तालिबान : 'माझ्या मुलींचं भविष्य अंध:कारमय झालं आहे'- अफगाणिस्तानात कसा सुरु आहे जगण्याचा संघर्ष?

    • Author, रजनी वैद्यनाथन
    • Role, दक्षिण आशिया प्रतिनिधी, बीबीसी न्यूज

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथून शेवटचा परदेशी सैनिक परतल्याच्या गोष्टीला आता एक आठवडा होत आला आहे.

ते परतल्यानंतर मागे राहिलेल्या लोकांचं आयुष्य कसं सुरू आहे?

वेगवेगळ्या शहरांतील आणि राज्यातील चार जणांशी बीबीसीने संवाद साधला.

लोकांना जिवंत राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आपलं आयुष्य कुठेतरी हरवल्याचं या सर्वांनी सांगितलं. त्यांच्या सुरक्षेसाठी या सर्वांची नावे आम्ही बदलली आहेत.

मजार-ए-शरीफ

मजार-ए-शरीफ अफगाणिस्तानातील एक मोठं शहर आहे. हे अफगाणिस्तानातील प्रमुख आर्थिक केंद्र मानलं जातं.

ताजिकिस्तान आणि उझबेकीस्तानच्या सीमा या शहराला लागून आहेत.

कधी काळी हे शहर लोकनियुक्त सरकारचा बालेकिल्ला मानलं जायचं.

पण काबूलमध्ये दाखल होण्याआधी 14 दिवसांपूर्वीच तालिबानने मजार-ए-शरीफ ताब्यात घेतलं.

मजीब या शहरात एका रेस्टॉरंटमध्ये काम करायचे. पण आता त्यांच्यावर अन्नासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. मजार-ए-शरीफ येथून व्हीडिओ कॉलवर त्यांनी बीबीसीशी बातचीत केली.

त्यांनी आम्हाला एका इमारतीखालचं दृश्य दाखवलं.

तिथं काही पांघरूणांचा ढीग लागला होता. सध्या हेच माझं घर आहे, असं ते म्हणाले.

मजीब काही आठवड्यांपूर्वी या ठिकाणी आले. तालिबान आणि सरकारमधील संघर्षामुळे त्यांना आपलं घर सोडावं लागलं.

मजीब यांनी सांगितलं, "दहा वर्षांपूर्वी तालिबानने माझ्या वडिलांची हत्या केली होती. या गोष्टीला आता दहा वर्षे झाली तरी अजूनही घराबाहेर पडायला मला भीती वाटते. रोज रस्त्यांवर कुणाला ना कुणाला मारहाण होत असल्याचं दिसतं.

गेल्या आठवड्यात मजार-ए-शरीफ येथील काही व्हीडिओ व्हायरल झाले होते.

मोठ्या संख्येने अफगाण नागरिक हातात सुटकेस, प्लास्टिक पिशव्या घेऊन काबूलला जाणाऱ्या बसमध्ये जागा मिळवण्याचा प्रयत्न करत होते. देश सोडण्याच्या उद्देशाने ते काबूलच्या दिशेने जात होते.

आता अमेरिकन सैनिक काबूलमधून परत गेले आहेत. पण तरीही मजार-ए-शरीफमधून काबूलला येणाऱ्या लोकांची संख्या वाढतच आहे.

मजीब आता उझबेकिस्तानमार्गे देश सोडण्याच्या प्रयत्नात आहेत.

मजीब यांना देश सोडायचा आहे. मात्र यामध्ये ते यशस्वी होतात किंवा नाही याची त्यांना माहिती नाही.

ते म्हणतात, "आता तालिबान इथं आहे. लोकांनी देश सोडावं असं त्यांना वाटत नाही."

लष्करगाह, हेलमंद प्रांत

अफगाणिस्तानच्या दक्षिण भागातील हेलमंद प्रांत हा संघर्षादरम्यान ब्रिटिश सैनिकांचा अड्डा होता. तालिबानने 13 ऑगस्ट रोजी हा प्रांत आपल्या ताब्यात घेतला.

राजधानी लष्करगाहमध्ये कित्येक आठवडे भीषण लढाई सुरू होती.

डॉ. व्हिक्टर युरोसेव्हिक आपल्या कार्यालयातील नोटीसबोर्डकडे बोट दर्शवतात. त्यामध्ये प्लास्टिकच्या अनेक छोट्या पिशव्या लटकवलेल्या आहेत. ते सांगतात, "आम्ही याला लज्जेची भिंत असं संबोधतो."

मी या गोळ्या आमच्या तरूण रुग्णांच्या शरीरातून काढल्या आहेत. यामध्ये बहुतांश मोठ्या शस्त्रांची काडतुसे आहेत.

डॉ. व्हिक्टर युरोसेव्हिक लष्करगाहच्या एका रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये काम करतात. आता लढाई संपली. रुग्णालयात पूर्वीप्रमाणे गर्दी नाही. बाहेर बॉम्ब आणि गोळीबार थांबला आहे. रस्त्यांवर शांतता आहे."

ते सांगतात, "खूपच विचित्र वाटतं. मी गेली कित्येक वर्षे इथं काम करतो. अशी शांतता यापूर्वी कधीच पाहिली नाही. वादळापूर्वीची शांतता म्हणून मी याकडे पाहतो. पुढे काय होईल, काय माहीत?"

