पाकिस्तान : अफगाणिस्तानच्या राजदूतांच्या मुलीचं अपहरण

फोटो स्रोत, @NAJIBALIKHIL
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादेत सशस्त्र हल्लेखोरांनी अफगाणिस्तानच्या राजदूतांचं अपहरणाचा प्रयत्न केला असल्याची माहिती, पोलिसांनी दिली आहे.
हल्लेखोरांना यात यश आलं नाही. मात्र, त्यांनी राजदूतांच्या मुलीचं अपहरण केलं आणि तिला मारहाण करून त्यांनी त्याठिकाणाहून पळ काढला.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेची दखल घेतली असून गृह मंत्रालय, पोलिस आणि संबंधित संस्थांना या घटनेची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी संबंधित यंत्रणांनी 48 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रध्यक्ष हमीद करझई यांनी ट्विट करून या प्रकारावर टीका केली आहे. ''पाकिस्तानात अफगाणिस्तानच्या राजदूतांच्या मुलीचं अपहरण करून तिला मारहाण करणं हे दुर्दैवी आणि निंदनीय आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी ही पाकिस्तान सरकारला विनंती आहे,'' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
पाकिस्तानातील अफगाणिस्तानचे राजदूत नजिबुल्लाह अलिखेल यांनीही या प्रकरणी ट्विट केलं. ''शनिवारी इस्लामाबादेत माझ्या मुलीचं अपहरण करण्यात आलं आणि तिला खूप मारहाणदेखील करण्यात आली. पण ईश्वराची कृपा म्हणून माझी मुलगी त्याठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाली. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे पण हे अमानवी कृत्य आहे. या प्रकरणावर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची नजर आहे,'' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
नजिबुल्लाह यांनी मध्यरात्री त्यांच्या मुलीचा फोटो पोस्ट करत हे ट्विट केलं आहे. ''मला माझ्या मुलीचा फोटो नाईलाजानं पोस्ट करावा लागला, कारण सोशल मीडियावर तिच्या नावानं दुसरे कुणाचे तरी फोटो पोस्ट केले जात आहेत.''
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
इम्रान खान यांनी याबाबत अधिकृत माहिती देत, पाकिस्तान सरकार राजदूत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.
पोलिसांनी या घटनेतील दोषींना लवकर अटक करावी असं, पाकिस्तानचे गृहमंत्री सय्यद रशीद यांनी म्हटलं आहे.
घटना कशी घडली?
पोलिसांच्या मते पाकिस्तानातील अफगाणिस्तानचे राजदूत नजिबुल्लाह अलिखेल यांची मुलगी सिलसिला अलिखेल खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी सशस्त्र हल्लेखोरांनी तिचं अपहरण केलं आणि अज्ञात स्थळी नेलं.
इस्लामाबादच्या कोहसारमधील बिलोर एरिया बाजार परिसरातील ही घटना आहे. एका गुप्तचर संस्थेनं या घटनेबाबत माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. राजदुतांची मुलगी भावासाठी गिफ्ट खरेदी करण्यासाठी गेली होती, तेव्हा परत येताना तिची टॅक्सी अडवण्यात आल्याचं, त्यांनी सांगितलं होतं.

फोटो स्रोत, NAJIB ALIKHIL ON TWITTER
ती गाडीत बसत होती तेव्हा एक अज्ञात व्यक्तीही गाडीत बसला. त्यावेळी सिलसिलानं त्याचा विरोधही केला.
पण अज्ञात व्यक्तीनं तिचं तोंड दाबून तिला मारहाण केली, त्यात ती जखमी झाल्यानं बेशुद्ध झाली होती, असंही पोलिसांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
सिलसिला शुद्धीत आली त्यावेळी ती एका जंगलात होती. तिनं रस्त्यानं जाणाऱ्या एका व्यक्तीला विचारलं तर त्यानं तो भाग सेक्टर एफ-सेव्हनचा असल्याचं सांगितलं, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
सिलसिला अली ही तिथून एका टॅक्सीमध्ये बसली आणि त्यानंतर एफ - 9 पार्कमध्ये जाऊन तिनं एका ओळखीच्या व्यक्तीला फोन केला. त्याठिकाणाहून एका सरकारी गाडीत ती घरी पोहोचली होती. सिलसिला हिनं हिकमत नावाच्या व्यक्तीला फोन केला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
अफगाणिस्तानातून घटनेवर टीका
अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत एक वक्तव्य जारी केलं आहे. त्यात पाकिस्तानात अफगाणिस्तानच्या राजदूतांच्या मुलीचं अनेक तास अपहरण करून अज्ञात लोकांनी मारहाण केल्याचं म्हटलं आहे. अपहरण करणाऱ्यांच्या ताब्यातून सुटल्यानंतर सिलसिला हिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अफगाणिस्ताननं प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यामध्ये या कृत्याचा निषेध केला आहे. तसंच पाकिस्तानात राजदूत, त्यांचे कुटुंबीय आणि दुतावासांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंताही यात व्यक्त करण्यात आली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
पाकिस्तानच्या सरकारकडे अफगाणिस्तानच्या दूतावास आणि राजदूतांच्या सुरक्षेसाठी त्वरित पावलं उचलण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांना अटक करण्यात यावी असं अफगाणिस्ताननं पाकिस्तानला म्हटलं आहे.
दोषींना 48 तासांत अटक करण्याचे इमरान खान यांचे आदेश
पाकिस्तानात अफगाणिस्तानचे राजदूत म्हणून कार्यरत असलेल्या नजिबुल्लाह अलीखिल यांच्या मुलीचं अपहरण करून तिला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी गृहमंत्री शेख रशीद यांना केली आहे.
