You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जावेद अख्तर RSS आणि तालिबानवर असं काय म्हणाले, ज्यानं इतका वादा झालाय?
प्रसिद्ध गीतकार आणि राज्यसभेचे माजी खासदार जावेद अख्तर यांनी टीव्ही वाहिनीच्या एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.
शुक्रवारी (3 सप्टेंबर) एनडीटीव्हीवरील एका कार्यक्रमात बोलताना जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी संघटनेची तुलना तालिबानशी केली होती.
भाजपच्या नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध केला असून जावेद अख्तर यांनी हात जोडून माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
"जावेद अख्तर जोपर्यंत संघ आणि विश्व हिंदु परिषदेच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांची हात जोडून माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा चित्रपट चालू देणार नाही," असं राम कदम यांनी ट्विटरवर एका वक्तव्यात म्हटलं.
''संघ परिवाराशी संलग्न असलेले लोक आज या देशातलं राजकारण चालवत आहेत, राजधर्माचं पालन करत आहेत. असं वक्तव्य करण्यापूर्वी किमान याचा तरी विचार करायला हवा होता. जर तालिबानची विचारसरणी असती तर त्यांना अशा प्रकारची वक्तव्य करणं शक्य झालं असतं का? यावरुनच त्यांचं विधान किती पोकळ आहे, हे स्पष्ट होतं," असं कदम म्हणाले.
राम कदम महाराष्ट्र विधानसभेचे घाटकोपर मतदारसंघातील आमदार आहेत. जावेद अख्तर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपचे कायदेशीर सल्लागार असल्याचं सांगणारे आशुतोष दुबे यांनी मुंबई पोलिसांत जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. आरएसएसची तालिबानशी तुलना केल्याप्रकरणी जावेद अख्तर यांच्या विरोधातपोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली.
काय म्हणाले होते जावेद अख्तर?
राज्यसभेचे खासदार जावेद अख्तर शुक्रवारी (3 सप्टेंबर) एनडीटीव्हीच्या एका शोमध्ये सहभागी झाले होते.
''ज्या पद्धतीनं तालिबानला मुस्लीम राष्ट्र हवं आहे, त्याचप्रमाणे हिंदु राष्ट्र असावं असं वाटणारेही लोक आहेत. हे सगळे लोक सारख्याच विचारसरणीचे आहेत. मग ते मुस्लीम असो, ख्रिश्चन असो, यहुदी असो वा हिंदु असो,'' असं ते शोमध्ये म्हणाले होते.
'तालिबान अधिक क्रूर आहे आणि त्यांची कृत्यं निंदनीय आहेत, हे स्पष्टच आहे. पण जे आरएसएस, बजरंग दल आणि व्हीएचपी सारख्या संघटनांचं समर्थन करतात, ते सगळे सारखेच आहेत.'
भारतीय लोकांच्या वैचारिक क्षमतेवर मला पूर्ण विश्वास आहे. भारतात राहणारे बहुतांश लोक हे सहिष्णू आहेत आणि त्याचा सन्मान करायला हवा. भारत कधीही तालिबानी राष्ट्र बनणार नाही, असंही अख्तर या कार्यक्रमात म्हणाले होते.
तालिबान संघटना काय आहे?
तालिबान हा अफगाणिस्तानातील कट्टरतावादी मुस्लीम गट आहे. त्यांनी शक्तीच्या जोरावर अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली आहे. तालिबाननं यापूर्वी 1996 मध्येही अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतली होती.
2001 मध्ये अमेरिकेनं अफगाणिस्तानवर आक्रमण करून तालिबानची सत्ता संपुष्टात आणली होती. आता तालिबाननं पुन्हा एकदा अफगाणिस्तावर सत्ता मिळवली आहे. ते याठिकाणी पुन्हा एकदा कठोर नियम लावतील अशी शक्यता आहे. त्यांनी अफगाणिस्तानला इस्लामी अमिरात जाहीर केलं आहे.
नसिरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यामुळंही झाला होता वाद
नसिरुद्दीन शाह यांनी तालिबानच्या अफगाणिस्तानवरील विजयानंतर एक व्हीडिओ पोस्ट केला होता.
"तलिबानच्या विजयाचा काही मुस्लीम गट जल्लोष साजरा करत आहे. पण त्यांना बदल हवा आहे, आधुनिक इस्लाम हवा आहे की अनेक दशकांचं क्रूर शासन हवं आहे," असं म्हणत शाह यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
"भारतीय मुस्लीम कायम जगभरातील मुस्लिमांपेक्षा वेगळे राहिले आहेत. ते तुम्हाला ओळखताही येऊ नये अशी वेळ ईश्वरानं आणू नये," असंही शाह म्हणाले होते.
त्यांच्या या वक्तव्यामुळं काही मुस्लीम नाराज झाले होते. नसिरुद्दीन शाह यांनी चुकीच्या पद्धतीनं तुलना केल्याचं काहींनी म्हटलं होतं, तर काहींनी शाह यांचं या वक्तव्यासाठी कौतुकही केलं होतं.
पत्रकार सबा नक्वी यांनी शाह यांच्या वक्तव्यावर टीका केली. भारतीय मुस्लिमांनी तालिबानची निवड केलेली नाही. मग भारतीय मुस्लीमांना तालिबानवर टीका करण्यास का सांगितलं जात आहे, असं त्या म्हणाल्या.
पत्रकार आदित्य मेनन यांनीही शाह यांचं वक्तव्य अनावश्यक आणि दुर्दैवी असल्याचं म्हटलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)