तालिबान म्हणतं, 'काश्मिरी मुस्लिमांबद्दल आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार'

    • Author, विनित खरे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन यांनी म्हटलंय की त्यांना जम्मू-काश्मीरमधल्या मुस्लिमांसाठी आवाज उठवायचा अधिकार आहे.

बीबीसीला झूमवरून दिलेल्या एका व्हीडिओ मुलाखतीमध्ये सुहैल शाहीन यांनी अमेरिकेसोबत झालेल्या कराराचं उदाहरण देत म्हटलं की कोणत्याही देशाविरोधात सशस्त्र मोहीम चालवणं त्यांच्या धोरणाचा भाग नाहीये.

दोहातून बोलताना शाहीन म्हणाले की, "एक मुसलमान म्हणून भारतात काश्मीरमधल्या किंवा अन्य कोणत्याही देशात मुस्लिमांसाठी आवाज उठवणं हा आमचा अधिकार आहे."

"आम्ही त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवू आणि म्हणू की मुसलमान तुमचे लोक आहेत, तुमच्या देशाचे नागरिक आहेत आणि तुमच्या कायद्यासमोर समान आहेत."

भारताचं नाव गेला काहीकाळ आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे. टीकाकारांचं म्हणणं आहे की सन 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं सरकार मुस्लिमांप्रती व्देष निर्माण करतंय. अर्थात भाजपने या गोष्टीचा कायमच इन्कार केलेला आहे.

जम्मू आणि काश्मीरची स्वायत्तता संपवण्याचा भारत सरकारचा निर्णय आणि त्याला लागू करण्याच्या पद्धतीमुळे अनेक लोक नाराज आहेत.

काश्मीर गेल्या चार दशकांपासून भारत-पाकिस्तानमधल्या वादाचं केंद्र ठरलेलं आहे. आता पाकिस्तानचं समर्थन लाभलेल्या तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवलेला आहे, आणि काही भारतात काही लोकांना ही चिंता सतवतेय की तालिबानच्या काही घटकांचं लक्ष जम्मू काश्मीरवर असू शकतं आणि त्यांना पाकिस्तानातल्या भारतविरोधी शक्तींचं समर्थन मिळू शकतं.

पाकिस्तानी टीव्हीच्या एका चर्चेतील याचसंदर्भातला व्हीडिओही बराच व्हायरल झालाय. पाकिस्तानचा सत्तारूढ पक्ष पीटीआयच्या प्रवक्त्या नीलम इर्शाद शेख म्हणताना दिसतायत की, "तालिबानने म्हटलंय की ते आमच्यासोबत आहेत आणि ते काश्मीरबाबत (स्वतंत्र करण्यात) आमची मदत करतील."

भारताच्या अडचणी वाढणार?

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली 2001 साली तालिबानला अफगाणिस्तानातून बाहेर काढलं गेलं होतं. याआधी भारताने नॉर्दन अलायन्सचं समर्थन केलं होतं जे तालिबानच्या विरोधात होतं.

आता 20 वर्षांनंतर पाकिस्तानचं समर्थन लाभलेलं तालिबान पुन्हा सत्तेत आलंय आणि यामुळे भारताच्या अडचणी वाढू शकतात कारण अशरफ घनी सरकारसोबत भारताचे चांगले संबंध होते.

भारताने अफगाणिस्तानच्या इंफ्रास्ट्रक्चर योजनांमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली होती. याव्दारे अफगाणिस्तानात स्वतःला सॉफ्ट पावर म्हणून स्थापित करण्याचा भारताचा प्रयत्न होता, पण आला तालिबान परत आल्यानंतर ही गुंतवणूक वाया जाईल अशी शंका आहे.

31 ऑगस्टला तालिबानसोबत झालेल्या पहिल्या अधिकृत चर्चेत भारताने आपली चिंता तालिबानच्या दोहा ऑफिसमध्ये शेर मोहम्मद अब्बास स्तानिकझई यांच्यासमोर मांडल्या.

या चर्चेदरम्यान भारताने म्हटलं की, "अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवाया किंवा कोणत्याही प्रकारच्या अतिरेकी कारवाया करण्यासाठी नाही झाला पाहिजे."

