अमेरिका-तालिबानः अफगाणिस्तानमधील युद्धावरचे 10 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

फोटो स्रोत, BBC/Getty Images
वीस वर्षांनंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून आपलं सैन्य मागे घेतलंय. अमेरिका आणि मित्र सैन्यासाठी तालिबान आणि अल कायदा विरोधातल्या या युद्धात बागराम हा महत्त्वाचा हवाई तळ होता.
डिसेंबर 2001मध्ये अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानमधली कारवाई सुरू झाली. आणि तेव्हाच या तळाचं नुतनीकरण करून तो 10,000 सैन्य तुकड्यांना सामावून घेईल असा सज्ज करण्यात आला.
आता या तुकड्या इथून गेल्यात. आणि 11 सप्टेंबर पर्यंत उर्वरित अमेरिकन सैन्यही अमेरिकेत परतेल अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे.
तर अमेरिकन सैन्य माघारी परतत असलेलं बघून तालिबानने अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा आपल्या हालचाली सुरू केल्यात. किमान बारा जिल्ह्यांमध्ये त्यांच्या कारवाया वाढल्या आहेत.
या युद्धाची खूप मोठी किंमत आतापर्यंत नागरिक आणि सैन्यानेही चुकवलीय. पैसाही भरपूर खर्च झालाय.
पण, युद्धाची ही वीस वर्षं नेमकी कशी होती? आणि सरते शेवटी अमेरिकेचं उद्दिष्ट पूर्ण झालं का?
1) अमेरिकेनं अफगाणिस्तानात युद्ध का सुरू केलं?
11 सप्टेंबर 2011 ला अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन हजारच्या वर माणसं मृत्युमुखी पडली. अतिरेक्यांनी विमानांचं अपहरण करून ती दोन वर्ल्ड ट्रेड सेंटरचे टॉवर आणि पेंटागॉन इमारतींमध्ये घुसवली. चौथं विमान पेनसिल्व्हेनियातील एका मोकळ्या जागेत पडलं.
या हल्ल्याचा मास्टरमाईंड अल कायदा या दहशतवादी संघटनांचा प्रमुख ओसामा बिन लादेन असल्याचं स्पष्ट झालं.

फोटो स्रोत, Reuters
अफगाणिस्तान तेव्हा कट्टरपंथीय इस्लामिक गट असलेल्या तालिबानच्या ताब्यात होता. आणि त्यांनी लादेनला आश्रय दिला होता. लादेनला अमेरिकेच्या ताब्यात द्यायला त्यांनी नकार दिला.
त्यामुळे सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर एका महिन्यात अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले सुरू केले. तालिबान आणि अल कायदाचा नायनाट हे त्यांचं उद्दिष्ट होतं.
2) पुढे काय झालं?
अमेरिका आणि मित्र देशांनी केलेल्या हल्ल्यानंतर दोनच महिन्यात अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट कोसळली. त्यांचे सैनिक पाकिस्तानच्या दिशेनं पळाले.
पण, तालिबानचा पूर्ण पाडाव झाला नाही. त्यांचा उपद्रव आणि हल्ले सुरूच राहिले. अंमली पदार्थांची तस्करी, ऑनलाईन खंडणी आणि लोकांकडून कर वसूल करणे यातून ते पैसे उभे करत होतं.

फोटो स्रोत, Reuters
2004मध्ये अमेरिकेच्या पुढाकाराने अफगाणिस्तानात लोकशाही सरकार उभं राहिलं. पण, तालिबानचे हल्ले सुरूच राहिले. तालिबान नव्या जोमाने सतत प्रयत्न करतच राहिले. तालिबान आणि अमेरिकेतील संघर्षामुळे अफगाणिस्तानमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली.
3) अफगाणिस्तानच्या अडचणी 2001नंतर सुरू झाल्या का?
थोडक्यात सांगायचं तर नाही.
अफगाणिस्तानात कित्येक दशकं युद्धजन्य परिस्थिती आहे, अगदी अमेरिकेनं कारवाई सुरू करण्या पूर्वीही.
1970च्या दशकाच्या शेवटी सोव्हिएट रशियाने तिथल्या कम्युनिस्ट राजवटीच्या समर्थनार्थ अफगाणिस्तावर स्वारी केली होती. त्यांनी तिथल्या मुजाहिदिन चळवळीचा बिमोड केला. सोव्हिएट रशियाला अमेरिका, पाकिस्तान, चीन आणि सौदी अरेबियाचाही पाठिंबा होता.
रशियन सैन्याने 1989मध्ये अफगाणिस्तान सोडलं. पण, देशात नागरी युद्ध सुरूच राहिलं. आणि तिथून पुढे जो संघर्ष देशात घडला त्यातूनच तालिबान(शब्दश: अर्थ - विद्यार्थी) संघटना उभी राहिली.
4) तालिबान इतकी सामर्थ्यवान कशी बनली?
उत्तर पाकिस्तानची सीमा आणि नैऋत्य अफगाणिस्तानमध्ये 1990च्या सुरुवातीला तालिबानची पाळंमूळं रुजली. सामान्य जनता नागरी युद्धामुळे गांजली होती. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तालिबानने उचलली. आणि भ्रष्टाचार संपवण्याचं वचन लोकांना दिलं.

