You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बायडन यांनी धोकादायक म्हणताच पुतिन काय म्हणाले?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे आपल्याला धोकादायक वाटत असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नुकतंच केलं होतं.
या वक्तव्यावरून पुतिन चिडले असून बायडन यांनी लाईव्ह कार्यक्रमात माझ्याशी चर्चा करावी, असं आव्हान त्यांनी दिलं आहे.
यावेळी रशियाच्या सुरक्षा संस्थांनी विरोधी पक्षातील नेते अॅलेक्सी नवालनी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपही पुतिन यांनी फेटाळून लावले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नुकतीच ABC न्यूजला एक मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी पुतिन यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.
अमेरिकेच्या 2020 च्या निवडणुकीत पुतिन यांनी केलेल्या लुडबुडीची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असं बायडन यांनी म्हटलं होतं.
गेल्या वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत गैरप्रकार करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी एक मोहिमेला मंजुरी दिली होती, असा अहवाल अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थांनी नुकताच दिलेला आहे. याविषयी बोलताना बायडन यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.
रशियाने ही निवडणूक अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला होता, असं या अहवालात म्हटलं आहे.
ही निवडणूक अटीतटीची झाली. पण अखेर या निवडणुकीत बायडन विजयी झाले.
त्यानंतर रशियाने आपल्या राजदूतांना अमेरिकेतून चर्चेसाठी बोलावलं होतं. संबंध इतकेही खराब होऊ नये की सुधारताही येऊ नयेत, अशी भूमिका रशियाने नंतर घेतली.
पण आता या अहवालावरून अमेरिका पुढील आठवड्यात रशियावर काही निर्बंध लावणार असल्याची शक्यता आहे.
पुतीन यांचं स्पष्टीकरण
जो बायडन यांच्या आरोपांवर बोलताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी एक कविता ऐकवली.
आपण जसे असतो, दुसरी व्यक्तीही तशीच आहे, असं आपल्याला वाटतं, असा या कवितेचा अर्थ होतो.
रशियन टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत पुतिन म्हणाले, "आम्ही लहानपणी खेळाच्या मैदानात भांडण करायचो, ते दिवस मला अजूनही आठवतात. त्यावेळी आपण जसे असतो, दुसरी व्यक्तीही तशीच आहे, असं आपल्याला वाटतं, असं आम्ही नेहमी म्हणत होतो."
पण योगायोगाने हा फक्त लहान मुलांचा विनोद नाही. तर याचे अनेक मानसिक मथितार्थ आहेत. आपण इतरांना पाहातो, ते तसेच असतील असा विचार आपण करतो. आपण जसे असतो, तसाच विचार आपण करतो. इतर व्यक्तींच्या कार्याबद्द्दल आपण मूल्यांकन करतो आणि आपलं मत प्रकट करतो."
पुतिन यांनी यावेळी अमेरिकेला प्रत्युत्तरही दिलं. स्थलांतरित अमेरिकन लोकांनी मूळ अमेरिकन लोकांचा नरसंहार केला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्ब टाकून मोठ्या संख्येने सामान्य नागरिकांचा बळी घेतला, असा आरोपही पुतिन यांनी केला.
पुतिन यांनी बायडन यांना चर्चेचं आव्हानही दिलं आहे. येत्या शुक्रवारी किंवा सोमवारी लाईव्ह ऑनलाईन चर्चा करा, असं पुतिन म्हणाले.
अशा प्रकारची खुली चर्चा रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी रंजक ठरेल, असंही पुतिन यांनी म्हटलं.
बायडन यांनी मर्यादा ओलांडली
मॉस्को येथील बीबीसी प्रतिनिधी सारा रेंसफोर्ड यांच्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचा अपमान केल्याचं सरकारी माध्यमांनी म्हटलं आहे. बायडन यांनी मर्यादा ओलांडली, असं त्यांनी म्हटलं आहे.
रशियन राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान क्रेमलिनच्या प्रवक्त्यांच्या मते, अमेरिकेसोबत रशियाचे संबंध आता प्रचंड बिघडले आहेत.
इतकंच नव्हे, तर येत्या काळातही हे संबंध अधिक बिघडतील, असंही त्यांनी म्हटलं.
जो बायडन यांचे आरोप बिनबुडाचे असून अमेरिकेला रशियासोबतचे संबंध सुधारायचे नाहीत, असे संकेत यातून मिळतात, असंही प्रवक्त्यांनी म्हटलं.
बायडन-पुतिन यांच्यात याआधीही झालेला वाद
दहा वर्षांपूर्वी बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना जो बायडन उपराष्ट्राध्यक्ष होते.
त्यावेळी बायडन यांनी रशियाला येऊन क्रेमलिन येथे पुतिन यांची भेट घेतली होती.
पुतिन त्यावेळी हंगामी पंतप्रधान म्हणून काम करत होते.
काही वर्षांनी जो बायडन यांनी न्यू यॉर्करला एक मुलाखत दिली होती.
आपल्या रशिया भेटीची आठवण सांगताना बायडन यांनी त्यावेळी सांगितलं, "मी म्हटलं, मिस्टर प्राईम मिनिस्टर, मी तुमच्या डोळ्यात पाहतो आहे. तुम्हाला मन आहे, असं मला वाटत नाही."
बायडन पुढे म्हणतात, त्यानंतर पुतिन यांनी माझ्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाले, 'आपण एकमेकांना चांगलंच ओळखतो.'
गेल्या वर्षी निवडणुकीच्या आधीही बायडन यांनी पुतिन यांच्यावर टीका केली होती.
ब्लादिमीर पुतिन यांच्या सोव्हिएत सिक्रेट सर्व्हिसमधील इतिहासाचा संदर्भ देत ते रशियाच्या KGB या गुप्तहेर संस्थेचा ठग असल्याचं बायडन यांनी म्हटलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)