You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मंगळावर अमेरिका, चीन आणि यूएई एकाच वेळी का जात आहेत?
येत्या काही दिवसांत एक,दोन नव्हे तर तीन अंतराळयानं मंगळावर जाणार आहेत. त्यामुळे मंगळ ग्रहाच्या संशोधनात प्रगती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE),चीन आणि अमेरिकेचं अवकाश यान मंगळ ग्रहावर संशोधनासाठी जाणार आहे.
भूगर्भशास्त्र आणि हवामानाचा अभ्यास करण्यासाठी तसंच प्राचीन सूक्ष्म जीवाणूंच्या अस्तित्वाची संभाव्य लक्षणं शोधण्यासाठी मंगळ ग्रहावर जाणाऱ्या या मोहिमांचं नियोजन करण्यात आलं आहे.
9 फेब्रुवारीला संयुक्त अरब अमिरातीची 'होप' ही मंगळ मोहीम सुरू झाली. दोन दिवसांनी तियानवेन-1 ही चीनची मोहीम लाँच होणार आहे तर नासाची मोहीम 18 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
पृथ्वी आणि मंगळ ग्रह आपआपल्या कक्षात फिरत असताना सध्या एकमेकांच्या जवळ आले आहेत. सूर्याभोवती फिरताना त्यांच्या वेगवेगळ्या वेगामुळे दोन्ही ग्रहांमधील अंतर सतत बदलत असतं. त्यामुळे कमी झालेलं अंतर कमी इंधनाच्या सहाय्याने पार करता येतं.
मोहीमेसाठी दर 26 आठवड्यातून एकदा कमीत कमी इंधन वापरलं जातं. पण प्रत्येक अवकाश मोहिमेप्रमाणे या तीन मोहिमांसमोरही मोठी आव्हानं आहेत. अवकाशातून जमिनीवर येण्याच्या "सात मिनिटांची दहशत" हे आव्हानही कायम आहे.
मंगळ ग्रहावर जाणाऱ्या जवळपास 50 टक्के मोहिमा अपयशी ठरत असतात. तेव्हा यावेळी शास्त्रज्ञांना या तीन मोहिमांकडून किती आशा आहे? आणि ते काय शोधण्याचा प्रयत्न करतील? याचा आढावा आपण घेणार आहोत.
UAE ची 'होप' मोहीम
युएईची पहिली ऐतिहासिक मोहीम गेल्यावर्षी जुलै महिन्यात जपानहून लाँच करण्यात आली होती. या मोहिमेत मंगळ ग्रहावरील हवामानाचा वेध घेतला जाईल. असं संशोधन यापूर्वी कोणत्याही मंगळ ग्रहाच्या मोहिमेत करण्यात आलेलं नाही.
विशेषत: मंगळ ग्रहावरील हवा कशी कमी झाली आणि पाण्याच्या अस्तित्वाबाबत अधिक माहिती मिळू शकेल, असं शास्रज्ञ सांगतात. चिनी आणि अमेरिकन मोहिमेच्या तुलनेत 'होम' मोहीम मंगळावर उतरणार नाही पण साधारण 687 दिवस ग्रहाभोवती फिरेल.
साधारण सप्टेंबर महिन्यापासून यासंदर्भातील माहिती पृथ्वीवर पोहचण्यास सुरूवात होईल. पण याआधी या मोहिमेला एक गंभीर आणि गुंतागुतीचा टप्पा पार करावा लागणार आहे, असं युएईच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. यासाठी एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
बीबीसीचे विज्ञान प्रतिनिधी जोनॅथन अमोस यांनी 'होप' मोहिमेचे वर्णन करताना मोहिमेला वैज्ञानिक प्रयत्नांपेक्षा इतर पैलू अधिक असल्याचं म्हटलं आहे. "ही मोहीम युएईमधील तरुणांना प्रेरणादायी ठरू शकेल. अरब भागात शाळांमध्ये आणि उच्च शिक्षणात विज्ञान शिकण्यासाठी प्रोत्साहन देईल," असं ते म्हणाले.
फक्त अमेरिका, भारत, पूर्वाश्रमीचा सोव्हिएत युनियन आणि युरोपियन स्पेस एजन्सी यापूर्वी मंगळावर यशस्वीरित्या पोहोचले आहेत.
योगायोगाने संयुक्त अरब अमिरातीच्या स्थापनेच्या 50 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 'होप' मोहीम सुरू होत आहे. यावेळी संयुक्त अरब अमिरातीतील ऐतिहासिक ठिकाणं लाल रंगात उजळून निघाली.
युएईमध्ये #ArabstoMars हॅशटॅग वापरला जात आहे. तसंच दुबईचा बुर्ज खलिफा हा जगातील सर्वांत उंच टॉवर एका उत्सवी कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असेल.
चीनची तियानवेन-1 मोहीम
चीनची पहिली मंगळ मोहीम ज्याला "Questions to Heaven" म्हणून संबोधलं जातं ही प्रत्यक्षात ग्रहापर्यंत पोहेचण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा वेळ घेणार आहे. यामुळे अभियंत्यांना धोकादायक टप्प्यात पोहचण्यापूर्वी ग्रहांच्या वातावरणाचा वेध घेण्याची संधी मिळेल.
मंगळावर उतरण्यासाठी शास्त्रज्ञांना 20,000 किमी प्रति तास प्रवासाचा वेग कमी करण्याचं आव्हान पेलणं गरजेचं आहे.