फोटो स्रोत, Getty Images
थोड्याच दिवसात तालिबानचं प्रस्थ वाढलं. आणि ते राज्य करत असलेल्या भागात त्यांनी कट्टर इस्लामिक शिक्षा लागू केल्या. खून आणि व्यभिचार करणाऱ्यांना मृत्युदंड आणि चोरीसाठी अवयव कापण्याची शिक्षा त्यांच्या राज्यात होती. पुरुषांनी दाढी राखणं बंधनकारक होतं. तर मुलींना बुरख्यात राहण्याबरोबरच दहाव्या वर्षीपासून शाळा सोडण्याचे निर्बंध होते.
5) मग तालिबानी कधीच अफगाणिस्तानमधून गेले नाहीत का?
मागच्या दोन दशकांत तालिबान बरीच बॅकफूटवर गेली आहे. पण, त्यांचा पूर्ण पाडाव झाला नाही.
2014 हे वर्ष अफगाणिस्तानमधील युद्धाचं सगळ्यात विघातक वर्ष होतं. पण, या वर्षाच्या शेवटी आंतरराष्ट्रीय फौजांनी अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. आणि तालिबानबरोबर युद्ध सुरू ठेवण्याची जबाबदारी अफगाणिस्तानच्या सैन्यावर आली.
पण, त्यामुळे तालिबानला नवीन उभारी आली. त्यांनी अफगाण सरकार आणि नागरी वसाहतींवरही बाँब हल्ले सुरू केले. 2018मध्ये बीबीसीने केलेल्या संशोधनात असं आढळून आलं की, किमान 70% अफगाणिस्तानी प्रांतांमध्ये तालिबान सक्रिय आहे.
6) या संघर्षाची किंमत काय?
2,300च्या वर अमेरिकन सैनिक आणि महिलांनी या संघर्षात जीव गमावलाय तर 20,000 लोक जखमी झाले. तर 450 ब्रिटिश लोक आणि शेकडो इतर देशाचे नागरिक ठार झाले.
अर्थातच, युद्धाचा सर्वाधिक फटका हा अफगाणिस्तानला बसलाय. संशोधक संस्थांचा अहवाल असं सांगतो की, त्यांच्या 60,000 सुरक्षा सैनिकांचा मृत्यू झालाय. 2009पासून संयुक्त राष्ट्रसंघाने तिथल्या जीवितहानीची नोंद ठेवायला सुरुवात केली आहे. आणि तेव्हापासून सैनिक आणि नागरिक मिळून 1,11,000 लोकांनी जीव गमावलाय.