भारतासमोरचा यक्षप्रश्न

भारतीय धोरणांवर प्रसिद्ध झालेल्या कार्नेगी इंडियाच्या रिपोर्टनुसार अमेरिका अफगाणिस्तानाबाहेर निघताच उच्च दर्जाचं ट्रेनिंग आणि हत्यारं मिळालेल्या तालिबानच्या हक्कानी गटाने कथितरित्या काबूलमध्ये भारतीय दुतावासासह भारतीय मालमत्तेवर हल्ले केले.

रिपोर्टमध्ये म्हटलंय की, "आयएसआय आणि हक्कानी गटाच्या नेतृत्वात असलेले संबंध पाहाता असं वाटतंय की पुन्हा एकजूट झालेला हक्कानी समूह भारतविरोधी कार्यक्रम राबवत राहील."

शाहीन यांनी म्हटलं की हक्कानी गटाच्याविरोधात केलेले आरोप फक्त दावे आहेत. "कोणताही हक्कानी गट नाहीये. ते अफगाणिस्तान इस्लामी अमीरातीचा भाग आहेत. ते अफगाणिस्तान इस्लामी अमीरात आहे."

भारतीयांच्या मनात अजूनही काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या विमानाच्या अपहरणात तालिबानच्या भूमिकेच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्या विमानात 180 प्रवासी होते.

कार्नेगीच्या रिपोर्टनुसार, "हा (तालिबान) तोच समूह आहे ज्यांनी 1999 च्या इंडियन एअरलाईन्सच्या विमानाच्या अपहरणानंतर अतिरेक्यांना पाकिस्तानात जाण्यासाठी मदत केली होती."

पण शाहीन यांचं म्हणणं आहे की त्या विमान अपहरण प्रकरणात तालिबानची कोणतीही भूमिका नव्हती. त्यांनी आपल्याकडून मदतच केली होती आणि भारत सरकारने त्यांचे आभार मानले पाहिजेत.

ते म्हणतात, "भारत सरकारने आमच्याकडे मदत मागितली होती कारण विमानात इंधन कमी होतं. आणि आम्ही अपहृत व्यक्तींना सोडवण्यासाठी मदतही केली होती."

शाहीन यांनी भारतीय माध्यमांवर प्रोपेगंडा पसरवण्याचा आरोप केलाय.

दानिश सिद्दीकीची हत्या

तालिबानच्या प्रवक्त्यांनी दानिश सिद्दीकीची हत्या कोणत्या परिस्थितीत झाली याची कोणतीही माहिती आमच्याकडे नाही, असं म्हटलं.

त्यांनी म्हटलं की, "आम्हाला माहिती नाही ते कोणाच्या गोळीबारात मारले गेले. तिथे चकमक झाली, तिथे गोळीबार झाला होता."

पुलित्झर विजेत सिद्दीकी वृत्तसंस्था रॉयटर्ससाठी काम करत होते. ते अफगाण सैन्याच्या एका तुकडीसोबत होते ज्यावर तालिबानने हल्ला केला.

दानिश यांच्या हत्येनंतर काही दिवसांनी एका नागरिकाने बीबीसीला सांगितलं की दानिशच्या मृतदेहाला तालिबानकडून लढणाऱ्या लोकांनी घेरलं होतं आणि ते म्हणत होते की त्यांनी, "भारताच्या एका गुप्तहेराला पकडून ठार केलंय."

त्या घटनेची आठवण सांगत तो नागरिक म्हणाला की, "ते अजूनही असंच म्हणतायत."

शाहीन यांनी हे आरोप खोडून काढले आणि म्हणाले की, "लोक अशा तथ्य नसलेल्या गोष्टी करतच असतात." त्यांनी म्हटलं की ते दानिश यांच्या हत्येसंदर्भात सगळी माहिती माध्यमांना देतील.

सुहैल शाहीन यांनी पंजशीर खोऱ्यातली परिस्थिती 'तणावपूर्ण आहे' असं म्हटलं. तिथे अफगाणिस्ताचे माजी उप-राष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांच्या नेतृत्वाखाली तालिबानविरोधी गटाने तालिबानशी लढण्याचा निर्णय घेतला आहे.

तालिबान घरोघरी जाऊन लोकांना लक्ष्य करतंय, त्यांच्या कुटुंबाला धमक्या देतंय या आरोपाचाही तालिबानने इन्कार केलाय.

त्यांनी दावा केला की "कोणीही त्यांच्या हिट लिस्टवर नाहीये."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)