तालिबान: अफगाणिस्तानात अमेरिकेचा हवाई हल्ला

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेच्या लष्करानं कंदहारसह अफगाणिस्तानच्या अनेक भागांमध्ये अफगाण लष्कराच्या समर्थनार्थ म्हणजेच तालिबानच्या विरोधात हवाई हल्ले केले आहेत. पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी गुरुवारी या हल्ल्यांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण हल्ले नेमके कुठून झाले आणि विमानं कशी होती, हे मात्र त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं नाही.
"गेल्या काही दिवसांत आम्ही अफगाणिस्तानच्या सुरक्षेसाठी आणि सुरक्षा दलांना पाठिंबा देण्यासाठी हवाई हल्ले केले आहेत. पण या हल्ल्याबाबत आणखी तांत्रिक माहिती देऊ शकत नाही," असं ते म्हणाले.
अमेरिकेच्या दुसऱ्या एका लष्करी अधिकाऱ्यानंही किर्बी यांच्या वक्तव्यानंतर पत्रकारांना माहिती दिली.
अमेरिकेनं बुधवारी आणि गुरुवारी अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांच्या समर्थनार्थ चारपेक्षा अधिक हवाई हल्ले केले होते, असं ते म्हणाले.
तालिबाननं अफगाणिस्तानच्या लष्कराकडून हिसकावलेली उपकरणं आणि वाहनं या हल्ल्यात नष्ट केल्याचंही ते म्हणाले.
तालिबानची टीका
तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहीद यांनी हल्ल्यांवर टीका केली आहे. तसंच या हल्ल्यात तालिबानच्या कुणाचाही मृत्यू झाला नाही किंवा कोणी जखमी झालं नाही, असंही ते म्हणाले.
"अमेरिकेनं केलेली कारवाई म्हणजे दोहा कराराचं उल्लंघन असल्याचं आमचं मत आहे. यावर आम्ही शांत राहणार नाही आणि जे काही होईल त्यासाठी अमेरिका जबाबदार असेल," असं ते बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचं लष्कर परतत असलं तरी अमेरिका अफगाणिस्तानच्या लष्कराला सहकार्य सुरू ठेवणार असल्याचंही पेंटागॉनच्या एका प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेचं लष्कर ऑगस्टच्या अखेरीपर्यंत अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघार घेईल. तालिबानबरोबर झालेल्या करारानुसार अमेरिकेच्या लष्करानं मे महिन्यातच अफगाणिस्तान सोडायला सुरुवात केली होती.
अमेरिकेचं लष्कर माघारी हटल्यानंतरच तालिबाननं अफगाणिस्तानच्या अनेक जिल्ह्यांवर आणि भागांवर ताबा मिळवायला सुरुवात केली होती.
'तालिबानचा विजय शक्तीच्या जोरावर नाही'
तालिबाननं मिळवलेला विजय हा त्यांच्या शक्तीमुळं झालेला नाही, तर राजकीय वर्तुळातील काही जणांनी अफगाणिस्तानच्या लष्कराचं खच्चीकरण केल्यानं झाला आहे, असं अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार हमदुल्ला मोहीब यांनी म्हटलं.
अफगाणिस्तान लष्करासाठी रसद मिळवण्यासाठी परदेशी लष्कर आणि विशेषतः हवाई मार्गाने पुरवठ्यावर अवलंबून होता, असं त्यांनी अधोरेखित केलं. त्यामुळंच अफगाणिस्तानच्या लष्काराला अनेक जिल्ह्यांमध्ये पराभव पत्करावा लागला.

फोटो स्रोत, Getty Images
सरकार आता या भागाच्या सुरक्षेसाठी मर्यादीत साधनांचा वापर करण्यासाठीच्या योजनेवर काम करत आहे.
अमेरिकेचे लष्करप्रमुख मार्क मिल्ली यांनीही एका पत्रकार परिषदेत अफगाणिस्तानच्या लष्कराला अमेरिकेचं सहकार्य मिळत राहणार असल्याचं म्हटलं. तालिबानचे हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा दलांची नव्यानं रचना केली जात असल्याचंही ते म्हणाले.
अमेरिकेच्या लष्कर प्रमुखांच्या मते अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी विविध विभागांच्या राजधानी आणि शहरांच्या सुरक्षेसाठी काही जिल्हे गमावले आहेत.
तालिबानची वेगात आगेकूच
अमेरिकेच्या लष्कराच्या अफगाणिस्तान सोडण्याचा दिवस जवळ येत असून, तालिबान हळू हळू अफगाणिस्तानच्या मोठ्या भागावर ताबा मिळत आहे.
तालिबानला अनेक भागांमध्ये फारशा विरोधाचा सामना न करता ताबा मिळाला आहे.
अफगाणिस्तानच्या लष्करानं विविध भागांच्या राजधानी आणि देशाची राजधानी काबूलला संरक्षण दिलं आहे.
कंदहार आणि इतर अनेक शहरांत युद्ध सुरू आहे.
तर त्याचवेळी तालिबान अफगाणिस्तान सरकारबरोबर दोहा याठिकाणी शांतता करारासाठी चर्चाही करत आहे.
अफगाणिस्तानात पुढं काय होणार हे, बऱ्याच अंशी या शांतता चर्चेवर अवलंबून असेल.
विश्लेषकांच्या मते जर हा करार झाला नाही, तर अफगाणिस्तानला पुन्हा एकदा मोठ्या गृहयुद्धाचा सामना करावा लागू शकतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