दोषींचा शोध घेऊन त्यांना 48 तासांच्या आत अटक करावी, असे आदेशही इमरान खान यांनी दिले आहेत.
अफगाणिस्तानचे राजदूत नजिबुल्लाह अलीखिल यांची मुलगी सिलसिला अलीखिल हिचं अपहरण इस्लामाबाद येथून शुक्रवारी करण्यात आलं होतं.
27 वर्षांची सिलसिला अलीखिल शुक्रवारी दुपारी इस्लामाबादच्या एका बेकरीत गेली होती. तिथून ती एका टॅक्सीत बसून घरी परतत होती. दरम्यान, टॅक्सी ड्रायव्हरने आणखी एका व्यक्तीला टॅक्सीत बसवलं. त्यानंतर सिलसिला हिचं अपहरण करण्यात आलं. अपहरणानंतर सिलसिला हिला जबर मारहाणही करण्यात आली.
अखेर, बेशुद्ध अवस्थेत तिला एका रस्त्याच्या बाजूला सोडून देण्यात आलं होतं. तिला मारहाण झाल्याचं वैद्यकीय चाचणी अहवालातही समोर आलं आहे.
या प्रकरणातील आरोपींना पकडण्याच्या कामात विविध संस्था कार्यरत झाल्या आहेत.
पंतप्रधान इमरान खान यांनी दोषींना 48 तासांत अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान सरकारने हे काम प्राधान्यक्रमाने घेतलं आहे, असं गृहमंत्री शेख रशीद यांनी ट्वीट करून म्हटलं.
या घटनेची माहिती सर्वांना देताना गृहमंत्री शेख रशीद म्हणाले, "आम्ही अफगाण राजदूतांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत. सिलसिला हिला रस्त्याच्या कडेला सोडणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. तसंच त्या बाजारपेठेत लावण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासून पाहिलं जात आहे."
पोलिस काय म्हणतात?
या घटनेसंदर्भात पोलिस सध्या सर्व बाजूंचा तपास करत असून अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचं, इस्लामाबाद पोलिसांचे प्रवक्ते नईम इक्बाल म्हणाले.
इस्लामाबादच्या प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांनी राजदूत आणि त्यांच्या मुलीशी संपर्क साधला असून, सुरक्षेचं आश्वासनही दिलं आहे.
तपास पथकातील अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर बीबीसीला माहिती दिली. सिलसिला अलिखेल यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे, त्यानुसार घटनाक्रम आणि समोर आलेल्या प्रश्नांच्या दृष्टीनं तपास केला जात आहे, असं त्यांनी सांगितलं.
सिलसिला अलिखेल यांना शुद्ध आली तेव्हा त्या एफ-7 सेक्टरमध्ये होत्या, तिथून त्या एफ-9 सेक्टरला गेल्या असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण त्यांचं घर एफ-7 मध्येच आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सिलसिला अली यांच्या ओढणीमध्ये एक पन्नास रुपयांची नोट बांधलेली होती. त्यावर 'पुढचा क्रमांक तुमचा' आहे असं लिहिलेलं होतं. त्या नोटेचाही तपास केला जात आहे.
सिलसिला यांच्या मोबाईलची माहितीही घेण्यात आली असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.
इस्लामाबादेत राहणाऱ्या सर्व राजदुतांना ते शहराबाहेर जाणार असतील तर, सुरक्षेची खबरदारी म्हणून पोलिसांना माहिती द्यावी, अशा सूचना दिल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.
तालिबान सध्या अफगाणिस्तानातील एक एक भाग ताब्यात घेत आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानच्या राजदूतांच्या मुलीनं एकटीनं घराबाहेर जाणं आणि घरी येण्यासाठी टॅक्सीचा वापर करणं, ही चिंतेची बाब असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.
ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडल्याची माहिती आहे, पण वैद्यकीय तपासणी रात्री 9 वाजता पिम्स रुग्णालयात करण्यात आली.
सिलसिला अलिखेल एका खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेल्या होत्या, पण त्यांनी नकार दिल्याचंही सांगण्यात आलं आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तानदरम्यान तणाव वाढला
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नेत्यांमध्ये तणाव वाढत असताना ही घटना घडली आहे. अफगाणिस्ताननं पाकिस्तानवर तालिबानला मदत करण्याचा आरोप केला आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्धही सुरू आहे.
अफगाणिस्तानातून अमेरिकेचं लष्कर मागं हटल्यानंतर आता सुरक्षेच्या दृष्टीनं वातावरण अस्थिर झालं आहे. तालिबान रोज अफगाणिस्तानच्या नव्या-नव्या भागावर ताबा मिळवत असल्याचं पाहायला मिळालं आहे.
दरम्यान शुक्रवारी मध्य आणि दक्षिण आशियाच्या परिषदेत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यापासून अगदी थोड्या अंतरावर बसलेले होते. पाकिस्ताननं कट्टरतावादी समुहांशी संबंध कायम ठेवल्याचं यावेळी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तावर हल्ला करताना म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
गुप्तचर माहितीच्या हवाल्यानं अशरफ गनी यांनी त्यांच्या भाषणात गंभीर आरोप केले होते. गेल्या महिन्यात 10,000 पेक्षा अधिक 'जिहादी' अफगाणिस्तानात आले आहेत. तसंच पाकिस्तान सरकारला तालिबानला शांतता चर्चेसाठी राजी करण्यात अपयश आलं आहे.
अशरफ गनी यांच्या वक्तव्याच्या काही मिनिटांनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही प्रतिक्रिया दिली. या आरोपांमुळं निराश झाल्याचं इम्रान म्हणाले. तसंच संघर्षात पाकिस्तानची भूमिका नकारात्मक होती, हे ऐकूण वाईट वाटल्याचंही ते म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








