तालिबान-अफगाणिस्तान संघर्ष : 'या' अफगाण खासदाराला दिल्ली विमानतळावरून परत का पाठवलं गेलं?

फोटो स्रोत, Facebook
- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
नवी दिल्ली विमानतळावरून परत पाठवण्यात आलेल्या अफगाणिस्तानच्या खासदार रंगीना करगर यांनी पुन्हा दिल्लीत येणार नाही, असं म्हटलं आहे.
"मी लोकांनी निवडून दिलेली प्रतिनिधी आहे. मला भारताकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा होती," असं त्यांनी इस्तंबूल बीबीसीशी बोलताना म्हटलं.
रंगीना करगर मूळच्या अफगाणिस्तानातील फरयाब प्रांतातील आहेत. त्यांचं कुटुंब सध्या काबूलमध्ये आहे. रंगिना, त्यांचं एका वर्षाचं बाळ आणि पती हे सध्या इस्तानबूलमध्ये आहेत.
"मी 21 ऑगस्टला सकाळी सहा वाजता दिल्ली एअरपोर्टला पोहोचले होते. दुर्दैवानं त्यांनी मला भारतात प्रवेश दिला नाही. त्यांनी मला दुबईमार्गे इस्तंबूलला परत पाठवलं," असं रंगिना यांनी बीबीसी बरोबर बोलताना सांगितलं.
"मी अधिकाऱ्यांना एकटी महिला आणि खासदार असल्याचं सांगितलं. पण त्यांनी मला सुरक्षेला धोका समजत परत पाठवलं," असंही त्या म्हणाल्या.
रंगीना यांच्या मते या घटनाक्रमानंतर भारत सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क करून भारताचा आपत्कालीन व्हिसा देण्याचा प्रस्ताव दिला आहे.
दिल्ली विमानतळावर काय घडलं?
रंगीना डिप्लोमॅटिक पासपोर्टवर भारतात आल्या होत्या. हा पासपोर्ट असणाऱ्यांना अफगाणिस्तानबरोबर झालेल्या द्विपक्षीय करारानुसार भारतात व्हिसाशिवाय प्रवेशाची परवानगी आहे. अफगाणिस्तानही भारताच्या राजदूतांना अशी सुविधा देत होता.
पण एअरपोर्टवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी रंगीना करगर यांना फ्लाईटद्वारे दुबईहून पुन्हा इस्तंबूलला परत पाठवलं होतं.
"भारताकडून जेपी सिंह यांनी मला संपर्क करून आपत्कालीन व्हिसासाठी अर्ज करायला पाहिजे असं सांगितलं. माझं एक वर्षाचं बाळ आहे. मला त्यालाही सोबत न्यायचं होतं आणि त्यासाठी मी ई-व्हिसा अप्लाय केला होता. पण आम्हाला काहीही उत्तर मिळालं नाही," असं रंगीना सांगतात.

फोटो स्रोत, Rangina zargar facebook
जेपी सिंह भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव असून इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानशी संबंधित प्रकरणांचे प्रभारीदेखील आहेत.
"मी भारताच्या फ्लाइटच्या पूर्वी मुलासाठी व्हिसाचा अर्ज केला होता. पण आठवडाभरानंतरही आम्हाला अद्याप काहीही उत्तर मिळालं नाही,'' असं रंगीना म्हणाल्या.
"भारतानं एकदा मला परत पाठवलं आहे. आता निकटच्या भविष्यकाळात मी भारतात परत नाही येऊ शकणार," असं त्या म्हणाल्या.
भारताच्या वर्तणुकीवर टीका
रंगीना सध्या पती आणि मुलासह इस्तंबूलमध्ये आहेत. पण त्यांच्या कुटुंबातील बहुतांश सदस्य काबूलमध्ये आहेत. कुटुंबीयांच्या सुरक्षिततेबाबत त्या अत्यंत चिंतित आहेत.