तर या युद्धासाठी अमेरिकन करदात्यांचा 100 अब्ज अमेरिकन डॉलर इतका खर्च झालाय.
7) तालिबानशी वाटाघाटी शक्य आहेत?
फेब्रुवारी 2020मध्ये अमेरिकेनं तालिबानबरोबर अफगाणिस्तान शांतता करारावर स्वाक्षरी केली. कराराच्या वाटाघाटी कित्येक वर्षं सुरू होत्या.
या करारानुसार, अमेरिका आणि इतर मित्र सैन्याने आपले सैनिक मागे घेण्याचं मान्य केलं. आणि तालिबानने त्यांचं नियंत्रण असलेल्या प्रांतामध्ये अल कायदा किंवा इतर दहशतवादी संघटनेला थारा देणार नाही अशी हमी दिली. तर अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानमध्ये गेल्यावर्षी झालेल्या करारानुसार, दोघांनी एकमेकांच्या ताब्यात असलेल्या कैद्यांना सोडण्याचं मान्य केलं.
करारानंतर पुढच्या काही महिन्यात अफगाणिस्तान सरकारने 500च्या वर तालिबानी सैनिकांना तुरुंगातून सोडलं.
अमेरिकेनं तालिबानवर लादलेले निर्बंध मागे घेण्याचं वचन दिलं. आणि संयुक्त राष्ट्रसंघाने लादलेले निर्बंध मागे घेण्यासाठी पुढाकार घेण्याचं मान्य केलं.
अमेरिकेनं थेट तालिबानाशी या वाटाघाटी केल्या. यात अफगाणिस्तान सरकारचा सहभाग नव्हता. 'इतक्या वर्षांनंतर आता सैन्य मायदेशी बोलवण्याची वेळ झाली आहे,' असं तेव्हाचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप तेव्हा म्हणाले होते.
8) अमेरिकन सैन्याच्या सगळ्या तुकड्या मायदेशी गेल्या का?
बागराम हवाई तळावरून शेवटची अमेरिकन आणि मित्रराष्ट्रांची तुकडी गेल्या आठवड्यात मायदेशी परतली. तिथली सुरक्षा आता अफगाण सरकारच्या हातात आहे.
पण, 650 अमेरिकन तुकड्या अजूनही अफगाणिस्तानमध्ये असणार आहेत. तशी बातमी असोसिएटेड प्रेसनं दिली आहे. अमेरिकन दूतावासातले अधिकारी, कर्मचारी आणि काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी हे सैन्य तिथं तैनात असेल.
9) सध्याची परिस्थिती काय आहे?
अमेरिकेबरोबर झालेल्या शांतता करारानंतर तालिबानने आपली रणनिती काहीशी बदलली आहे. शहरं आणि सैनिकी तळांवर संघटित हल्ले करण्याऐवजी अफगाण सरकारमधील महत्त्वाच्या लोकांची हत्या करून जनतेला भयभीत करण्याचं त्यांचं धोरण आहे.
परदेशी सैन्य इथून हटल्यावर पुन्हा एकदा अफगाणिस्तानचं सरकार उलथून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी पुन्हा काही प्रांतांवर ताबा मिळवायला त्यांनी सुरुवात केली आहे.
अल कायदाही इथं सक्रिय आहे. तर इस्लामिक स्टेट्सनेही काही हल्ले घडवून आणले आहेत.
अफगाणिस्तानमध्ये काय होणार याबद्दल काळजी व्यक्त होत असताना, अध्यक्ष अश्रफ घनी यांनी आपलं सैन्य तालिबानला रोखण्यासाठी सक्षम असल्याचा दावा केला आहे.
10) अफगाणिस्तान युद्धाची वीस वर्षं: काय साध्य झालं?
याविषयी बीबीसीचे सुरक्षाविषयक प्रतिनिधी फ्रँक गार्डनर म्हणतात, "तुम्ही त्याकडे कशा नजरेनं बघता यावर या युद्धाचं फलित अवलंबून आहे.''
ते पुढे म्हणतात, 'अफगाणिस्तान सैन्यातील वरिष्ठ सूत्रांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, युद्ध झाल्यापासून या भूमीतून एकही गंभीर आंतरराष्ट्रीय दहशतवादी कृत्याचा कट रचला गेलेला नाही. किंवा पार पाडण्यात आलेला नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी लढ्याचा विचार केला तर हे युद्ध यशस्वी झालं असंच म्हणावं लागेल,' गार्डनर यांनी आपला मुद्दा पूर्ण केला.
पण, युद्धाला वीस वर्षं झाली तरी तालिबान संघटनेचा पुरता पाडाव झालेला नाही. आणि अजूनही शांततेला धोका म्हणूनच त्यांच्याकडे बघितलं जाईल.
काही आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार, मागचा जून महिना हा हिंसाचाराच्या दृष्टीने मागच्या वीस वर्षांमधला एक वाईट कालावधी होता. शेकडो लोकांचा जीव गेला. आणि इथल्या कित्येक शाळा, सरकारी इमारती आणि उर्जा प्रकल्पही जमीनदोस्त झाले. अफगाणिस्तानच्या विकासाला हा मोठा धोका आहे.
अल कायदा, इस्लामिक स्टेट्स आणि इतरही दहशतवादी गट गायब झालेले नाहीत. वर अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या फौजा इथून गेल्यामुळे त्यांना पुन्हा लढण्याचं बळ मिळालं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