मे महिन्यापर्यंत युटोपिया इम्पॅक्ट बेसिनमधील एका सपाट मैदानावर 240 किलो वजनाचा रोव्हर उतरवण्याची आशा चीनला आहे. फोल्ड-आऊट सोलर पॅनल्सवर चालणारा हा रोव्हर त्या प्रदेशाच्या भूगर्भशास्त्राचा तसंच अगदी खोलवर पृष्ठभागाचा अभ्यास करणार आहे.
एक उंच मास्ट फोटो काढण्यासाठी आणि नेव्हिगेशनला मदत करण्यासाठी कॅमेऱ्यासहीत सज्ज आहे. आणखी पाच उपकरणं स्थानिक खडकांच्या खनिजाचं मूल्यांकन करण्यास आणि बर्फ शोधण्यास मदत करतील.
रोबोट किमान 90 दिवसांसाठी काम करेल असं चिनी शास्त्रज्ञांना अपेक्षित आहे. आतापर्यंत केवळ अमेरिकेला दीर्घकालीन मोहीम पूर्ण करण्यात यश मिळालं आहे. (सोव्हिएतच्या मंगळ-3 आणि युरोपच्या बीगल-2 मोहिमा उतरल्या होत्या पण काही वेळातच ते अपयशी ठरले.)
तियानवेन-1 मोहिमेकडून आधीच मंगळ ग्रहाची प्रतिमा पृथ्वीवर पाठवण्यात आली आहे. शियापारेली क्रेटर आणि व्हॅलेस मरीनरिस सारखी भौगोलिक वैशिष्ट्यं आणि मंगळाच्या पृष्ठभागावरील दशांशांचा प्रचंड पट्टा दाखवणारा एक ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो आहे. मंगळापासून 22 लाख किलोमीटर अंतरावरून हा फोटो काढण्यात आला.
तियानवेन-1 हा मंगळावर पोहोचण्याचा चीनचा पहिला प्रयत्न नाही. 2011 मध्ये प्रक्षेपण अयशस्वी ठरल्याने रशियाबरोबरची एक मोहीम अकाली संपली. पण चंद्रावर दोन रोव्हर्स पाठवल्यानंतर चीनचा आत्मविश्वास वाढला आणि गेल्या वर्षी चीन हा दूरवर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश ठरला.
अमेरिकेची परसीवरन्स मोहीम
नासाची मोहीम मंगळावरील प्राचीन सूक्ष्मजीवांचे पुरावे शोधणार आहे. यामध्ये मंगळावर जीवन होतं की नाही याचे संकेत देणारे खडकाचे नमुने गोळा केले जातील.
दुसऱ्या ग्रहावर उतरण्यासाठी पाठवलेले सर्वांत मोठं, अत्याधुनिक यान 18 फेब्रुवारीला मंगळावरील जेझिरो नावाच्या विषववृत्तीय खड्ड्यावर स्पर्श करेल अशी अपेक्षा आहे.
"जेव्हा शास्त्रज्ञ जेझिरो क्रेटर या आमच्या लँडिंग साईटकडे पाहतात तेव्हा त्यांना प्रत्येक गोष्टीत वैज्ञानिक पैलू दिसतात. या खड्ड्याच्या आत आणि बाहेर वाहणारी नदी सुक्ष्मजीवांचे जीवाष्म शोधण्यासाठी उपयुक्त माध्यम बनेल असं शास्त्रज्ञांना वाटतं. पण जेव्हा मी जेझिरोकडे पाहतो तेव्हा मला धोका दिसतो," असं मोहिमेचे अभियंता अलन चेन यांना वाटतं.
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "सगळीकडे धोका आहे. 60-80 मी. उंचीचा हा खडक आहे. जो आमच्या लँडिंग साईटच्या मध्यभागी दिसतो. जर तुम्ही पश्चिमेकडे पाहिलंत तर असे काही खड्डे आहेत ज्यापैकी एकात आपण यशस्वीपणे उतरलो तरी रोव्हर मधून बाहेर पडू शकत नाही. पूर्वेकडे पाहिलं तर असे मोठे खडक आहेत जे खाली ठेवल्यास रोव्हर दुखावेल."
"सुदैवाने, आमच्या मोहिमेच्या तंत्रज्ञानाची पुरेशी चाचणी झाली आहे. यामुळे मोहीम पृष्ठभागावर सुरक्षित बिंदूपर्यंत पोहोचली पाहिजे," अशी आशा ते व्यक्त करतात.
रोव्हरचा आकार एका छोट्या एसयूव्हीसारखाच आहे आणि त्याचे वजन एक मेट्रिक टन आहे.
हे यान दररोज 200 मीटर उंचीवरून जाऊ शकतं आणि त्यात 19 कॅमेरे आणि दोन मायक्रोफोन आहेत. यामुळे मंगळ ग्रहावरील आवाज रेकॉर्ड करण्याचा प्रयोग पहिल्यांदाच केला जाईल अशी आशा शास्त्रज्ञांना आहे.
या मोहिमेत प्रथमच दुसऱ्या जगावर 1.8 किलो वजनाचं ड्रोन उडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मंगळ ग्रहावरून घेतलेले नमुने पृथ्वीपर्यंत पोहचल्यानंतरच याबाबतची संपूर्ण ठोस माहिती प्रसिद्ध करता येईल. ही मोहीम संपुष्टात येण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत वाट पाहवी लागेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)