फोटो स्रोत, EPA
"माझे कुटुंबीय अफगाण सरकारच्या वतीनं तालिबानच्या विरोधात लढत होतं. पण सध्या तालिबान सत्तेत आहे. अफगाणिस्तानातील स्थिती अत्यंत वाईट आहे. मी प्रत्येक क्षणाला कुटुंबीयांच्या चिंतेत आहे," अशी काळजी रंगिना यांनी बोलून दाखवली.
"मी भारत सरकारला सांगू इच्छिते की, अफगाणिस्तान सरकार आणि भारत सरकारमधील संबंध खूप चांगले होते. आपण एकमेकांना खूप सहकार्य केलं आहे. मी एक खासदार आहे. भारतात माझ्याबरोबर असं वर्तन केलं जाईल अशी मला अपेक्षा नव्हती. मी एक महिला आहे आणि एकटी प्रवास करत होते. जगानं अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी दारं खुली केली आहेत. पण भारतानं मला परत पाठवलं. मी या वर्तनाचा निषेध करते."
"मला विमानतळावरून परतवल्यानंतर भारतानं अफगाणिस्तानातील हिंदु आणि शिखांना भारतात येऊ दिलं होतं. आम्ही भारताचे सहकारी आहोत, आम्हाला भारताकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा होती," असं त्या म्हणाल्या.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचं म्हणणं काय आहे?
काही वृत्तांनुसार भारत सरकारनं चूक झाल्याचं मान्य केलं असून त्यांच्याशी संपर्क साधल्याचंही सांगितलं आहे.
गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, तेव्हा सरकारनं ही माहिती दिल्याचं इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अफगाणिस्तानातील भारताच्या वाणिज्य दुतावास आणि दुतावासात असलेले अफगाणी नागरिकांचे पासपोर्ट तालिबाननं नेले होते. त्यानंतर सुरक्षा संस्था अफगाणिस्तानातून भारतात येणाऱ्यांबाबत दक्ष होत्या. त्यामुळंच रंगिना यांना परत पाठवण्यात आलं होतं, असं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं गेलं.
अफगाणिस्तानात सुरक्षेची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. गुरुवारी काबूल एअरपोर्टवर झालेल्या बॉम्ब स्फोटांत अमेरिकेच्या सैनिकांसह किमान 90 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका 31 ऑगस्टला काबूलमधील सुरक्षा मोहीम संपवत आहे. त्यानंतर काबूल एअरपोर्टही तालिबानच्या ताब्यात जाईल.
तालिबाननं 15 ऑगस्टला काबूलवर ताबा मिळवला होता. या दरम्यान अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी देश सोडून गेले होते. भारतानं अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी आपत्कालीन ई व्हिसाची घोषणा केली आहे. पण हा व्हिसा सहज मिळत नसल्याचं अफगाणिस्तानच्या नागरिकांचं म्हणणं आहे.
ई-व्हिसामध्ये अडचणी
भारतीय दूतावासात शैक्षणिक व्हिसासाठी अर्ज केला होता, पण व्हिसा मिळालाच नाही, असं काबूलमध्ये राहणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थिनीनं बीबीसीला सांगितलं.
ही विद्यार्थिनी भारताच्या पंजाब विद्यापीठात शिकते. सध्या ती काबूलमधूनच ऑनलाइन क्लास करत होती. आता तिचे वर्ग सुरू झाले आहेत. पण व्हिसा मिळाला नसल्यानं ती भारतात येऊ शकली नाही.
''मी कुटुंबातील पाच महिला सदस्यांसह घरात कैदेत आहे. आमच्या घराबाहेर तालिबान उभं आहे. आम्ही खिडक्याही उघडू शकत नाही," असं ही विद्यार्थिनी म्हणाली.
"मला भारतात येऊऩ शिक्षण सुरू ठेवायचं होतं, पण भारतानं मला व्हिसा दिला नाही. मी ई व्हिसासाठी अर्ज केला आहे, पण अद्याप उत्तर मिळालेलं नाही," असं ती म्हणाली.
31 ऑगस्टनंतर काबूल एअरपोर्टच्या सुरक्षेत तैनात असलेले अमेरिका आणि नाटोच्या सैन्याचे जवान परतणार आहेत. त्यानंतर काबूल एअरपोर्टची स्थिती नेमकी काय असेल, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








