Tokyo Olympics डायरी : आदिती अशोक आणि गोल्फसाठी भारतात नवी पहाट

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

शुक्रवारची (6 ऑगस्ट) गोष्ट आहे. सकाळी सकाळी आम्ही काही गोष्टी रेकॉर्ड करत होतो आणि एकीकडे सामन्यांवर लक्ष ठेवून होतो.

अचानक मला एका मित्राचा मेसेज आला. आदिती अशोक खरंच मेडल जिंकणार आहे का आणि ती गोल्फ खेळते म्हणजे नेमकं काय करते?

मी काही क्षण फोनकडे पाहात होते. आणि मला जाणवलं, की त्यालाच नाही तर माझ्या आसपासच्या काही पत्रकारांना भारतातल्या अनेकांना हा प्रश्न पडला असेल.

तरीही त्यातले अनेकजण सकाळी लवकर उठून टीव्ही लावून आदितीचा सामना पाहत होते. हे असं पहिल्यांदा होत नाहीये.

2008 साली अभिनव बिंद्रानं सुवर्णपदक जिंकल्यावर अचानक लोकांना नेमबाजीत रस वाटू लागला. 2016 साली ललिता बाबर फायनलमध्ये पोहोचली, तेव्हा भारतीयांना स्टीपलचेस या प्रकाराची ओळख झाली.

त्याच वर्षी आदितीनं ऑलिंपिकमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हाच गोल्फनं ऑलिंपिकमध्ये पुनरागमन केलं होतं. त्यावेळी आदितीकडे बहुतेकांनी फारसं लक्षही दिलं नव्हतं. पण पाच वर्षांनी परिस्थिती बदलली. आदिती पदकाच्या शर्यतीत आहे, म्हटल्यावर मात्र अचानक गोल्फ विषयी चर्चा होऊ लागली.

हीच ऑलिम्पिकची गंमत आहे. ही केवळ पदकांसाठी स्पर्धा नाही, तर सर्वोच्च स्तरावरचं खेळांचं प्रदर्शन आहे. नव्या खेळाडूंची आणि खेळांचीही जगाला ओळख करून देणारं व्यासपीठ आहे. एरवी कोणी कशाला तलवारबाजीचे सामने टीव्ही लावून पाहात बसेल? पण सीए भवानी देवीसाठी यंदा अनेक भारतीयांनी तेही केलं.

स्केटबॉर्डिंग, सर्फिंग, स्पोर्टस क्लायंबिंग अशा नव्या खेळांची ओळख या ऑलिम्पिकनं करून दिली आहे आणि भारतींयांमध्ये पहिल्यांदाच गोल्फमध्ये एवढा रस निर्माण केला आहे.

एक गोष्ट मीही कबूल करते, मी आयुष्यात फक्त एकदा गोल्फचा सामना प्रत्यक्ष पाहिला आहे आणि फक्त एकदाच गोल्फ खेळण्याचा प्रयत्न केला आहे. म्हटलं तर समजायला सोपा पण म्हटलं तर थोडा गोंधळात टाकणारा हा खेळ आहे.

थोडक्यात आणि साध्या शब्दांत सांगायचं, तर ऑलिम्पिकच्या स्टँडर्ड गोल्फ कोर्समध्ये अठरा होल्स असतात आणि खेळाडूंना एका फेरीत अठराही होल्समध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न करायचा असतो. गोल्फ क्लब म्हणजे ती हॉकीसारखी वाटणारी स्टीक जिच्यानं खेळाडू बॉल होलमध्ये टाकतात.

टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?

प्रत्येक होलसाठी किती शॉट्स लागतील हे ठरवलेलं असतं - त्यालाच पार स्कोर म्हणतात. उदा. पार 4 म्हणजे बॉल होलमध्ये टाकण्यासाठी खेळाडूंकडे चार शॉट्स आहेत.

'अंडर पार' म्हणजे पार स्कोरपेक्षा कमी शॉट्समध्ये बॉल होलमध्ये टाकणं. जो खेळाडू 'अंडर' असतो म्हणजे कमीत कमी शॉट्समध्ये होल्स पूर्ण करतो, तो विजेता ठरतो.

आदितीची पदक मिळवण्याची संधी केवळ एका शॉटनं हुकली आहे. पण तिच्या चौथ्या स्थानानं गोल्फला भारतात नवी ओळख मिळवून दिली आहे. एरवी केवळ श्रीमंतांचा खेळ, न समजणारा खेळ अशी प्रतिमा असलेल्या या खेळात सामान्यांना नवा रस निर्माण झाला तर आश्चर्य वाटणार नाही.

भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)