गजबजलेल्या घरात झालेल्या तरुणीच्या खुनामुळे खळबळ का माजली?

नूर मुक़द्दम

फोटो स्रोत, SM Viral Post

फोटो कॅप्शन, नूर एक साधी मुलगी होती, असं तिचे मित्रमैत्रिणी सांगतात.
    • Author, हुमेरा कनोल, आबीद हुसेन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, इस्लामाबाद

पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादेत माजी राजदूताच्या मुलीच्या हत्येनं शहरात खळबळ माजली आहे.

नूर मुकद्दमच्या मृत्यूची कहाणी अत्यंत वेदनादायी आहे. कारण हे काही सामान्य मृत्यू प्रकरण नाही.

शवपेटीत कापडात गुंडाळलेल्या नूरचं शीर धडापासून वेगळं झालेलं होतं. ही काही अचानक घडलेली घटना नाही, तर निर्घृण हत्येचं धक्कादायक असं प्रकरण आहे.

नूरच्या हत्येनंतर तिचं शीर कापण्यात आलं. तिच्या हत्येच्या संशयात तिचा बालपणीचा मित्र झाहीर जफीरला अटक करण्यात आली आहे. दोघांच्या कुटुंबीयांची एकमेकांशी जुनी ओळख आहे.

पोलिसांच्या तपासानुसार 20 जुलैला इस्लामाबादच्या राहणाऱ्या नूर मुकद्दम हिची धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ज्या घरात नूरची हत्या झाली होती, त्याठिकाणी घटनेच्या वेळी अनेक लोक उपस्थित होते.

नूर मुकद्दमचे वडील आणि माजी राजदूत शौकत मुकद्दम यांनी एफआयआरमध्ये तिचा मित्र झाहीरचं नाव दिलं आहे. शौकत मुकद्दम हे दक्षिण कोरियात पाकिस्तानचे राजदूत होते.

दगडालाही पाझर फुटावं असं नूरच्या अंत्ययात्रेचं दृश्य होतं. 'मी लेकीला अल्लाहकडे सोपवलं आहे,' असं नूरच्या चेहऱ्याकडं पाहत तिचे वडील वारंवार म्हणत होते.

कब्रस्तानात दफनविधी

नूरबरोबर घडलेल्या घटनेबाबत तिच्या वडिलांना बऱ्याच वेळानंतर माहिती देण्यात आली. 'तिला गोळी लागली आहे का?' असं तिचे वडील विचारायचे, त्यावर सगळे त्यांना होकार द्यायचे.

'जनाजे की नमाज'साठी शवपेटी मशिदीत नेली जात होती, तेव्हा प्रत्येकजण शांत होता. सर्वांच्या चेहऱ्यावर प्रचंड धक्का बसल्याचे भाव होते. सगळीकडं एक विचित्र अशी शांतता पसरलेली होती.

सर्व लोक नूरच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होते. कुटुंबीयदेखील अत्यंत धैर्यानं सर्वांना भेटत होते, पण त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.

कब्रस्तानमध्ये असलेले नूर यांचे वडील आणि माजी राजदूत शौकत मुकद्दम हे एका दगाडाचा आधार घेऊन मुलीच्या कबरीजवळ बसले होते. हत्येच्या दिवशी सायंकाळपर्यंत ते पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात अडकले होते, असं त्यांनी सांगितलं.

नूर ही मनाने अत्यंत चांगली होती. ती गल्लीतील कुत्र्या-मांजरांनाही खाऊ घालायची, असं तिच्या मैत्रिणीनं सांगितलं.

पाकिस्तानात दफन

'आम्ही सगळे फार तणावात आहोत. आमची मुलं सुरक्षित नाहीत आणि त्यांचं संरक्षण कसं करावं. नूरची हत्या जेवढी क्रूरपणे करण्यात आली, ते कृत्य माफ करण्यासारखं नाही. सरन्यायाधीशांनी याची दखल घ्यायला हवी, असं कब्रस्तानमध्ये आलेली एक महिला म्हणाली.

