तालिबान अफगाणिस्तानमध्ये फिंगरप्रिंटच्या साहाय्याने 'शत्रुंचा' शोध घेणार?

बायोमेट्रिक, अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ख्रिस वॉलेस
    • Role, तंत्रज्ञान प्रतिनिधी

अमेरिकेच्या मरीन फोर्सचे माजी अधिकारी पीटर किअर्नन जुन्या आठवणी सांगताना म्हणतात, "आम्ही अफगाणिस्तानातल्या गावांमध्ये जाऊन बायोमेट्रिक डेटा सिस्टिमने लोकांचं नाव रजिस्टर करायचो."

त्यांनी सांगितलं की, "12 इंच लांब आणि सहा इंच जाड या उपकरणाच्या सहाय्याने लोकांच्या बोटांचे ठसे घेतले जायचे आणि त्यांच्या डोळ्यातला रेटिना स्कॅन केला जायचा. या उपकरणाने त्यांचा फोटोही काढला जायचा."

पीटर गेल्या काही दिवसांपासून धावपळीत आहेत. जेव्हा ते अफगाणिस्तानात होते तेव्हा 12 स्थानिक दुभाषे त्यांच्यासाठी काम करायचे.

स्थानिक लोकांशी बोलण्यात हे दुभाषे त्यांना मदत करायचे. या बातमीसाठी जेव्हा पीटर यांच्याशी आम्ही बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्या सहकाऱ्यांपैकी अजूनही कित्येकजण अफगाणिस्तानातच अडकलेले आहेत. पीटर त्या लोकांना तिथून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत.

अमेरिकन सुरक्षा यंत्रणांसोबत काम केलेल्या लोकांना अफगाणिस्तानातून लवकरात लवकर बाहेर पडणं गरजेचं झालेलं आहे. संयुक्त राष्ट्रांचं एक दस्ताऐवज पाहण्याची संधी बीबीसीला मिळाली. यानुसार तालिबान अशा लोकांना शोधतंय ज्यांनी नाटो आणि अमेरिकन सैन्याची मदत केली किंवा त्यांच्यासाठी काम केलं होतं.

अशात अनेक लोकांना असं वाटतंय की अमेरिकन सैन्य आणि अफगाणिस्तान सरकारने जो बायोमेट्रिक डेटा गोळा केला होता तो आता अशा लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यांना तालिबान आता सूडाच्या भावनेने कारवाई करेल ही भीती आहे.

बायोमेट्रिक, अफगाणिस्तान

फोटो स्रोत, EPA

मानवधिकारासाठी काम करणारी संस्था 'ह्युमन राईट्स फर्स्ट'चे सल्लागार ब्रायन डूले यांनी बीबीसीला सांगितलं की याबाबतीत ठोस माहिती नाहीये पण "अंदाज असाय की बायोमेट्रिक डेटाचा भलामोठा साठा तालिबानच्या हातात एकतर आलाय किंवा हातात येण्याच्या बेतात आहे."

हँडहेल्ड इंटरएजेंसी आयडेंटिटी डिटेक्शन इक्विपमेंट नावाच्या यंत्राचा वापरून करून पीटरसारख्या सैनिकांनी अफगाणिस्तानातल्या नागरिकांचा डेटा अमेरिकन बायोमेट्रिक स्टोरमध्ये भरला.

त्यांनी सांगितलं की ही यंत्रणा बॉम्ब बनवणाऱ्या लोकांची ओळख पटवता यावी म्हणून बनवली होती, पण याव्दारे अमेरिकन सैन्यासोबत काम करणारे ठेकेदार आणि स्थानिक लोकांची ओळखही पटवली जात होती.

सैन्याची महत्त्वकांक्षी योजना

सुरूवातीला सैन्याची योजना होती की अफगाणिस्तानातल्या जवळपास 80 टक्के लोकसंख्येला या यंत्रणेत समाविष्ट करून घ्यावं, पण प्रत्यक्षात फारच कमी लोकांचा डेटा स्टोर होऊ शकला.

