रशियाच्या कैदेत असलेल्या एका अमेरिकन गुप्तहेराची गोष्ट....

अमेरिकेत लाखो लोक नाताळचा सण साजरा करण्याच्या तयारीला लागले आहेत. मात्र, एक अमेरिकन नागरिक नाताळचा सण साजरा करू शकणार नाही.

या व्यक्तीचं नाव आहे पॉल वीलन. पॉल यांना नाताळचा सण रशियातील एका लेबर कॅंपमध्ये साजरा करावा लागणार आहे. याचं कारण, गुप्तहेर असल्याचा आरोपावरून पॉल यांना अटक झाली आहे. त्यांच्या सुटकेबाबत सुरू असलेली चर्चा थांबली आहे.

अटक झाल्यानंतरचा पॉल यांचा हा पहिला इंटरव्ह्यू. जेलमध्ये कैदेत असताना चोर, खूनी यांच्यासोबतचे दिवस पॉल आठवतात. 'ती परिस्थिती अत्यंत बिकट होती,' असं ते म्हणतात. चार सरकारसोबत सुटकेसाठी चर्चा केल्याची माहिती पॉल देतात.

पॉल यांनी नौदलात देशसेवा केली आहे. ते नेहमी म्हणतात, 'मी कोणताच गुन्हा केला नाही. रशियातील अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण आणि खोट्या प्रकरणात मला अडकवण्यात आलं.'

पॉल हाय-प्रोफाईल कैदी आहेत. कौटुंबिक नात्यांमुळे त्यांच्याकडे ब्रिटन, कॅनडा आणि आयर्लंडचा पासपोर्ट आहे. पण, सुटकेसाठी त्यांना कैद्यांच्या अदला-बदलीवर अवलंबून रहावं लागणार आहे.

मात्र, ही गोष्ट सहा महिने आधीची आहे.

'रात्री दर दोन तासांनी उठवलं जातं'

पॉल वीलन यांना आयके-17 या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. हे जेल रशियाची राजधानी मॉस्कोपासून 8 तासांच्या अंतरावर आहे.

जेलमध्ये पॉल मला सांगतात, 'मी सकारात्मक रहाण्याचा प्रयत्न करतो.'

या कॅंपमध्ये एक भाग कोरोनाचा संसर्ग पसरण्याच्या भीतीने क्वॉरन्टाइन करण्यात आला आहे. जेलचे कर्मचारी रात्री दर दोन तासांनी उठवतात. पांघरूण फाडून टाकतात, फोटो घेतात. बहुधा हे पाहण्यासाठी, की जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न तर केला नाही ना!

ते पुढे सांगतात, 'मी 16 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेवर लक्ष देत नाही. फक्त एका दिवसबद्दल विचार करतोय.'

अटकेत असताना, सुनावणी दरम्यान आमची चर्चा झालीये. पण, कोठडीचा दरवाजा सुरक्षारक्षक लगेचच बंद करायचे.

पॉल वीलन यांना दोषी ठरवण्यात आलं. आपली बाजू समोर ठेवण्यासाठी त्यांनी जेलमधून मला फोन केला.

पॉल वीलन यांना दोन वर्षांपूर्वी मॉस्कोच्या एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. तो दिवस आठवताना पॉल सांगतात, 'मी तयार होत होतो. जेव्हा अचानक एक व्यक्ती आला.'

रशियामध्ये पॉल वीलन यांच्या मित्रांपैकी तो एक होता. 2006 मध्ये वीलन पहिल्यांना रशियामध्ये आले. पॉल या व्यक्तीला, त्याच्या कुटुंबीयांना ओळखत होते. त्यांच्या घरीदेखील जाऊन आले होते.

वीलन म्हणतात, 'हा व्यक्ती त्यांना पर्यटनस्थळावर घेऊन जात असे. एका परदेशी नागरिकासोबत तो खूष दिसत होता.'

मात्र, हा व्यक्ती रशियाच्या फेडरल सिक्युरीटी सर्विस (एफएसबी) साठी काम करत होता. त्या दिवशी हॉटेलमध्ये आल्यानंतर, काही वेळातच त्यांच्या साथिदारांनी वीलन यांना अटक केली.

एका फोनवरून झालेल्या संभाषणादरम्यान त्यांनी मला सांगितलं, 'मला पकडून जमिनीवर झोपवण्यात आलं. पहिल्यांदा मला वाटलं कोणीतरी थट्टा करतंय. मात्र, काही वेळातच सत्य समोर आलं.'

वीलन सांगतात, 'त्यांच्या विरोधातील हे प्रकरण खोटं आणि त्यांच्या मित्राच्या जबाबावर आधारित आहे.'

पॉल वीलन त्यांची बाजू सांगतात, 'गोष्टी अशी की, अमेरिकेची गुप्तचर संस्था डीआयए ने मला मॉस्कोमध्ये एक फ्लॅश ड्राइव्ह घेण्यासाठी पाठवलं. यात बॉर्डर गार्ड शाळेतील मुलांची नावं आणि फोटो आहेत.'

