थ्यांनीही 80-90 टक्के गुण मिळाल्याचं निदर्शनास आलं. विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याची यंत्रणा सॉफ्टवेअरमध्ये नसल्यामुळे या गोष्टी घडल्याचा आरोप यामुळे झाला.

या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने आपल्या ऑनलाईन परिक्षा प्रॉक्टर्ड पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांवर कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.

पण विजय जोशी यांचं याबाबत वेगळं मत आहे. ते पुढे सांगतात, "80-90 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बेसिक आणि साध्या-सोप्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत तर त्याला काहीच अर्थ नाही. तुमचे गुण आणि तुमचं कौशल्य यामधील तफावत मुलाखतकाराला लगेच कळते. लबाडी करणारे विद्यार्थी तिथं हमखास पकडले जातात."

सध्याच्या काळात फक्त अंतिम वर्षाचे गुण विचारात न घेता सगळ्याच वर्षांचे गुण पाहिले जातात. त्या विद्यार्थ्याच्या कामगिरीत किती सातत्य आहे, ही गोष्ट अशा वेळी महत्त्वाची ठरते.

काही ठिकाणी फक्त पदवीच्या डिग्रीचा उपयोग नसतो तर ते काम प्रत्यक्षात येतं की नाही, हे पाहिलं जातं. उदाहरणार्थ मोटर मेकॅनिकला डिग्री कधीच विचारत नाहीत, त्याला संबंधित यंत्राची दुरुस्ती जमते की नाही, यावर त्याची निवड अवलंबून असते.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपण घेतलेल्या डिग्रीबाबत आनंद किंवा दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा आपल्यातील कमतरता हेरून त्या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे.

आपल्या क्षेत्रात आवश्यक मानलं जाणारं कौशल्य आत्मसात करण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. तुम्हाला कधीच अपयश येणार नाही, असं मार्गदर्शन जोशी यांनी केलं.

विद्यार्थ्यांना नोकरी न मिळण्याची कारणे वेगळी

नरवडे यांनीही याबाबत इतर बाजू स्पष्ट करून सांगितल्या.

नरवडे म्हणतात, "नोकरी मिळत नसलेल्या विद्यार्थ्यांनी खचून जाण्याचं कोणतंही कारण नाही. सध्याची वेळ निघून जाईल आणि पुन्हा नव्याने जग उभारी घेऊ लागेल,

त्यांच्या मते, "विद्यार्थ्यांना नोकरी न मिळण्याची कारणं वेगळीही असू शकतात. कोरोना लॉकडाऊनचा मोठा फटका उद्योगांना बसला. त्यामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली. काहींचे पगार कमी झालेत. आर्थिक तंगीमुळे नवी भरती केली जात नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर नुकतेच पास झालेल्या विद्यार्थ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते."

"पण या गोष्टींचा थेट संबंध कोरोना काळातील ऑनलाईन परीक्षांशी जोडला जाऊ नये. याबाबत कोरोना ग्रॅज्यूएट म्हणून कुणी हिणवत असलं तरी मुलांनी त्याकडे दुर्लक्ष करावं. त्यांनी आत्मविश्वास गमावता कामा नये," असा सल्ला नरवडे यांनी दिला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)