'ती जणू खरंच 'नूर' होती. तिनं कधीही कुणाबाबत वाईट विचार केला नाही. कुणाबाबत वाईट बोललीही नाही. ती एक पेंटर आणि समाजसेवक होती. प्रत्येक मित्राच्या वाढदिवसाला स्वतः कार्ड तयार करायची, असं नूरची जवळची मैत्रीण आलिया गुल म्हणाली.

तिच्याबरोबर जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. ती ज्या घरात राहायची तिथं अनेक नोकर होते, असं तिच्या मित्रांनी सांगितलं.

'ज्या घरात एवढे लोक आहेत, त्याठिकाणी अशी हत्या कशी होऊ शकते? याचा कुणी विचारही करू शकत नाही,' असं तिचे मित्र म्हणतात.

ती अत्यंत हळू आवाजात बोलायची. हत्येच्या वेळी तिनं मदतीसाठी नक्की हाक मारली असेल, पण तिचा आवाज कुणाला ऐकू आला नसेल, असं तिचे मित्र म्हणतात.

नूरच्या हत्येच्या संशयात तिचा मित्र झाहीर जफीरला अटक करण्यात आली आहे. त्याचे वडील इस्लामाबादच्या एका मोठ्या रियल इस्टेट कंपनीचे सीईओ आहेत.

इस्लामाबाद पोलिसांची प्रेस कॉन्फरन्स
फोटो कॅप्शन, इस्लामाबाद पोलिसांची प्रेस कॉन्फरन्स

नूर मुकद्दमच्या दफनविधीनंतर काही तासांनी लगेचच इस्लामाबाद पोलिसांनी या हत्येबाबत पत्रकार परिषद घेतली.

आरोपी झाहीर जफीरला अटक करण्यात आली तेव्हा, त्याची मानसिक स्थिती अत्यंत चांगली होती आणि तो पूर्ण शुद्धीत होता, असं इस्लामाबाद पोलिसांनी सांगितलं.

तपास करणारे एसएसपी अताउर्रेहमान यांनी सोशल मीडियावरील चर्चांना उत्तर दिलं. आरोपीची मानसिक स्थिती यापूर्वी कधीतरी बिघडलेली असेल. पण ज्यादिवशी त्याला अटक झाली, तेव्हा त्याची मानसिक अवस्था चांगली होती, असंही पोलिसांनी सांगितलं.

झाहीर जफीर मानसिक तणावात होते, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती.

'तो पूर्ण शुद्धीत होता. त्यानं कुणावर तरी हल्ला केला होता. त्यामुळं त्याला बांधण्यात आलं होतं. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा लोकांनी त्याला पकडून ठेवलं होतं. या घटनेबद्दल सांगायचं तर तो पूर्ण शुद्धीत होता,'' असं पोलिस म्हणाले.

आरोपीनं हत्येचा गुन्हा नाकारला तरी पोलिसांकडं पुरेसे पुरावे आहेत आणि न्यायालयात पुराव्यांनाच महत्त्व असतं, असं पोलिसांचं मत आहे.

पोलिसांनी हत्येसाठी वापरलेलं शस्त्र जप्त केल्याचा दावाही केला आहे.

पोलिसांना घटना स्थळावरून चाकू आणि पिस्तुल मिळालं आहे. पण तपास आणि वैद्यकीय अहवालावरून पिस्तुलाचा वापर झालाच नसल्याचं स्पष्ट झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पिस्तुलात गोळी अडकली होती, त्यामुळं ती सुटली नाही, असंही पोलिसांचं म्हणणं होतं.

पोलिसांनी आरोपींना घटनास्थळावरून अटक केली होती, सध्या तो रिमांडमध्ये आहे.

हत्येपूर्वी काय झालं असावं, असं पोलिसांना विचारण्यात आलं. त्यावर आधी भांडण झालं होतं, असं घरातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. पण त्याचं कारण काय होतं, याचा तपास केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

माजी राजदुतांच्या मुलीची अशा प्रकारे निर्घृण हत्या झाल्यानं संपूर्ण इस्लामाबादमध्ये भीतीचं वातावरण आहे. राजकीय नेत्यांसह सामान्य नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)