पॉल सांगतात, इंटरनेटच्या युगात अशा पद्धतीचं मिशन तर्कहीन म्हणावं लागेल.

या गुप्त माहितीसाठी बहुदा चार महिने आधीच पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. पण, पॉल वीलन म्हणतात, 'हे पैसे कर्ज म्हणून मित्राला दिले होते. त्याच्या पत्नीसाठी नवीन फोन घेण्यासाठी.'

'एफएसबीने एक खोटी गोष्ट तयार केली. ठोस पुरावे कधीच समोर आले नाहीत,' असं वीलन पुढे सांगतात.

'रशियामध्ये लोकांना उचलून गोळी मारल्याचं ऐकलं होतं. ही परिस्थिती काही अशीच होती.'

कैद्यांची अदलाबदली

पॉल वीलन यांच्या वक्तव्याची शहानिशा करता येणं शक्य नाही. याचं कारण, रशियामध्ये गुप्तहेर प्रकरणात वकीलांना कोणतीही माहिती देणार नाही असा करार लेखी स्वरूपात करावा लागतो. कोर्टाची कारवाई अत्यंत छुप्या पद्धतीने बंद दरवाजाच्यामागे केली जाते.

त्यांच्या वापर रशिया काही लोकांच्या बदल्यात करणार असल्याचा, वीलन यांना विश्वास दाखवण्यात आला.

ते पुढे सांगतात, 'दोन नावं नेहमी घेतली जातात. हत्यारं विकणारा विक्टर बाऊट कॉन्सटेंटीन यारोशेंको. ज्याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही रशियन नागरीक अमेरिकेच्या जेलमध्ये कैद आहेत.

मात्र, या दोन व्यक्तींना गुप्तहेराचा आरोप नाकारणाऱ्या व्यक्तीच्या बदल्यात मागणं, जरा अतिशयोक्ती वाटते.

अमेरिकन सरकारचे प्रयत्न

मॉस्कोमधील अमेरिकेचे राजदूत सांगतात, 'अमेरिकन सरकार, रशियाच्या सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. मात्र, त्यांनी स्पष्ट शब्दात याची माहिती दिली नाही.'

गेल्या आठवड्यातच अमेरिकेचे राजदूत जॉन सुलीवन यांनी माझ्याशी बोलताना सांगितलं होतं, 'मी फक्त पॉल यांची सुटका करून, त्यांना मिठी मारणार आहे. त्यांना मिशिगनला घरी पाठवण्याची इच्छा आहे. यापेक्षा जास्त काहीच नाही.'

अमेरिकेच्या राजदूतांनी पहिल्यापासून या गुप्तहेर प्रकरणावर विश्वास बसत नाही अशी भूमिका घेतली होती. जेल कॅंपमध्ये ते वीलन यांना भेटण्यासाठी गेले होते.

राजदूत सुलीवन सांगतात, 'डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्ष असताना. माझ्यासाठी, पॉलसाठी लढण्याशिवाय माझी इतर कोणतीच प्राथमिकता नव्हती. पॉल यांची सुटका व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.'

'सद्य स्थितीत अमेरिकन सरकार मान्य करेल अशा कोणत्याच अटींपर्यंत आम्ही पोहोचलेलो नाही,' असं ते सांगतात.

वीलन यांच्या मोठ्या बहिणीने सांगितलं, 'माझं माझ्या भावावर प्रचंड प्रेम आहे. पण, एका पर्यटकासाठी तुम्ही वाईट लोकांची अदला-बदली करू शकत नाही. हे चुकीचं आहे. लोकांना अदला-बदलीची कल्पना फार छान वाटते.'

एलिझाबेथ वीलन पुढे म्हणतात, 'नेत्यांना या प्रकरणी थोडा जास्त विचार करण्याची गरज आहे. ट्रंप व्हाईट हाऊस सोडण्याआधी.'

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाच्या मुद्यावर कठोर निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. याबद्दल एलिझाबेथ सांगतात, 'आशा करूया की, रशियाच्या सरकारला काही मिळवण्याची त्यांच्याकडे एक संधी आहे हे कळेल.'

एलिझाबेथ आपल्याकडून सर्व प्रयत्न करत आहेत. त्यांनी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे #freepaulwhelan या हॅशटॅगने एक फ्लॅश ड्राइव्ह पाठवला होता. पण, तो परत आला.

एकेकाळी सुरक्षा सल्लागार असलेले पॉल वीलन आता जेलमध्ये कैद्यांचे यूनिफॉर्म शिवण्याचं काम करतात.

त्यांच्याबद्दलचा निर्णय मॉस्को आणि अमेरिका यांच्यात लटकलेला आहे.

सोपं काहीच नाही.

फोनवरच्या संभाषणात वीलन मला सांगतात, 'मी संयम ठेऊन वाट पहातोय. मला माहित आहे. माझ्यासारखे अनेक असतील. पण, मी याठिकाणी जास्त काळ राहू इच्छित नाही.'

'त्यांनी एका पर्यटकाचे अपहरण केलं. मला माझ्या घरी परतायचं आहे. कुटुंबियांना पहायचं आहे. मला जगायचं आहे,'

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)