डॉ. व्हीक्टर सांगतात, "लष्करगाहमध्ये बॉम्बवर्षावामुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. लढाईच्या काळात अनेक जण इथून निघून गेले होते. ते परतले आहेत. लोक रस्त्यांवर, मशिदींबाहेर झोपतात. आपलं घर पुन्हा बांधण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत."

याठिकाणी मदतकार्य करत असलेले परदेशी वैद्यकीय कर्मचारी तालिबान आल्यानंतर निघून गेले आहेत. पण सर्बियाचे डॉ. व्हिक्टर युरोसेव्हिक यांनी इथंच थांबण्याचा निर्णय घेतला.

ते सांगतात, "आमच्याकडे एक जबाबदारी आहे. आम्ही या राज्यातील ट्रॉमा सेंटर चालवत आहोत. लोकांना जेवण, पैसा आणि औषधांची गरज आहे."

बदख्शान

अफगाणिस्तानच्या सर्वाधिक मागास प्रांतापैकी एक बदख्शान ईशान्येकडे वसलेला आहे. ताजिकिस्तानची सीमा या प्रांताला लागून आहे. तालिबानने 11 ऑगस्ट रोजी बदख्शानची राजधानी आपल्या नियंत्रणाखाली घेतली होती.

अब्दुल याच ठिकाणी डॉक्टर आहेत. गेल्यावेळी तालिबानची राजवट होती तेव्हा अब्दुल वैद्यकीय शिक्षण घेत होते.

ते सांगतात, "त्यावेळी परिस्थिती खूपच बिकट होती. आताही त्यांची वागणूक तेव्हासारखीच आहे. यामध्ये कोणताच फरक दिसून येत नाही."

अब्दुल यांनी एका रुग्णालयातून अनेक फोटो बीबीसीला पाठवले. रुग्णालय परिसरात तालिबानचा कडेकोट बंदोबस्त आहे.

एका फोटोत एक अशक्त मूल बेडवर पडलं होतं. त्याची आई त्याला वाचवण्याची विनंती कर्मचाऱ्यांना करताना यात दिसत आहे.

अब्दुल सांगतात, त्या महिलेकडे मुलाच्या जेवणासाठी काहीच पैसे नव्हते. इथं दिवसेंदिवस कुपोषणाची समस्या बळावत चालली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार, अफगाणिस्तानात पाच वर्षांपेक्षा कमी वयाची निम्म्याहून अधिक मुले पुढील वर्षी कुपोषणाचा बळी ठरू शकतात.

बदख्शानमधील नागरीक आधीपासूनच गरीबीला तोंड देत होते. तालिबानने कब्जा केल्यानंतर आता खाण्यापिण्याच्या वस्तू, तेल यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांचं काम बंद झालं. लोकांना गेल्या कित्येक महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.

डॉ. अब्दुल यांना महिलांच्या अधिकारांबाबतही खूप काळजी वाटते. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनाही कामाची परवानगी नाही. मुलींना सहावीपुढील वर्गात जाण्यावर मनाई करण्यात आली आहे.

लोकांना आता भविष्याबाबत कोणतीच उमेद नाही. लोकांसमोर कोणताच संधी उरलेली नाही, असं डॉ. अब्दुल म्हणाले.

हेरात

सिल्क रुटवर वसलेल्या हेरात शहराच्या सीमा ईराणला लागून आहेत. अफगाणिस्तानातील सर्वाधिक उदारमतवादी शहर म्हणून हे शहर ओळखलं जात होतं.

काबूलमधून अमेरिकन सैनिक परतल्यानंतर पुढच्याच दिवशी शेकडो तालिबान समर्थक शहराच्या रस्त्यांवर उतरले होते.

इतर नागरीक भीतीपोटी आपल्या घरातच बसून राहिले.

बाजारातून परतल्यानंतर गुल यांनी बीबीसीशी बातचीत केली.

त्यांनी सांगितलं, "संपूर्ण बाजारपेठेत तालिबान बंदुका घेऊन उभा आहे. रस्त्यांवर तुम्हाला समृद्ध नागरिक, महिला किंवा मुली दिसणार नाहीत. कारण सगळेच तालिबानला घाबरलेले आहेत."

गुल यांची पत्नी अफसून कोणत्याच पुरुषाला सोबत घेतल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. त्यांना बुरखा घालावा लागतो. त्या म्हणतात, "माझ्या मुलींचं आयुष्य अंधकारमय झालेलं आहे."

गुल यांची बहिण डॉक्टर आहे. आता इथून पुढे काही दिवस क्लिनिकला जाऊ नका, असं त्यांना सांगण्यात आलं होतं. तालिबान नेत्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील महिलांना कामावर जाण्याची परवानगी दिली आणि त्यानंतर त्या कामावर जाऊ शकल्या.

ते सांगतात, अजूनही अनेक महिलांना घरातच बसून राहण्यास भाग पाडलेलं आहे. गुल आणि त्यांचे कुटुंबीयही देश सोडण्याच्या प्रयत्नात आहेत.

ते म्हणतात, "आम्हाला कुठेही चालेल. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स कोणत्याही देशात आम्ही जाऊ शकतो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)