व्लादिमीर पुतीन यांच्यावर आयुष्यभर कुठलाही खटला चालू शकणार नाही, रशियाच्या संसदेत विधेयक पास

पुतीन यांच्यावर आयुष्यभर कुठला खटला चालू शकणार नाही, रशियाच्या संसदेत विधेयक पास

रशियन संसदेचं कनिष्ठ सदन डुमामध्ये एक विधेयक पास झालं आहे ज्याच्याअंतर्गत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि त्यांच्या कुटुंबावर ते राष्ट्राध्यक्ष नसले तरी कोणताही फौजदारी खटला चालवता येणार नाही.

हे विधेयक त्या घटनादुरुस्त्यांचा भाग आहे ज्यांना जुलै महिन्यात एका सार्वमताव्दारे मंजुरी दिली गेली होती. पुतीन यांच्या समर्थकांकडे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत आहे.

व्लादिमीर पुतीन यांचा कार्यकाळ 2024 ला पूर्ण होईल, पण या घटनादुरुस्त्यांमुळे त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही दोन टर्म म्हणजे 12 वर्षं राष्ट्राध्यक्ष पदावर राहाता येईल.

हे विधेयक आल्यानंतर पुतीन यांच्या राजकीय भविष्याबद्दल तर्कवितर्क सुरू झाले आहेत. सन 2000 पासून पुतीन राष्ट्राध्यक्ष आहेत आणि त्यांनी आपल्या कार्यकाळात सत्तेचा भरपूर वापर केला आहे.

पुतीन यांचे विरोधक अॅलेक्सी नवलानी यांनी हे विधेयक आल्यानंतर ट्वीट केलंय की, "पुतीन यांना आता बचावासाठी विधेयकाची काय गरज आहे?"

यानंतर नवलानी यांनी ट्वीट करून एक प्रश्न विचारला की, "हुकूमशाह काय आपल्या मनाला वाटेल तेव्हा पद सोडू शकतात का?"

डुमात हे विधेयक तीन वेळा मांडलं जाणार आहे. मंगळवारी, 17 नोव्हेंबरला, पहिल्यांदा हे विधेयक पारित केलं गेलं. सदनात पुतीन यांचा पक्ष युनायटेड रशियाला बहुमत आहे पण डाव्या पक्षांच्या 37 खासदारांना या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं.

याशिवाय अजून दोनदा हे विधेयक डुमात मांडलं जाईल आणि त्यानंतर हे विधेयक फेडरेशन काऊन्सिल, म्हणजे संसदेच्या वरिष्ठ सदनात जाईल आणि सरतेशेवटी राष्ट्रपती पुतीन याच्यावर स्वाक्षरी करतील.

काय आहे या विधेयकात?

या नव्या विधेयकाअंतर्गत माजी राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय कोणत्याही प्रकारचे फौजदारी खटले, पोलीस तपास यांच्या कक्षेतून बाहेर राहतील. त्याबरोबरच त्यांची संपत्ती जप्त करता येणार नाही.

'दुर्मीळ परिस्थिीत केलेले मोठे गुन्हे किंवा कथित राजद्रोहाच्या घटना' वगळता राष्ट्रपतींच्या हयातीत त्यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करून खटला चालवता येणार नाही.

सध्या रशियाचे एकच माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव जिवंत आहे आणि ते व्लादिमीर पुतीन यांचे सहकारी आहेत. या विधेयकाच्या लेखकांपैकी एक असणारे खासदार पावेल क्रिशनिकोव यांचं म्हणणं आहे की, "या विधेयकाचा उद्देश राष्टाध्यक्षांना 'एक गॅरेंटी' देण्याचा आहे जी देश आणि समाजाच्या स्थिरतेसाठी महत्त्वाची आहे."

यावर्षी जुलै महिन्यात घटनादुरूस्तीसाठी केलेल्या सार्वमतानुसार पुतिन 2024 नंतरही 6-6 वर्षांसाठी आपल्या पदावर कायम राहू शकतील म्हणजेच 2036 पर्यंत पुतीन रशियाचे राष्ट्रपती असतील.

विरोधी पक्षाने मात्र या सार्वमताच्या निकालाचा विरोध केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, 'पुतीन आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष राहू इच्छितात.'

पुतीन मात्र कायम हे आरोप नाकारत आलेले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)