न्यूज वेबसाईट द इंटरसेप्टने मंगळवारी सैन्याच्या सुत्रांच्या हवाल्याने सांगितलं की काही उपकरणं तालिबानच्या हाती आले आहेत. तर वृत्तसंस्था रॉयटर्सने काबुलमधल्या एका व्यक्तीच्या हवाल्याने सांगितलं की तालिबान 'बायोमेट्रिक मशीन' चा वापर करून घराघरात जाऊन झडती घेत आहेत.

एका अफगाण अधिकाऱ्याने 'न्यूसायंटिस्ट' ला सांगितलं की अफगाणास्तानातली बायोमेट्रिक यंत्रणा आता तालिबानच्या हातात गेली आहे.

बायोमेट्रिक, अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकन थिंक टँक 'द ट्रूमन नॅशनल सिक्युरिटी प्रोजक्ट' चे सदस्य म्हणून काम करणाऱ्या पीटर यांचं म्हणणं आहे की तालिबानींकडे मित्रराष्ट्रांचा डेटा पोहोचला असेल अशी शक्यता आहे. याचा फायदा करून घेण्याइतकी तालिबानची तंत्रज्ञानावर पकड आहे की नाही हे माहिती नाही.

मिल्ट्री बायोमॅट्रिक्सवर संशोधन करणाऱ्या पत्रकार अॅनी जॅकबसन म्हणतात की तालिबानच्या हातात मशीन्स आल्या तरी ते मोठ्या प्रमाणावर डेटा मिळावू शकतील अशी शक्यता नाही.

त्या म्हणतात, "कोणा भ्रष्ट अधिकाऱ्याने पैसे घेऊन डेटा बाहेर द्यायला नको या विचाराने अफगाणिस्तानातल्या सहकाऱ्यांना मोठ्या प्रमाणत आधी डेटा दिलाच नव्हता."

हा डेटा अफगाणिस्तानात स्टोर केलेला नाही तर पेटांगॉनच्या स्वयंचलित बायमेट्रिक्स ओळख प्रणालीत सेव्ह केला आहे. ही यंत्रणा इतकी गुंतागुंतीची आहे की हिला 'सिस्टिम ऑफ सिस्टिम' असं म्हटलं जातं.

अफगाणिस्तान, तालिबान

फोटो स्रोत, Getty Images

त्या म्हणतात की प्रत्यक्षात सोशल मीडियावरून माहिती मिळवणं तालिबान जास्त सोपं पडेल.

बीबीसीने याबाबतीत अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून त्यांची प्रतिक्रिया मागवली आहे.

नागरिकांशी संबंधित डेटा

अर्थात अफगाणिस्तानातल्या सरकारनेही आपल्यासाठी बायोमेट्रिक्स डेटा गोळा केला होता.

अफगाणिस्तानातच्या राष्ट्रीय सांख्यकी आणि माहिती-प्रसारण (एनएसआयए) विभागाने आपल्या 'इ-तजकिरा' बायोमेट्रिक ओळखपत्र बनवण्यासाठी साठ लाखाहून अधिक अर्ज प्रोसेस केले आहेत. यात लोकांच्या बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन आणि त्यांचे फोटो घेतले आहेत.

2019 साली झालेल्या निवडणुकांच्या वेळी मतदारांच्या नोंदणीकरणासाठी चेहऱ्याची ओळख यासह इतर बायोमेट्रिक्सचा वापर केला होता.

याखेरीज देशात व्यावसायिकांसाठी एक रजिस्टर लॉन्च केलं होतं. मदरशांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा बायोमेट्रिक डेटा गोळा करण्याची योजना बनवली होती.

2016 साली एका अफगाण प्रसारकाने सांगितलं होतं की एका बसमधल्या प्रवाशांपैकी कोण सैनिक आहेत हे ओळखण्यासाठी तालिबानने बायोमेट्रिक रीडरचा वापर केला होता. या हल्ल्यात 12 जणांचा जीव गेला होता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)